टीम व्हिजनची डोळस मदत

_Team_Vision_1.jpg

दिव्यांग व्यक्तींना गरज असते ती त्यांची अडचण समजून घेऊन केलेल्या मदतीच्या हातांची; तसेच, अंध विद्यार्थ्यांना मदतीची गरज असते ती ‘डोळस’ मदतीची. मुंबईतील विविध कॉलेजांमधील तरुण ‘व्हिजन’ या उपक्रमाअंतर्गत तशी मदत करत आहेत. अंध विद्यार्थ्यांसाठी रीडर किंवा रायटर म्हणून काम करणे किंवा तशी माणसे मिळवून देण्याचे काम त्या उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी करत असतात.

उपक्रमाची सुरुवात एका प्रसंगातून झाली. पोद्दार कॉलेजमध्ये ‘एनएसएस फेस्ट’च्या निमित्ताने संदेश भिंगार्डे या विद्यार्थ्याची ओळख प्रज्ञा पटेल या अंध युवतीशी झाली. ती राष्ट्रीय स्तरावरची जलतरणपटू आहे. संदेशने तिच्या बँकेच्या परीक्षेसाठी पेपर रायटर आणि रिडर म्हणून काम केले. त्याच वेळी इतर अंध विद्यार्थ्यांना सुद्धा रायटरची गरज आहे असे त्याला कळले. त्यावेळी त्याने शक्य तेवढ्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. पण पुरेसे रायटर उपलब्ध होऊ शकले नाहीत. तेव्हाच त्यांना त्या गंभीर समस्येची जाणीव झाली. त्यावरचे उपाय म्हणून ‘टीम व्हिजन’ची निर्मिती झाली.

त्यांनी ती चळवळ अधिकाधिक सक्रिय होण्यासाठी व्हॉट्सअॅप व फेसबुक या सोशल मीडियावरून मोहीम राबवली. त्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ‘टीम व्हिजन’च्या ‘रीडर्स अँड रायटर्स फॉर ब्लाइंड स्टुडंट्स’ या फेसबुक पेजला एक हजार तीनशे हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. रूइया, पोद्दार, रुपारेल, मिठीबाई, भवन्स, सिद्धार्थ, कीर्ती, साठ्ये, झेव‌िअर्स आणि विल्सन या मुंबईतील कॉलेजांमधील दोन हजारांपेक्षाही जास्त विद्यार्थी त्या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. अंधांसाठी काम करणा‍ऱ्या ‘नॅब’ (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड) या संस्थेकडूनही ‘टीम व्हिजन’शी संपर्क साधला जातो. जेथे रायटर्सची गरज असेल त्या विद्यार्थ्यांची माहिती ‘टीम व्हिजन’च्या स्वयंसेवकांना व्हॉटसअॅपद्वारे कळवली जाते. त्यामुळे झटपट आणि कमी वेळात रायटर उपलब्ध होऊ शकतात. साडेपाचशेपेक्षा जास्त अंध विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे. काहींनी बारावीच्या परीक्षेमध्ये सत्तर टक्क्यांपेक्षाही जास्त गुण मिळवले आहेत. ‘व्हिजन’ची प्रेरणा ठरलेली प्रज्ञा पटेल ही स्वतःच्या पायावर उभी असून बँकेमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहे.

_Team_Vision_2.jpg‘व्हिजन’ संस्थेचे उदाहरण घेऊन पुणे, नाशिक अशा शहरांमधून मदतीचे हात पुढे आले आहेत. त्या सर्व स्वयंसेवकांची माहिती व नोंद ‘व्हिजन’कडे केली गेली आहे व त्या प्रमाणे गरजेनुसार अंध विद्यार्थ्यांना विविध प्रकारे सहाय्य केले जाते. ‘टीम व्हिजन’चे वैयक्तिक पातळीवर सुरू असलेले काम विस्‍तरण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍या उपक्रमाला संस्‍थात्‍मक रुप 2013 मध्‍ये देण्‍यात आले.

अभय पाटील या पूर्ण अंध मुलाने अंध मुलांना पदव्युत्तर शिक्षण घेताना संदर्भ पुस्तके मिळण्याबाबत मोठीच अडचण येते असे सांगितले. तो विद्यापीठात इतिहास विषयात एम.ए. करत आहे. त्यानेच त्यावर तोडगा ही सुचवला. जर या पुस्तकांचे श्राव्य वाचन सी.डी.वर केले तर अंध विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घेता येईल. त्यानुसार ‘व्हिजन’ने त्या पुस्तकाचे श्राव्य वाचन केले आहे. त्यातूनच ऑडिओ लायब्ररी तयार झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संस्थेच्या कार्यामुळे, प्रेरणेमुळे काही दिव्यांग विद्यार्थी सुद्धा एकमेकांची मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. त्यांनी ‘फेसबुक’ आणि ‘व्हॉटसअॅप’चे गट तयार करून त्यावर वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा करण्याचा उपक्रम चालू केला आहे.

संस्‍थेने त्‍यांची www.teamvision.org.in ही वेबसाईट निर्माण केली आहे. त्‍यावर अंध विद्यार्थी आणि त्‍यांच्‍यासाठी लेखक म्‍हणून मदत करू इच्छिणा-या व्‍यक्‍ती यांची नोंदणी करण्‍याची सोय आहे. ती नोंदणी त्‍यांच्‍या परिसरानुसार केली जाते. त्‍यामुळे एकाच परिसरातील विद्यार्थी आणि लेखक यांची सांगड घालणे संस्‍थेला सोपे जाते. संस्‍थेकडून सी.डी.वर रूपांतर झालेली मूळ पुस्तके जमा करून, त्यांची नोंद ठेवून ती पुस्तके डोळस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातात. त्‍याचबरोबर त्‍यांच्या अभ्‍यासक्रमाचे ऑडिओ रेकॉर्डींग करून ते इच्‍छुक विद्यार्थ्‍याला इमेलद्वारे पाठवले जाते. ‘टीम व्जिन’ची त्‍या प्रकारचा ऑडिओ डाटा लवकरच वेबसाईटवर उपलब्‍ध करून देण्‍याची इच्‍छा आहे.

सध्‍या ‘टीम व्हिजन’ त्‍यांचे काम वेबसाईट, फेसबुक आणि मोठ्या प्रमाणात व्‍हॉटस् अॅप यांद्वारे करत आहे. या प्रकारे केवळ मुंबई अथवा महाराष्‍ट्र नव्‍हे तर भारतातील दिल्‍ी, लखनऊ अशा प्रदेशांमध्‍ये लेखक पुरवण्‍याचे काम संस्‍थेने केले आहे.

‘टीम व्हिजन’ने त्या गटाच्या कामाची व्याप्ती वाढवली आहे. आता त्‍यांच्‍या कामाचा रोख अंध विद्यार्थ्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍त्‍व घडवणे याकडे असल्‍याचे टीम व्हिजनच्‍या सहकारी अर्चना देशपांडे आणि ऋतुजा शिंदे यांनी सांगितले. संस्‍थेतर्फे अंध विद्यार्थ्यांसाठी ट्रेकिंग, इंग्लिश स्पीकिंग कोर्स आयोजित करण्यात येतात. त्या सोबतच त्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करणे; तसेच, नेत्रदान शिबिरांचे आयोजन आदी उपक्रमही चालवले जातात. ‘टीम व्हिजन’बद्दल बोलताना संदेश‌ भिंगार्डे म्हणतो, आमचा प्रयत्न उपक्रमाद्वारे त्या विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा आहे. त्या विद्यार्थ्यांना खरंच मदत करायची असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींनी नेत्रदान केले पाहिजे.

‘टिम व्हिजन’च्‍या कामात सहभागी होण्‍यासाठी संपर्क करा.

संदेश भिंगार्डे – 9757088108, ऋजुता शिंदे – 8422043763
Email – teamvision.vcs@gmail.com
Website : www.teamvision.org.in

प्रथमेश करजावकर

(मूळ लेख महाराष्ट्र टाइम्स २९ सप्टेंबर २०१५)

About Post Author

2 COMMENTS

  1. Sandesh Bhingarde aani…
    Sandesh Bhingarde aani tyachi Team Vision….sagalech great aahet. Aamchya ‘eye-doll’ sathi pn aamhi weloweli Team Vision chi madat gheto. Sandesh ha aamchyasathi khas wyakti aahe.Sandesh Bhingarde,Amol Mane,Archana…..tumha saglyansathi aamchya kayamach shubhechha ? aahet.

  2. Rima copy karun konihi pas…
    Rima copy karun konihi pas hita….tumhi lok kase pass hotat he ata jagjahir ahe

Comments are closed.