डॉ. विनोद इंगळहळीकर यांची विविधगुणी मात्रा

1
30
_DR.Vinod_Ingalhaldikar_2.jpg

विनोद इंगळहळीकर हे ठाण्याच्या ‘ज्युपिटर हॉस्पिटल’मधील मणक्यांच्या विकारांसाठी विख्यात अस्थिशल्यतज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यांचा लौकिक डॉक्टर म्हणून जेवढा आहे तितकाच त्यांच्या अंगच्या विविध कलागुणांमुळेही आहे. त्यांचे एक पूर्वज, नारो देशपांडे-हणमंते हे व्यंकोजीराजे भोसले यांच्याबरोबर तंजावरच्या मोहिमेत होते. व्यंकोजी यांनी जिंकलेल्या मुलुखाची देखभाल करण्यासाठी माणसे नेमली. त्यावेळी नारो देशपांडे यांना इंगळहळी या हुबळीजवळच्या गावी वतन मिळाले. शिक्षणाचे महत्त्व देशपांडे यांच्या घराण्यात पूर्वापार चालत आलेले आहे. विनोद यांच्या पणजोबांची नेमणूक कोल्हापूरच्या शाहू महाराजांकडे मुख्य शिक्षणाधिकारी म्हणून 1870 च्या सुमारास झाली. त्यामुळे कुटुंब कोल्हापूरला स्थिरावले, पण नाव इंगळहळीकर हे चिकटले; त्यांचे दुसरे पणजोबा बळवंतबुवा पोहोरे हे कोल्हापूर आणि कागल या संस्थानांतील दरबारी राजगायक होते.

विनोदजी यांच्या आजोबा-आजीचे लग्न त्या काळाच्या हिशोबात फार मजेदारपणे जमले. इंगळहळीकरांच्या नारायणने पोहोरेबुवांच्या छोट्या लक्ष्मीला (विनोदजींच्या आजीला) 1895 च्या सुमारास शाहू राजांच्या दरबारच्या दसऱ्याच्या उत्सवात पाहिले. लक्ष्मी सुंदर, गौरवर्णी अशी होती. नऊवारी साडी नेसली होती, तिने नाकात नथ घातली होती. तत्क्षणीच नारायण लक्ष्मीच्या प्रेमात पडला; तो लग्न करीन तर ह्याच मुलीशी असा हट्ट धरून बसला. स्थळ योग्य असल्याने लग्न होण्यात अडचण आली नाही.

विनोदजींच्या आईवडिलांच्या लग्नाची हकिगतही उद्बोधक आहे. त्यांच्या आईचा विवाह बालपणीच झाला. परंतु त्यांचे पहिले पती अकाली मरण पावले आणि त्यांची रवानगी शिक्षणाकरता महर्षी कर्वे यांच्या हिंगणे येथील आश्रमात झाली. विनोदजींच्या वडिलांची विधवा बहीणदेखील तेथे होती. वडील व आई यांचे प्रेम त्या ओळखीतून जमले. त्यांनी विवाह करण्याचे ठरवले. प्रथमवराच्या आणि विधवेच्या त्या विवाहाला घरातून आणि महाराष्ट्रातून प्रचंड विरोध 1935 साली झाला.

विनोदजींच्या आई मालतीबाई या मुंबई महापालिकेत शिक्षिका होत्या. अनेक वर्षें शाळाखात्यात स्काउट-गाईड विभागाच्या प्रमुख. त्यांचे मातृछत्र लहानपणीच हरपले. त्यामुळे त्यांचे संगोपन आजीच्या शिस्तीत झाले. शिवाय त्यांना पाठच्या भावंडांचा सांभाळ करावा लागेच.

डॅाक्टरांचे वडील त्रिंबकराव बालपणापासून ललितकलांमध्ये रमत गेले. ते चित्रमहर्षी आबालाल रेहमान यांचे शिष्य लहान वयातच झाले. ते जे.जे. स्कूल आॉफ आर्टमधून ‘आर्ट मास्टर’ ही पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यांनी चित्रपटसृष्टीत, नाट्यसृष्टीत कलादिग्दर्शक, वर्तमानपत्रात चित्रकार आणि व्यंगचित्रकार म्हणून अनेक वर्षें काम केले. पण त्यांचे मन चित्रकलाशिक्षक म्हणून रमले. ते प्रसिद्ध संगीतज्ञ पं. यशवंतबुवा पाध्ये यांचे शिष्य शालेय वयातच झाले. त्यांनी संगीताचीही सेवा आयुष्यभर केली, संगीतातून असंख्य मित्र जोडले.

संगीत हा विनोदजींच्या घरात जन्मापासून रोजच्या जगण्याचा भाग होता. विनोदजी सांगतात, की “वडील मला बालपणी रडताना मांडीवर घेऊन पेटी वाजवू लागले, की रडणे थांबायचे. माझ्या छोट्या बोटांना तेव्हाच बहुधा सूर गवसले!” वडिलांचा बालगंधर्वांशी गाढा स्नेह होता. बालगंधर्वांचा अखेरचा काळ हलाखीचा होता. ते घरातून बाहेर पडले होते, अपंग झाले होते. त्यांना सांभाळणाऱ्या, मदत करणाऱ्या काही मोजक्या लोकांपैकी इंगळहळीकर कुटुंबीय होते. आठवी-नववीतील विनोदजी सायकलवरून बालगंधर्वांना जेवणाचा डबा घेऊन सणासुदीच्या दिवशी जात. त्यांना जेवण्यास वाढून परत येत. नंतर इंगळहळीकर घरातील मंडळी जेवत. नारायणराव त्यांना ‘छोटा नाना’ म्हणत आणि प्रेमाने गाणे शिकवत. बालगंधर्व विनोदजींच्या दोन खोल्यांच्या चाळीतील दादरच्या घरी येऊन त्यांच्या मुंजीच्या आदल्या दिवशी गायले होते.

विनोदजी गायक, संगीतकार, संगीतशिक्षक आहेत. त्यांचे पहिले गुरू त्यांचे पिताश्रीच. त्यांना विविध वाद्ये लहान वयापासून वाजवता येत होती. विनोदजी त्या काळात कै. व्ही.जी. जोग यांच्याकडे व्हायोलिन शिकले. त्यांचे शिक्षण पं. नागेश खळीकर, पं. शिवाजीराव भारती, संगीत दिग्दर्शक प्रभाकर पंडित अशा संगीतज्ञांकडे झाले आहे.

विनोदजी यांना काही काळ सुधीर फडके यांचाही सहवास व मार्गदर्शन लाभले होते. विनोदजींनी तरुण वयात ‘शिवायन’ नावाच्या दीर्घकाव्याला चाल लावली. सुधीर फडके यांनी त्यांना ती ऐकून शाबासकी दिली होती. विनोदजींची इच्छा संगीतक्षेत्रातच जन्मभर राहण्याची होती, मात्र त्यांनी मॅट्रिक व इंटरसायन्स पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्यावर मेडिकलला जाण्याचे ठरले. त्या काळात संगीतक्षेत्रामध्ये आर्थिक स्थैर्य करियरही मोठ्या ग्लॅमरस नव्हत्या.

विनोदजींनी पाश्चात्य संगीताचेही प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी ‘संगीत दिग्दर्शन आणि संगीत संयोजन’ या विषयातील पदविका मुंबई विद्यापीठातून मिळवली आहे. ते सुगम संगीताच्या माध्यमातून दर्जेदार पारंपरिक शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण अनेक विद्यार्थ्यांना देण्याचे कार्य विनामूल्य करत असतात. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांच्या ‘शब्दसुरांशी मैत्री माझी’ ह्या सीडी निघाल्या आहेत. त्यांनी महिलांच्या आणि बालकांच्या नाटकांना संगीत दिलेले आहे.

संगीतोपचार हा डॉ. विनोद यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ते संगीतोपचाराच्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे सक्रिय सभासद आहेत. त्यांचा सहभाग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधे असतो. ते शारीरिक आणि बौद्धिक विकलांगांच्या संस्थांत विनामूल्य संगीतोपचार करतात. त्याचे प्रशिक्षण तेथील मंडळीना देतात.

विनोद यांचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांची शब्दांशी आणि वेगवेगळ्या भाषांशी मैत्री शालेय वयापासून झाली. ते संस्कृतच्या, हिंदीच्या, ड्रॅाईंगच्या परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचे शब्दोच्चार संस्कृत व हिंदी काव्य आणि गीता यांच्या पठनामुळे चांगले झाले. त्यांचे संस्कृतचे ‘जगन्नाथ शंकरशेठ पारितोषिक’ मॅट्रिकच्या परीक्षेत काही मार्कांनी हुकले. ते मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषांतून भाषणे देऊ शकतात. त्यांचा सहभाग शालेय आणि महाविद्यालयीन वक्तृत्व, नाटक स्पर्धांत सतत असे.

त्यांचे कवितालेखन लहान वयापासून सुरू झाले. त्यांचे वैशिष्ट्य मात्राबद्ध, छंदबद्ध कविता-गीते लिहिणे हे आहे. त्यांनी दूरदर्शन मालिकांसाठी व चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. त्यांचे ‘संवेदना’ (2000) आणि ‘शब्दांशी मैत्री माझी’ (2013) हे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या ‘तू निरागस चंद्रमा’ या मानिनी (2007) चित्रपटातील गीताला ‘म.टा. सन्मान उत्कृष्ट गीत पुरस्कारा’साठी नामांकन मिळाले होते. त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’ने आयोजित केलेल्या काव्यलेखन शिबिरात (चिपळूण, मुंबई) आणि अन्य अनेक ठिकाणी ‘गीतलेखन’ या विषयावर कार्यशाळा घेतल्या आहेत.

विनोदजी त्यांच्या कवितांचा आणि संगीत-रचनांच्या सादरीकरणाचा दृकश्राव्य कार्यक्रम देशांत आणि परदेशांत 1994 पासून करत आले आहेत. ते दृकश्राव्य माध्यमातून काव्य सादरीकरण करणारे मराठीतील पहिले व्यक्ती आहेत.

त्यांना चित्रकला अवगत आहे. ते फोटोग्राफी उत्तम करू शकतात. विनोदजींनी संगणकशास्त्र, टाईम मॅनेजमेंट- स्टेर्इंग ऑर्गनाइझ्ड अशा विविध कलांमध्ये प्राविण्य मिळवले आहे. ते त्या साऱ्या विषयांवर कार्यशाळा घेतात. त्यांना यश आणि कीर्ती वैद्यकीय व्यवसायातील निष्ठापूर्वक कामामुळे मिळाले, पण त्यांचे जीवन सुंदर व आनंदमय ललित कलांमुळे झालेले आहे असे ते समाधानाने सांगतात.

विनोदजी म्हणाले, की त्यांना अध्यापनाची आवड आहे. म्हणून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण होताच सायन हॉस्पिटलमधील मानद प्राध्यापक ही जबाबदारी विनामूल्य पत्करली आणि एकोणतीस वर्षांपर्यंत अनेक विद्यार्थी घडवले. त्यांपैकी काही जण अस्थिशल्यविशारद आणि मणक्याच्या विकाराचे तज्ज्ञ म्हणून जगप्रसिद्ध आहेत. त्यांचा ज्ञानदानाचा यज्ञ चालू आहे.

विनोदजींनी ‘असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन ऑफ इंडिया’ या संस्थेची स्थापना 1984 साली केली. ते त्या संस्थेचे सचिव व अध्यक्ष अनेक वर्षें होते. त्या संस्थेचे सोळाशे सभासद आहेत. ती मणक्यांचे विज्ञान आणि शस्त्रक्रिया शिकवणारी जगातील मान्यवर संस्था आहे. डॉक्टरांचा मोठा हात भारतात ‘स्पाइनसर्जरी शास्त्र’ प्रस्थापित होण्यात आहे. ती संस्था त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता म्हणून वार्षिक परिषदेत उत्कृष्ट शोधनिबंधाला ‘प्रोफेसर व्ही.टी. इंगळहळीकर सुवर्णपदक’ ह्या नावाच्या पुरस्काराने सन्मानित करते.

विनोदजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1985 पासून ‘बॅक-स्कूल’ (पाठीचा विज्ञानवर्ग) ही संकल्पना भारतात प्रथम राबवली. त्या नावाचा वर्ग दर दोन महिन्यांनी वेगवेगळ्या भाषांतून गेली काही वर्षें सातत्याने चालू आहे. रूग्णांचे सक्षमीकरण हा त्याचा हेतू आहे. वैद्यकीय ज्ञान हे लोकाभिमुख झाले तर त्याचा रुग्णांना प्रचंड उपयोग होतो, हे विचारसूत्र त्या पाठीमागे आहे.

विनोदजींना शरीर जोपासनेची आवड मुळात होती. त्या आवडीला स्काऊट, एनसीसी, रा.स्व.संघ ह्यांसारख्या संस्थांतील सहभागाने खतपाणी घातले. त्यांचा व्यायाम, प्राणायाम, योगाभ्यास नियमित चालू असतो.

योगासनांचा विचार आणि प्रचार 1980 पर्यंत पारंपरिक रीत्या होत असे. विनोदजींनी त्याला आधुनिक शरीररचनाशास्त्र, शरीरविज्ञानशास्त्र ह्यांची जोड देऊन वैज्ञानिक विचारधारेत नेण्याचा प्रयत्न केला. ते योग विद्या निकेतन (वाशी), कैवल्यधाम (चर्नीरोड), योग इन्स्टिट्यूट (सांताक्रूझ), सहयोग मंदिर (ठाणे) अशा मान्यवर संस्थांच्या प्रशिक्षक वर्गांचे नियमित व्याख्याते आहेत. त्यांच्या त्या कार्याकरता सदाशिवराव निंबाळकरांच्या वाशीच्या ‘योग विद्या निकेतन’ या संस्थेने त्यांना ‘योगमित्र’ हा पुरस्कार दिलेला आहे.

ते ठाणे महानगरपालिकेचा ‘ठाणे-गौरव’ आणि ‘जनकवी पी. सावळाराम सन्मान-पुरस्कार, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा कवी प्रफुल्लदत्त पुरस्कार, काही जीवनगौरव पुरस्कार, क्रांतिवीर सावरकर सन्मान पुरस्कार, रोटरी प्रोफेशनल एक्सलन्स अॅवार्ड’ अशा आणखी काही पुरस्कारांचे मानकरी आहेत.

विनोदजी यांची ओळख डॉ. शरयू भिडे यांच्याशी नायरला वैद्यकीय अभ्यास शिकत असताना झाली. त्यांचे लग्न तेथेच जमले. शरयू भूलतज्ज्ञ म्हणून अनेक वर्षें काम करून निवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या प्रथम कन्येचा तरुण वयातच काही आजाराने मृत्यू झाला. त्यांची द्वितीय कन्या डॅा. अनघा वझे ही मानसोपचारतज्ज्ञ म्हणून नावाजलेली आहे.

विनोदजी स्वत:ला शालेय, महाविद्यालयीन जीवनात, किंबहुना प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट, वंदनीय आणि अनुसरणीय शिक्षक मिळाल्याबद्दल नशिबवान समजतात. त्यांना सध्याच्या जगात मुलांच्या डोळ्यांसमोर असे फारसे आदर्श राहिले नसल्याची खंत वाटते.

डॅा. विनोद इंगळहळीकर यांचा भर वैद्यकीय क्षेत्रातील ‘फेअर प्रॅक्टिस’वर आहे. विनोदजी ते संस्कार त्यांच्यावर डॉ. के.व्ही. चौबळ, डॉ. विजय आजगावकर, डॅा. राममूर्ती अशा गुरूंकडून झाले असे सांगतात.

– प्रतिनिधी

About Post Author

1 COMMENT

  1. Totally Impressed
    I stay in…

    Totally Impressed, I stay in Thane & have heard about Dr. Vinod Sir’s Good Name & fame. Great feeling to read.

Comments are closed.