ठणकतं दुःख

     'हिंदू दहशतवाद' म्हटलं, की स्वत:ला हिंदू समजणार्‍या माणसांच्या मनात कितपत दुखावं? नवबौद्ध मित्रानं ब्राह्मणांना शिव्या घातल्या, की ब्राह्मण घरात कर्म-धर्म संयोगानं जन्माला आलेल्या व्यक्तीनं ते स्वतःच्या अंगाला लावून घ्यावं का? कोणी कुराण जाळतो म्हणणारा बिनडोक ख्रिश्चन उपटला, तर ज्यांनी आजन्मत:  प्रोटेस्टंट ख्रिश्चनांना शिव्या घातल्या त्या कॅथलिक ख्रिश्चनांनी काय वाटून घ्यायचं? की आपली एक अस्मिता त्या मूर्ख, दुष्ट, दहशतवादी, क्रूर, शोषण करणार्‍या व्यक्ती अथवा समूहासोबत शेअर झाली आहे हे निमूट मान्य करून दुःखी व्हायचं? 

     काही नशीबवान व्यक्तींना स्व-श्रेष्ठगंडाची अर्थात सेल्फ- रायचसपणाची झिंग असते. त्यांना आपण जन्मतःच पॉलिटिकली करेक्ट होतो असं वाटतं. ते जन्मानं ब्राह्मण, हिंदू, दलित, उदारमतवादी आणि उरलेल्या वेळात संधिसाधू, स्त्रीवादी आणि घरी 'बायको = मोलकरीण' ही समानता जपणारे असतात आणि त्यात भरीत भर म्हणजे ते यशस्वी असतील तर त्यांना परमेश्वरकृपेनं अशा टोचण्या लागत नाहीत. त्या थोर यशस्वी समूहाला आता जरा बाजूला ठेवूया. हा नैतिक प्रश्न ज्यांना टोचणी लागते त्यांचा आहे. माझे काही 'लकी' डावे मित्र आणि काही 'दक्ष' हिंदूराष्ट्रवादी परिचित, काही यशस्वी व्यावसायिक, काही कॉर्पोरेट उच्चपदस्थ, काही डाव्या-कळकळग्रस्त मैत्रिणी, काही पर्पेच्युअल व्हिक्टिमाईज्ड आत्मे ही काही जात्या दुष्ट मंडळी नाहीत. परंतु त्यांची स्वतःच्या पॉलिटिकली करेक्ट असण्याकडे टीकात्मक बघण्याची तूर्त तयारी नाही. त्यांच्या कॉन्ट्रॅडिक्शन्स त्यांना पाहव्याशा वाटत नाहीत. एलकुंचवारांच्या 'वाडा' मध्ये एक पात्र म्हणतं तसं, ' सर्वांचे हात राड्यात आहेत. काहींचे कोपरापर्यंत तर काहींचे ढोपरापर्यंत'. असंही त्यांना वाटतं क्वचित. सर्वच जण थोडे-थोडे पॉलिटिकली इन्करेक्ट असतील तर टोचणी का बाळगा? म्हणून मग टोचणी लागणं क्रमशः निरर्थक बनत जात असावं.

     त्यांना तरी का दोष द्या किंवा टार्गेट करा – माध्यमात काम करताना कधी कधी मी देखील पोझिशन घेऊन उर्मट प्रश्न विचारलेत की. माझी आयडिऑलोजिकल धारणा पक्की नाही. किंवा असं म्हणू, की ती सतत प्रश्न विचारण्याच्या, स्केप्टिक भूमीवर आणि स्वतःला उद्ध्वस्त करू शकेल अशा ज्वालामुखीच्या तोंडावर रेलून उभी आहे. अशा न पक्क्या अस्मितेचा प्रश्न अधिक दुखरा होतो. दरम्यान केलेले विचारप्रणाल्यांचे निर्णय अस्मितेचा भाग बनून बसतात. आणि त्यांचा प्रतिवाद करताना कधी कधी त्यातली भगदाडं सामोरी येतात. त्याला तोंड द्यावं लागतंच. तेव्हा ते अर्धवट अस्मितेचं दुखणं अधिक अवघड. त्या पापाची स्मृती भयंकर. 

     माझा लाडका दिग्दर्शक रॉबर्ट आल्टमान याचं एक कोटेशन मला फार आवडायचं. If you do not have a leg to stand on, you cannot put your foot down. पण आपण ज्या कोणत्या भूमीवर उभं राहून, ठासून काही बोलायला जातो त्या भूमीचा पाया जर जिदू कृष्णमूर्तींनी आधीच कापला असेल तर पोझिशन घेतानाच तिच्या उध्वस्त होण्याची बीजंही आपण पेरली आहेत हे ध्यानात येतं. असो. तिथपर्यंत जाण्यापूर्वी, शेअर केलेल्या अस्मितेकडे पुन्हा एकदा वळते.

     ज्यांना 'हिंदू' म्हणून ओळख आवडते त्यांना ‘हिंदू दहशतवाद’ या कल्पनेचा राग येतो. त्यापेक्षा काकणभर अधिक राग ज्यांना 'हिंदू' अस्मिता नाकारली तरीही ज्यांना 'हिंदू' म्हणून टार्गेट केलं जातं त्यांना येतो. पण काही राजकीय नेत्यांची आपल्याला राग येत नाही हे दाखवण्यातच गुंतवणूक असते. अस्मिता ही जगण्यासाठी, सर्व्हायवलसाठी वापरलेली रणनीती असल्यामुळे त्या रणनीतीचा पाया राजकीय असतोच.

     मी मराठी आहे पण ‘मनसेग्रस्त’ नव्हे, मी बाई आहे, पण काही बायांच्या ढाक भावनिक राजकारणाचा भाग नव्हे. गायत्री स्पिवॅकसारखं मग लांबलचक टिपण स्व-ओळखीला जोडावं लागतं. स्वायत्त व्यक्तिवाद जपण्याच्या मर्यादेत आपण जगण्यासाठी ज्या तडजोडी केल्या आणि त्या तडजोडींमुळे अस्मितेच्या ज्या  गटांमध्ये आपण ढकलले गेलो त्याची संगती कशी लावायची हा प्रश्न मला कायम ग्रासतो.

     गांधीजींच्या राजकारणाचं महत्व इथं कळतं. शोषण करणा-याच्या मनातल्या माणसाला आवाहन करणे म्हणजे काय? ते का महत्त्वाचं आहे त्याची ताकद इथं जाणवायला लागते. अस्मितेच्या राजकारणाची संगती लागते हळूहळू. 

     हे सारं आठवायचं कारण म्हणजे ९/११ ची आठवण. माझी मैत्रीण फरझाना आणि मी यावर बोललो होतो. महम्मद आटा = मुस्लिम, फरझाना = मुस्लिम असं म्हणत फरझानालाही जेव्हा ९/११ नंतरच्या अमेरिकेत दहशतवादग्रस्त नजरेनं तोललं जायचं त्यावेळी तेव्हा ती भडकून उठायची. फरझानच्या व्यक्तिगत आयुष्यात वैचारिक स्वातंत्र्यासाठी तिने मोजलेली किंमत ज्यांना माहीत होती त्यांना तिचा संताप समजायचा. परंतु लोंढामाध्यमं अस्मिताबाबतच्या आपल्या जाणिवा-धारणांना आकार देतात. त्यांच्या रेट्यात पहिला बळी व्यक्तिवादाचा जातो. अस्मितेच्या राजकारणात सर्वांत जास्त भरडला जातो ते स्वायत्त, एकटा लढणारा, अस्त्र ना परत्र, डक बिल्ड प्लॅटिपस- ज्याला कोणत्याच अस्मितेच्या कुशीत शांत वाटत नाही.

ज्ञानदा देशपांडे
भ्रमणध्वनी : ९३२०२३३४६७
इमेल – dnyanada_d@yahoo.com

 

About Post Author