दीपक कलढोणे यांची संगीत मुशाफिरी

0
30
carasole

सोलापूर जिल्ह्यातील आणि राज्यातील नावाजलेल्या व्यासपीठांवर कला, संगीत, साहित्य अशा नानाविध क्षेत्रात सहजी मुशाफिरी करणारा दीपक कलढोणे हा कलाकार वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पोलिओच्या कारणाने एका पायाने अपंग आहे. एका पायावर ताण आल्याने वावरण्यात होणारा त्रास, तासन् तास चाललेल्या बैठकीतही एकाच पायावर होणाऱ्या वेदना सांभाळत रसिकांच्या हृदयात पांडुरंगाचे दर्शन घडवणाऱ्या या भल्या माणसाने गंभीर शारीरिक त्रासाचे ना कधी भांडवल केले, ना कधी कमीपणा वा न्यूनगंड ठेवला!

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकंब हे दीपक गोरख कलढोणे यांचे गाव. आई विजया. दीपक यांची या क्षेत्रात झालेली ‘एन्ट्री’ मजेशीर आहे. ते गावातील रामभाऊ जोशी हायस्कूलमध्ये शिकत असतानाची ती कथा. दुपारी ११ च्या दरम्यान मुंबई रेडिओ केंद्रावर ‘कामगार सभा’ हा कार्यक्रम प्रसारित होत असे. त्यात जितेंद्र अभिषेकी यांची ‘कैवल्याच्या चांदण्याला’, ‘सर्वात्मका सर्वेषु’ ही गाणी आवर्जून वाजायची. अभिषेकीबुवांच्या गाण्यांनी दीपकवर अशी जादू केली, की दररोज शाळेत नियमित असणारा तो गुणी मुलगा शाळेत उशिरा येऊ लागला. मुख्याध्यापक रघुनाथ देशपांडे यांनी त्याला उशीरा येण्याचे कारण विचारले आणि उत्तर ऐकून ते थक्कच झाले! दीपकने सांगितले, “सर वाटेतील घरात लागलेले कामगार सभेतील गाणे ऐकून मला काहीच सुचत नाही. अंगात काहीतरी संचारल्यासारखं होतं. मेंदूत काहीतरी भिनभिनतं. आणि मी जागेवरच राहतो. गाणं संपल्याशिवाय पायच उचलत नाही. मी तरी काय करू सर?” जितेंद्र अभिषेकी यांच्या ‘कैवल्याच्या चांदण्याला’ने दीपक यांच्यावर गाण्याचा पहिला संस्कार झाला होता. त्यावेळेस देशपांडेसरांनी दीपकला सुनावले, “उद्यापासून शाळेला उशीर झाला तरी चालेल पण ते गाणे चुकवायचे नाही!” त्यावेळेस देशपांडे सर आणि दीपक या दोघांना कल्पनाही नव्हती, की भविष्यात दीपक त्याच जितेंद्र अभिषेकी यांचा आवडता शिष्य होणार आहे!

अभिषेकी यांच्या गाण्याने दीपक कलढोणे यांचा कान तयार झाला. त्यांचे गाणे गुणगुणणे शाळेत एका शिक्षकांनी ऐकले आणि दीपक यांना ते गाणे थेट शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करायला लावले. कोठलीही सांस्कृतिक पार्श्वभूमी किंवा तयारी नसताना जाहीर कार्यक्रमात गायले गेलेले ते त्यांचे पहिले गाणे त्यांना वही बक्षीस देऊन गेले. चंद्रकांत पांडव हे त्यांचे गायनातले पहिले गुरु. पांडवसरांनी स्वत: स्वयंपाक करून, खाऊ घालून दीपकला शिकवले. त्यानंतर दीपक यांचे शिक्षण पंढरपूरला तात्या मंगळवेढेकरांकडे झाले.

दीपक यांना अगदी कमी वयात भांड्याची दुकानदारी करावी लागली. त्याच काळात त्यांनी त्यांच्या छोट्याशा गावात ‘कलोपासक मंडळ’ चालवले. त्या मंडळाच्या व्यासपीठावर त्यांनी शंकर पाटील, द.मा. मिराजदार, प्राचार्य शिवाजीराव भोसले अशा दिग्गजांना पाचारण करून साहित्य, ललितकला यांचा गावाला परिचय करून दिला. त्या सगळ्या कामात गावात कलारसिक ‘टीम’ उभी राहिली.

दीपक यांचा जितेंद्र अभिषेकींशी ओळख आणि शिष्यत्त्व हा प्रवास मजेशीर आहे. त्यांचे गायन आणि वादन ऐकायला कोणी कळती माणसे यावीत म्हणून गावातील त्यांच्या समवयीन मित्रांनी ‘दत्त दरबार’ स्थापन केला. एकदा सोलापूरचे रेल्वे स्टेशन मास्तर सुधाकर कुलकर्णी आले होते. त्यांनी दीपक यांचे गाणे ऐकले आणि ते भारावून गेले. ”तू तयारी ठेव, तुला जितेंद्र अभिषेकींकडे गाणे शिकायला नेतो”  असा त्यांनी शब्द दिला आणि खरा केला. जितेंद्र अभिषेकींकडे शौनक अभिषेकी, महादेव पेडणेकर, शेखर कुंभोजकर, हेमंत पेंडसे, देवकी पंडीत, अजित कडकडे अशा मोठ्या गायकांनी शिक्षण घेतलेले. त्या मालिकेत दीपक यांचेही नाव घेतले जाऊ लागले. त्या काळात लता मंगेशकर यांचा एक दिवसाचा सहवास लाभल्याची घटना, कलढोणे एखादे सोनेरी प्रमाणपत्र मिळाल्याच्या आनंदात सांगतात.

दीपक यांनी गावी परतल्यावर व्यक्तिगत शिक्षण आणि व्यासंग यापेक्षा पुन्हा ग्रामीण कलाकारांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी ‘बंदिश’ या नावाने दमदार चळवळ उभी केली. ‘बंदिश’च्या मार्गाने शेजारच्या मोडनिंब या गावातही ‘स्पंदन’ नावाची साहित्यिक चळवळ सुरु झाली. त्याशिवाय कथा, कविता, ललितलेखन, देशभक्तीपर गीते, पर्यावरण गीते आदी साहित्यप्रकार त्यांनी सहजपणे आणि सोप्या भाषेत हाताळले आहेत. दीपक यांना त्यांच्या प्रवासात त्यांची पत्नी मनीषा यांची पहाडासारखी भक्कम साथ आहे. त्या दीपक यांच्या कार्यक्रमांमध्ये व्यासपीठामागील महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. कन्या निरंजनी तर पुत्र निरज हे त्यांच्या संस्कारशीलतेने घरी येणाऱ्या पाहुण्यांची मने जिंकतात. ती बहीण-भाऊही संगीताचे धडे घेत आहेत. कलढोणे कुटुंबाशी भेट हा एक चैतन्याचा अनुभव असतो. त्यांच्याकडे काहीतरी नवीन शिकूनच आपण परततो.

दीपक सोलापूर तरुण भारत मध्ये ‘तरंग’ हे सदर गेली आठ वर्षे तर  दैनिक ‘संचार’मधून गेली दीड वर्षे ‘मनातल्या उनसावल्या’ हे सदर लिहीत आहेत. ‘लोकमत’ मधून त्यांचे संगीतविषयी पाक्षिक सदर गेले दीड वर्षे सुरू आहे.

दीपक कलढोणे यांच्या कार्यक्रमांची निर्मिती व सादरीकरण :

अमृताची फळे (अभंगगायन व संत चरित्रात्मक निवेदनाची मैफल )
भावपुष्पे : (पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीतरचनांचा वेध घेणारी निवेदनासहित मैफल )
व्हावी भेटी पायांची :  (संत तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राचा ललित भावरम्य आविष्कार)
माझी बहिणाई : (भूमिकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनचरित्रावर आधारित विशेष कार्यक्रम )
पियुषवाणी : संत नामदेवांच्या जीवनचरित्रावर आधारित विशेष कार्यक्रम. देशभक्तीपर गीते, पर्यावरण गीते, अभंग, गौळणी यांचा समावेश)
विठ्ठल सोयरा : अभंग गौळणीची ध्वनीमुद्रिका (सी.डी.)

– योगेशकुमार भांगे

Last Updated On – 5th Nov 2016

About Post Author