माणसाने कलासक्त तरी किती असावे की कला हेच माणसाचे जीवन बनावे! छांदिष्ट किती असावे की छंद हे व्यसन बनावे! काही माणसे कलासक्त आणि कलंदर या शब्दांपलीकडे जाऊन काहीतरी अद्भुत करून जातात आणि असामान्य बनतात. उदाहरणार्थ, मालवणमधील हरहुन्नरी कलाकार आणि अद्भुत व्यक्तिमत्त्व म्हणजे संग्रहकार उदय रोगे!
मालवण- मेढा येथील जोशी वाड्याचे पुत्र उदय रोगे. एकदम साधा आणि अतिशय गोड माणूस. लहानपणापासून छंदवेडा. दुर्मीळ वस्तू शोधत राहणे आणि त्या संग्रहित करणे हे त्यांचे नित्याचे काम. तो छंदच त्याची पुढे ओळख बनला. जुनी नाणी, विविध देशांची चलने, शिवमुद्रा असलेली नाणी, पुरातन वस्तू आणि शस्त्रे, बटणे, माचीस (मॅचबॉक्स), बाटल्यांची झाकणे, स्टिकर्स, पोस्टाची तिकिटे, जुनी भांडी व साधने, दुर्मीळ मुर्ती व वस्तू, विविध मान्यवर व्यक्तींच्या जन्मतारखांशी नंबर जुळणाऱ्या चलनी नोटा, पेंटिंग्ज, शंख-शिंपले आणि खूप काही… अशी ही उदयच्या संग्रहातील संपत्ती. उदयने अलिकडे तर देवळातील व इतर ठिकाणच्या देवदेवतांच्या जुन्या मूर्ती जतन करण्यासाठीही पुढाकार घेतला आहे!
त्याच्या अफाट संग्रहाची नोंद ‘लिम्का बुक’सह इतर संस्थांना घ्यावीच लागली आणि उदय स्टार झाला! उदयच्या नावे एक-दोन नव्हे तर विविध संग्रहांच्या नोंदी ‘लिम्का रेकॉर्ड बुक’मध्ये आहेत! पर्यटकांची गर्दी मालवण बंदर जेटीच्या रस्त्यावर उदयच्या जनरल स्टॉलवर होते ती, वस्तू खरेदीऐवजी उदयच्या संग्रहांच्या रेकॉर्डची सर्टिफिकेट्स पाहण्यासाठी! ते केवळ वस्तूंचा नुसता संग्रह केला म्हणून घडलेले नाही, तर त्याने त्या वस्तूंची योग्य ती देखभाल घेणे, त्यांचे जतन करणे हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आणि कष्टाचे काम मन:पूर्वक पार पाडले आहे. उदय स्टॉल बंद करून पूर्ण वेळ त्याच्या संग्रहित वस्तूंसाठी देत आहे. वस्तू एकाच जागी संग्रहित राहव्यात आणि सर्वांना पाहता याव्यात यासाठी उदयने त्याच्या मेढा येथील निवासस्थानी ‘शिवमुद्रा संग्रहालया’ची स्थापना केली आहे. ते संग्रहालय पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण ठरत आहे. त्यांनी सप्टेंबर 2017 पासून प्रदर्शन पाहण्यासाठी पर्यटकांना फी आकारणे सुरू केले. पहिल्या वर्षभरात पाच हजार लोकांनी प्रदर्शन पाहिले. रोगे कुटुंबाचे दुकान होते, उदयने ते बंद केले आहे – संग्रह हाच कुटुंबाचा व्यवसाय बनून गेला आहे.
उदय नेहमी पांढऱ्या सदऱ्यात दिसणार! तो ‘साधी राहणी मात्र उच्च विचारसरणी’ हा मंत्र जगतो. साधा-सरळ स्वभाव, प्रसन्न आणि हसतमुख, गोड आणि मिश्किल बोलणे, पण तेवढाच स्पष्टवक्ता. समाजातील प्रश्नांवर, घडामोडींवर, प्रवृत्ती-विकृतींवर त्याच्या लेखणीतून शाब्दिक मार्मिक फटकारे देणारा.
प्रकाशित पुस्तके –
1. हे असंच चालायचं, 2. दोन मालवणी एकांकिका, 3. मस्करी नाय करनय (कविता संग्रह), 4. मयुरपंखी (चारोळी संग्रह). त्यांच्या पस्तीस एकांकिका अाणि दोन नाटके यांना रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची योग्यता प्रमाणपत्रके प्राप्त झाली आहेत. उदय रोगे यांनी एकूण छपन्न एकांकिका लिहिल्या अाहेत. त्यांनी त्यासोबतीने तीन नाटके, तीनशेहून जास्त कविता अाणि तीस लेख असे लेखन केले अाहे.
1. चार हजार शिवमुद्रा नाणी, 2. एक लाख वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर्स, 3. एक लाख बटन, 4. बावीस हजार (बॉटल कॅप) बुचे, 5. एक हजार वेगवेगळ्या प्रकारच्या आगपेट्या, 6. वर्तमानपत्राची एक लाख कात्रणे, 7. जन्म तारखांप्रमाणे नंबर असलेल्या दहा रुपयांच्या नोटा.
* ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’मध्ये दोन संग्रहांच्या नोंदी.
* ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये चार संग्रहांच्या नोंदी.
* ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये सलग तीन वर्षांत चार संग्रहांच्या नोंदी.
उदय रोगे – 9421263739 / 9049394516, uday.roge9@gmail.com
– भूषण मेतर, bhushanmetar52@gmail.com
खूपच छान भूष भाई….थँक्स…
खूपच छान भूष भाई….थँक्स एवढ्या सुंदर व्यक्तिचित्रण साठी…मस्त उदय रोगे सर…
Comments are closed.