अंधारातल्या पणत्या!
फादर्स डे, मदर्स डे अशा दिवशी मुले आपल्या पितामात्यांबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करतात, त्याच धर्तीवर ‘डॉक्टर्स डे’च्या दिवशी रुग्णांच्या वतीने डॉक्टरांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून नाना पालकर स्मृती समितीने ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने मुंबईत आगळावेगळा सोहळा योजला. भारतात १ जुलै हा ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा होतो.
डॉक्टरांच्या दोन पिढ्या व्यासपीठावर होत्या. दोन तरुण कर्तृत्ववान मराठी डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. राजन बडवे अलिकडेच टाटा स्मृती कॅन्सर रूग्णालयाचे संचालक झाले. हे रुग्णालय आशियातले या रोगाचे सर्वोत्तम मानले जाते. डॉ. संजय ओक महापालिकेच्या वीस रूग्णालयांचे संचालक व ‘केइएम’चे अधिष्ठाता अशी दुहेरी जबाबदारी सांभाळतात. डॉ. बडवे
कार्यक्रमाचे अध्यक्ष होते ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. व्ही.एन.श्रीखंडे आणि संयोजक होते मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. अजित फडके. संजय ओक यांनी त्या दोघांचे वर्णन वैद्यक विषयातील द्रोणाचार्य व भीष्माचार्य असेच केले.
समाजातील सर्वसामान्य माणसाचे कर्तृत्व व चांगुलपणा हाच मग समारंभाचा ‘थीम’ होऊन गेला. (‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हा प्रकल्प अशा कामांची नोंद करण्याच्या हेतूने सुरू झाला आहे!)
बडवे यांनी रोग्याची शारीरिक दुर्बलता आणि मानसिक अगतिकता कशी असते याची उदाहरणे सांगत असतानाच, धीराने रोगाचा सामना केल्याचे प्रसंग वर्णन करून सांगितले. व्यक्तीने अन्न, पैसा व वेळ दुस-यासाठी वापरावा ही आपली शिकवण असल्याचेही त्यांनी नमूद केले. संजय ओक सिद्धहस्त लेखक व वक्ते आहेत. त्यांच्या नावावर इंग्रजी-मराठी बत्तीस पुस्तके आहेत. त्यांत कविता-संग्रहही आहे. त्यांनी रुग्ण आहेत म्हणून डॉक्टर आहेत हा मुद्दा, विविध दाखले व संस्कृतातील उदधृते देऊन ठासून मांडला. ते म्हणाले, की डॉक्टर म्हणजे देवदूत ही भावना कोणाचीही राहिलेली नाही. विशिष्ट प्रसंगी मात्र डॉक्टर देवदूत तरी ठरतो, नाहीतर यमदूत! आपण डॉक्टर बनण्यासाठी जन्माला आलो व तेच काम आयुष्यभर निष्ठेने करणार आहोत हे त्यांनी
बडवे व ओक डॉक्टरांचा परिचय डॉ. मुकुंद थत्ते, डॉ.ऋजुता हाडये व डॉ. हेमा यांनी करुन दिला.
व्ही.एन.श्रीखंडे यांच्या मागे साठ वर्षांची तपश्चर्या आहे. त्यांचे अनुभवाचे बोल प्रत्ययकारी होते. ते म्हणाले, की सर्वत्र अंधार पसरल्यासारखा भासतो खरा, परंतु या दोन सत्कारमूर्ती डॉक्टरांसारख्या पणत्याही सर्वत्र पेटलेल्या आहेत. त्यांच्या प्रकाशात हा समाज उद्या उजळून निघणार आहे.
इतिहासाचे भान गरजेचे आहे असे सांगून श्रीखंडे यांनी, ज्यांच्या नावाने ‘डॉक्टर्स डे’
साजरा होतो त्या बी.सी.रॉय यांचे कार्य-कर्तृत्व वर्णन केले. ते बंगालचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अन्य अशी सार्वजनिक पदे भूषवली, पण वैद्यकाचे व्रत सोडले नाही. त्यांना भारतरत्न बहाल करण्यात आले ते त्यामुळे. त्यांनी इंडियन मेडिकल कौन्सील १९३० च्या दशकात स्थापन केले. तेथेच अध्यक्षांनी सध्या भ्रष्टाचार मांडला ही विसंगती त्यांनी दाखवून दिली.
रॉय यांचा जन्म व मृत्यू, दोन्ही एक जुलैचे. म्हणून तो ‘डॉक्टर्स डे’ असा मानला जातो. पालकर स्मृती समितीने योजलेला हा पहिला ‘डॉक्टर्स डे’ समारंभ. तो रुग्णांमार्फत साजरा करण्याची कल्पना उपस्थित सर्वांना आवडली.
– प्रतिनिधी