नाशिकच्या ज्योती आव्हाड यांनी शारीरिक व मानसिक अक्षमता असलेल्या मुलांसाठी तयार केलेले ‘सेन्सरी गार्डन’ ही महाराष्ट्रातील पहिलीच, अगदी आगळीवेगळी अशी बाग आहे.
‘नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) युनिट, महाराष्ट्र (नाशिक)ट ही संस्था १९८४ सालापासून अंधांच्या पुनर्वसनाचे कार्य करत आहे. ज्योती आव्हाड संस्थेच्या नाशिकमधील अंधांसाठी असलेल्या शाळेच्या प्राचार्य आहेत. संस्थेने (नॅब) त्यांच्या कामाची कक्षा वाढवली व २००० साली मूकबधिर, मल्टिपल डिसॅबिलिटी, ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मतिमंद अशा मुलांचे पुनर्वसन करण्याचे ‘प्रोजेक्ट’ही हाती घेतले. त्यांना त्या कामासाठी ‘Sense International (India)’ या संस्थेने आर्थिक व तांत्रिक मदत केली. पुढे, ‘नॅब’ने नवीन तंत्रांचा, अॅक्टिव्हिटीजचा वापर करण्याचे ठरवत ‘सेन्सरी गार्डन’ हा प्रोजेक्ट हाती घेतला.
ज्योती आव्हाड त्या नाविन्यपूर्ण कामाविषयी माहिती सांगताना म्हणाल्या, “आम्हाला ‘सेन्सरी गार्डन’ आमच्या शाळेशी संलग्न असावी असे वाटले. त्याचा फायदा आमच्या संस्थेतील मुलांना होणार होता. हैदराबाद येथे ‘सेन्सरी गार्डन’ आहे. आम्ही ती पाहून आलो. मग आम्ही आमच्या ‘सेन्सरी गार्डन’चे प्रेझेंटेशन तयार केले व दिल्लीचा ‘नॅशनल ट्रस्ट’ यांना दाखवले. त्यावेळच्या ‘नॅशनल ट्रस्ट’च्या चेअरपर्सन पुनम नटराजन यांना ती संकल्पना आवडली व १९९९ च्या अपंगांविषयीच्या एका अॅक्टच्या आधारे, त्यांनी आम्हाला बागेसाठी चार लाख रुपये मंजुर केले. बागेचा प्रत्यक्ष खर्च अंदाजे दहा लाख रुपये होता. आम्ही त्या बागेसाठी आवश्यक असलेले बाकी सहा लाख रुपये देणग्यांच्या रूपाने जमा केले. बागेचे भूमिपूजन ३० जानेवारी २००९ रोजी झाले आणि तिचे काम पूर्ण होऊन, बाग नोव्हेंबर २००९ मध्ये सुरू झाली.”
अंध, मूकबधिर, मल्टिपल डिसॅबिलिटी असणाऱ्या, ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मतिमंद अशा मुलांसाठी ‘सेन्सरी गार्डन’ सुरू करणे ही अगदी नवीन संकल्पना आहे. ‘सेन्सरी इंटिग्रेशन’ हा त्यामागील महत्त्वाचा उद्देश. त्या मुलांसाठी तो उपचार आहे. त्यामुळे मुलांमध्ये खूप सुधारणा झालेली आढळून आली. This type of treatment shows promising results in the development of sensory functioning of the brain & in general adaptive behavior.
शारीरिक आणि मानसिक उणेपण असणाऱ्या मुलांना, समाजातील इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे आयुष्य जगता यावे हा त्या बागेच्या निर्मितीमागील मुख्य उद्देश आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या थेरपीजचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, स्पीच थेरपी, मुलांची लाँगटर्म व शॉर्ट टर्म मेमरी वाढवण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्यातील हायपर अॅक्टिव्हिटी कमी करणे, सोशल व कम्युनिकेशन स्कील्स सुधारणे, त्यांच्यातील कॉग्निटिव्ह स्कील्स सुधारणे असे अनेक प्रयत्न केले जातात.
‘सेन्सरी गार्डन’मध्ये असणारे विविध खेळ व अॅक्टिव्हिटीज विशेष मुलांमधील वेगवेगळी स्कील्स कशी सुधारली जातील याचा अभ्यास करूनच तयार केलेली आहेत. संपूर्ण ‘सेन्सरी गार्डन’ म्हणजे एक चक्रव्यूह आहे. नागमोडी वाटांचे जणू एक जाळेच. ते जाळे मुलांना बागेतील विविध भागांमध्ये घेऊन जाते. ज्यामुळे मुलांमधील ‘सेन्स ऑफ डायरेक्शन’ सुधारण्यास मदत होते. बागेत नुसतेच नागमोडी रस्ते नाहीत, तर त्यात खूप चढ-उतार आहेत. जे मुलांना जाणवतात. अनुभवता येतात. ‘सेन्सरी गार्डन’मधील रस्ते वेगवेगळे आहेत. तेथील प्रत्येक रस्त्याचा पृष्ठभाग वेगवेगळ्या टेक्श्चरचा आहे. त्यांच्या स्पर्शांचे वेगळेपण मुलांना जाणवते. उदाहरणार्थ, खूप मोठे दगड, लहान दगड, वाळू इत्यादी. ‘सेन्सरी गार्डन’मधील सर्व रस्ते रूंद आहेत. त्यामुळे जी मुले व्हीलचेअरचा वापर करतात, त्यांनाही व्हीलचेअरवरून फिरणे सोपे जाते. तेथे विविध रंगांच्या, विविध तऱ्हांच्या झाडांची प्लँट बेडस् तयार केलेली आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या बसण्याच्या व्यवस्था आहेत. तेथे बसून मुले आर्टक्राफ्ट तयार करू शकतात. ‘सेन्सरी गार्डन’मध्ये एक तळे आहे, तेथे कारंजे बसवले जाणार आहे. बागेत वायर व पाने यांच्या साहाय्याने एक ‘टोटल एक्लिप्स टनेल’ बनवले आहे. त्यामधून मुले इकडून तिकडे जाऊन खेळू शकतात. त्यामुळे ती प्रकाश व छाया या दोन संकल्पना अनुभव घेत शिकतात. तेथे ‘थीम गार्डन’सुद्धा आहे. त्यात वेगवेगळ्या टेक्श्चरची, व्हॉयलेट्स अशी विविध झाडे लावलेली आहेत. त्यामुळे मुलांची sensory development होते. उदाहरणार्थ, olfactory sense, fictile sense इत्यादी. बागेत सी-सॉ आहे, त्यामुळे मुलांमधील नियंत्रण आणि सुसूत्रता या गुणांमध्ये सुधारणा होते.
‘सेन्सरी गार्डन’ची देखभाल करणे हे मोठे काम आहे. त्यासाठी पूर्णवेळ व्यक्ती नेमलेली आहे. नर्सरीच्या देखभालीसाठी दर आठ दिवसांनी चार-पाच जण येतात. त्या शाळेमध्ये मल्टिपल डिसॅबिलिटी असलेली दोन ते चोवीस या वयोगटातील एकूण पन्नास मुले/मुली आहेत. त्या मुलांकडून फी घेतली जात नाही. त्या पन्नास मुलांसाठी वीसजणांचा स्टाफ आहे. त्याशिवाय अंध मुलामुलींसाठी वेगळी शाळा आहे. ज्यात सत्तर मुले-मुली शिकत आहेत. त्यांच्यासाठी दहाजणांचा स्टाफ आहे.
मुलांसाठी करावा लागणारा खर्च, स्टाफ व इतर लोकांचा पगार, ‘सेन्सरी गार्डन’ची देखभाल हा खर्चाचा सर्व ताळमेळ राखण्याबाबत ज्योती आव्हाड म्हणतात, “आम्हाला सुरुवातीला पाच वर्षे ‘Sense International (India)’ या संस्थेतर्फे ग्रँट मिळाली. आता आर्थिक मदत नसली तरी त्यांचे तांत्रिक पाठबळ आहे. ‘Sense International (India)’चे मुख्य अखिल पॉल यांचा मोठा पाठिंबा आहे. त्या जोरावरच, मी प्राचार्यपदावर राहून हे काम गेली सव्वीस वर्षें करत आहे.”
आव्हाड यांनी ‘सेन्सरी गार्डन’मध्ये आणखी सुधारणा करण्याचे ठरवले आहे. जेथे घसरगुंडी आहे, तेथे खाली सध्या वाळू टाकलेली आहे. त्याऐवजी समुद्रावरील रेती टाकायची आहे. त्यासाठी अंदाजे पन्नास हजार रुपये खर्च आहे. तसे करण्यामागे ‘स्पर्शाच्या थेरपी’चाच विचार आहे.
शाळेसाठी जागा अपूरी पडत आहे. त्यांना एकूण पंचवीस हजार चौरस फुटांचे बांधकाम करायचे आहे. त्यामुळे इमारत वाढवण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यांची त्याकरता देणगी कोठून मिळू शकेल यासाठी धडपड चालू असते.
‘सेन्सरी गार्डन’ इतर लोकांनाही बघण्यासाठी खुली केली गेली आहे. सर्वसामान्य मुले तेथे जाऊन खेळू शकतात. त्यासाठी प्रवेश फी ठेवणार नसल्याचे ज्योती आव्हाड म्हणाल्या. पण त्या तेथे एक डोनेशन बॉक्स ठेवणार आहेत. ज्यांची जशी इच्छा असेल त्यास तसे त्यात पैसे टाकता येतील.
तेथील मुले स्वत:च्या पायावर उभी राहवीत यासाठी अठरा वर्षांच्या पुढील मुलांसाठी/मुलींसाठी व्होकेशनल कोर्सेस घेतले जातात. त्यांना मेणबत्त्या बनवणे, ऑफिस फाईल्स बनवणे, हाऊस किपिंगविषयीची माहिती, अंध मुलांना मसाज करण्याविषयीचे अॅक्युप्रेशर थेरपीचे प्रशिक्षण दिसे जाते. त्यामुळे काहीजण स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत.
ज्योती आव्हाड – 02532-353578/364378 /9850885413
– पद्मा कऱ्हाडे
Last Updated On – 7th Jan 2017
Very nice
Very nice
Comments are closed.