दृष्टिवंत योगिता

2
26

योगिता तांबे ही अंध आहे. मात्र तिच्‍या आंतरिक गुणांनी शारिरीक उणेपणावर मात केली आहे.

योगिता जोगेश्वरीतील ‘अस्मिता विद्यालया’त संगीतशिक्षक म्हणून काम करते. ती तेथे 2012 पासून कार्यरत आहे. तिने शाळेत बालवाद्यवृंद बसवला आहे. योगिताला संगीत व गाणी ऐकण्याचा छंद आहे. तिला तीन हजार गाणी तोंडपाठ आहेत. ती एकंदर पंचवीस तालवाद्ये वाजवते. तबला, मृदुंग, ढोलकी, ढोलक, धनगरी ढोल, ताशा, दिमडी, हलगी, नगारा… इत्यादी. तिची स्मरणशक्ती दांडगी आहे. त्‍याचा आश्चर्य वाटावा असा नमुना म्हणजे तिला तब्बल पंधराशे जणांचे मोबाईल नंबर पाठ आहेत.

योगिता मूळची लांजाची. तिचे बालपण, तिच्या आजी-आजोबांकडे मुंबईत जोगेश्वरी येथे गेले. योगिताला जन्मापासूनच दृष्टिदोष आहे. तिला सुरुवातीला अगदी थोडे दिसायचे. त्यामुळे तिला सर्वसामान्य मुलांच्या शाळेत घातले, ज्युनियर, सिनियर केजीमध्ये. परंतु तिच्या डॉक्टरांनी तिच्या पालकांना योगिताला ब्लार्इंड स्कूलमध्ये घालावे असे सुचवले. डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे वयाच्या दहाव्या वर्षी योगिताला दादरच्या ‘कमला मेहता अंध शाळे’त घातले गेले. ती निवासी शाळा आहे. तेथे योगिताचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. योगिताला दहावीला ७०.९२%  मार्क मिळाले. पुढे योगिताने अकरावीला रुईया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ती तेथून इतिहास विषय घेऊन बी.ए. व पुढे एम.ए. झाली. तिने बी.ए. तसेच एम.ए.ला फर्स्ट क्लास मिळवला.

योगिताला ‘कमला मेहता’ या शाळेत संगीत विषय अनिवार्य होता. अंध मुलांना त्या कलेचा भविष्यात उपयोग व्हावा हा त्यामागचा उद्देश. योगिताला बालपणापासून वाद्यांची आवड आहे. तिला विशेष करून तालवाद्य आवडतात. योगिताची ती आवड तिच्या आईवडिलांच्या लक्षात आली, त्यांनी योगिताला वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपासूनच तबला शिकवण्यासाठी सतीश पिंपळे यांची नियुक्ती केली. योगिता त्यापूर्वी हाताशी येईल त्यावर ताल धरून वाजवत असे. टेबल, कपाट, टीपॉय, घरातील भांडी असे काहीही! त्यामुळे पिंपळेसर तबल्याचे बोल शिकवू लागले, तेव्हा ते तिला कंटाळवाणे वाटू लागले. वयाच्या सातव्या वर्षी, योगिताने पिंपळेसरांना काय सांगावे? “सर, तुम्ही कोणतेही गाणे सांगा – हिंदी, मराठी गाणे, आरती, अभंग… अगदी काहीही! मी त्याला तबलासाथ करते. तुम्ही माझे काय चुकते आहे ते सांगा!” योगिता अचूक ताल पकडून वादन करू लागली. त्यावेळी पिंपळेसर म्हणाले, “हिला दैवी देणगी आहे!”

योगिताला ‘कमला मेहता अंध शाळे’त दरवर्षी संगीतातील एक राग शिकवला जात असे. त्यामुळे योगिता दहावीपर्यंत दहा-बारा राग शिकली. योगिताने संगीताच्या तीन परीक्षाही दिल्या आहेत. योगिताचा कल तालवाद्यांकडे अधिक आहे हे शाळेतील शिक्षकांच्याही लक्षात आले होते. त्यामुळेच शाळेने योगिताला सहावी आणि सातवी ही दोन वर्षे ‘अल्लारखाँ इन्स्टिट्यूट’मध्ये तबला शिकण्यासाठी पाठवले होते. योगिताने तेथे तबल्याचे शास्त्रीय शिक्षण घेतले.

योगिता म्हणाली, “आम्हाला पहिलीपासूनच, गाण्यांच्या स्पर्धेत सक्तीने भाग घ्यावा लागायचा. इतर मुली गात असताना, त्यांना मी व तबला वाजवणाऱ्या आणखी दोघी-तिघीजणी साथ करत असू. पण जेव्हा आम्हाला गायचे असे, तेव्हा आम्हाला साथ कोण करणार? असा प्रश्न उभा राहत असे. त्यामुळे मग आम्ही गात असतानाच तबलाही वाजवू लागतो.” अशा प्रकारे स्वत: तबला वाजवत गाणे हे वैशिष्ट्य आहे. असे फार क्वचित आढळते.”

योगिता नॅशनल लेव्हलवर युथ फेस्टिव्हलमध्ये २००८-०९ सालापासून भाग घेत आहे. तेथेच तिची सुमीत पाटीलशी ओळख झाली. सुमित पेशाने आर्ट डायरेक्टर आहे. सुमीत अंधांना ड्रॉईंगशी संबंधित गोष्टी शिकवतो. योगिताने 2015 साली मनश्री सोमण आणि प्रशांत बनिया या इतर दोन अंध व्यक्तींसोबत लोअर परळ येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाच्‍या गणेशोत्सवासाठी आठ गणपती आणि देखावा उभारला होता. त्‍यांनी पंचगंगा सार्वजनिक मंडळाच्‍या ‘डोनेट आईज’ या थीमकरता गणपती निर्मितीचे कामगिरी शिरावर घेतली आणि यशस्‍वीपणे पार पाडली. त्‍यांच्‍या कामाची दखल ‘लोकसत्‍ता’ वर्तमानपत्राने घेतली होती. त्या उपक्रमात योगिताच्‍या टिमला सुमितचे मार्गदर्शन होते.

योगिता शाळेला सलग दोन-तीन दिवस सुट्टी असते तेव्हा रत्नागिरीला जाते. योगिताची आई रत्नागिरी येथे असते. योगिताच्या वडिलांचे तेथे पूर्वीपासून ‘जनरल आणि स्टेशनरीचे’ दुकान आहे. वडील २००९ साली वारल्यानंतर आई ते दुकान चालवते. योगिताला एक मोठी बहीण होती. तीही अपंग होती. ती पंधरा वर्षांपूर्वी वारली. योगिता रत्नागिरीला गेली तरी तेथे घरासमोर असणाऱ्या ‘स्वरेश’ संगीत विद्यालयात तबल्याचे शिक्षण घेते.

योगिता मुंबईत असते, तेव्हा नाटकांना बॅकग्राउंड म्युझिक देते. त्याशिवाय कांचन सोनटक्के यांच्या ‘नाट्यशाळा’ या संस्थेतर्फे होणाऱ्या बालनाट्यांनाही संगीत देते. ती सध्या त्यांच्याच ‘शहणपण देगा देवा’ या नाटकाला संगीत देत आहे.

योगिताने बनवलेला पहिला गणपती पद्मासन मुद्रेतील वाद्यांचा गणपती होता. त्यात योगिताने डफापासून गणपतीचे उदर, ढोलकीच्या मांड्या, खंजिरीचे तोंड, खेळण्यातील मृदुंगाचे डोळे, वीणेचे गंध, वाद्यांच्या पानांचे सूप आणि सोंड म्हणून बासरीचा वापर केला होता. तिने एकेक वाद्य एकमेकांवर रचून तो गणपती साकार केला होता.

योगिताने तयार केलेला दुसरा गणपती पानाफुलांचा होता. योगिता म्हणते, “गणपती मूलाधार-चक्राधार चक्रावर विराजमान असलेली देवता आहे. पृथ्वी विश्वाचा मूलाधार आहे. वृक्षतोड, पर्यावरणाच्या एकूणच ऱ्हासामुळे मनुष्यच त्या मूलाधारावर कुऱ्हाड मारत आहे.” योगिताच्या मते, गणपती हा निसर्गात, कलेत, संगीतात आणि माणसाच्या शरीरातच आहे.

योगिताचा कुंडलिनीशास्त्राचाही अभ्यास आहे. त्या अंतर्गत तिने ‘देव व विज्ञान’ या विषयांचा अभ्यास केला आहे. योगिता माणसाच्या शरीरातील सर्व चक्रांविषयीची सविस्तर माहिती सांगू लागते तेव्हा ऐकणारा चाट पडतो.

योगिताने ग्रॅज्युएशन करत असताना ‘स्त्री सक्षमीकरणा’वर एक प्रोजेक्ट केला होता. त्याला ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ तसेच, ‘नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लार्इंड’तर्फे पारितोषिक मिळाले आहे. ती त्या ‘स्त्री सक्षमीकरणा’वरच्या प्रोजेक्टचा दीड तासांचा कार्यक्रमही करते.

योगिताला नाटकाला बॅकग्राऊंड म्युझिक देण्यासाठीचा शंकर घाणेकर राज्यस्तरीय पुरस्कार (२००६) मिळाला आहे.

तिने ‘फोक ऑर्केस्ट्रा’या इव्हेंटसाठी नॅशनल लेव्हलवरील सांघिक सुवर्णपदक मिळवले आहे. त्यात तिने ढोलकी, दिमडी, हलगी आणि नगारा ही चार वाद्ये वाजवली होती. (२००८-०९).

तिने लिहिलेल्या ‘आजची भारतीय स्त्री सुरक्षित आहे का?’ या निबंधास २०१३ साली ‘कोमसाप’चे बक्षीस मिळाले आहे. तिला फेब्रुवारी २०१५ मध्ये फिनिक्स अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

गणपती उत्सवादरम्यान तयार केलेल्या गणपतीसाठी व सजावटीसाठी ‘मुंबईचा राजा’ या सन्मानाने गौरवण्यात आले आहे.

योगिताच्या ठायी असलेल्या गुणांची यादी येथेच संपत नाही. ती काव्यलेखन, अभंगरचनाही करते. अगदी कॉलेजात असल्यापासून.

योगिता तिच्या भविष्यातील स्वप्नाबाबत म्हणते, “मला भविष्यात निसर्गसंगीताला साद देणारे कलाकार घडवायचे आहेत. सध्याच्या पिढीला जे रिमिक्स, डीजे म्युझिक ऐकायला मिळत आहे, त्यापासून दूर, ख-या संगीताकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. डीजे संस्कृतीचा शरीरातील लिम्बिक एरियावर परिणाम होऊन, कलेच्या बाबतीतील रसग्रहणता हळुहळू कमी होते, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. त्यामुळे संगीताचे पर्यावरणही बिघडत आहे. मला रसिकता टिकवून ठेवत व भारतीय संगीत निसर्गाशी कसे एकरूप आहे ते पटवून देऊन, नवे कलाकार घडवायचे आहेत.”

नजरेला सीमा असल्या तरी दृष्टी अमर्याद असलेल्या योगितासारख्या ‘दृष्टिवंता’ला भेटायला मिळणे, तिच्याशी दोस्ती होणे हे माझे भाग्यच आहे असे मला वाटते.

योगिता तांबे – 9702354531

– पद्मा क-हाडे

About Post Author

2 COMMENTS

  1. Khrch ha upkram khup chhan
    Kharch ha upkram khup chhan aahe. Ya websitemule khup lok pudhe yet aahe.

Comments are closed.