जान्हवीचे होमस्कूलिंग आणि तिची आई

-homeschooling

माझी लेक जान्हवी दहावी परीक्षा उत्तीर्ण झाली. तिला चौऱ्याऐंशी टक्के गुण मिळाले. ती गेली नऊ वर्षें घरीच शिकत होती. तिने इयत्ता पहिलीत शाळा सोडली. त्यानंतर, ती घरी शिकली. ती पास झाल्याचे कळले, तेव्हा सर्वांना तिच्या यशाचे आश्चर्य वाटत राहिले. मुलाने घरी राहायचे आणि शिकायचे ही संकल्पनाच मात्या-पित्यांना थोडी न पटण्यासारखी आहे ना!

मी UPSC परीक्षा देत होते, त्यावेळी जान्हवी तीनेक वर्षांची होती. तिला शाळेत घालावे लागणार होते. पण, मी स्वतंत्र विचारांची आई म्हणून तिच्या भवितव्याचा विचार वेगळेपणाने करण्याचे ठरवले. मुलासाठी बालवाडी, खेळगट हे ठीक आहे, पण शालेय अभ्यासक्रम आणि त्यामुळे होणारी त्याची ओढाताण मला मान्य नाही. शिवाय, माझा आवडता एक विचार आहे – मला स्वत:ला जे मिळाले नाही ते मुलांना मिळवून द्यावे; किंबहुना त्यापेक्षा यथार्थ सांगायचे तर मला स्वत:ला जे जे उत्तम मिळाले आहे ते ते तरी मुलांना मिळायला हवेच! शिवाय, शिक्षण आणि शिक्षकी पेशा आमच्याकडे अनुवांशिक आहे. आजोबा, बाबा लौकिकार्थाने तर माझी आई सर्वार्थाने पक्की शिक्षक. त्यामुळे शाळा आणि आमचे नाते घट्ट जवळचे.

मला आठवते, आमची शाळा खेडेगावात असली तरी ज्ञानदानात मागे कोठेच नव्हती; उत्तम शिक्षक असलेली आणि कलागुणांना वाव देणारी होती. जान्हवीला आमच्या शाळेसारखी शाळा कोठे मिळेल? हा विचार मला सतावत असे. शिवाय, त्यावेळीही rat race होतीच. म्हणजे शाळासुद्धा प्रत्येक मुलाला – कराटे, स्विमिंग, एखादा खेळ, चित्रकला असे – बरेच काही एकाच वेळी यायला हवे हा पालकांचा अट्टाहास पुरवत होत्या. मला कोणत्याही परिस्थितीत जान्हवीवर तसला निरुपयोगी भार टाकण्याची इच्छा नव्हती. तरीही ती प्ले ग्रूपला गेली, मग ज्युनियर, सिनियर करत इयत्ता पहिलीलाही शाळेत गेली. अर्थात, तिच्यासाठी शालेय अभ्यास माझ्या दृष्टीने आवश्यक होताच, पण माझ्या मते, त्या पलीकडे तिला एक सामाजिक भान, व्यावहारिक ज्ञान असणे आणि एखादा छंद जोपासता येणे हे आवश्यक वाटत होते. ती पहिलीमध्ये आठ तास शाळा, येणे-जाणे यांतच दमून जात होती.

त्यामुळे आम्ही, एके दिवशी, अचानक निर्णय घेतला, की ‘तिला आता शाळेत पाठवायचे नाही. आपण तिला घरीच शिकवायचे!’ ते तिला कळताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण त्या निर्णयाला घरात मात्र विरोध झाला. तू तुझ्या प्रायोगिक तत्त्वासाठी तिच्या भवितव्याशी खेळतेस येथपासून तुला काय अधिकार आहे तिला असे शिक्षणापासून वंचित (!) ठेवण्याचा? असे काही आरोप झाले. मी फक्त म्हटले, माझी मुलगी एक वर्ष नापास झाली असे मी समजेन आणि तिला शाळेत पुढच्या वर्षी पाठवीन. तो तोडगा मान्य झाला. 

मुळात, माणूस कथाप्रिय असतो, लहान मूल तर विशेष. तुम्ही त्याला गोष्ट सांगा, तो विषय त्याला हळूहळू आवडू लागतो. मग मी माझे तत्त्वाचे प्रयोग सुरू केले. माझा विश्वास मूल काय किंवा आणखी कोणी काय बंधन घालून ते सुधारते यावर नाही. उलट, ते मूल स्वातंत्र्य जितके मिळेल तितके जबाबदार बनते. त्यामुळे, जान्हवीवर टीव्ही पाहणे, खेळणे यावर कोणतीच बंधने नव्हती आणि म्हणून त्या सगळ्याचा तिला दोन-तीन महिन्यांतच कंटाळा येऊ लागला. मग मी तिला इतिहास, विज्ञान वेगवेगळ्या कथारूपात सांगण्यास सुरुवात केली. भाषा विषय (मराठी) आणि त्याचे व्याकरण तर तिला वर्तमानपत्रातील ‘चिंटू’ वाचून येऊ आणि कळू लागले. भाजी घेण्यास जाऊन जाऊन गणित येऊ लागले – दहातून तीन गेले की सात अशी छोटी, बोटांवरची गणिते जमू लागली. त्याच बरोबरीने पाठांतर (घोकंपट्टी नव्हे) सुरू केलेले होते. श्लोक, पाढे, कविता, गाणी करता करता एक वर्ष पूर्ण झाले.

हे ही लेख वाचा-
लेकीची मैत्रीण होताना…
प्रत्येक विद्यार्थी हे स्वतंत्र पुस्तक!

शेवटी, शाळेत कायम न जाण्याच्या मुद्यावर सर्वांकडून शिक्कामोर्तब झाले. आता, त्या होमस्कूलरचे – जान्हवीचे –  शिक्षक घरातच वाढले होते – तिचे आजी-आजोबा, मावशी आणि ड्याडू (बाबा). अचानकच, एका विद्यार्थ्याला पाच शिक्षक मिळाल्याने तिची चंगळ झाली होती. शिवाय, अभ्यासपद्धत मनोरंजनात्मक असल्याने तिला कंटाळा हा विषयच नव्हता. अर्थात, त्या सगळ्याचा मूळ गाभा एखादी गोष्ट कशी शिकायची हे शिकून घेणे हा होता. ते शिक्षण स्व-अध्ययन कसे करता येईल या दृष्टीने जात होते. ती तिला फिरण्याची आवड असल्याने वेगवेगळ्या प्रांतांत, देशांत फिरताना नवनवीन गोष्टी शिकत गेली. घरातही सगळ्यांचे अवांतर वाचन नेहमी चालायचे किंवा पेपरमधील एखादी बातमी… त्यावर चर्चा असायची. त्यामुळे वाचन किंवा अभ्यास म्हणजे तिला तिच्या जगण्याचा अविभाज्य घटक वाटू लागला. आपण जेवतो, झोपतो, तसा अभ्यास करतो, इतके सहज!

ती तिला शाळा नसल्याने एकलकोंडी होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज मात्र पडली नाही. तिने तिचा स्वभाव खेळकर असल्याने मित्र-मैत्रिणी जोडण्यास बिल्डिंगमध्ये, गल्लीत, नंतर जाईल तेथे सुरुवात केल्याचे आमच्या लक्षात आले. शिवाय, तिने शालेय सुट्टीच्या काळात बाहेर होणारे कॅम्प्स किंवा नाट्यशिबिरे, नृत्यशिबिरे आवडीने केली. तिला त्या ठिकाणी कमीजास्त वयोगटाचे आणि वेगवेगळ्या स्वभावाचे विद्यार्थी भेटत राहिले आणि तिची समजून घेण्याची क्षमता विकसित झाली. 

आई म्हणून मला त्या प्रयोगाची भीती कधीच वाटली नाही. कारण माझा तो विचार अचानक किंवा कोठल्या प्रभावाखाली तयार झालेला नव्हता. मी स्वत:ची तीमागील भूमिका आणि तिचे संभाव्य परिणाम यांचा आढावा सांगोपांग घेऊन ती उडी मारली होती. परंतु, जान्हवीला ‘बर्डन’ होऊ नये याचेच तर ‘बर्डन’ होत नाही ना; किंवा आम्हाला चांगली वाटणारी, तिच्या फायद्याची वाटणारी गोष्ट तिलाही वाटत आहे ना याची काळजी मात्र मला माझ्या मनामध्ये वेळोवेळी वाटत असे आणि आम्ही त्यासंबंधात तिचे मत अलगद, हळूच असे तपासून पाहत असू.

तिला तिच्या साधारण बाराव्या वर्षानंतर, समोर बसवून अभ्यास घेण्याची वेळ फार क्वचित आली. ती आणि तिचा ‘ड्याडू’ (ऋतुराज – जान्हवीचे वडील) मिळून त्यानंतरचा सगळा अभ्यास करत असत. ऋतुराज हा सॉफ्टवेअर इंजिनीयर, गायक. तो तंत्रज्ञानावर सुलभपणे लिहिणारा लेखक आहे. त्याने तिच्या अभ्यासाचा ताबा घेतला होता. बाप-लेकीचा अभ्यास चालू असताना माझ्याही ज्ञानात भर पडायची. आम्ही आमचा व्यवसाय स्वतंत्र असल्याने काही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. जान्हवी लहान असताना, ती माझ्यासोबत युनिव्हर्सिटीत, कधी कामाच्या ठिकाणी तर कधी आमच्या बिझनेस मीटिंगना सोबत असायची. ती शांतपणे कोपऱ्यात बसून राहायची, नंतर त्यावर मत मांडायची. तिला घरात एकटे काही वेळ तर फक्त आजी-आजोबांसोबत कधी राहवे लागायचे. त्यामुळे ती जबाबदार अधिक बनली. तिला तिची कामे स्वतंत्रपणे करता येऊ लागली. तिला स्वयंपाकाची आवड आजीच्या हाताखाली मदत करताना लागली. आज, ती चांगली सुगरण आहे. तिच्या आजीचा कटाक्ष तिच्या तिला काही गोष्टी जमायला हव्यात यावर होता. त्यात मुलगा, मुलगी असा भेद नसे. आजीचा दंडक स्वतंत्रपणे जगता येणे, कोणावर अवलंबून राहण्याची वेळ न येणे हा होता. तिचा बाबाही (ड्याडू), तिला भाजी येते आणि मला का येत नाही असे म्हणत तिच्या सोबतीने उत्तम स्वयंपाक करण्यास शिकला आहे. तिच्या आजीच्या भाषेत सांगायचे तर “त्या ‘होमस्कूलर’चा विकास अमुक एका गोष्टीमुळे झाला असे म्हणता येणार नाही; होमस्कूलर हा असा एक पदार्थ आहे, जो थोड्या थोड्या वेळाने तपासत न राहता, पूर्ण शिजल्यावरच त्याचे काय झाले आहे ते कळते!”

-janhaviमला एक परिपूर्ण प्रयत्न, शिकण्याची कला आणि उत्सुकता, जिज्ञासा हे या प्रयोगातून अपेक्षित होते आणि ते जान्हवीने उत्तम साथ दिल्यामुळे साधले गेले आहे! आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जान्हवी लहान आणि आम्ही खूप मोठे असा आव घरात कधीच नव्हता. कारण तिचे मूल म्हणून असणारे वय हे आमचे आईवडील म्हणून होते. त्यामुळे समजून घेण्याची आणि सांगण्याची जबाबदारी दोन्ही बाजूंनी समान असायची. तेथे पालक आणि पाल्य यांपैकी कोणीच ढिले पडून चालत नाही. दोघांचीही समरसता अभ्यासाप्रती तितकीच हवी. तेथे एकरकमी फी भरून पालकांची सुटका नाही. शिवाय, पालकांना पाल्यांसाठी एक विशिष्ट वेळ द्यावा लागतो, तो वेगळाच.

खरे सांगायचे तर, प्रत्येक पालकांची धडपड ही त्यांच्या मुलांनी उत्तम शिक्षण घ्यावे म्हणून असते. तेव्हा मैत्रीचा सल्ला असा, की पालक जो खर्च करतात, ज्यासाठी करतात ते त्यांच्या पाल्याला मिळत आहे ना ते तपासत राहणे. जान्हवीच्या होमस्कूलिंगचा जन्म त्याच विचारातून झाला. अर्थात, प्रत्येक पालकाला ते शक्य नाही आणि त्याची गरजही नाही. मला वाटते, पालकांनी त्यांच्या प्रायॉरीटीज बदलल्या तर त्यांना हवे ते देण्यास शाळा नक्की तयार होतील.

सध्या मुले व त्यांचे पालक मार्कांच्या मागे धावत आहेत, मुलांना किती कळते किंवा त्यांचे गुण- कौशल्य विकसित होत आहेत किंवा कसे याचा विचारच पालकांकडे नाही. मुलांना त्याचा दोष देऊन चालणार नाही. कारण, ती जबाबदारी पालकांची आहे. पालकांनीच बदलायला हवे, म्हणजे मग पालकांना हवे तसे शिक्षणात व संगोपनात सगळे बदल आपोआप दिसून येतील.
मी आई म्हणून इतकेच म्हणेन – धन्यवाद जान्हवी! आम्ही पालक म्हणून जे काही केले तू त्याला साथ उत्तम प्रकारे देत त्याचे सोने केलेस…
तुझ्या पंखात बळ आले आहे…आता फक्त झेप घे!

– नीलिमा देशपांडे
neelima.deshpande1@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

 1. 1st…big congratulations to…
  1st…big congratulations to you & your family also.
  gret great achivement . janhavi is really brilliant student .best wishesh & gid bless to Janhavi. for future.
  अतिशय सुंदर वर्णन ,मोजकेच. thanks.

 2. अप्रतिम
  ताईडे मस्त मांडले…

  अप्रतिम
  ताईडे मस्त मांडले आहे.

Comments are closed.