जीआयएफनी गणित झाले सोपे

7
51
-gif-heading

गणिताशी गट्टी असलेला विद्यार्थी तसा विरळाच; अनेकांसाठी तर अभ्यासातील मोठा शत्रू म्हणजे गणित असतो. अनेकांचे शिक्षण थांबते, ते केवळ गणिताशी असलेल्या कट्टीमुळे. शमशूद्दिन अत्तारसरांनी नेमके ते पाहिले आणि ठरवले, की मुलांची दोस्ती गणिताशी करून दिली पाहिजे. ते विविध उपक्रम त्याच भावनेतून राबवत आहेत. त्यांनी उपक्रमांची आखणी तंत्रज्ञानाचा वापर करून साधली आहे व त्यामुळे त्याचा प्रभाव विद्यार्थ्यांवर जास्त होतो असा त्यांचा अनुभव आहे.

शमशूद्दिन हे राहतात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील शिरगावला. ते तेथील शाळेत आठवी-नववी-दहावी या इयत्तांना गणित विषय शिकवतात, पण त्यांचे ज्ञान,  त्यांची प्रयोगशीलता आणि कळकळ साऱ्या जगाला व्यापून उरणारी आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागावी याकरता गेली दोन दशके जो खटाटोप चालवला आहे तो थक्क करून सोडतो. त्याचे फळ म्हणजे त्यांचे विद्यार्थी वेगवेगळ्या मोठ्या अभ्यासक्रमांना जगभरच्या विद्यापीठातून शिकत आहेत.

इंग्लंडमधील न्यू कॅसल विद्यापीठात सोल (सेल्फ ऑर्गनाइज्ड लर्निंग एनव्हॉयरॉनमेंट) नावाचा प्रकल्प 2009 ते 2014 या काळात चालवला गेला. विद्यार्थ्यांना संगणकास अभिमुख करण्याची ती कल्पना त्या विद्यापीठातील सुगातो मित्र या मूळ भारतीय-बंगाली प्राध्यापकाची होती. शमशूद्दिन त्या प्रकल्पाचे भागीदार होते, परंतु त्यांनी त्यातून स्फुरण घेऊन तो प्रकल्प त्या विद्यापीठाने थांबवला असला तरी शिरगावच्या शाळेत सुरू ठेवला आणि त्यांची शाळा त्यांच्या त्या प्रयोगाकरता जगभर नावाजली जाते. तेथील मुले सकाळी सहा वाजता उठून अमेरिकेतील शिक्षकांकडून धडे घेतात तर ती दुपारी तीननंतर इंग्लंडमधील शिक्षकांना शंका विचारतात. ती किमया शमशूद्दिनसरांनी शाळेत सुरू केलेल्या कॉम्प्युटर लॅबची. विद्यार्थी तेथे पाळी लावून शिकत असतात.

शमशूद्दिनसरांचा विषय गणित असला व ते त्यात विविध प्रयोग करत असले तरी त्यांचा खटाटोप विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा जागी व्हावी याकरता असतो. ते त्याकरता मुलांना ‘टेड टॉक्स’ पाहण्यास, त्यावर चर्चा करण्यास प्रवृत्त करतात, मुलांच्या चाळीस आठवड्यांच्या लीग स्पर्धा योजतात. त्यांचा उद्देश मुलांनी व्यक्त होण्याचे, आविष्कार करण्याचे कौशल्य प्राप्त झाले पाहिजे एवढाच असतो.

शमशूद्दिन म्हणाले, की माझी गणितप्रेमाची कथा 1999 मध्ये सुरू झाली. त्यावेळी आम्ही शाळेत ‘होल इन द वॉल’ हा प्रकल्प चालू केला. त्यामध्ये एका भिंतीत खिडकी करून तेथे संगणक बसवला आणि शाळा जगाला जोडून टाकली. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम एक वैज्ञानिक म्हणून त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनास आले. त्यानंतर ‘सोल’ प्रकल्प आणि मीच चालवलेली कॉम्प्युटर लॅब आणि त्यातून साकारलेले ‘डिजिटल विश्व’- जे जे सारे सायबर जगात खुले आहे, ‘ओपन सोर्स’मध्ये आहे ते वापरून मी भूमिती पूर्ण डिजिटाइज्ड केली आहे, sopeganit.in नावाची वेबसाइट चालवली आहे आणि पन्नास ‘ग्रूप’मधील पाच हजार शिक्षकांना गणितातील एका नव्या प्रश्नावर काही सेकंदांची नवी जीआयएफ रोज पाठवत असतो. सगळी कोडी दृक्माध्यमातून सोपी होऊन जातात असाच शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. मी एकेका कोड्यावरच्या पाच-पाच दहा-दहा जीआयएफ बनवतो व शिक्षकांना व्हॉट्स अॅपवर पाठवून देतो.

-teacher-teaching

शमशूद्दिन मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचे, परंतु त्यांचे वडील प्राचार्य होते. ते नोकरीनिमित्ताने कणकवली तालुक्यात एस. एम. हायस्कूल येथे 1953 साली रुजू झाले आणि अत्तार कुटुंब कोकणातील होऊन गेले. ते फिजिक्स घेऊन बीएस्सी (व पुढे बीएड) झाले, परंतु त्यांना ओढ गणिताची. त्यांनी संगणकासंबंधातील अभ्याक्रमही पूर्ण केले आहेत. ते पत्नी, मुलगा व त्यांची आई असे चौघेजण शिरगावी राहतात. ते म्हणाले, की शिक्षकी आमच्या रक्तातच आहे. माझा धाकटा भाऊ शिक्षक आहे. आमचे सख्खे-चुलत कुटुंब एकत्र धरले तर त्यात अठरा जण शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे अनेक वह्या-पुस्तके वापरल्याने होते, त्यामुळे ते कमी करण्यासाठी अत्तारसरांनी ऑनलाइन गृहपाठ देण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी जिओजेब्रा या सॉफ्टवेअरचा वापर केला. त्यांच्या शाळेत 2009 ते 2014 या काळात न्यू कॅसल विश्व विद्यापीठाच्या मदतीने SOLE (सेल्फ ऑर्गनाइज्ड लर्निग एन्व्हायरन्मेंट) हा उपक्रम राबवला गेला. त्याअंतर्गत, जगभरातील दोनशेपेक्षा जास्त शिक्षक या खेड्यातील शाळेला ऑनलाइन भेट देऊन शिकवू लागले. शिक्षक विद्यार्थ्यांचे वर्ग स्काइप (SKYPE) च्या साथीने घेत असत. ते तीन-चार मीडिएटर्स विद्यार्थ्यांशी आठवड्याला सरासरीने संवाद साधतात. त्या प्रकारचे शिक्षण त्यांच्या शाळेत सुरू आहे.

अत्तारसरांच्या शाळेतील विद्यार्थी त्यांचे प्रकल्प विज्ञान प्रदर्शनात मांडतात. त्याकरता ते http://www.arvindguptatoys.com या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करतात. त्यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळते आणि संकल्पनाही हसतखेळत पक्क्या होतात. त्या सगळ्याचाच परिपाक म्हणून त्यांच्या शाळेचा दहावीचा निकाल गेली बारा वर्षें उत्तम लागत आहे.

-shikhskanchevyaspithlogo

त्यांनी राबवलेल्या उपक्रमांत https://www.ted.com या संकेतस्थळाचा वापर आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देणे हा त्यामागे प्रामुख्याने हेतू आहे. अत्तारसरांनी गणिताच्या जीआयएफ इमेज बनवल्या आहेत. जीआयएफ इमेज म्हणजे व्हॉट्स अॅप आणि इंटरनेटवर धुमाकूळ घालणारा प्रकार. ती काही सेकंदांतील हलती चित्रे दाखवणारी चित्रफीत म्हणजे जीआयएफ. अत्तारसरांनी तरुणाईमध्ये त्याची असलेली आवड लक्षात घेऊन त्या केल्या आहेत.

विद्यार्थ्यांना प्रामुख्याने अवघड वाटणारे विषय म्हणजे गणित आणि इंग्रजी. त्यातही आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तर ते भलतेच कठीण वाटणारे विषय. विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यावर अत्तारसरांच्या लक्षात आले, की त्यांना बऱ्याच संकल्पना, गुणधर्म, सिद्धता, प्रमेय यांसारख्या गोष्टी समजून घ्यायला अवघड जातात. त्यामुळे ते पाठांतराची मदत घेतात आणि तेथेच फसतात, कारण गणितात नुसते पाठांतर असून भागत नाही, तर मूळ संकल्पना समजणे अत्यावश्यक असते. त्यामुळेच मुलांना एखादे प्रमेय वेगळ्या पद्धतीने सोडवायचे म्हटल्यास ते जमत नाही. त्यांना परीक्षेत कमी गुण मिळतात आणि ती मुले हताश होऊन गणिताकडे पाठ फिरवतात. त्यासाठी सरांनी संगणकाच्या साथीने मात करण्याचे ठरवले. त्यावेळी त्यांना सापडले ते https://phet.colorado.edu/  हे संकेतस्थळ. तेथे सिम्युलेशन्सचा प्रत्यक्ष शिकवण्यामध्ये केलेला वापर दाखवलेला आहे. सरांना त्या सिम्युलेशन्सचा उपयोग अमूर्त संकल्पना स्पष्ट करताना झाला आणि एक गोष्ट लक्षात आली, की जर एखादा गुणधर्म चलचित्राच्या साहाय्याने दाखवला तर तो समजण्यास सोपा पडतो. त्यानुसार त्यांनी स्वत:च्या अभ्यासक्रमात असलेले साहित्य जिओजेब्रा या सॉफ्टवेअरच्या मदतीने बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये जिओजेब्राचे अॅप डाऊनलोड करून दिले आणि वर्गातच त्यांच्याकडून जिओजेब्राच्या साहाय्याने गणिते सोडवण्याचा सराव सुरू केला. विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅचप ग्रूप तयार केला आणि विद्यार्थ्यांना दररोज दोन गुणधर्मांचे जीआयएफ पाठवण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सुधारणा दिसू लागली. सरांच्या वर्गातील चार विद्यार्थ्यांना दहावीच्या गणितात पैकीच्या पैकी गुण मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. इतरही चांगल्या सवयी त्या उपक्रमामुळे लागल्या आहेत -उदाहरणार्थ, गणिताची कोडी सोडवणे. त्यामुळे बुद्धीला चालना मिळते. ते जे शिकले ते प्रत्यक्ष वापरून पाहण्याची सवय लागते. विद्यार्थ्यांना गणित ऑलम्पियाड, संबोध आणि प्रावीण्य यांसारख्या परीक्षांनाही -gif-mathsबसण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. अत्तारसरांनी सुमारे सहाशे ते सातशे गुणधर्म जीआयएफ स्वरूपात तयार केले असून, ते अनेकांना पाठवत असतात. तो प्रयोग त्यांनी केवळ आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित ठेवलेला नाही. त्यांच्या संपर्कातील अनेक शिक्षकांनाही ते हे जीआयएफ पाठवत असतात. तेही अगदी विनामूल्य. त्या नाचऱ्या आकृती विद्यार्थ्यांची गणिताची भीती घालवून टाकतात. 

(मूळ स्रोत – लोकसत्ता)
लेखाचा विकास – ‘टीम थिंक महाराष्ट्र’

शमशूद्दिन अत्तार(सर) 9922413492
snattar1968@gmail.com  

हे ही लेख वाचा – 
कातकरी-मराठी शब्दकोशाधारे शालेय शिक्षण – गजानन जाधव यांचा उपक्रम
अनिताबाईंचे भाषादालन

About Post Author

7 COMMENTS

  1. अशोक निकाळजे . प्रा.शा. राक्षस भुवन ( शनि)ता. गेवराई. जि .बी

    सरजी आपले कार्य महानच आहे…
    सरजी आपले कार्य महानच आहे. उपयोजनात्मक गणित शिकल्याशिवाय मुलांची भीती जात नाही आणि आनंद मिळत नाही. आपलं काम या दृष्टीकोनातून एकमेव आहे. आपणास सलाम !
    अशोक निकाळजे प्रा.शा. राक्षस भुवन (शनि)ता. गेवराई.

Comments are closed.