टेकड्या बेरंगी होऊ नयेत म्हणून … स्थळ चतुःशृंगी, पुणे

0
27

विकासाच्‍या नावाखाली भकास होणारा परिसर अनेक ठिकाणी पाहण्‍यास मिळतो. माणसाचा हव्‍यास कित्‍येक हिरव्‍यागार ठिकाणांना उजाड करत चाललाय. अशा परिस्थितीत काही मंडळी एकत्र आली आणि त्‍यांनी ‘ग्रिन हिल्‍स ग्रूप’ची स्‍थापना केली. या ग्रूपच्‍या माध्‍यमातून त्‍यांनी पुण्‍यातील चतु:शृंगीच्‍या टेकडीला तिचा हरवलेला हिरवा रंग पुन्‍हा मिळवून देण्‍याची धडपड सुरू केली. कार्यकर्त्‍यांच्‍या या धडपडीला अनेक हातांची सोबत मिळाली आणि चतु:शृंगीची टेकडी पुन्‍हा हिरवीगार दिसू लागली. असे आणखी काही ‘ग्रूप’ कार्यरत झाल्यास पुण्यातील व भोवतालच्या टेकड्या पुन्हा हिरव्या होण्यास वेळ लागणार नाही….

जगात तशा अनेक टेकड्या असतील; त्या वेगवेगळ्या रंगांच्याही असतील. पण तूर्तास आपल्याला ज्याबद्दल बोलायचंय ती टेकडी पुणे विद्यापीठा जवळ आहे. चतु:शृंगी देवी च्या मंदिरामागे असणारी – म्हणून चतु:शृंगीची टेकडी असंच नाव पडलेली. ह्या टेकडीचा मूळ रंग होता हिरवा. म्हणजे टेकडीवर घनदाट झाडी होती. ती झाडी हिरवी म्हणून मग टेकडीचा रंगसुद्धा हिरवा. पण मग हळुहळू माणूस नावाच्या प्राण्यानं विकास नावाच्या बाबीखाली अशी झाडं वाट्टेल तशी तोडली नि मग हिरवा रंग संपत, संपत शेवटी, ही टेकडी रिकामी झाली; स्वतःचा हिरवा रंग हरवून बसली. असा एकूण गोष्टीचा शेवट.

मग काही मंडळींना वाटलं, की टेकड्यांना हे असं बेरंगी करणं काही बरं नाही. झाडांना असं संपवणं चुकीचं आहे. आता, आपल्या हातात काय, तर आपण ह्या टेकड्यांना त्यांचा मूळ रंग पुन्हा मिळवून देऊ. म्हणून मग त्यांनी ‘ग्रीन हिल्स ग्रूप ’ची स्थापना केली. अशी एकूण दुस-या गोष्टीची सुरुवात.

चतु:शृंगीच्या टेकडीला मूळ रंग पुन्हा देण्यासाठी ‘ग्रीन हिल्स ग्रूप’च्या कार्यकर्त्यांनी चार वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केले. टेकडीवर जगू शकतील अशी रोपं, पाण्यासाठी चर, दर रविवारी त्यांची विचारपूस असं सगळं रीतसर. दर रविवारी आणि गुरूवारी, मंडळी टेकडीवर एकत्र जमत, झाडं लावत, त्यांना पाणी घालत. बघता बघता, रोपं वर दिसू लागली. अरे, खरोखरच, टेकडीचं डोकं हिरवं दिसणार की असं वाटू लागलं! बाजूच्या पोलिस ठाण्यातील मंडळींची मदत लाभली. कंपन्यांची मदत मिळू लागली. पाण्याची टाकी उभी राहिली. देशातले पाहुणे टेकडीवर येऊ लागले. कार्यकर्तेही नवनव्या आयडिया काढू लागले.

चार वर्षांत, रोपांनी चांगलीच उभारी घेतली आहे. झाडं कमरेपेक्षा उंच वाढली आहेत. पुण्यात विमानांनी येणा-यांना जाणीव झाली, पुण्यातल्या एकूणच टेकड्या हिरव्या होऊ शकतात की …! संस्थेची, उपक्रमांची अधिक माहिती. http://www.greenhillsgroup.org/

पण ग्रीन हिल्स ग्रूपसमोर एक छोटीशी अडचण होती. ती निवारण्याच्या प्रयत्नांतून कार्यकर्त्यांच्या मनातील अभिनवता कळते; व्हायचं असं, की पुण्याबाजूच्या पाटस वगैरे भागातली धनगर मंडळी त्यांच्या मेंढ्यांना ह्या टेकडीवर चरायला घेऊन येत. ‘ग्रीन हिल्स’च्या कार्यकर्त्यांनी लावलेली ताजी रोपंच मग ह्या मेंढ्यांचं खाद्य ठरू लागली. त्यामुळे कार्यकर्त्यांचे प्रयत्न वाया,  रोपांना घालण्यासाठी टेकडीवर आणावं लागणारं पाणी वाया,  त्यासाठी लागणारे स्वयंसेवकांचे श्रम वाया,  वेळ नि पैसा वाया!

ह्यावर उपाय म्हणून कार्यकर्त्यांनी धनगर मंडळींशी चर्चा केली आणि त्यांना मेंढ्यांच्या चरण्यामुळे होत असलेला गोंधळ समजावून दिला; टेकडीवर मेंढ्यांना चरण्यासाठी आणू नये अशी विनंती केली. मुळातूनच पर्यावरणाजवळ असणा-या धनगर मंडळींनी तत्काळ ह्या गोष्टीला होकार दिला. त्यामुळे घडली ती चांगली गोष्ट म्हणजे, चतु:शृंगीच्या टेकडीला तिचा हिरवा रंग परत मिळाला. ह्या सर्व प्रयत्नांना साहाय्य करणा-या धनगरांचा सत्कार ‘ग्रीन हिल्स ग्रूप’च्या वतीने समाजसेवक-लेखक गिरीश प्रभुणे व स्थानिक नगरसेवक विकास मठकरी यांच्या हस्ते टेकडीवरतीच एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आला. या वेळी धनगरांचे, त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मुंडासं आणि कडं देऊन आभार मानण्यात आले. कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रभुणे म्हणाले, की धनगर समाज हा मुळात निसर्गाला हानी पोचणार नाही अशी जीवनशैली असलेला आहे. त्यामुळे हा सत्कार म्हणजे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची शहरी लोकांनी पकडलेली संधी आहे. ते पुढे म्हणाले, की “कोणतेही नियोजन नसलेले शहरीकरण व पाश्चात्यांचे अंधानुकरण करणारी तथाकथित आधुनिक जीवनशैली ही पर्यावरणाच्या -हासाची महत्त्वाची कारणे आहेत. शहरी समाजाच्या पिढ्यानपिढ्यांनी हा -हास घडवलेला आहे. त्यामुळे पर्यावरणरक्षणाचे शहरी लोकांचे प्रयत्न हे मुख्यत्त्वे पापक्षालन आहे.”

 

दहा वर्षांपूर्वी एक छोटा गट म्हणून वृक्षारोपण व जलसंधारणाच्या कामांना सुरुवात केल्यानंतर चार वर्षांपूर्वी ‘ग्रीन हिल्स ग्रूप’ची ट्रस्ट म्हणून नोंदणी करण्यात आली. संस्थेचे श्रीकांत परांजपे हे संस्थापक असून रवी पुरंदरे सचिव म्हणून व संजय आठवले अध्यक्ष म्हणून काम बघतात. इतर वेळी, वेगवेगळ्या क्षेत्रांत नोकरीव्यवसाय करणारी ही पन्नासेक मंडळी दर रविवारी पुण्यातील हनुमान टेकडी, चतु:शृंगी टेकडी अशा टेकड्यांवर जाऊन वृक्षारोपण व संवर्धनाचं काम करतात. मुळात, शीर्षकात म्हटलंय तसं, टेकड्या बेरंगी होऊ नयेत या हेतूने ही संस्था काम करत आहे.

 

आठवले सॉफ्टवेअरमध्ये असून पर्यावरण विषयानं पछाडलेले आहेत. ते स्वत: घरच्या बागेला सायकल चालवून पाणी देतात, व्यायामापरी व्यायाम व विजेची बचत! त्यांचं मुख्य काम चतु:श्रुंगी टेकडीवर. तिथेच पलीकडे त्यांचे सहकारी टाकळकर यांनी तरूण मुलांच्या सहकार्यानं आणखी मोठ्या क्षेत्रात वृक्षलागवड आरंभली आहे. तर आठवले यांना वनखात्यानं एमआयटीमागच्या टेकडीवर झाडंच झाडं लावायचं काम सोपवलं आहे. आठवले आता रविवारी सकाळी उठून तिकडे जातात. त्यांचं म्हणणं असं, की काम केलं तर मनुष्यबळ, साधनसंपत्ती… सगळं हजर होतं; कोणीतरी त्या कामाला जुंपून मात्र घ्यावंच लागतं. असे काही ‘ग्रूप’ कार्यरत झाल्याने पुण्यातील व भोवतालच्या टेकड्या पुन्हा हिरव्या होण्यास वेळ लागणार नाही.

– प्रतिनिधी – thinkm2010@gamil.com , संजय आठवले – 9890211198

About Post Author