सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी व तालुक्याचे गाव. तेथे जेमतेम अठ्ठावन्न सेंटिमीटर पाऊस पडतो. ते एकेकाळी ‘सोन्याचे सांगोला’ म्हणून प्रसिद्ध होते. ती समृद्धी राहिलेली नाही. विजयसिंह मोहिते, सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार अशा तीन गटांच्या गटबाजीमुळे तालुक्याच्या विकासाचे तीन तेरा वाजले! गटबाजीचा फायदा घेत शेकापचे गणपतराव देशमुख दीर्घकाळ त्या भागाचे आमदार राहिले. ग्रामपंचायती, सहकारी संस्था, पंचायत समिती, नगरपालिका अशी तालुक्यातील सत्ताकेंद्रे शेकापच्या ताब्यात आहेत, परंतु त्यांना सांगोला तालुक्याची श्रीमंती टिकवता आलेली नाही. अशा या उपेक्षित भागात पुण्यासारख्या, संधींची उपलब्धता असलेल्या शहरातून कोणी जाणार नाही, असे असूनही एम.बी.बी.एस.ला ‘सर्जरी’मध्ये चौथा क्रमांक पटकावणा-या संजीवनी गोडबोले यांनी स्वत:हून सांगोल्यातील ‘स्थळा’ला पसंती दिली. त्या सांगोल्यातील डॉ. सतीश केळकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांचा प्रेमविवाह नव्हता. वडिलांच्या ओळखीतील दाताच्या एका डॉक्टरांनी स्थळ सुचवले आणि संजीवनी सांगोल्याच्या झाल्या. नात्यातला महिलांनी संजीवनी यांच्या मातोश्रींना त्यावेळी म्हटले, हा काय वेडेपणा चाललाय या मुलीचा! दुष्काळी गावातील असुविधा तुमच्या (संपन्न) घरातील मुलीला सहन होणार आहेत का? पण पुण्यातल्या संपन्न कुटुंबातून १९७० च्या दशकात सांगोल्याला समजून उमजून स्थायिक झालेल्या संजीवनी यांनी अथक परिश्रमातून तेथे आदर्श सामाजिक कार्य उभे केले आहे. महिलांचे आरोग्य, बालकांचा विकास, अनौपचारिक शिक्षण, अन्यायाविरुद्ध संघर्ष, ग्रामीण आरोग्य, पर्यावरण साक्षरता, पारंपरिक लोकर उद्योगाचा विकास, महिलांचे बचतगट आणि त्यातून आर्थिक स्वावलंबन अशी डॉ. संजीवनी केळकर यांच्या रचनात्मक कामांची साखळी आहे.
डॉ. संजीवनी सांगतात, मी सुरुवातीपासून ठरवून असे काहीच केलेले नाही. माझे सासरे या विभागातले वैद्यकीय अधिकारी होते. ते अडल्यानडल्या गरिबांची मदत करत. मी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम करू लागले. माझे पती डॉ. सतीश यांची मला कामात साथ मिळाली. शहरी महिलांपेक्षा ग्रामीण महिलांच्या जगण्यातील अडचणी, त्यांचे आरोग्याचे प्रश्न पूर्णपणाने वेगळे असतात हे अनुभवातून समजत गेले. अडचणी आल्या की त्यावर मार्ग शोधताना कामाच्या नवनवीन कल्पना सुचायच्या. मग त्यातून नवी कामे उभी राहायची.
लोकांची परिस्थिती हलाखीची. त्यात चौदाव्या-पंधराव्या वर्षीच मुलीचे लग्न लावून दिले जायचे. मुलगी माता होण्यासाठी सक्षम व्हायच्या आत तिच्यावर गर्भारपण लादले जायचे. मुलगी म्हणून जन्मापासून उपेक्षा वाट्याला आलेली. पालनपोषण नीट न झाल्याने रक्तात लोहाचे, हिमग्लोबिनचे प्रमाण कमी, डॉ. संजीवनी म्हणतात, “जेमतेम प्रवास भाड्यापुरते पैसे बरोबर असलेल्या मुलींना रक्तवाढीच्या गोळ्या-इंजेक्शन द्यायच्या. त्याचबरोबर आहारातून लोह कसे मिळते हे समजावून सांगावे लागायचे. हे सारे विसंगत वाटायचे. माता सुदृढ असेल तर सुदृढ मूल जन्माला येईल हे त्यांना पटवण्यासाठी आम्ही महिलांच्या मदतीने ‘माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ ची स्थापना केली.”
गरोदर महिलांची नोंदणी करायची, त्यांचे आहारविषयक प्रबोधन करायचे. त्यांना गर्भारपणातील धोके समजावून सांगायचे. नियमित तपासणी, प्रसूतीपूर्व रक्त-लघवीची तपासणी, योग्य वेळचे औषधोपचार यामुळे परिसरातील गर्भारपण, बाळंतपण यांमधील महिला व नवजात अर्भके यांच्या मृत्यूचे प्रमाण घटले. आणि समाजाला संस्थेचे महत्त्व पटले! त्याचा जनजागृतीचे कार्यक्रम राबवण्यास उपयोग झाला. ‘जननी- सुरक्षा’ या शासकीय योजनेमार्फत मिळणारे अर्थसाहाय्य बाळंत झालेल्या महिलांना मिळवून देण्यात त्याची मदत झाली. ‘सामुदायिक स्तरावर जनजागृती असल्याशिवाय अशा शासकीय योजनांचे लाभ महिलांपर्यंत पोचवता येत नाहीत’ असा डॉ. संजीवनी यांचा अनुभव आहे.
महिलांचे काही आजार, पाळीच्या तक्रारी, गरोदरपणातील सामान्य उणिवा या अशा असतात, की त्या वेळीच लक्षात आल्यास त्यावर स्थानिक पातळीवर उपचार करता येतात व पुढचा धोका टळतो. संस्थेने त्याकरता वाडीवस्तीवरील महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले आहे. त्यांना कुटुंब नियोजनाचेही ज्ञान दिले आहे.
“मी येथे प्रॅक्टिस चालू केली तेव्हा या परिसरात मी एकटी महिला डॉक्टर होते. त्यावेळी माझ्या असे लक्षात आले, की महिला साध्या साध्या तक्रारींसाठी दूरवरून येतात. त्यांचा जाण्या-येण्यात दिवस जातो. रोजंदारी बुडते. शिवाय प्रवास खर्च आणि औषधांचा खर्च वेगळाच. प्रशिक्षित ‘आरोग्यदूत’ महिला स्थानिक पातळीवर गावच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवू लागल्याने ते सोयीचे झाले आहे.” असे संजीवनी सांगतात. त्याच्याच जोडीला संस्थेने ‘यू.जी. पटेल फाऊंडेशन’च्या अर्थसहाय्याने ‘आरोग्यदूत’ हा अद्ययावत फिरता दवाखाना सुरू केला आहे. त्याचा लाभ निवडलेल्या वाड्यावस्त्यांवरील दहा हजार लोकसंख्येस मिळतो.
‘मुक्त विद्या केंद्र’ हा नवा उपक्रम तरुण मुलांना ‘आरोग्यप्रशिक्षण’ देऊन संपूर्ण वस्तीचे आरोग्य सुधारण्यासाठी नव्या पिढीचा उपयोग करून घेतो.
स्वभावाने व परिस्थितीने गरीब असलेली एक तरुण महिला एक दिवस डॉ. संजीवनी यांच्या दवाखान्यात आली. त्या गरोदर महिलेची रक्त-लघवीची तपासणी करताना डॉक्टरांच्या असे लक्षात आले, की ती एच.आय.व्ही पॉझिटिव्ह आहे. अधिक चौकशी करता समजले, की नव-याच्या बदफैलीपणामुळे नव्हे तर मुकादमाने केलेल्या लैंगिक शोषणाने महिलेला तो रोग जडलेला आहे. तसेच, त्या समस्येचा संबंध महिलांच्या आर्थिक सक्षमतेशी आहे हे जाणून महिला बचत गटांचा उपक्रम सुरू झाला.
“बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांची हिंमत आणि किंमत वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे” असे डॉ. संजीवनी यांचे मत आहे. प्रत्येक बचत गटाची वेगळी गटप्रमुख, गावातील सर्व गटांची काळजी घेणारी ‘सगुणा’, दहा गावांतील बचतगटांची काळजी वाहणारी ‘संघटिका’, त्यांची काळजी घेणारी ‘प्रमुख समन्वयक’ आणि संस्थेच्या कार्यकारिणीमधील ‘बचतगट विभाग प्रमुख’ अशा साखळीतून बचतगटांचे काम चालते. प्रत्येक महिन्याला सगुणा व संघटिका यांच्या बैठका होतात. सहा महिन्यांतून एकदा बचतगट प्रमुखांचे प्रबोधन व प्रशिक्षण मेळावे होतात. वर्षाच्या शेवटच्या सप्ताहात, २५ डिसेंबरला बचतगटांच्या वार्षिक महामेळाव्याचे आयोजन केले जाते. ‘मन’ आणि ‘मनी’ या दोन्हींच्या व्यवहारांचे संवर्धन तेथे होते. रीतसर व्यवसाय प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना बचतगटातून आणि बॅंकेकडून पुरेसा कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला जातो.
कर्ज व्यवसायासाठी वापरले जाते. त्याची परतफेडही सचोटीने वेळेत केली जाते. अनेक महिलांनी त्यातून नवीन उद्योग उभे केले तर काही जणींनी त्यांच्या शेती-पशुपालनाच्या पारंपरिक व्यवसायात भरभराट आणली असल्याचे डॉ. संजीवनी अभिमानाने सांगतात. ‘उत्कर्ष महिला उद्योग’ या नावाने महिलांनी एक निधीही उभारला आहे.
महिलांना प्रशिक्षित करण्यासाठी संस्थेने महिला-प्रशिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. कपडे-शिलाई, भरतकाम, लेदर व रेक्झिन पर्स बनवणे, चटपटीत खाद्यपदार्थ व दिवाळीचा फराळ तयार करणे, परसबाग, शेळीपालन, फळप्रक्रिया, इतकेच नव्हे तर संगणक प्रशिक्षण इत्यादींचे प्रशिक्षणवर्ग तेथे सतत चालू असतात. त्या उपक्रमात संस्थेला ‘स्वयंसिद्धा’चे नेहमी सहकार्य मिळत असते.त्याचप्रमाणे सर्व बचतगटांना ‘नाबार्ड’कडून अर्थसहाय्य मिळते. सर्व बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्रीकेंद्र सुरू करण्यात आलेले आहे.
‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ विविध शैक्षणिक उपक्रम १९७९ पासून राबवत आहे. त्यामध्ये जिजामाता बालसंस्कार केंद्रामधून ग्रामीण बालकांना व किशोरवयीन मुलामुलींना बाह्यजगताशी परिचित करून देण्यात येतो. त्यामध्ये त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होईल याकडे लक्ष दिले जाते. वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या सहा ते बारा वयोगटातील बालकांसाठी छंद वर्ग चालवले जातात. त्यातून त्यांच्या बुद्धिमत्तेचे विविध पैलू विकसित करण्याचा प्रयत्न असतो. आठ ते चौदा वयोगटातील मुलांसाठी त्यांचे शरीर, मन, घरातील माणसांशी नाते, भविष्यकाळासाठीची तयारी याबद्दल चर्चेच्या माध्यमातून नवी माहिती दिली जाते. मुलांच्या विचारांना चालना देणारे वैज्ञानिक खेळ, स्पर्धा घेतल्या जातात. शैक्षणिक सहली-शिबिरांचे आयोजन केले जाते. मुलांची गणिताशी मैत्री व्हावी म्हणून ‘अॅबॅकस’ या आधुनिक तंत्राचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या कलागुणांच्या विकासासाठी गायन, वादन, नृत्य यांच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले जाते.
संस्थेने १९८३ साली ‘उत्कर्ष बालक मंदिर’ व १९८४ मध्ये ‘उत्कर्ष प्राथमिक विद्यालया’ची स्थापना केली. १९९० पासून ‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्रा’च्या समन्वयातून खेडोपाडी अनेक बालवाड्या सुरू केल्या. विद्यार्थ्यांनी आनंदी वृत्तीने शिक्षण घेताना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा. परस्पर सहकार्य, सचोटी, चिकाटी, जिद्द हे त्यांच्यातील गुण वाढीस लागावेत अशा रीतीने शाळेत उपक्रम राबवले जातात. पाठ्यपुस्तकावर आधारित नियमित प्रकल्प मांडणी. स्वयंअध्ययनाची सवय दृढ होण्यासाठी गटपद्धतीने शिक्षण,कृतिपत्रिकांचा मुक्त वापर, इंग्रजी संभाषण कला विकसित करण्यावर भर, प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र अवांतर वाचनपेटी, संगणक प्रशिक्षण इत्यादी उपक्रम शाळेत राबवले जातात. ‘ग्राममंगल’, ‘सृजन आनंद’, ‘अक्षरनंदन’ इत्यादी प्रयोगशील शाळांच्या संपर्कात राहून शाळा स्वत:ची उपक्रमशीलता अद्ययावत ठेवते. शिक्षकांसाठी क्षमता विकसनाचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. नियमित पालक सभा घेऊन शिक्षक-पालक यांच्यात संवाद घडवला जातो. त्यामुळे पालकांना त्यांच्या पाल्यांची प्रगती समजते तसेच त्यांना शाळेचे वेगवेगळे उपक्रम जाणून घेता येतात.
सांगोला तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. एकेकाळी मेंढ्यांच्या लोकरीचे सूत कातण्याचा व सुताची घोंगडी विणण्याचा व्यवसाय तेजीत चालत असे. सध्या त्या कारागिरांची स्थिती हलाखीची आहे. लोकरीशिवाय मेंढीचे मांस आणि खत हा तालुक्यातील प्रमुख कच्चा माल आहे. संस्थेने नाबार्डच्या प्रायोजकत्वातून ‘लोकर उत्पादन विकास’ प्रकल्प उभारला आहे. त्यामध्ये मेंढीपालनापासून लोकरीच्या विविध वस्तू निर्मितीच्या प्रत्येक टप्प्याशी निगडित असणा-या लोकसमुहांचा विचार केला असून त्यांचा व्यवसाय विकसित करण्याचा त्यात प्रयत्न आहे. प्रकल्पातील नाबार्डच्या सहभागामुळे राज्यशासनाच्या महसूल, पशुधन विकास, कृषी, जिल्हा उद्योग केंद्र कुरण विकास, हस्तकला, यांसारख्या संबंधित खात्यांचे आणि शेळीमेंढी विकास महामंडळाचे व जिल्ह्यातील बॅकांचे सहकार्य या प्रकल्पास लाभले आहे.
या प्रकल्पातून मेंढपाळ, सूतकताई करणारे, जेन बनवणारे व घोंगडी विणणारे अशा चार स्तरांवरील जवळपास अडीचशे कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यासाठी या घटकांचे बचतगट बनवून त्यांना बॅंकेकडून वित्तपुरवठा करण्याचे प्रयत्न आहेत. व्यसनी पतीकडून मारहाण, सासरी हुंड्यासाठीचा छळ, पतीपत्नींमधील बेबनाव, गुंडांकडून फसवणूक-छेडछाड, विधवा-परित्यक्तांचा गैरफायदा अशा अनेक प्रकारांनी महिलांवर अन्याय-अत्याचार होत असतात. त्या अपप्रवृत्तींच्या विरुध्द संघर्ष करण्यासाठी ‘महिला अन्याय निवारण समिती’ आणि ‘भारतीय स्त्री-शक्ती’च्या समन्वयाने ‘मैत्रीण कुटुंब सल्ला व मार्गदर्शन केंद्र’ संस्थेने सुरू केले आहे. एका बाजूला महिलांना अन्यायाविरुध्द संघर्ष करण्याचे बळ द्यायचे तर दुस-या बाजूने समाजप्रबोधनाचे कार्यक्रम राबवायचे या प्रकारे महिला संघर्षाचे काम चालते. डॉ. संजीवनी स्वानुभवावरून सांगतात, “महिलांकडे उपजत शहाणपण असते. त्याचा कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी व समाजाच्या विकासासाठी वापर करता आला पाहिजे, आमचे असे निरीक्षण आहे की पुरुषांच्या अहंला छोट्या-छोट्या गोष्टींमधून धक्का पोचतो. पुरुषी वृत्तीला समजुतीने पायबंद घालण्याचा आमचा प्रयत्न असतो.”
शाळेत असताना ‘भूमिकन्या सीता’ या नाटकात सीतेची भूमिका करणा-या संजीवनी यांनी कॉलेजमध्ये वादस्पर्धाही गाजवल्या. ‘मेडिकल’ला ‘सर्जरी’त प्राविण्य मिळवले. विवाहानंतर ‘दुष्काळी सांगोल्यात’ स्थिरावताना भोवतालच्या ग्रामीण महिलांच्या समस्यांचे समजुतदारीने निरीक्षण केले. त्यातून तिथल्याच महिलांच्या मदतीने सामाजिक काम उभे केले.
विजय व वीणा देव (गो.नी.दांडेकरांच्या कन्या) दांपत्य या ‘नीरा-गोपाल’पुरस्कार देतात. डॉ. संजीवनी केळकर यांना हा पुरस्कार गतवर्षी मिळाला.
डॉ. संजीवनी केळकर,
केळकर हॉस्पिटल, सांगोला, जि. सोलापूर, ४१३ ३०७
९४२१०६३८२६, matabalak@yahoo.co.in
रमेश दिघे,
बी. आर. भोंगजवळ, १४९६, शुक्रवार पेठ,
नेहरू चौक, ‘प्रकाश मसाले’जवळ, पुणे – ४११ ०२२
९४२३० ४७४४०, rameshtdighe@gmail.com
टिप –
‘स्वयंसिद्ध’– महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वालंबी बनावे या उद्देशाने कोल्हापूरात सुरू करण्यात आलेली ही संस्था. कांचन परूळेकर या संस्थेच्या संस्थापक सदस्य असून ‘माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या’ सल्लागार आहेत.
कृतिपत्रिका– शाळेतील अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तकांवर आधारित असतो. ‘उत्कर्ष प्राथमिक विद्यालया’त पाठातील गाभाघटकावर लक्ष केंद्रीत केले जाते. उदाहरणार्थ, एका मुलाला संशयास्पद वस्तू आढळली. त्याने पोलिसांना पाचारण केले आणि ती वस्तू बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाली. यानंतर या पाठावर आधारित बॉम्ब कुठे ठेवला होता, वस्तू पाहिल्यानंतर मुलाने काय केले असे प्रश्न तयार करण्याऐवजी मुलांचे प्रसंगावधान, कुतूहल, धीटपणा कसा महत्त्वाचा आहे हे मुलांना समजू शकेल अशा कृतिपत्रिका तयार केल्या जातात.
जेन– मेंढीच्या लोकरीवर दाब देऊन त्याचे कारपेट तयार केले जाते. त्यास ‘जेन’ असे म्हणतात. घरात जमिनीवर, पलंगावर अंथरण्यासाठी, तसेच झोपताना अंथरूण म्हणन याचा वापर केला जातो.
नीरा-गोपाल’ पुरस्कार– गो. नी दांडेकरांच्या पत्नी नीरा यांच्या स्मरणार्थ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यक्तींकरीता ‘नीरा-गोपाल’ पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार गो.नी.दां.नी स्वतः सुरू केला होता. डॉ. संजीवनी केळकर यांना हा पुरस्कार गतवर्षी मिळाला. सध्या या पुरस्कारांच्या वितरणाची पूर्ण जबाबदारी विजय व वीणा देव दांपत्य (गो.नी.दांडेकरांच्या कन्या) यांच्याकडे आहे.
Last Updated On – 25th Nov 2016
I know this family well. Even
I know this family well. Even today their son Dr. Ranjeet is carrying out their social work with enthsiasum, and hard work. Hats off to Dr.Sanjeevanitai and all her faily members.
Comments are closed.