दलित महिला परिषदेच्या अध्यक्ष – सुलोचना डोंगरे

0
39
_DalitMahilaParishadechyaAdyaksha_SulochanaDongare_1.jpg

सुलोचना डोंगरे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील नागापूर या खेडेगावी 6 नोव्हेंबर 1919 साली सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील बनसोडे पाटील त्या गावच्या प्रतिष्ठित मंडळींपैकी गणले जात. ते शेतीवाडी बाळगून होते. ते गोरगरिबांना मदत वेळोवेळी करत असत. बाबासाहेबांच्या चळवळीतील वऱ्हाडातील बऱ्याच मंडळींचे त्यांच्या घरी जाणे-येणे असे. तेही चळवळीतील कार्यकर्ते होते. सभा-मीटिंगा होत; चर्चा चालत असत. ते सर्व सुलोचना यांनी लहानपणी पाहिले होते. नागापूर गावात शाळा नसल्यामुळे, त्यांचे प्रारंभीचे शिक्षण त्यांचे मामा जी.डी. बोरकर यांच्याकडे इंदूर मुक्कामी झाले. सुलोचना यांना बोरकर हे ब्राह्मो समाजिस्ट असल्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्या उच्च वर्गातील लोकांमध्ये वावरण्याची संधी मिळाली.

सुलोचना यांचा विवाह आठव्या वर्गात शिकत असताना 1934 साली अमरावती येथील पोस्टमास्टर चंद्रभान डोंगरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव सदाशिव डोंगरे यांच्याशी झाला. सुलोचना यांना लग्नानंतर शिक्षण पुढे घ्यायचे होते. त्यांनी त्यांची ती इच्छा त्यांच्या सासऱ्यांजवळ व्यक्त केली. सासरे सुशिक्षित असल्यामुळे त्यांना त्यांचे पुढील शिक्षण घेण्यास कोठलीच अडचण आली नाही. त्यांचे यजमान पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते.

सुलोचना यांनी मॅट्रिक झाल्यावर नागपूरच्या मॉरिस कॉलेजात पुढील शिक्षण सुरू ठेवले व त्या इंटर झाल्या. त्यांनी त्यामधील काळात नागपूर शहरातील गोकुळ पेठेत नव्याने सुरू झालेल्या ‘डिप्रेस्ड क्लासेस गर्ल्स होस्टेल’मध्ये सुपरिटेंडेंटचेही काम केले. त्यांनी व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना बऱ्याच होतकरू मुलींना मार्गदर्शन केले, त्यांपैकी सुगंधा शेंडे ह्या एक होत. त्या अस्पृश्य, दलित मुलींच्या अडीअडचणी जाणून त्यांना शक्य असेल तेवढी मदत करत असत. सुलोचना यांना सामाजिक कार्याची आवड तशीच उत्पन्न झाली आणि त्या बाबांविषयींच्या, दलित समाजाच्या सभा-संमेलनांस हजर राहू लागल्या; वेळप्रसंगी भाषणेही देऊ लागल्या.

सुलोचना या दिसण्यास नाजूक, देखण्या होत्या. त्यांची राहणीही चांगली होती. त्यांचे पती रिक्रुटिंग ऑफिसर होते. त्यांचे भाऊ जयराम बनसोडे हे ‘समता सैनिक दला’मध्ये कार्य करत असत. सुलोचना यांना दोन मुली व एक मुलगा. त्यांची घरसंसार सांभाळून सामाजिक कार्य करण्याची जिद्द वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल.

त्या जाई चौधरी ह्यांच्यासोबत सभा-भाषणांना जात असत. त्या त्यांचे विचार भाषणात कणखरपणे स्पष्टरीत्या व्यक्त करत व त्यांचा प्रभाव श्रोत्यांवर पडत असे. सुलोचना यांची वृत्ती परोपकारी, स्वावलंबी व स्वाभिमानी होती. त्यांच्यामध्ये बाबांच्या चळवळीच्या कार्यात पडून आत्मविश्वास निर्माण झाला होता व बाबांच्या कानावर त्यांची कीर्ती पोचली होती. म्हणूनच त्यांना 1942 मध्ये ‘अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट महिला परिषद, नागपूर’ या अधिवेशनाचे अध्यक्षपद देण्यात आले. त्यांनी अधिवेशनात 20 जुलै रोजी समस्त महिला वर्गासमोर मोठे उद्बोधक भाषण दिले. त्याप्रसंगी बाबासाहेब आंबेडकर हेही हजर होते. त्यानंतर बार्इंना महाराष्ट्रातून ठिकठिकाणांहून सभेची आमंत्रणे येऊ लागली. सुलोचना यांची भाषणे समाजप्रबोधन करणारी असत. त्या कानपूर महिला अधिवेशनासाठी 1944 साली गेल्या होत्या. त्यांच्या कार्यप्रवणतेबद्दल श्री वराळे यांनी लिहिले आहे, की नागपूरला ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन महिला परिषदे’च्या अध्यक्ष सुलोचना डोंगरे या मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष अशा होत्या. सभेच्या पहिल्या दिवशी महिला सभेची व्यवस्था करत असताना, महिला सभेचे ठराव लिहून इतर महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सर्व रात्र त्यांनी जागून काढली. (1. वराळे: पृष्ठ 131)

त्यांचे निधन 1945 मध्ये दोन दिवसांच्या अल्प आजाराने झाले.

(उर्मिला पवार आणि मीनाक्षी मून लिखित ‘आम्हीही इतिहास घडवला’ या पुस्तकातून उद्धृत.)

About Post Author