दधीची देहदान मंडळ

1
32
carasole

देहदान प्रचारासाठी कार्यरत

जसे र.धों.कर्वे यांनी पन्नास-साठ वर्षांपूर्वी संतती नियमनाचा प्रसार करून आपण काळाच्या पुढे आहोत (प्रचंड विरोध पत्करून) हे दाखवून दिले; तसेच कै.ग.म.सोहनी यांनी तीस वर्षांपूर्वी मरणोत्तर देहदानाचा प्रचार व प्रसार पुण्याला केला होता. ग. म. सोहनी हे शाळेत सुपरिटेंडंट म्‍हणून कार्यरत होते. त्‍यांनी कोणतीही संस्‍था स्‍थापन न करता केवळ भाषणांच्‍या साह्याने देहदानाविषयी जनजागृती घडवण्‍याचा प्रयत्‍न केला. शंतनुराव किर्लोस्‍कर आणि ना. ग. गोरे यांच्‍या सहकार्याने सोहनी यांनी देहदानासंबंधीची काही पुस्‍तकेही प्रसिद्ध केली होती. मात्र त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर ते कार्य खंडित झाले. सोहनी यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन डोंबिवलीतील गुरुदास तांबे यांनी मरणोत्तर देहदान-नेत्रदान यांचा प्रसार सुरू केला. ते साल होते 1988. त्या वर्षी संस्थेची नोंदणी करण्‍यात आली.

ग. म. सोहनी यांच्‍या एक भाषणाचा वृत्‍तांत गुरूदास तांबे यांच्‍या वाचनात आला. त्‍यांना देहदानाचा मुद्दा महत्‍त्‍वाचा वाटला. त्‍यानंतर त्‍यांनी जे. जे. रुग्‍णालयासहित मुंबईतील काही रुग्‍णलयांमध्‍ये जाऊन देहदानासंबंधीची माहिती गोळा केली. त्‍यातून मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे त्‍यांनी 1987 साली ‘दधीची देहदान मंडळा’ची अनौपचारिक स्‍थापना केली.

विश्व हिंदू परिषदेकडून भिवंडी येथे शिक्षण घेणा-या आदिवासी मुलांकरता वसतिगृह चालवले जाते. त्याची जबाबदारी 1974 सालापासून गुरुदास तांबे सांभाळत असत. वसतिगृहासाठी निधी गोळा करण्‍याचे काम त्‍यांच्‍याकडे असे. मोठ्या प्रमाणात निधी गोळा करावा आणि त्‍यातून वसतिगृहामधील विद्यार्थ्‍यांचा खर्च भागवला जावा अशी तांबे यांची कल्‍पना होती. त्याकरता त्‍यांनी जी.पी.ओ.मधील नोकरीचा राजीनामा दिला आणि वसतिगृहाच्‍या जोडीने ‘दधीची देहदान मंडळा’चे काम सुरू केले. तांबे यांनी स्वत:चा देहदानाचा फार्म प्रथम भरला. त्यांनी बरोबरीच्या मित्रमंडळींबरोबर चर्चा करून देहदान मंडळाची स्थापना करत हा विषय डोंबिवली-ठाणे-मुलुंड येथील ज्येष्ठ नागरिक संघांपुढे ठेवला. सुरुवातीला, कॉर्नर मीटिंगा, ज्‍येष्‍ठ नागरिक संघाच्‍या बैठका अशा माध्‍यमातून त्‍यांनी मंडळाच्‍या कल्‍पनेचा प्रसार केला. मग चर्चा/संवाद सुरू झाले. त्यातून प्रतिसाद मिळू लागला. तांबे यांनी तोच ध्यास घेऊन त्यांच्या घरीच कार्य चालू केले. गुरुदास तांबे यांच्‍या रेडिओवर अनेक वेळा मुलाखती झाल्‍या.

मंडळाचे नाव ठेवताना सांस्कृतिक दृष्टीने विचार केला गेला. त्यांना वेदामध्ये एका कथेचा संदर्भ मिळाला. वृत्रासूर नावाच्या दैत्याने इंद्रादी देवांना त्रास देऊन त्राही भगवान करून सोडले. तेव्हा देवांनी भगवान विष्णूंना गा-हाणे घातले. भगवान विष्णू यांनी योगशास्त्रात पारंगत अशा दधीची ऋषी यांना, त्यांनी योगाच्या साहाय्याने जिवंतपणी प्राणोत्क्रमण करावे आणि त्यांच्या अस्थींचे वज्र बनवून वृत्रासुराचा वध करावा अशी आज्ञा केली. दधीची यांनी विष्णूची आज्ञा प्रमाण मानून पहिले देहदान केले! म्हणून मंडळाचे नाव ‘दधीची देहदान मंडळ’ असे ठेवण्यात आले.

सध्या मंडळाचे अध्यक्ष विनायक जोशी असून कार्यवाह म्हणून सुरेश तांबे आहेत. गुरूदास तांबे हे सुरेश तांबे यांचे वडिलबंधू आहेत. काही ज्येष्ठ नागरिक हे काम नेटाने पुढे नेत आहेत.

सभासदांचे भरून आलेले फार्म वेगवेगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांत पाठवण्यात येतात. वैद्यकीय महाविद्यालये सभासदांच्या नावे ओळखपत्रे बनवून देतात. म्हणजे त्या व्यक्तीचे निधन झाल्यावर तिचा देह वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात अडचण येत नाही. काही महाविद्यालये स्वत: शव आणण्यासाठी मेडिकल व्हॅन पाठवतात, तर काही त्याबद्दल मोबदला देतात. पण देह स्वीकारण्यापूर्वी शव निरोगी असल्याबद्दल डॉक्टरांचे सर्टिफिकेट असावे लागते. व्यक्तीला निधनापूर्वी काही रोग असल्यास महाविद्यालये शरीर स्वीकारत नाहीत.

महाराष्ट्रात दीडशे वैद्यकीय महाविद्यालये आहेत. त्यांच्या अभ्यासक्रमानुसार माणसाच्या शरीरशास्त्राची रचना समजण्यासाठी दहा-पंधरा विद्यार्थ्यांना एक देह असावा लागतो. यावरून वैद्यकीय महाविद्यालयांना अभ्यासासाठी किती मृत शरीरांची आवश्यकता आहे हे लक्षात येते.

विज्ञान, मेडिकल सायन्समध्ये नवनवीन इतके शोध लागले आहेत, की व्यक्तीच्या निधनानंतर एक मानवी देह अनेक जिवंत व्यक्तींची आयुष्ये सुखी करण्याकरता उपयोगी ठरू शकतो. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. कारण त्याच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतो. मानवाच्या अनेक अवयवांचे रोपण इतरांच्या शरीरात करणे शक्य झाले आहे. मानवी त्वचादेखील जळित तसे अपघातातील व्यक्तींना उपयोगी पडू शकते.

आपल्‍याकडे असलेली पुस्‍तके एकदा वाचली की पडून राहतात. दधीची देहदान मंडळाकडून लोकांना आवाहन करून अशी पुस्‍तके मिळवली जातात. या प्रयत्‍नांतून मंडळाने ‘दधीची ज्‍येष्‍ठ नागरिक वाचनालय’ हे निःशुल्‍क वाचनालय सुरू केले आहे. या वाचनालयात लोकांकडून दान करण्‍यात आलेली चार कपाटेही आहेत. मंडळाच्‍या सभासदांना पुस्‍तके घरी नेण्‍याची सुविधा आहे. या ठिकाणी दर आठवड्याला वामनराव नवरे यांच्‍याकडून गीतेचे वर्ग भरवण्‍यात येतात. तसेच दर शनिवारच्‍या वर्गात गीतेच्‍या एका अध्‍यायावर गुरुदास तांबे यांच्‍याकडून भाष्‍य केले जाते. याचबरोबर मंडळाकडून गेल्‍या पंधरा वर्षांपासून ‘महर्षी दधीची देहदान पत्रिका’ नावाचे एक त्रैमासिकही चालवण्‍यात येते.

दधीची देहदान मंडळात सोळाशेपेक्षा जास्त लोकांनी फार्म भरुन दिले आहेत. तसेच साडेतीनशेपेक्षा जास्त व्यक्तींचे देहदान विविध वैद्यकीय महाविद्यालयातून केले गेले आहे. मंडळ दर तीन महिन्यांनी पत्रिका प्रकाशित करते व आपल्या सभासदांना विनामूल्य पाठवते. त्यामध्ये देहदानाबरोबर नेत्रदान – अवयवदान-त्वचादान, तसेच इच्छामरण यासंबंधी मार्गदर्शपर लेख असतात. यापैकी देहदान, नेत्रदान व त्वचादान यांमध्ये मंडळ साखळी निर्माण करण्यात यशस्वी झाले आहे. समाजात जागृती निर्माण झाल्यामुळे दर तीन महिन्यांत शंभर-सव्वाशे लोक देहदानाचे व नेत्रदानाचे फार्म भरतात. मंडळ सभासदांशी संपर्क राहण्यासाठी वर्षातून दोन-तीन कार्यक्रम करते. मकर संक्रांतीचा तिळगुळ समारंभ, दधीची ऋषींची जयंती भाद्रपद महिन्यात असते, त्या समारंभात ज्येष्ठ व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. तिसरा समारंभ वार्षिक सभेचा.

मंडळाने ‘देहदान, शंकासमाधान’ असे पुस्तक प्रकाशित केले आहे त्याची पाचवी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
 

संपर्क : (0251) 2490740

सुरेश तांबे, सचिव
9867755572

विनायक जोशी, अध्‍यक्ष
9324324157, 2481553
 

पत्‍ता– श्री गुरूदास तांबे, ए-6/6, एलोरो सोसायटी, विष्‍णूनगर, डोंबिवली पश्चिम, 421202

कार्यालयाचा पत्‍ता– न्‍यू अनंत सोसायटी, पंडित दीनदयाळ मार्ग, डोंबिवली पश्चिम, 421202
 

– प्रभाकर भिडे

Last Updated On – 3rd July 2016

About Post Author

1 COMMENT

  1. आपले उपक्रम अतिशय प्रेरणादायी
    आपले उपक्रम अतिशय प्रेरणादायी आहेत. तुमच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Comments are closed.