दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि.

सोलापूर जिल्ह्यात बत्तीस साखर कारखाने आहेत. त्यांतील पाच कारखाने माळशिरस तालुक्यात आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात नगर जिल्ह्याच्या सासवड, कोपरगाव, श्रीरामपूर या भागातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी परंपरागत शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला होता; पण शेतमालाच्या अनिश्चित भावामुळे, मुंबई राज्य पाटबंधारे खात्याने केलेल्या शिफारशीनुसार कालव्याच्या पाण्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन 17 नोव्हेंबर 1932 रोजी ‘दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लि., माळीनगर’ या कंपनीची स्थापना केली.

शेतक-यांनी सुरुवातीला अडीचशे मेट्रिक टन गाळप क्षमतेची मशिनरी इंग्लंडहून आयात केली. कारखान्याने शेतीसाठी आवश्यक जमीन त्यांच्या सभासदांना मूळ शेतकऱ्यांकडून विकत वा खंडाने घेऊन दिली. त्यांना त्यांच्या ऊसासाठी आवश्यक पाणी सरकारकडून विकत घेऊन पुरवले. तीच योजना सरकार ‘विशेष आर्थिक क्षेत्रा’द्वारे (सेझ) पुरस्कृत करते. तसेच, कंपनी ऊस उत्पादकांच्या उन्नतीसाठी बेणे, नांगरट वा तत्सम इतर सोयी पुरवते. कंपनीने ऊसगाळप क्षमता 1991 नंतर वाढवली. कंपनी प्रतिदिन तीन हजार ते बत्तीसशे मेट्रिक टन ऊसगाळप करते. कंपनीने शेतकऱ्यांना ऊसाचा कमाल दर मिळावा व इतर कारखान्यांच्या स्पर्धेत समर्थपणे टिकावे यासाठी ‘उपपदार्थ’ निर्मिती सुरू केली. त्यासाठी कंपनीने जून 2006 मध्ये तीस हजार एलपीडी रेक्टिफाइड स्पिरिट उत्पादन क्षमतेची अद्ययावत डिस्टिलरी सुरू केली. तेथे सरासरी एकशेअडतीस टक्के उत्पादन होते. नंतर मार्च 2008 मध्ये एलपीडी तीस हजार क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प सुरू केला. मार्च 2010 पासून तीस हजार लिटर क्षमतेचा धान्याधारित डिस्टिलरी प्रकल्प चालू केला आहे. डिस्टिलरी प्रकल्पातून पन्नास मेट्रिक टन टाकाऊ पदार्थांपासून गुरांचे चांगल्या प्रतीचे खाद्य, कोंबड्यांचे व माशांचे खाद्य तयार करण्याचा प्लाण्ट उभारला जाणार आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादनात वाढ होईल व शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग उपलब्ध होईल. बगॅसपासून 14.8 मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. पुणे येथे हॉटेल सेंट्रल पार्कच्या जागेमध्ये मोठा प्रकल्प होणार आहे.

संकुलात पाच प्राथमिक व माध्यमिक शाळा, बारावीपर्यंत शास्त्र व कला विद्यालय, इंग्रजी माध्यमाची शाळा, आयटीआय-इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी सुविधा असून त्यात साडेपाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तेथे सुसज्ज वाचनालय आहे. ‘माळीनगर फेस्टिवल’ दरवर्षी डिसेंबर महिन्यांत साजरा होतो. मे महिन्यांत ‘कमांडो निवासी शिबीर’ आयोजित केले जाते.

ऊस उत्पादकांच्या मागणीनुसार कर्ज व खत पुरवठा करण्यासाठी ‘शुगरकेन सोसायटी’ स्थापन झाली व त्या संस्थेने नुकतीच एकावन्न वर्षे पूर्ण केली. सभासद व कामगार यांच्या उन्नतीसाठी पतसंस्था व क्रेडिट सोसायटीही आहे. माळीनगरचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून ‘माळीनगर विकासमंडळ’ कार्यरत आहे. महिलांसाठी ‘महिला मंडळ’ व ‘गृहउद्योग’ आहेत. मागील तीन वर्षांत तीस हजारांपेक्षा जास्त विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या शासनासमोर मांडण्यासाठी ‘शेतकरी जागरण मंच’ही आहे.

माळीनगरवासीयांच्या आरोग्यासाठी नियमित योगासने, प्राणायाम वर्ग, जिम (व्यायामशाळा), टेनिसकोर्ट असून व्यापारासाठी मोठी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले आहेत.

सासवड माळी शुगर फॅक्टरी लि.
saswadmali@yahoo.com

– प्रमोद शेंडे

About Post Author