पंढरपूरच्या दिंडीत आठ वर्षांपूर्वी सायकलस्वार दिसू लागले! सायकलस्वारांची ती संख्या शेकड्यांत मोजावी लागत आहे. म्हणजे सायकली पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत नसतात, त्यांचा मार्ग स्वतंत्र असतो. ‘नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन’च्या सेक्रेटरी मनीषा रौंदळ यांचा तो पुढाकार आहे. मनीषा म्हणजे सळसळता उत्साह आहे. त्या क्लिनिकमध्ये अथवा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये असतात; नाहीतर त्यांच्या सायकलवर दिसतात! सायकलवारीचे त्यांचे 2018 हे पाचवे वर्ष. त्या सायकलवारीत सहभागी 2014 मध्ये सहकुटुंब सामील झाल्या होत्या.
नाशिकचे माजी पोलिस उपायुक्त हरीश बैजल यांनी सायकलवारी त्यांच्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ 2012 मध्ये सुरू केली. मनीषा यांनी या वर्षी त्यांच्याबरोबर डोंबिवलीच्या प्रसाद उतेकर या सत्तावीस वर्षीय दिव्यांग तरुणाला सायकलवारी घडवली. एक आगळावेगळा झेंडा पंढरपुरी रोवला गेला! त्या झेंड्याची आभा प्रसाद उतेकरला आयुष्यभर पुरणार आहे. मनीषा यांना ती कल्पना कशी स्फुरली?
दिल्ली ते मुंबई सायकल रॅली नाशिकमधून जाणार होती. त्यांचा मुक्काम नाशिकमध्ये होता. त्या रॅलीत काही दिव्यांगांचा सहभाग होता. ‘नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन’चे सभासद त्यांना भेटण्यास गेले तेव्हा या अनोख्या वारीचे बीज मनीषा यांच्या मनात रुजले. त्यांना फक्त मनचक्षूंनी जग पाहणाऱ्या एखाद्याला विठुरायाचे दर्शन घडवून आणायचे होते. तसा शोध घेताना प्रसाद उतेकरचे नाव कळले. त्यांनी त्याचा आत्मविश्वास आणि उत्साह यांचा अंदाज घेतला आणि पुढील गोष्टींना वेग आला.
त्यांनी टँडम सायकल घेतली. त्या सायकलला दोन सीट, दोन हँडल, दोन पॅडल असतात. पुढच्या सीटवर बसणाऱ्याच्या हातात ब्रेक, गियर शिफ्टर असतो. मागील सीटवरील व्यक्तीला पुढच्याच्या बरोबरीने लय साधत पायडल मारावे लागते. दोघांचा ताळमेळ एकमेकांशी जुळणे गरजेचे ठरते.
मनीषा यांनी प्रसादला घरी बोलावून त्याचा सराव दोन दिवस घेतला. त्या दोघांनी विठुरायाच्या गजरात नाशिकहून 13 जुलै 2018 ला प्रस्थान केले. मनीषा सायकलवारीचे वर्णन मनापासून करतात – “रिमझिम पावसाच्या धारांनी जणू साक्षात पांडुरंग शुभेच्छांचा वर्षाव करत होता! आम्ही दोघांनी न थांबता वारीच्या पहिल्या टप्प्याचा सिन्नरचा घाट पार केला. ते बघून सर्व सायकलिस्ट थक्क झाले. ‘सिन्नर सायकलिस्ट ग्रूप’ने आमचे स्वागत पुष्पहार घालून केले आणि प्रसादला नवी ऊर्जा मिळाली. मार्गात शाळकरी मुले प्रेमाने ‘टाटा-बाय बाय’ करत होती. त्यामुळे चैतन्य मिळत होते. आमचे स्वागत एका गावात ढोल वाजवून होताच थकवा दूर झाला. आम्ही त्या गावात वृक्षारोपण करून नगरकडे मार्गस्थ झालो. आमच्या सायकल ग्रूपचे दोन सहकारी, प्रसाद मुळे आणि सुनील औटे हे प्रवासात आमच्या पाठोपाठ सायकलिंग करत होते आणि विसाव्याच्या ठिकाणी प्रसादला प्रत्येक गोष्टीसाठी मदत करत होते. आम्ही पहिल्या दिवसाचा एकशेसाठ किलोमीटरचा सगळ्यात मोठा टप्पा पूर्ण केला आणि अहमदनगरला पोचताच स्थानिकांनी केलेल्या स्वागताने सुखावलो. मी स्वतःबरोबर प्रसादचापण स्ट्रेचिंग व्यायाम करून घेतला आणि त्याला दुसऱ्या दिवशी सज्ज राहण्यास सांगितले.
“दुसऱ्या दिवशी, आम्ही अहमदनगर ते टेंभुर्णी या एकशेचाळीस किलोमीटरच्या प्रवासासाठी अधिक जोमाने निघालो. वाटेत, अनेक पायी दिंड्या बघण्यास मिळाल्या. त्यात आमची सायकल दिंडी अनोखी ठरत होती. ग्रीन जर्सी, हेल्मेट घालून एका रांगेत चालणारे सुमारे पाचशे सायकल वारकरी! खूप समाधान वाटत होते, की मी त्या पाचशे जणांतील एक होते. त्या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होती. मी प्रसादच्या गळ्यात शिट्टी अडकावली होती. ती त्याच्यात आणि माझ्यात संवाद साधत होती. आम्ही वाहतुकीचा सामना करत करमाळ्यापर्यंत पोचलो.
“दुपारच्या जेवणानंतरचा प्रवास आमची सत्त्वपरीक्षा बघणारा ठरला. समोरून प्रचंड प्रतिरोध करणारा वारा, त्यात सारखे चढ, त्यामुळे दमछाक होत होती. सायकलचा तोल हँडल घट्ट पकडून सांभाळणे हे वाऱ्याच्या वेगामुळे आवश्यक होते. प्रसाद थकला होता. मी त्याला सकारात्मक पाठबळ देत ऊर्जा आणि उत्साह वाढवण्याचा प्रयत्न सतत करत होते. आम्ही सफर ‘कोशिश करने वालो की हार कभी नही होती’ हे गाणे गुणगुणत हळूहळू चालू ठेवली. अंधार पडू लागला. पण ‘हमारे इरादे बुलंद थे’! आम्ही सायकलचे लाईट चालू केले आणि प्रवास सुरू ठेवला. सगळ्यांनी टेंभुर्णी येताच टाळ्या वाजवून आम्हाला सलाम केला. आम्ही अवघड टप्पा ‘बॅकअप’चा सपोर्ट न घेता, सगळ्या आव्हानांचा सामना करत पूर्ण केला होता!
“तिसऱ्या दिवशी, ओढ लागली विठुरायाच्या दर्शनाची. केव्हा एकदा आमच्या सायकली पंढरपुरात पोचतील असे झाले होते, अंतर फक्त चाळीस किलोमीटर उरले होते. धर हँडल आणि मार पायडल! पण त्या प्रवासानेही आमची परीक्षा घेतली. वीस किलोमीटरनंतर रस्त्याचे काम चालू असल्यामुळे सायकल चालवणे महाकठीण ठरले. अखेर, आम्ही नाशिक ते पंढरपूर असा तीनशेचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. खेडलेकर महाराज आश्रमात रिंगण सोहळ्यासाठी पोचताच सगळ्या प्रसार माध्यमांचे कॅमेरे प्रसादकडे वळले. मी ‘नेत्रदान करा आणि परत जग पाहा’ हा संदेश पंढरपूर वारीत दिला. खरोखर, आपण म्हणतो, ‘मरावे परी कीर्तीरूपे उरावे’; पण त्याच बरोबर म्हणावे, ‘मरावे परी अवयव रूपी उरावे’”.
मनीषा यांची संवेदनशीलता नेत्रदानाचा प्रचार आणि प्रसार एवढ्यापुरती मर्यादित नाही. त्यांची जडणघडणच समाजभानाच्या मुशीत झाली आहे. नाशिक-दिंडोरी येथील पिंपळनारे नावाच्या गावातील शेतकरी कुटुंबातील ती मुलगी – मनीषा आनंदराव पिंगळे. एकत्र कुटुंब. एक बहीण – दोन भाऊ. मनीषा अतिशय हट्टी; म्हणून तिला शिकण्यासाठी आजोबांकडे ठेवले होते. आजोबा आदर्श पोलिस-पाटील होते. त्यांच्या निगराणीत मनीषाची मस्ती आणि शिक्षण, दोन्ही चालू होते. तिला आठवीत असताना शाळेत जाण्यासाठी हातात सायकल मिळाली.
तेव्हापासून तिचे सायकलवरील प्रेम आणि पकड घट्ट होत गेली. बारावीत चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळाले. मेडिकलला जाण्याचा इरादा पक्का होता. मात्र मेडिकलला प्रवेश नाशिकमध्ये कोठे मिळेना. घरून नाशिकबाहेर शिकण्यास जाण्याला परवानगी नव्हती. अखेरीस नाशिकला मोतिवाला मेडिकल कॉलेजमध्ये होमियोपॅथीच्या कोर्सला प्रवेश मिळाला आणि मनीषा 1996-97 मध्ये डॉक्टर झाल्या.
त्या नाशिकच्या हृषीकेश हॉस्पिटलमध्ये सी.एम.ओ. झाल्या. चांगला अनुभव मिळू लागला. त्यांनी स्वतःचे क्लिनिक सुरू केले. दरम्यान, डॉ. नितीन रौंदळ या समविचारी तरुणाशी ओळख झाली. ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मनीषा यांचा कमालीचा हट्टी स्वभाव डॉक्टरांना नीट ओळखीचा आहे. त्यांची जिद्द सवयीची झाली होती, म्हणूनच 1998 साली लग्न झाल्यापासून आजतागायत ते मित्र आणि नवरा म्हणून मनीषा यांच्या प्रत्येक उलाढालीत सहभागी तरी असतात किंवा पाठीशी उभे तरी असतात. त्या दोघांची कन्या बारावीनंतर आता मेडिकलला प्रवेश घेत आहे.
रौंदळ पती-पत्नीचे क्लिनिक आणि हॉस्पिटल रुग्णांच्या गर्दीत नाशिकमध्ये सुरू आहे. डॉ. मनीषा रुग्णांना फिटनेससाठी सायकलिंगचा सल्ला देताना, तो फंडा त्यांनी स्वत:ही अमलात आणला पाहिजे असे म्हणून वैद्यकीय दृष्टिकोनातून सायकलकडे बघू लागल्या. नाशिकच्या त्या जणू ‘सायकल क्वीन’ आहेत.
त्यांनी प्रथम नाशिक-कोपरगाव (येवले) या नव्वद किलोमीटरच्या सायकल सफरीत ‘नाशिक सायकल फाउंडेशन’तर्फे भाग घेतला. स्वतःच्या साध्याशा सायकलने नव्वद किलोमीटरची सफर पूर्ण केली. त्यांनी नंतर, नाशिक-घोटी-नाशिक स्पर्धेत भाग घेतला. त्यात त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची सायकल दौड अधिकच वेगात सुरू झाली. त्या एकशेपन्नास किलोमीटरवरील स्पर्धांत सहभागी होऊ लागल्या. सायकलिस्ट फॅमिलीतील मेम्बर वाढू लागले. मनीषा यांच्या सहभागाने प्रोत्साहित होऊन अनेक महिला मेम्बर झाल्या. मनीषा महिलांना त्यांनी सायकल चालवताना घेण्याच्या काळजीविषयी प्रशिक्षण देतात. त्यांचे लक्ष सायकलिंगबरोबर रनिंगनेही वेधून घेतले आणि मनीषा एकवीस किलोमीटरची हाफ मॅरेथॉन जिंकल्या, मग बेचाळीस किलोमीटरची फूल मॅरेथॉनही जिंकल्या.
‘माणसे जोडणे’ हा त्यांच्या स्वभावाचा भाग. त्यात व्यवसायामुळे अनेक क्षेत्रांतील अनेक माणसे रोज भेटत असतात. त्यातूनच विविध सामाजिक घडामोडी निर्माण झाल्या. त्या आणि त्यांची मित्रमंडळी ट्रॅफिक अँबेसॅडर म्हणून सिग्नलवर काम करतात; हेल्मेटचे महत्त्व लोकांना पटवून देतात. मनीषा यांचा सहभाग पुण्याच्या डॉ. गणेश राख यांच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या आंदोलनात आहे. त्यांनी त्यांच्या दवाखान्यात मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षें मोफत उपचार केले जातील असे जाहीर करून टाकले आहे! तो सक्रिय सहभाग अनोखा आहेच, पण त्यांच्या वृत्तीची ओळख पटवून देणारा आहे. त्यांचा वैद्यकीय उपचारांबाबतचा दृष्टिकोनही निःसंदिग्ध आहे. उपचार रुग्णांना दिलासा देत, कमी त्रास होईल अशा पद्धतीने आवश्यक ते केले जातात. अनावश्यक तपासण्या टाळल्या जातात, मात्र औषध रोग्याला तपासूनच दिले जाते.
तीन जून हा ‘जागतिक सायकल दिन’ म्हणून 2018 पासून जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने मनीषा यांना त्यांची लेक अपूर्वा हिने पत्र लिहून लेखी शुभेच्छा दिल्या. बायसिकल डे असो नाहीतर डॉक्टर्स डे असो, कोणताही डे सामाजिक सत्कार्य करूनच साजरा करायचा आणि तो एका दिवसापुरता मर्यादित ठेवायचा नाही, कार्य सतत चालू ठेवायचे हे ब्रीद डॉक्टरांचे आहे. त्यांना त्यांच्या कार्यासाठी काही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. मनीषा रौंदळ यांनी अफाट इच्छाशक्ती, अगम्य उत्साह आणि प्रंचड मेहनत यांच्या जोरावर सतत स्वतःला सिद्ध केले आहे. इच्छा असली की मार्ग निघतो; येथे त्यांच्या नावातच मनीषा आहे!
मनीषा रौंदळ – 9822538166
drmanisharaundal@gmail.com
– अलका आगरकर रानडे
alakaranade@gmail.com
Thanks to thinkmaharashtra…
Thanks to thinkmaharashtra.com for publishing my achievement
Comments are closed.