जन्मदत्त उदारमतवादी लक्ष्मण नारायण गोडबोले (Laxman Narayan Godbole)

1
33
-heading

‘वडिलांची सांगे कीर्ती’ अशा तऱ्हेचा रामदासी मूर्खपणा करून माझ्या दिवंगत वडिलांबद्दल लिहीत आहे. पण प्रत्येक माणसामध्ये त्याच्या गरजेपुरता शहाणपणा असतोच असतो ही त्यांचीच धारणा होती!  

त्यांनी माझे नाव विचारपूर्वक निवडून ठेवले हे घरच्यांकडून बऱ्याचदा ऐकल्यावर, कधीतरी अगदी लहानपणी मला असे वाटून गेले, की आपणही त्यांचे नाव ठेवायला हवे – मी ते तसे बाटी असे लगेच ठेवूनही दिले आणि मी त्यांना त्याच नावाने आजवर हाक मारते. तर्कशुद्धता, मतस्वातंत्र्य, समानता अशा तत्त्वांवर त्यांची अविचल श्रद्धा होती. त्याचा असा घरगुती परिणाम कोठलीच चर्चा न होता आमच्या घरी रूढ झाला. घरातील सर्वच मतभेद किंवा आग्रह हे असेच, सर्वांची मते ऐकून घेऊन शमायचे किंवा तडीला जायचे. स्वतःचे मत स्पष्टपणे, समोरच्या माणसाच्या डोळ्याला डोळा देऊन मांडण्याची सवय आम्हाला सर्वानाच लागली, पण त्याच बरोबर मांडले आहे त्याची संपूर्ण जबाबदारी घेण्यास हवी हेही झाले. माणसाने त्याच्या व तिच्या शब्दाची किंमत त्याची त्यालाच व तिची तिलाच द्यावी किंवा घ्यावी लागते, ती लोकांकडून वसूल करता येत नाही. समोरच्याचे चुकत आहे, त्याचे परिणाम त्याला आणि त्या समोरच्याला, दोघांना भोगावे लागणार आहेत, हे सांगूनही जर समोरच्याने मांडलेल्या मुद्यांना धरून, ठरवले तसेच करत असेल, तर ते तसे घडू देण्यातच शहाणपणा आहे. ह्या आधीच्या चर्चेतून त्याला स्वतःची हानी कमी कशी होईल ह्याची दृष्टी येईल असा आशावाद बाळगावा. पराकोटीचे आग्रह, हट्ट, त्यातून येणारे दुरावे, कटुता हे सगळे कुटुंबाला आणि जरा मोठ्या मापाने समाजाला बाधक असतात. ही अशी पूर्वचर्चेची शिस्त आपुलकी, समरसता आणि गोडवा टिकवण्यास उपयोगी ठरते. सगळ्यांनाच त्यांच्या त्यांच्या मताचे तावून-सुलाखून निघालेले व्यावहारिक पडसाद ऐकण्यास मिळतात. न्याय, समन्वय, समरसता अशा वेगवेगळ्या मूल्यांचे जतन होते. 

त्यांची जन्मतारीख 7. 3. 37 अशी palindromic. हे आम्हाला सांगितले त्यांच्या सिडनहॅम कॉलेजमधील एका ज्येष्ठ सहकार्याने – प्रो डोंगरे यांनी. विलक्षण बुद्धिमत्तेचे, अॅक्युअरी असणारे, अत्यंत अबोल असे डोंगरेकाका बाटी यांना त्यांच्या वाढदिवशी न चुकता अशी अंकशास्त्रीय कोडी पाठवत. क्वचित ते घरी येत तेव्हा तासन् तास एकही शब्द न बोलता एकत्र बसून काहीतरी करत. त्या अंकमालिका हेच त्यांचे संवादमाध्यम असावे. बाटी यांच्या संपर्कात आणि जिव्हाळ्यात अशीच लोकविलक्षण माणसे असायची. त्यांची धारणा जगाविषयीच्या ज्ञानाचे असंख्य पैलू आहेत, माणसाला ज्याबद्दल कुतूहल आहे ते झेपेल तितके समजून घेण्यास हवे अशी होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कार्यक्षेत्राबाहेरच्या खगोलशास्त्र, स्थापत्य, संगणकीय व्यवहार, छपाईचे तंत्र अशा क्षेत्रात वाचन-व्यासंग ठेवला. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कोणत्याही क्षेत्रात काही अंतःप्रेरणेने, स्वतःचा विचार करून काम करणाऱ्या लोकांचा खूप मोठा संग्रह केला,  ते त्यांचे शंकासमाधान ready reference सारखे करू शकत. ते स्वतःही बऱ्याच लोकांचे असेच ready reference होते. अमर चित्र कथेचे पै काका अनेकदा फोनवर त्यांना एखाद्या शब्दाचे  जुने /नवे मराठी शुद्धलेखन, त्याबद्दलचे पर्याय विचारत आणि बाकी काही आधार नसेल, तितकीच घाई असेल तर लक्ष्मण सांगत आहे म्हणून बाटी यांनी सुचवलेला पर्याय छापून टाकत. नाना गाडगीळ आणि त्यांचा Hasselblad कॅमेरा, त्याची महती, मणचेकर काका आणि त्यांच्या ग्रामसमृद्धीसाठीच्या योजना, अण्णा शिरगावकर आणि त्यांचे इतिहासाशी नाते हे त्यांचे असेच अजून काही offbeat विषय. संपर्कातील गुणी माणसे त्यांचे आयुष्य किती संपन्न करू शकतात ह्याचा तो वस्तुपाठ. त्यांच्या निधनानंतर समाचारासाठी आलेल्या लोकांनी इतक्या विविध गोष्टी त्यांच्याकडून शिकल्याच्या आठवणी सांगितल्या, की त्यांची ती संपन्नता वाटून वृद्धिंगत होत होती हे अधोरेखित झाले. 

जगाविषयीचे औत्सुक्य अगदी लहानसहान गोष्टींत दिसायचे- घरातील कोणीही कोठेही परगावी/परदेशी जाऊन आले, की येताना तिकडची एखादी खास वस्तू घेऊन यायचे. खाद्यवस्तूचा आस्वाद सगळ्यांनी मिळून घ्यायचा, त्यात बाटी अग्रस्थानी. त्यांची अनाकर्षक नव्हे भीषण वासाचे चीजसुद्धा एकदा खाऊन बघण्यास तयारी असायची. सोलापूर प्रबोधिनीतील मावशी जेवण्यास बसल्यावर प्रेमाने पुष्कळ पोत सुटलेल्या गरम पोळ्या तुकडे करून का वाढत असतील त्याबद्दल घरी आल्यावर त्यांचे प्रयोग/ विचार. जर्मनीत मिळणाऱ्या विविध प्रकारच्या जर्दाळूजातीच्या फळांबद्दल त्यांना केवढा तरी उल्हास. ते लहानपणी सातवणीच्या झाडाच्या खुणेने सडा चालून जाण्याच्या सवयीने जर्मनीमध्ये माझ्या घरी आले. विविध जर्दाळूच्या फुलोऱ्याच्या खुणांनी रस्ते लक्षात ठेवायचे. ते कधी कामानिमित्त मंगळूरला गेले, की तिकडच्या मल्लिगे जाईचे लांबसडक गजरे खास त्या गजऱ्याच्या गुंफणीसाठी घरात यायचे. ते वेगेवेगळे वास, पदार्थांचा पोत, नव्या वस्तूचे वेष्टन, आलेल्या पत्रावरील स्थानिक डाकघराचा शिक्का हे सगळे ते बारकाईने बघत. त्यांचा आग्रह संपर्कातील तान्ह्या बाळांनी सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर करण्यास शिकावे असा असायचा, पण त्यात त्यांचा सहभाग वैचारिक पातळीवरील. माणसाने काही नवे करावे, काही अपेक्षा न ठेवता गोष्टी अजमावून पाहाव्यात, अनुभव हे ठरावीक कप्प्यात कोंबण्याच्याही पलीकडचे असतात, ते धास्तावून आधीच टाळू नयेत इतके सरळ आणि आश्वस्त असे त्यांचे भवतालाशी नाते होते. स्मरणरंजन, गतस्मृतिध्यास वगैरे विषय त्यांच्या स्वभावात न बसणारे, अगदी वाटलेच तर ते स्मृतींसाठी साधने शोधत बसत.  ते निदान 80 सालापासून कौटुंबिक समारंभात एकवेळ वधू – वर  किंवा उत्सवमूर्ती डावलूनही, नात्यातील वृद्धांचे फोटो निघतील आणि त्यांचा आवाज कोठेतरी ध्वनिमुद्रित होईल ह्या प्रयत्नात असायचे.  त्यामुळे अनेक नातेवाईक, विशेषतः म्हाताऱ्या आज्या लक्षात राहिल्या आहेत. आजच्या काळात सेल फोनचा  वापर त्यांच्या अगदी  पथ्यावर पडला असता. 

घरगुती आर्थिक व्यवहार किंवा त्यांच्या कारखान्याचे व्यवहार तत्पर आणि त्यांच्या नोंदी अगदी त्या दिवशीच्या सकाळपर्यंत चोख ठेवण्यासाठी त्यांनी त्यांच्या कोणा तशाच कलंदराला पकडून स्वतःचे software तयार केले होते, ते ते आग्रहाने वापरत. त्यांना त्याच पद्धतीचा उपयोग प्राप्तिकर, कारखान्याला आनुषंगिक कर ह्या सगळ्यासाठी होत असे. बाकी कोणी ती बाजारात उपलब्ध software शी त्या पद्धतीचे काही जुळत नसल्याने वापरात नसे, पण त्यांनी ती प्रणाली त्यांच्या गरजेची अशी अगदी तंतोतंत असल्याने सोडली काही नाही. त्यांचा पत्र आणि हल्लीच्या काळात इमेल संपर्क विस्तृत होता, त्यांचा अत्याधुनिक संपर्कमाध्यम मराठीतून वापरण्याचा आग्रहही तितकाच ठाम. त्यांच्या जिव्हाळ्याच्या गावांचे/ ठिकाणांचे google earth वर अवलोकन हा त्यांचा नित्यक्रम. त्यांनी स्वतः जाऊन तेथील अक्षांश / रेखांश नोंदलेले/ आमच्यापैकी कोणाला तरी पाठवून मिळवलेले होते. त्यांच्या अभ्यासाचा वेगवेगळ्या ठिकाणचे नकाशे हा विषय. माणसाने त्याच्या प्रदेशावर आकाशातून लक्ष ठेवता येते, तर ते तसे ठेवायलाच हवे. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून ते माणसाने त्याच्या गरजेसाठी वापरायलाच हवे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि विनोबा भावे ह्या त्यांच्या निरंतर मार्गदर्शकांनीही ते तसेच केले असते.  

स्वच्छ, स्पष्ट विचारांचे त्यांचे घर, त्याच्या खिडक्या सार्वत्रिक विचारांसाठी उघड्या असायच्या- त्यांच्या नित्य वाचनात The Economist, The Spactator, Guardian, EPW, अंतर्नाद, साम्ययोगसाधना, भूमिपुत्र, मैत्री, छात्रप्रबोधन, साधना, सोबत, Outlook, Arbiter ही नियतकालिके होती – त्यातील काही आपसूक बंद झाल्याने खंड पडला. काही भाषेसाठी, काही विचारांसाठी, काही प्रचलित मतप्रवाह जाणून घेण्यासाठी. त्यांची सहमती एकाच प्राचीन / अर्वाचीन पुस्तकात अंतिम सत्य आहे, बाकी सर्व असत्य म्हणून गर्ह्य आहे, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हे एकाच विचारात दडलेले आहे अशा सुरुवातीतून पुढे आलेल्या कोठल्याही मताशी कधीही, कोणत्याही मुद्यावर झाली नाही. त्यांच्यातील हम भी वाला हिंदू अशा हम ही विचारप्रणालींना नेहेमीच विरोध करायचा, त्यासाठी कोणत्याही मांडणीत असा काही हम ही गाभा आढळतो आहे, की काय ह्याविषयी जागरूक असायचा, तो आसपासच्या लोकांना त्याबद्दल सावध करत राहायचा, कारण अशा एकाधिकारी मतांतर्गत सहजीवन शक्य नसते. उदारमतवादी हे बिरुद सवंग, प्रचलित होण्याआधीचे ते उदारमतवादी होते, कारण त्यांचा उदारमतवाद जन्मदत्त आणि विविधांगी वाचनाने संस्कारित होता. 

सुनियोजित कार्य हा त्यांच्या श्रद्धेचा विषय होता. आईबाबांनी मी पार्ल्याच्या शाळेत असताना माझ्या एका वाढदिवशी माझ्या वर्गमैत्रिणींना घेऊन जुहूचौपाटीवर जाण्याचा बेत आखला. पाच मुली गाडीच्या पाठच्या भागात सहज मावतील इतकी आमची वये आणि आकारमाने. सरळ शाळेतून निघून तास-दोन तासांत शाळेत परतायचे आधीच ठरले होते. आईला आयत्या वेळी येताच आले नाही. बाटी यांनी पहिले काम केले ते म्हणजे बाईंना विनंती करून आम्हा सगळ्यांना शाळेतच शू करून येण्यास लावले. मग चौपाटीवरचे घोडेवाले आणि उंटवाले ह्यांना एका वर्तुळात फेऱ्या मारण्यास सांगून, जिला ज्या प्राण्यावर बसावे वाटेल, तेथे तिला बसवून ते वर्तुळाच्या केंद्रभागी उभे राहिले. फुगे, शिट्ट्या ह्यांचे नेमके तेव्हाच वाटप केल्याने आम्ही घाबरण्याचे वगैरे विसरलो आणि सगळ्या एकदम रपेट करून किंचाळून आलो. भेळपुरीवाल्याकडे गेल्यावर त्याचा एक माणूस उभा केला, मधोमध आम्ही आणि टोकाला ते, गोळेवाला आणि आईस्क्रीमवाला जवळपास. जिला जे जितके हवे ते तिने तिकडून न हलता खायचे/ प्यायचे. आम्ही घरी निघण्याच्या आधी एकेकीला गाडीवर बसवून, वाळू झटकण्यास लावून मग परत आलो. मैत्रिणी त्या वाढदिवसाची आठवण अजून काढतात. 

ते 26 जानेवारी 2019ला रात्री पावणेनऊ वाजण्याच्या आसपास गेले. बाटी यांनी त्यांच्या और्ध्वदेहिकाबद्दल तपशीलवार सूचना लिहून ठेवल्या होत्या. त्यांची इच्छा शक्यतो विद्युतदाहिनीमध्ये, कोणत्याही विलम्बरहित, कोणत्याही प्रचलित धार्मिक विधिरहित अंत्यसंस्कार व्हावा अशी होती. ते सगळे तसेच झाले. त्यांच्याच एका पारशी मित्राने आम्हाला कळवळून सूचना केली, की हा माणूस चांगले विचार, चांगला आचार आणि चांगली माणसे तुमच्यासाठी ठेवून गेला. त्यांनी हे सर्व अगदी पारशी धर्मवचनांप्रमाणे केले, तर त्याच्या सगळ्या अस्थी पाण्यात विसर्जित न करता, आमच्या पारशी परंपरेप्रमाणे थोड्या जमिनीवरही पसरा. ते आम्ही मानले. ते आमच्या दृष्टीने आता त्यांच्या घरातून, त्यांच्या जमिनीत त्यांच्या झाडांत पुन्हा उगवाया निघून गेले आहेत.

 
ऋचा गोडबोले 9819321852
rcagodbole@gmail.com
 

About Post Author

1 COMMENT

 1. सुन्दर लेख
  गोडबोले कुळ…

  सुन्दर लेख
  गोडबोले कुळ खालापुर हे शोधताना अनगांव हा उल्लेख आणि आणि आपला लेख सापडला
  माझा नं
  9424708241 संतोष गोडबोले

Comments are closed.