Home लक्षणीय तंत्रउद्योगी जव्वाद पटेल

तंत्रउद्योगी जव्वाद पटेल

‘थिंक महाराष्ट्र’ला शोध अाहे तो कर्तृत्ववान माणसांचा. ते कर्तृत्व प्रत्येकवेळी मोठ्या गोष्टींमध्ये सापडते असे नाही. अनेकदा माणसे छोट्या, मात्र अत्यंत कल्पक गोष्टींच्या निर्मितीमधून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करतात. जव्वाद पटेल हा त्या गटात मोडतो.

त्याला रोज सकाळी लवकर उठायचा कंटाळा येई. पण नियमित क्लासला जाणे भाग होते. मग हा पठ्ठ्या पहाटे अलार्म वाजला, की बिछान्यातूनच गिझरला अादेश देई. ‘चल पाणी तापवायला घे!’ तो बिछान्यात असेपर्यंत त्याचा गिझर गरम आणि थंड पाण्याची योग्य मात्रा घेऊन पाणी तापवायचा. तो अंघोळ करायला गेला की टोस्टरला हुकूम द्यायचा – ‘आंघोळ होत आली आहे. ब्रेड टोस्ट करून घे.’ टोस्टर त्याचे म्हणणे गपगुमान ऐके.

तो तेव्हा केवळ अाठवीत होता!

पुढे तो उच्च शिक्षणासाठी हैद्राबादेला गेला. तिथे हॉस्टेलवर घरगुती जेवण कोठून मिळणार? तो तिथेही यंत्रांना हुकूम देऊन फर्माईशी पूर्ण करून घेई. तो कॉलेजमधून हॉस्टेलसाठी निघाला की फोनवरून घरातील कुकरला सूचना देई. ‘दोन माणसांचं भात-वरण लाव.’ कधी कधी तर मसालेभात किंवा लेमन-राईचीसुद्धा फर्माईश असे. तो हॉस्टेलवर पोचेपर्यंत त्याच्या कुकरने गरमागरम जेवण तयार ठेवलेले असे. भारी गमंत ना!

शाळेत फटाके फोडून शिक्षकांना त्रास द्यायचा असो किंवा लोकांची पाण्यासाठीची तगमग पाहून निर्माण केलेले हवेतून पाणी काढायचे यंत्र असो! तो त्याला हव्या त्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साध्य करत राहीला. तो – तेवीस वर्षांचा जव्वाद पटेल!

जव्वाद पटेल हा उत्सुक तरूण अाहे. तो स्वत:ची उत्सुकता शमवण्यासाठी तंत्रज्ञानाचा मुक्त वापर करतो. इतका, की अातापर्यंत त्याने तब्बल दोन हजारांहून अधिक ‘इनोव्हेशन्स’ केली आहेत. त्याला त्याने तयार केलेल्या हवेतून पाणी काढणारे ‘ड्यूड्रॉप’ हे यंत्र आणि ‘स्मार्ट हेल्मेट’ या दोन संशोधनांचे पेटंट मिळाले आहेत. त्याचे चाळीसपेक्षा अधिक शोधनिबंध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विज्ञान नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत.

_Tantraudyogi_javvadPatel_3.jpgजव्वाद मूळचा अकोल्याचा. त्याचे वडिल निवृत्त मुख्याध्यापक तर आई गृहिणी. मोठी बहिण डॉक्टर. जव्वाद शालेय अभ्यासात साधारण होता. मात्र त्याला हत्यारे-साधने फार प्रिय. तो मित्रांत फारसा रमायचा नाही, पण वस्तूंची तोडफोड करून काहीतरी नवं करून पाहण्यात त्याला मजा यायची. त्याची पहिली मैत्री झाली ती वडिलांच्या ‘टुलबॉक्स’मधील स्क्रू-ड्रायव्हरशी! त्याने त्याचे ‘टोनी’ असे नामकरण करून टाकले. तो टोनीसोबत विविध मशीन्स उघडून पाहू लागला. इतर मुले खेळण्यांची मागणी करत असताना जव्वादला स्क्रू-ड्रायव्हरचे सेट, विविध उपकरणं, मल्टीमीटर, टेस्टर अशा गोष्टी हव्या असत. त्याने त्याच्या त्या ‘उद्योगी’ वृत्तीमुळे आठवीत असताना चक्क ‘इन्फ्रारेड रेडीयशन’वर शोधनिबंध लिहीला होता.

जावेदचे त्या सगळ्या खटाटोपामागील तत्व खूप साधे आहे. तो म्हणतो,‘‘ मी ‘थिंक बियॉंड नॉर्मल’ या सूत्राने काम करतो. कथित ‘इनोव्हेटीव्ह कल्पना’ वगैरे अशी काही भानगड नसते. तशा कल्पना मला तरी सुचत नाहीत. मी माझ्यापुढं असणार्‍या समस्यांचा, प्रश्‍नांचा विचार करताना सर्वसाधारण विचारापलिकडे कसं जायचं, साधारण उत्तरांच्या पुढची काय पायरी असेल असा विचार करतो आणि तिथंच मला उत्तरं सापडतात. म्हणून तर मी लहानपणी ‘डीटीएमएफ- ड्वेल टोन मल्टि फ्रिक्वेन्सी’ हे तंत्र वापरून ऑटोमॅटीक गिझर, टोस्टर, राईसकुकर बनवू शकलो.’’
जव्वादचा एकटेपणा तंत्राच्या सान्निध्यात दूर होई. त्याच्या तंत्र अाणि यंत्र या दोस्तमंडळींसोबत त्याची चौकसबुद्धी वाढीस लागली. जव्वादमध्ये संवेदनशीलता होती. त्याला स्वत:च्या जीवनशैलीपलिकडील एखादी समस्या दिसली, की तो ती सोडवण्याच्या मागे लागे. जव्वाद बारावीत असताना त्याचे एक नातेवाईक रस्ता अपघाताने कायमचे बिछान्याला खिळले. त्यांना वेळीच उपचार मिळाला असता तर ते कदाचित बरे होऊ शकले असते, हे कळाल्यावर जव्वाद कमालीचा अस्वस्थ झाला. त्याने थेट ‘स्मार्ट हेल्मेट’ तयार केले. ते हेल्मेट घातल्यानंतर चालकाने दारू प्यायली असेल तर गाडी सुरू होत नाही. शिवाय चालक चालत्या गाडीवर फोनवर बोलत असेल तर गाडी तीन सूचना देऊन आपोआप थांबते. गाडीचा वेग मर्यादेबाहेर वाढवला तरीदेखील गाडी थांबते. तसेच, गाडीला अपघात झाला तर हेल्मेटमधील जीपीएस यंत्रणेद्वारे जवळच्या हॉस्पिटल, पोलिस व चालकाचा एक नातेवाईक यांना तात्काळ सूचना दिली जाते. जव्वादने त्या तऱ्हेचे हेल्मेट केवळ अतिरीक्त दोन हजार रूपयांत तयार केले.

जव्वादने हैद्राबाद येथे बी. टेकसाठी प्रवेश घेतला. तो एकदा हैद्राबादहून अकोल्यास जात होता. त्याच्या हातातील पाण्याच्या बाटलीकडे एक बाई व तिचा मुलगा आशाळभूतपणे पाहत होते. त्याला वाटले त्यांना पैसे हवेत. त्याने त्यांना काही पैसे देऊ केले, पण ते पैसे नाकारून त्याच्या हातातील पाण्याच्या बाटलीकडे पाहत राहिले. त्या प्रसंगाने त्याचे मन हेलावून गेले. पाण्यासाठी इतकी तगमग? त्याच्या डोक्यात हा विचार घोळत राहिला आणि त्याने एका तासात कमी दाबाच्या हवेतून दोन बाटली पाणी तयार करण्याचे ‘ड्यूड्रॉप’ हे उपकरण तयार केले. साधारणपणे अशा प्रकारच्या उपकरणांसाठी लिक्वीड नायट्रोजन, अमोनिया अशा वायूंचा वापर केला जातो. परंतु त्या वायूंचा ओझोनच्या थराला धोका असतो. जव्वादला ते टाळायचे होते. त्याने त्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक कन्डेशन’ या तंत्राचा वापर केला आणि त्याला यश मिळाले. त्याने सुरूवातीच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग शोधू शकेल अशा यंत्राचा शोध लावला आहे. त्याला त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले अाहे.

जव्वदला शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या घटना कळू लागल्या. तेव्हा त्याला प्रश्‍न पडला, की शेतकर्‍याला सोयाबीनसारख्या फायद्याच्या उत्पादनातही घट का होत असेल? प्रत्येक पीकाला ‘बॅलन्स डायट’ आवश्यक असतो. मातीची विशिष्ट प्रत, पाण्याचे प्रमाण, आद्रतेचे प्रमाण, योग्य बियाणे, पूरक वातावरण. जव्वादने सोयाबीनला आवश्यक असणार्‍या माती, वातावरणाचा अभ्यास करून बॅलन्स डायटप्रमाणे एका जागेत सोयाबीन लावला. दुसरीकडे शेतकर्‍यांच्या नेहमीच्या पद्धतीने सोयाबीनची लागवड केली. त्याला उत्पादनात दहा टक्क्यांनी फरक दिसला. योग्यरित्या वाढवलेल्या सोयाबीनचे उत्पादन नेहमीपेक्षा दहा टक्के अधिक मिळाले. जव्वाद शरिरातून रक्त बाहेर न काढता रक्तातील साखर शोधणारे उपकरण बनवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचे तसे कित्येक प्रकारचे शोध-नवसंशोधन सुरू आहे.

जव्वादने आरोग्य, उर्जा, कृषी आणि जल या क्षेत्रांत केलेल्या संशोधनासाठी त्याला नुकतेच केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने ‘युवा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. जव्वादला आजतागायत एकेचाळीस पुरस्कार आणि सन्मान लाभले आहेत. त्याला जगप्रसिद्ध टेडटॉक या कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली. एवढ्या सन्मानानंतर माणूस हुरळून जाईल, पण जव्वादची संशोधनमग्नता आणि त्याचा बोलघेवडा स्वभाव त्याचे पाय जमिनीवर असल्याची साक्ष देतात.

जव्वादने बी.टेकची पदवी मिळवली आहे. त्याने स्वत:ची एक लॅब हैद्राबाद येथे सुरू केली आहे. जव्वादला ‘सोशल इनोव्हेटर’ बनायचे आहे. तो म्हणतो,’‘मी वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम यांना आदर्श मानतो. मला लोकोपयोगी काम करावं असं वाटतं. मी तंत्रज्ञानाकडे जगणं सुसह्य करणारे साधन म्हणून पाहतो. मला अनेकदा अमेरिकेतून, परदेशातून संशोधनासाठी स्कॉलरशिपची विचारणा होते. काही बड्या कंपन्यांत संशोधनासाठी, नोकरीसाठीही गळ घालण्यात आली. मात्र मला कधीही परदेशात जाऊन संशोधन करावे वा काम करावे असं वाटत नाही. माझ्या ज्ञानाचा उपयोग माझ्या देशातील माणसांना व्हावा अशी माझी इच्छा अाहे. ते करणं हे माझ्यासाठी देशभक्तीची भावना व्यक्त करण्यासारखं अाहे.’’

जव्वादने मोठमोठ्या ऑफर नाकारल्या. गलेलठ्ठ पगारांची आमिषे डोळ्यांअाड केली. हा तरूण स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग लोकोपयुक्त गोष्टींसाठी वापरावा या हेतूने धडपडत आहे. त्याच्या प्रयत्नांमध्ये खरेपणा जाणवतो. त्याला त्याची दिशा सापडली अाहे. जव्वादमधील संशोधकवृत्ती अाणि त्याचे लोकाभिमुख विचार त्याच्या यशाचा मार्ग सुकर करणार अाहेत.

जव्वाद पटेल- ७३८५०४८३५८, www.jawwadpatel.com

– हिनाकौसर खान-पिंजार

(पूर्वप्रसिद्धी – ‘थिंक महाराष्ट्र’च्या ‘प्रज्ञा-प्रतिभा’ या दैनिक ‘दिव्य मराठी’च्या ‘रसिक’ पुरवणीतील सदरात ६ मे २०१८ रोजी.)

About Post Author

Previous articleबेफाट बाळ्या : वसंत वसंत लिमयेची हिमयात्रा
Next article…परी जीनरूपे उरावे
हिनाकौसर खान-पिंजार या पुण्‍याच्‍या पत्रकार. त्‍यांनी दैनिक 'लोकमत'मध्‍ये अाठ वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी 'युनिक फिचर्स'च्‍या 'अनुभव' मासिकासाठी उपसंपादक पदावर काम केले. त्या सध्या 'डायमंड प्रकाशना'मध्ये कार्यरत अाहेत. हिना वार्तांकन करताना रिपोर्ताज शैलीचा चांगला वापर करतात. कथालेखन हा हिना यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वाचा महत्‍त्‍वाचा घटक आहे. त्‍या प्रामुख्‍याने स्‍त्रीकेंद्री कथांचे लेखन करतात. हिना 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' 2016 मध्‍ये सहभागी होत्या. हिना यांनी तीन तलाक प्रथेविरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच महिलांना भेटून लेखन केले. त्यावर अाधारीत 'तीन तलाक विरूद्ध पाच महिला' हे पुस्तक 'साधना'कडून प्रकाशित करण्यात अाले अाहे. हिना 'बुकशेल्फ' नावाच्या अॉनलाईन उपक्रमाच्या संस्थापक सदस्य अाहेत. लेखकाचा दूरध्वनी 98503 08200

Exit mobile version