ज्ञानोत्सुक महाराष्ट्र!

0
25
Think Maharashtra ALFA Image_0.png

कवी सतीश काळसेकर ‘वाचणा-याची रोजनिशी’ नावाचे सदर ‘आपले वाङ्मयवृत्त’ या मासिकात लिहीत असतात. त्यामध्ये पुस्तकांची, लेखनाची ताजी वाचनीय उदाहरणे मिळतात. त्यातून मल्टिमीडियाच्या सध्याच्या युगात वाचन कसे असावे – त्यात किती रमावे यासाठी मार्गदर्शक सूचनाही जमा होत जातात. काळसेकर यांची त्यामध्ये एक टिप्पणी दर महिन्याला नक्की असते, ती विकल सद्यकाळाबाबत. काळ बिकट आला आहे आणि माणूस सर्व बाजूंनी, आतून-बाहेरून घेरला जात आहे याची जाणीव काळसेकर यांचे सदर वाचताना भेदक रीतीने होत असते. सध्या, भावना सर्वत्र तशीच व्यक्त होत असते. कोठे त्याचे राजकीय अंग ठळकपणे मांडले जाते, तर कोठे सामाजिक – जसे जातीय उग्रपणा. त्या सर्व मुद्यांना तंत्रज्ञानातून आलेला अनिश्चिततेचा मुद्दा असतोच! काळसेकरांपुरते बोलायचे तर ते चांगल्या वाचनाचे संदर्भ देत जातात आणि तो दिलासा मोठा वाटतो.

आम्ही ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल २०१० साली सुरू केले, तेव्हा फक्त दिलाशाच्या, सकारात्मक गोष्टींचा विचार करण्याचे आणि त्या प्रसृत करण्याचे तर योजले होते. कारण माणसे भली अधिक असतात, बुरी कमी असतात हा सार्वत्रिक आणि सार्वकालिक अनुभव आहे. आमचा त्यावर पक्का विश्वास आहे. पण मीडियाने आम्हाला शिकवले, की कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी नव्हे, परंतु माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होय! कारण त्यात सनसनाटी आहे. आम्ही विचार असा केला, की ज्या  ‍मीडियाने मानवी मनाची दुर्बलता अचूक पकडली तोच मीडिया मानवी मनाचे केवळ सामर्थ्य प्रकट करण्यासाठी नव्हे तर ते वाढवण्यासाठीदेखील उपयोगात आणता येऊ शकेल! स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील दैनिके, साप्ताहिके व्रतस्थ होती; पण आमच्यासमोर प्रिंट मीडियाच्या बहराच्या काळातील ‘माणूस’ साप्ताहिकाचे उदाहरण होते. ‘माणूस’चे संपादक श्री.ग. माजगावकर यांनी तो अस्वस्थ‘तेचा काळ वस्तुनिष्ठ रीत्या नोंदला; तेवढेच नव्हे, तर त्या काळातील चळवळी-आंदोलनांना, विधायकतेला बळ दिले. मग त्याहूनही अधिक सूक्ष्म व तरल गुंतागुंतींनी धुमसणारी सध्यांची अस्वस्थता सद्यकाळाला अनुरूप अशा प्रकारे का बरे व्यक्त होऊ शकणार नाही?

लक्ष्यवेधी मीडियाचा सकारात्मक प्रभावदेखील विलक्षण असू शकतो याचे आणखी एक उदाहरण. कुसुमाग्रज-पु.ल. यांना महाराष्ट्रातील तत्कालिन सात-आठ कोटी सर्व लोकांनी काही वाचले-पाहिले नव्हते; ‘सत्यकथा’ मासिकाचा खप तर दोन-तीन हजार. पण त्या सर्वांचा दबदबा केवढा! तो निकोप, गुणवत्तापूर्ण सांस्कृतिक प्रभाव सध्याच्या मनोरंजनाने-करमणुकीने भरलेल्या जगात, युगात अशक्य का असावा? ‘मौजे’चे अध्वर्यू, साहित्यिक ‘गुरू’ श्री.पु. भागवत यांची तर तीच मनीषा होती. ते त्यालाच सांस्कृतिक अग्रक्रमाचा सिद्धांत म्हणत. आता तर संवादाची साधने अधिक परिणामकारक आहेत. इंटरनेटच्या माध्यंमातून प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचणे, विचारी-संवेदनशील व्यक्तींचे ‘नेटवर्क’ बांधणे शक्य आहे. प्रत्येक व्यक्तीच्या फक्त गुणांची, ‘पॉझिटिव्ह साईड’ची बेरीज करत जायचे. उणिवा, निगेटिव्ह साईड तर प्रत्येकात असतात – त्याकडे दुर्लक्ष करायचे. यशवंतराव चव्हाण बेरजेचे राजकारण नावाची संज्ञा वापरत. आपण संस्कृतिकारण करू पाहत आहोत. त्यात विचारांची आणि भावनांची बेरीजच बेरीज अभिप्रेत आहे. भावना थोडी ताणून बोलायचे, तर मुंबईवरील अतिरेकी हल्लेखोर कसाब कोठडीत होता, पोलिस त्याचे त-हत-हेने ‘इंटरॉगेशन’ करत होते. पोलिस अधिका-यांचे नोकरीत भरती होताना जसे ‘ट्रेनिंग’ झाले होते, तसे कसाबचेही ‘ब्रेनवॉशिंग’ झाले होते, हे आपण जाणतो. कसाबची पोलिसी चौकशी करणा-या एका वरिष्ठ अधिका-याला एकदा विचारले गेले, की तो तुम्हा लोकांना बधत नाही, तो खरेखोटे काय सांगतो ते तुम्हाला कळत नाही. त्याच्यांशी बोलायला एखाद्या ‘आई’ला पाठवा. तो तिच्या मायेने कदाचित बोलता होईल, निदान तो हळवा तर होईल! पण सध्याच्या व्यवसाय प्रशिक्षणाच्या काळात डॉक्टरला जसे रोग्याचा फक्त रोग दिसतो- त्याचे दुःख कळत नाही. तसे पोलिसाला गुन्हेगाराचा गुन्हा दिसतो, त्या‍चे मन कळत नाही. त्यामुळे ते मन विकारी कशामुळे झाले असेल हेही पोलिसांना जाणवत नाही.

_Ajintha_7.jpgसध्याचा काळ बिकट जाणवतो; माणूस सर्व बाजूंनी, आतून-बाहेरून, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळ्यांवर पोखरला जात आहे असे वाटते. माणसाला जगताना त्याच्या सभोवतालाविषयीचा, तो ज्या समाजात राहतो त्याबद्दलचा आत्मविश्वास आवश्यक आहे. त्या आधारे त्याची नाळ समाजाशी जोडली जाते. प्रस्थापित व्यवस्था, मग ते सरकार असो वा बिनसरकारी संस्था, विद्यापीठे असोत वा स्वायत्त संस्था त्या बदलांना सामोरे जाण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे माणसाची समाजाशी नाळ तुटली आहे का? माणसे त्यांच्या त्यांच्या कोशांमध्ये बंद होत चालली आहेत. माणूस आत्मकेंद्री बनत आहे – स्वांत! माणसांनी त्यांचे कोष भेदून बाहेर यावे, स्वत:कडून सभोवतालाकडे पाहवे, त्यांना आजूबाजूच्या धडपड्या व्यक्तींकडून प्रेरणा मिळावी हा ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चा उद्देश आहे.

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या या मोहिमेची तयारी सुरू होती. निफाडच्या एका छोट्या गावात राहणा-या अशोक सुरवडे या प्रयोगशील शेतक-याचा फोननंबर हाती लागला. माझ्या त्याच्याशी त्याची भेटण्याची वेळ ठरवण्याकरता गप्पा सुरू झाल्या. सुरवडे यांनी पुण्याला जाऊन पदवी मिळवली. मात्र त्यांनी शेतीच्या ओढीपायी नोकरीऐवजी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावी परतल्यानंतर शेतीत प्रयोगदेखील केले. सुरवडे बोलण्याच्या ओघात म्हणाले, “मी काही वर्षांपूर्वी अंटार्टिकाला जाऊन आलो!” तो आश्चर्याचा धक्का होता. मी विचारले, “कशासाठी?” तर ते म्हणाले, “पेंग्वीनचा अभ्यास करण्याकरता.” मला आश्चर्याचा दुसरा धक्का! असे सुखद धक्के बसत जावेत असे ज्ञानोत्सुक वातावरण महाराष्ट्रात आहे. मात्र प्रस्थापित समाजास त्यांची जाणीव नाही. आम्हाला ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या प्रकल्पाच्या कामातून महाराष्ट्राबद्दलचा असा अनुभव येत असतो.

_Ajintha_1.jpg‘थिंक महाराष्ट्र ‘ची कॅचलाईन अशा विवि‍ध समाजनिरीक्षणांतून घडली आहे – राजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर… समाजात विधायक काही घडत आहे त्याचे दर्शन, मराठी माणसाची प्रज्ञाप्रतिभा आणि त्याचा चांगुलपणा यांचे नेटवर्क! चांगुलपणा हा वर्तनाचा भाग झाला. त्याचा उत्कर्ष बुद्धिविलासातून प्रकट होतो – ती प्रज्ञाप्रतिभा. आणि खरोखरच, प्रत्यय असा येत गेला, की एकूण माणसे सुस्वभावी व उपक्रमशील अधिक आहेत. बलात्कार, खून, आत्महत्या यांच्या गावोगावच्या बातम्या माध्यमांतून येत असतात. त्यास बळी पडणा-या व्यक्तींचे दुःख अपार आहे. त्या घटनांवर हिरीरीने चर्चा-गप्पा-आक्रोश होत आहेत. पण समाज बांधून ठेवण्याचे, तो घडवण्याचे काम कोण करत आहे? तर ती नित्यक्रमात भलेपणाने कार्यरत असलेली माणसे. आम्ही महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यात, तालुक्या‍तालुक्यात माहिती संकलनासाठी जाऊ लागलो, तसतसा तो प्रत्यय वाढतच गेला. नाशिकला गंगेकाठी पौरोहित्य करणारा दिनेश वैद्य गंगार्पण होणारे जुन्या हस्तलिखितांचे धन गोळा करतो – त्यांचे डिजिटायझेशन करण्याचा मोठा यज्ञ आरंभतो, तर तेथलाच प्रसाद पवार हा अवलिया माणूस त्याने विकसित केलेल्या कॅमे-याने गावागावांत प्रदर्शित करण्याचे व इंटरनेटच्या माध्यमातून घरोघरी पोचवण्याचे स्वप्न बाळगून स्वतःला त्या लेण्यांत व त्याच्या स्टुडिओत गाडून घेतो.

_Navnath_Kaspate.jpg_6.jpgसोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याच्या मातीत सोने आणि प्लॅटिनम आहे असे तेथील रसायनतज्ज्ञ सुभाष कदम सिद्ध करतात, त्या संशोधनाचे पेटंट घेतात आणि त्याच्या आर्थिक दृष्ट्या लाभकारकतेची शक्यशक्यता अजमावण्यासाठी सरकारी परवान्यांची वाट पाहत राहतात. भंडारा जिल्ह्यात पाण्याचे तलावच तलाव आहेत. इंग्रजी उच्च विद्याविभूषित मनीष राजणकर तलावांच्या भोवतीचे जीवन अभ्यासता अभ्यासता तेथील लोकांच्या प्रश्नांत गुंतून जातो व त्याचे स्वतःचे तेच जीवनध्येय बनून जाते. सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील नवनाथ कस्पटे हा शेतकरी चक्क सीताफळांचे विद्यापीठ सुरू करण्याचे प्रयत्न चालू ठेवतो. हा वर्तमान महाराष्ट्राच्या सकारात्मक स्वरूपाचा ‘थिंक महाराष्ट्र’वर सादर झालेल्या माहितीतून साकारलेला नमुना आहे.

_Aashutosh_Patil_2.jpg _Vishwas_Yevle_2.jpgमहाराष्ट्रात ज्ञानप्रकाशाचे वातावरण निश्चित आहे. लहान-मोठी गावे तशा प्रयत्नांनी हळुहळू प्रकाशमान होत आहेत. ‘थिंक महाराष्ट्र’चे काही कार्यकर्ते नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील हजारभर शेतक-यांचा गट असलेल्या ‘देवनदी व्हॅली अॅग्रीकल्चरल प्रोड्युसर कंपनी’ची माहिती घेण्यासाठी तेथे पोचले, तेव्हा त्यांना त्या गटाची शेती अभ्यासण्याकरता पंजाबहून शेतक-यांनी भरून आलेली बस दृष्टीस पडली. आम्ही माहिती संकलनासाठी येवला शहरात पोचलो तेव्हा तेथील नारायण क्षीरसागर यांनी येवला शहराच्या संपूर्ण इतिहासाने सिद्ध ग्रंथ हाती ठेवून आम्हाला चकित केले! केवळ बारावीत असलेला आशुतोष पाटील त्याच्या जुन्या नाण्यांच्या अभ्यासामुळे विविध संस्थांना मार्गदर्शन करण्यास जातो. सोलापुरात पत्र्यांच्या झोपडीत राहणा-या आणि जगातील सात सर्वोच्च शिखरांवर चढाई करणा-या आशीष बनसोडेची कहाणी चित्रपटात शोभावी अशी वाटते; तर पुण्याचे विश्वास येवले आळंदी-पंढरपूर ‘जलदिंडी’च्या उपक्रमातून माणसाची आणि पाण्याची नाळ जोडण्याचा अनोखा कार्यक्रम गेली तेरा वर्षें राबवतात. हे सारे ज्ञानोत्सुक महाराष्ट्राचे चित्र आहे! आजचा वर्तमान, व्हायब्रंट महाराष्ट्र! सरकारी जाहिरातीतील नव्हे, लोक त्यांचे ते घडवत असलेला महाराष्ट्र!

महाराष्ट्र ज्ञानप्राप्तीसाठी असा तुकड्या तुकड्यांतून प्रयत्नशील दिसतो, मात्र त्याची केवळ नोंद पुरेशी आहे का? परंपरेतून मिळालेले ज्ञान जतन करण्यासाठी, त्याच्या प्रसारासाठी आणि नवे ज्ञान निर्माण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने कार्यरत असलेली मंडळी प्रत्येक तालुक्यात दहा ते पंधराच्या संख्येने आढळतात. राज्यभरात तशी साडेतीन-चार हजार मंडळी सहज आढळतील. मात्र ती सारी विखुरलेली आहेत. त्यांचा परस्परांशी संबंध नाही. ती मंडळी आणि त्यांची धडपड … ते सारे प्रयत्न एकाकी ठरतात. ती सारी माणसे आपापसांतील ‘ओळखी’अभावी ‘चांगुलपणाची बेटे’ होऊन गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचा परिणाम मर्यादित आहे. जर त्या मंडळींमध्ये नेटवर्क निर्माण करता आले तर त्यांच्या कार्याच्या परिणामाचा परीघदेखील वाढवता येऊ शकेल. नेटवर्किंग हा ‘थिंक महाराष्ट्र’च्या कामाचा पुढील अपेक्षित टप्पा आहे. मात्र ते काम कोणा एकट्या व्यक्तीचे अथवा संस्थेचे नाही. त्याकरता समविचारी व्यक्ती-संघटनांनी पुढाकार घ्यावा लागेल.

महाराष्ट्रात पाणी, शिक्षण, आरोग्य, ग्रामस्वराज्य, स्वच्छता, शेती, कला, साहित्य अशा अनेकानेक विषयांसंबंधात सुरू असलेले कल्पक आणि अथक प्रयत्न जर जाणले, त्याकरता झटणारी शरीरे-गुंतलेली मने आणि त्यांचा लोकमानसावर होणारा परिणाम पाहिला, की त्या सा-या घडामोडीला महाराष्ट्रातील ‘रेनेसान्स’ असेच म्हणावे लागते. ‘रेनेसान्स’ म्हणजे ज्ञानप्रकाश. ‘थिंक महाराष्ट्र’चा खटाटोप महाराष्ट्राचे ते विधायक चित्र नोंदवून समाजासमोर मांडण्याचा आहे.

उपक्रमशील माणसांची आम्ही नमूद केलेली संख्या साडेतीन-चार हजार ही अल्प भासत असली, तरी ते हिमनगाचे टोक आहे. ती मंडळी पूर्णवेळ एकचित्ताने ध्येयप्रेरित काम करत असतात आणि म्हणून ती शोधक नजरेत भरतात. मात्र त्याच त-हेचे प्रयत्न कमीअधिक प्रमाणात करणारी माणसे त्या त्या परिसरात असतातच. ती साडेतीन-चार हजार मंडळी तशा चाळीस हजार व्यक्तींचे प्रतिनिधीत्व करत असतात असे समजले, तर त्या चाळीस हजारांच्या खाली तसा तुरळक प्रयत्न करणारी चार लाख माणसे आहेत असे सहज गृहित धरता येते. समाजाची ती रचना आणि तसे अंतस्थ प्रवाह हेच त्या ‘रेनेसान्स’चे लक्षण. युरोपमध्ये रेनेसान्स घडला तेव्हाचे वातावरण आणि महाराष्ट्रातील रेनेसान्सचे सध्याचे वातावरण यांत फरक आहे. युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होऊन छपाईचे यंत्र, वाफेचे इंजिन यांसारखे शोध लागले. ते ‘रेनेसान्स’ला पूरक ठरले. युरोपातील ‘रेनेसान्स’ला दिशा लाभली ती तत्पूर्वीच्या काळात झालेल्या तत्त्वचिंतनामुळे आणि विचारक्रांतीमुळे. त्यातूनच लोकशाही ही समाजव्यवस्थेची कल्पना विकसित झाली; स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे निर्माण झाली. तो आधुनिक जीवनाचा आधार ठरला. तशा तात्त्विक मांडणीचा अभाव विद्यमान ‘रेनेसान्स’च्या वातावरणात जाणवतो. ती जबाबदारी विद्वतजनांची आहे. समाजाला दिशा देण्याकरता, त्याचे व्यवस्थापन करण्याकरता धर्मस्तरावर आधी मांडणी केली गेली. ती कालौघात, नव्या मूल्यव्यवस्थेने कालबाह्य ठरवली. त्यानंतर आलेले लोकशाहीचे तत्त्व सा-या जगाने मान्य केले, मात्र त्याकरता निर्माण झालेल्या व्यवस्थेच्या मर्यादा कालौघात स्पष्ट होत गेल्या आहेत. एकीकडे ज्ञानोत्सुक वातावरण आणि दुसरीकडे त्याकरताच्या व्यवस्थेचा अभाव अशी ही विद्यमान परिस्थिती आहे. काळसेकर, विकल परिस्थितीचे निदान आम्हाला कळले ते असे आहे. या काळात समाजासाठी नव्या तत्त्वांवर आधारित समाजव्यवस्थेच्या विचारचर्चेची आवश्यकता आहे. त्याआधारेच नवी व्यवस्था उभी राहू शकेल. तो ‘ज्ञानप्रकाश’ सध्याच्या ग्लोबल वातावरणात जगाच्या कोणत्याही कोप-यातून पसरू शकेल, त्यासाठी स्थानिक संस्कृती व स्थानिक विचार महत्त्वाचा. ‘थिंक महाराष्ट्र’चे उद्दिष्ट जगभर पसरलेल्या महाराष्ट्र समाजाचा तसा वेध घेण्याचा आहे…

– किरण क्षीरसागर

info@thinkmaharashtra.com

About Post Author

Previous articleचाफळचे श्रीराम मंदिर
Next articleमाझे शाळा मंत्रिमंडळ
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767