चोर बाजार – मुंबापुरीची खासियत

3
72
carasole

बहुरंगी, बहुढंगी मुंबईत दोनशे वर्षांपूर्वी काही मजेशीर बाजार होते.

‘मारवाडी बाजार’ भुलेश्वर-क्रॉफर्ड मार्केट रस्त्यावर होता. तेथे उंची शेले, शालू, साड्या, लुगडी, पीतांबर, पागोटी आणि सतरंज्या मिळत.

‘अंग्रेजी बाजार’ फोर्टच्या मेडोज स्ट्रीटवर होता.

‘सट्टा बाजार’ मुंबादेवी तलावाच्या मागे एका मोठ्या इमारतीच्या आगाशीवर (गच्चीवर) भरत असे. मारवाडी लोक तेथे पावसावर सट्टा खेळत. पाऊस कोणत्या दिवशी व किती पडणार यावर सट्टेबाज भाव देत असत. पोलिसांनी त्या सट्ट्यावर कालांतराने बंदी घातली.

त्याशिवाय मुंबईत भाजी बाजार (भायखळा मंडई), कांदेबटाटे बाजार (डंकन रोड), फूल बाजार (भुलेश्वर), तांबाकाटा किंवा तांबट आळी (तांब्या-पितळेची भांडी), लोहार आळी-चाळ (हार्डवेअर), चिऱ्याचा बाजार (धोबी तलाव), कापड बाजार (मंगलदास व मुळजी जेठा मार्केट), पान बाजार (खेतवाडी), बांगडी बाजार, खांड बाजार, बोरा बाजार, क्वाटल बाजार (दावण किंवा दोरखंड), कुंभार तुकडा, गोणपाट बाजार, कॉटन बाजार (कॉटन ग्रीन), क्रॉफर्ड मार्केट तसेच नळ बाजार असे विविध प्रकारचे बाजार १८६५ ते १८७० या काळात बांधले गेले. नळबाजाराशेजारी भिकार बाजारही होता. लोक दारावर भिक्षा मागण्यास आलेल्या भिकाऱ्यांच्या (यामध्ये साधू-बैरागी वगैरे सर्व प्रकार येत) झोळीमध्ये मूठभर धान्य घालत. ते भिकारी गहू, तांदूळ व ज्वारी यांसाठी वेगवेगळ्या झोळ्या ठेवत. दिवसभर जमा झालेले धान्य दिवस मावळताना भिकार बाजारात नेऊन विकत. शहरातील गरीब लोक भिकाऱ्यांनी, साधू-बैराग्यांनी जमा करून आणलेले ते धान्य भिकार बाजारातून स्वस्त दरात खरेदी करत.

काळाच्या ओघात तेथील काही बाजार बंद पडले, तर काही स्थालांतरित झाले.

ग्रँट रोडवरील रिपनचा (ऑल्फ्रेड टॉकिज) नाका म्हणजे मुंबईच्या सांस्कृतिक इतिहासातील एकेकाळचा सर्वात गजबजलेला नाका! नाट्य, तमाशा आणि सिनेमाची पंढरी! त्याच्या आसपासचा पिला हाऊस परिसर म्हणजे गरीब जनतेची शारीरिक भूक भागवणारा मोहमयी बाजार! तर ग्रँट रोडच्या पवनपुला (केनेडी ब्रिज) खाली रेल्वे लाइनला खेटून नृत्यसंगीताचा बाजार होता.

मुंबईतील सर्वांत जुना, वर्षानुवर्षे चालत आलेला, गरीब जनतेला, हौशी-छांदिष्ट संग्राहकांना वरदान ठरलेला, आगळावेगळा वैशिष्ट्यपूर्ण बाजार आहे तो म्हणजे जुना बाजार ऊर्फ चोर बाजार!

चोर बाजार हा मुळात जुन्या कपड्यांचा बाजार! तेथे पुढील काळात जुन्यापुराण्या नानाविध तऱ्हांच्या वस्तू विक्रीस येऊ लागल्या. त्या जुन्या बाजाराचे ‘चोर बाजार’ नामकरण कसे झाले? त्याचा किस्सा त्या बाजारातच ऐकायला मिळतो. मरीन लाइन्सच्या सोनापूर भागात, हिंदू दहनभूमीत प्रेते जाळल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत असे. त्यामुळे चिराबाजार व धोबीतलाव परिसरातील किरिस्ताव व पारशी लोकांनी त्या स्मशानभूमीस आक्षेप घेतला. त्यांनी स्थानिक ब्रिटिश सरकार जुमानत नाही म्हणून इंग्लंडमध्ये थेट व्हाईसरॉयला पत्रे पाठवली. तेव्हा व्हाईसरॉय जातीने हिंदुस्मशानभूमीमुळे खरोखरच दुर्गंधी पसरते की नाही ते पाहण्यासाठी मुंबईला आले होते. त्यावेळी सँडहर्स्ट रोडवरून जाताना त्यांच्या कानी, नळ बाजाराच्या समोरच्या गल्ल्यांतून, ‘रास्ते का माल सस्ते में’, ‘जुना पुराणा सामान’, ‘बे बे रुपया, कोई भी माल उठाव’, ‘मिठा खाजा, बे पैसा’ असे तारसप्तकात ओरडत माल विकणाऱ्या मुस्लिम फेरीवाल्यांचा (काबाडी लोकांचा) आवाज पडला. लोकवस्ती विरळ असल्याने व गाड्यांची रहदारी नसल्याने रस्त्यांवर शांतता नांदत असे. तेव्हा व्हाईसरॉयनी फेरीवाल्यांच्या आवाजाला त्रासिकपणे ‘क्या शोर बाजार है’ असे म्हणून नाक मुरडले होते. त्यावरून त्या जुन्या बाजाराचे नाव ‘शोर बाजार’ पडले. लोकांनी त्याचा ‘चोर बाजार’ असा अपभ्रंश केला. मुंबईतील शर्विलकांनीही त्यांच्या हस्तकौशल्याने, चलाखीने अनेकांना त्यांचा ‘हिसका’ दाखवून त्या बाजाराचे ‘चोर बाजार’ हे नाव सार्थ केले!

इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया मुंबई भेटीस आली असताना तिच्या मूल्यवान सामानातून तिचे आवडते ‘व्हायोलिन’ गायब झाले होते. काही दिवसांनी, ते चोर बाजारातून जुने सामान म्हणून विक्रीसाठी आले, तेव्हा पोलिसांना सापडले. चाळीस वर्षांपूर्वी राजकुमार या सिनेअभिनेत्याचे चोरीस गेलेले किंमती घड्याळही पोलिसांनी तेथूनच जप्त केले होते.

हैदराबादचे धनाढ्य नवाब सालारजंगचे वंशज अलियावर जंग हे मुंबईचे गव्हर्नर होते. ते वाळकेश्वरला राजभवनात राहत. एके दिवशी, एका चोराने समुद्रमार्गे येऊन, राजभवनच्या मागच्या बाजूने अलियावर जंगसाहेबांच्या शयनगृहात प्रवेश केला आणि तेथील अलमाऱ्यांतील त्यांचे कपडे चोरून पोबारा केला. त्या घटनेने मुंबई पोलिसांची झोप उडाली. पोलिसांना राजभवनात इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही तेथे चोरी झालीच कशी ते कळत नव्हते. मात्र आठ-दहा दिवसानंतर त्या बुद्धिमान चोराचे दुर्दैव आड आले. तो ‘चोरांच्या आळंदीत’ म्हणजे ‘चोर बाजारा’त साहेबांचे कपडे विकताना पकडला गेला. त्याचे दुर्दैव अशासाठी, की त्याने चुकीच्या माणसाचे कपडे चोरले होते. शेरवानी, कुर्ते, कोट, गाऊन्स असे, हैदराबादी नवाबाचे उंची, भारी किंमतीचे कपडे विकत घ्यायला कोणीही माईचा लाल पुढे येईना! फक्त कोटाची सोन्याची बटणे तेवढी विकली गेली! काही वेळा वाटते, की अशा शर्विलकांचे फोटो फ्रेम करून चोरा बाजारात लावले गेले पाहिजे होते. शेवटी चौर्यकर्म हीसुद्धा चौसष्ट कलांपैकी एक कलाच आहे. चोर बाजारातील एक चाचा मला कौतुकाने म्हणाले होते, ‘मालिक ऐसी हुन्नर (कला) बहुत कम लोगोको देता है.’

नळ बाजारासमोरच्या सरदार वल्लभभाई पटेल रोडवरून (जुना सँडहर्स्ट रोड) मौलाना आझाद रोडकडे (जे. जे. हॉस्पिटल रोड) जाणाऱ्या मटण स्ट्रीट, चिमणा बुचर स्ट्रीट, मोची गल्ली या सर्वसाधारण परिसराला चोर बाजार म्हणून संबोधले जाते. त्यामध्ये मिनी मार्केट, मुघल बाजार, चिंधी गल्ली, बोहरी मोहल्ला, गुजर स्ट्रीट, बारा इमाम रोड यांसारखे भाग आहेत.

मॉर्टन नामक ब्रिटिश इंजिनीयरने नळ बाजार मंडई उभी केली. त्यातील मटण आणि मच्छी मंडईच्या समोरील गल्लीला त्यांचे नाव दिले गेले होते. नळ बाजारातील कसाई लोकांनी मॉर्टन स्ट्रीटचे ‘मटण स्ट्रीट’ असे नामकरण केले. मटण स्ट्रीटवर मटणाचे दुकान नव्हते आणि आजही नाही. शेजारीच चिमणा बुचर स्ट्रीट आहे. रस्त्याला कसायाचे नाव असले तरी तेथे बकरे कापले जात नाहीत. तेथे फक्त गाडीचे सुटे भाग (स्पेअर पार्ट) मिळतात. मोची गल्लीत मात्र अजूनही मोची राहतात व तेथे नवे-जुने जुतेही मिळतात.

नळ बाजारासमोर, मटण स्ट्रीट, चिमणा बुचर स्ट्रीट व सैफी ज्युबली स्ट्रीट या गल्ल्यांच्या तोंडावर हार्डवेअर बाजार आहे. तेथे सर्व प्रकारचे व आकाराचे खिळे, स्क्रू, हातोड्या, स्क्रू ड्रायव्हर्स, पाने (स्पॅनर), कात्र्या, करवती (लोहार व सुतार सामान), छिन्नी, तराजू, साखळ्या (चेन्स), वजने, मापे, डंबेल्स, व्यायामशाळेतील लोखंडी सामान, रोलर स्केटिंग, सर्व प्रकारची छोटी छोटी चाके, नट बोल्ट्स, रंगांचे ब्रश, विविध प्रकारच्या स्प्रिंग्ज, बाथरूम फिटिंग्ज आदी सामान मिळते. रोजंदारीवर अथवा कंत्राटावर काम करणारे सुतार, plumber, रंगारी, कडिया, हमाल, मांडव बांधणारे असे कारागिर-बिगारी लोक दोन टाकी परिसरात रस्त्यावर दीड-दोनशे वर्षांपासून दररोज सकाळी उभे असतात. पूर्वी मटण स्ट्रीटच्या तोंडाशी फूटकळ सामानांच्या गाड्या उभ्या असत. त्या गाड्यांवर बटण चाकू, रामपुरी चाकू, खटक्यांचे चाकू, दुहेरी धार असलेले, करवतीसारखे पाने असलेले सुरे, खंजीर, कोयते, कुऱ्हाडी, वस्तरे, फाइट (पुढे टाके असलेल्या लोखंडी अंगठ्या), गुप्त्या (मुठीच्या काठीत लांब धारदार पाते असलेल्या सुऱ्या), विळ्या, नारळ खोवणी, स्वयंपाकघरातील सुऱ्या आदी सामान मिळे. मुंबईतील गुंड लोक प्राणघातक हत्यारे पंचवीस वर्षेंपूर्वीपर्यंत तेथूनच खुलेआम खरेदी करत. नंतर पोलिसांची बंदी आली. पूर्वी त्या रस्त्यावर विविध प्रकारच्या टोप्यांची दुकाने होती. तेथे काश्मिरी, इराणी, बोहरी, तुर्की, फारसी, अरबी या लोकांच्या रंगीबेरंगी टोप्या मिळत.

चोर बाजारात साधारणत: पाचशे स्टॉल्स (टपऱ्या) आणि दुकाने आहेत. काही टपऱ्या दोन ते तीन फूट लहान आहेत. काही जवळपासच्या भागात मोठमोठी गोदामेही आहेत. तेथील व्यापारी कितीही मोठे गिऱ्हाईक असले तरी त्याला त्याच्या गोदामात  घेऊन जात नाहीत. आधी कळवल्यास ‘माल’ दुकानात आणून ठेवतात.

चोर बाजारात अॅण्टिक (दुर्मीळ) वस्तूंची जवळ जवळ पावणेदोनशे दुकाने आहेत. बाजारात काठेवाडी मुस्लिम लोकांचे प्राबल्य आहे. पूर्वी बाजारात काळे जाकिट व लाल गोंड्यांची तुर्की टोपी घातलेले ‘चाचा’ दिसत. सध्या तेथे मन्सुरी, खोडा, मेमन, युपीचे भय्ये, हैदराबादी व्यापारी आहेत. काही बोहरी जुने फर्निचर व काच सामानाच्या धंद्यात आहेत. तेथील दुकानदार स्वत:ची नावे, दुकानाचा नंबर, टेलिफोन नंबर पाटीवर लिहून ती दुकानाबाहेर लावतात. त्या पाट्यांवर दुकानात कोणत्या प्रकारचा माल विकला जातो याचेही चिन्ह बहुधा असते.

‘जरी’चा धंदा हा चोर बाजारातील सर्वात पुरातन धंदा! गेल्या शतकापर्यंत मुंबईतील पाठारे प्रभू, शणवी, खत्री, सोनार, पाचकळशी, सीकेपी, सारस्वत ब्राह्मण अशा समाजातील घरंदाज सधन स्त्रिया जरीचे काठ असलेले शालू व पैठण्या सर्रास नेसत. पाठीवर शेले घेत. पुरुषमंडळीसुद्धा अल्पाक, शार्कस्किनचा कोट परिधान करत. पूजेसाठी भरजरी पीतांबर अथवा कद नेसत. त्यांच्या जुन्या कपड्यांना चोर बाजारात सोन्याचा भाव येत असे. जरीकाठी शालू आणि पैठणी यांतून सोने, चांदी निघत असे.

चाळीत, जुन्या इमारतीत, घराबाहेर, गॅलरीत, गच्चीवर वाळत घातलेले कपडे, तसेच लाँड्रीतून गहाळ झालेले कपडे पहाटेच्या वेळी चोरबाजारात येतात. मध्यमवर्गीय लोक जुने कपडे बोहारणी अथवा वाघरीणींना (काठेवाडी बायकांना) देतात. ते कपडेसुद्धा चोर बाजारात विक्रीस येतात. रेडिमेड गारमेंटचा डिफेक्टिव्ह माल, तसेच उल्हासनगर-धारावीमधून तयार झालेला माल प्रसिद्ध कंपन्यांची लेबले लावून डुप्लिकेट रूपात तेथे येतो. कपडे लाँड्रीचा मार्क नाहीसा करून, मळके डाग पडलेले कपडे धुऊन इस्त्री करून नव्याने पुन्हा बाजारात येतात. सायंकाळच्या मंद प्रकाशात ते जुने कपडे ओळखूही येत नाहीत. त्या व्यवहारात व्यापारीही खूश आणि गिर्हाकईकही खूष!

एका बाजाराचे नाव मुघल बाजार जरी असले, तरी त्या ठिकाणी मुघलकालीन कोणत्याही वस्तू मिळत नाहीत. तो बाजार हरी मशिदीजवळ असून तेथे लहानमोठ्या जहाजावरील फूटकळ सामान विकणारी आठ-दहा दुकाने आहेत. सुकाणू (जहाजाचे गोल स्टिअरिंग व्हिल), विविध प्रकारचे नांगर, दुर्बिणी, जहाज नांगर टाकते त्यावेळी वाजवली जाणारी घंटा, नेव्हिगेशनचे रंगीत दिवे, बॅटरी चार्जर्स, लाइफ जॅकेट्स, जहाजावर वापरली जाणारी दिशा-वारा-पर्जन्य-भरती-ओहोटी-स्टॅबिलिटी यांची दर्शक मीटर्स किंवा यंत्रे आदी सामान विक्रीस ठेवलेले असते. त्यातील बहुतेक सामान परदेशी कंपन्यांचे व टिकाऊ असते. मुघल बाजारात त्या वस्तूंची मोठी गोदामे आहेत.

‘हरी मशिदी’समोर मिनी मार्केट आहे. तेथे फुटकळ वस्तू विकत मिळतात. रस्त्यावर पेन्सिली, बटणे, दो-यांची रिळे, सुया, विणकामाचे साहित्य विक्रीसाठी ठेवलेले दिसते.

कालबाह्य झालेल्या, अपघातात छिन्नविच्छिन्न होऊन गेलेल्या देशी-विदेशी कंपन्यांच्या मोटारगाड्या, मोटर सायकली कमीत कमी किंमतीत हस्तांतरित होत असतात. शेवटी, त्या निकामी, टाकाऊ होत जातात. त्यावर अधिक खर्च करणे व्यावहारिकदृष्ट्या मूर्खपणाचे ठरते. तशा अवस्थेतील एके काळच्या आलिशान गाड्या, हातगाडीवरून शेवटच्या क्रियाकर्मासाठी चोरबाजारात दाखल होतात! बारा इमाम रोडवरील गॅरेजेस म्हणजे तशा गाड्यांचे अस्तित्त्व नष्ट करणारी स्मशानभूमी! मेडिकल कॉलेजमध्ये निष्णात सर्जन शवविच्छेदन करून बेवारस प्रेतांचे अवयव अलगद काढून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देतात, तसे बारा इमाम रोडवरील कुशल मॅकेनिक चार तासांत स्क्रू-ड्रायव्हर, छिन्नी व हातोडा यांच्या साहाय्याने त्या गाड्यांचे पार्ट मोकळे करून मालकांना देतात. गाडीचा उरलेला सांगाडा, सडलेले पत्रे, निरुपयोगी पार्ट भंगारवाल्याला विकून टाकतात. जुन्या गाड्यांचे ते सुटे पार्ट मालकांना कधी कधी दामदुप्पट किंमत मिळवून देतात! पाऊणशे वर्षांपूर्वीच्या हौशी मालकांनी कौतुकाने सांभाळलेल्या काही व्हिंटेज गाड्या मुंबईच्या रस्त्यावर रॅलिजमध्ये धावताना अथवा प्रदर्शनात उभ्या असलेल्या दिसतात. त्याचे श्रेय ‘चोर बाजारा’ला जाते. कारण त्या गाड्यांना लागणारे विविध प्रकारचे सुटे भाग चढ्या भावात का होईना, फक्त चोर बाजारातील गॅरेजवाले पुरवू शकतात. प्रसिद्ध फिल्मी संगीतवादक कलाकार केरसी लॉर्ड याने किस्सा सांगितला होता. पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी हौसेने सेंकड हँड गाडी घेतली होती. त्या गाडीच्या दोन चाकांवर व्हिलकॅप नव्हती. त्यांचा ड्रायव्हर जयसिंग त्या विकत घेण्यासाठी सकाळीच चोर बाजारात गेला. तेथील माणसाने गाडीचा मेक व इतर माहिती घेतल्यावर, ‘आप यही रूको, अभी मैं व्हिलकॅप लेके आता हूँ ’ असे म्हणत पाच मिनिटांत दोन नव्या व्हिलकॅप आणल्या. जयसिंग त्या पॅक करून पैसे देऊन घरी आला. दुपारी तो त्या कॅप चाकांना बसवायला गेला, पाहतो तर काय, पहिल्या दोन्ही चाकांच्या व्हिलकॅप गायब! चोरबाजारातील त्या अनोळखी माणसाने गाडीच्या (लतादीदींच्या) दोन व्हिलकॅप्स काढून त्या जयसिंगलाच विकल्या होत्या!

चिंधी गल्लीशेजारच्या मोची गल्लीत पादत्राणांचा (चपला, बुटांचा) बाजार आहे. त्यास चप्पल बाजार म्हटले जाते. तेथे चपला-बूट बनवून विकले जातात. महाराष्ट्रात हजारो देवळे आहेत. देवळाबाहेर भाविकांचे जोडे चोरणारे शेकडो भुरटे चोर, त्यांनी चोरलेले जोडे मोची गल्लीत विकतात. दंगलीच्या काळात चोरलेला मालही तेथे येतो. पाश्चात्य कंपनींच्या ब्रँडेड शूजना (बुटांना) मोठी मागणी आहे. त्यांच्या किंमतीही फार असतात. ते शूज चोरून, चप्पलबाजारात आणले जातात. बाजारात पाश्चात्य कंपनीचे नकली शूजही पाहायला मिळतात. तेथे कमी किंमतीत तशा प्रकारचे शूज मिळतील.

काही वेळा चांगला शेलका मालही बाजारात हाती लागतो. बाजारातील फेरीवाले आणि मोची सांगली, कोल्हापूर, मिरज या भागातील असल्याने त्यांच्याशी मराठीत बोलणे श्रेयस्कर! मातृभाषेत बोलल्यामुळे व्यवहारात आपलेपणा येतो. मी त्या बाजारात चपला व बूट आणण्यास गेलो होतो. मी दुकानात बसलेल्या मावशींना सांगितले, की मी येथे नेहमी येत असल्याने भावासाठी उगाच घासाघीस करत नाही. मला जुने पण चांगल्या प्रतिष्ठित कंपनीचे जोडे व चामड्याची मजबूत चप्पल हवी आहे. तेव्हा लॉटमधील माल मला तुम्हीच काढून द्या. तिने मला खरोखरीच चांगला माल काढून दिला. बूटाचे अडीचशे व चप्पलेचे शंभर रुपये असे तिने फक्त साडेतीनशे रुपये माझ्याकडून घेतले. मी तोच माल एखाद्या दुकानातून घेतला असता तर मला कमीत कमी दीड हजार रुपये तरी द्यावे लागले असते. इतक्या स्वस्तात माल विकणे तुम्हाला कसे परवडते असे विचारल्यावर, ती म्हणाली, “आम्ही खानदानी मोची म्हणजे चांभार. आम्ही स्वत: माल बनवतो पण आम्हाला चामड्याची साधी चप्पल चारशे रुपयांच्या खाली देणे परवडत नाही. पण चोरांना माल फुकटच मिळालेला असतो. ते आम्ही देऊ ती किंमत घेऊन आनंदाने जातात. मी ही चप्पल पन्नास रुपयांत, तर बूट दीडशे रुपयांत घेतले. यात माझा व गिऱ्हाईकाचा असा दोघांचाही फायदा असतो. पूर्वी देवळातून चोरलेला माल यायचा, पण आजकाल तो माल कमी झाला आहे. सध्या कार्यक्रमाचे हॉल असतात तेथून माल येतो. तुला जो माल दिला तो सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपातील होता.” गिऱ्हाइकाने व्यापाऱ्यावर विश्वास दाखवला तर तोही त्याच्यावर विश्वास ठेवतो.

मुस्लिम बांधवांचा ‘जुम्मा’ किंवा शुक्रवार हा प्राथनेचा दिवस असतो. त्या दिवशी चोरबाजारातील सर्व दुकाने व स्टॉल्स दिवसभर बंद असतात. परंतु दर शुक्रवारी, भल्या पहाटेपासून बाजाराला जाग येते. दूरदूरचे फेरीवाले त्यांचे किंमती सामान पाट्या, हातगाड्या-टेम्पोत भरून बाजारात घेऊन येतात. बाजार सकाळी सात वाजेपर्यंत नटूनथटून तयार असतो. फेरीवाल्यांच्या रस्त्यावर बसण्याच्या जागा ठरलेल्या असतात. त्यासाठी ते स्थानिक दुकानदारांना दिवसाचे भाडेही देतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, शेजारच्या राज्यांतून अनेक लोक जुन्या, दुर्मीळ वस्तू विकण्यास बाजारात येतात. त्या मालाला ग्राहकांची चांगली मागणी असते. चोखंदळ ग्राहक त्यातील निवडक, शेलका माल पडेल त्या किंमतीस उचलण्यास तयार असतो. कारण ती दुर्मीळ वस्तू पुन्हा हाती लागेल याची शाश्वती नसते. तेथे येणारा बहुतेक माल जुना, वापरलेला अथवा चोरलेला असल्याने त्याची किंमतही बरीच कमी असते. ग्राहकाला तेथील सौंदर्यपूर्ण, कलात्मक वस्तूंची भुरळ पडते. तेथे हौसेला मोल नसते. वस्तू पाहताक्षणी आवडणे सर्वांत महत्त्वाचे असते. ग्राहक त्यांच्या पूर्वजांची आठवण म्हणून, छंद जोपासण्यासाठी, त्यांचा स्वत:चा संग्रह वाढवण्यासाठी, तर कधी घराच्या सजावटीसाठी ती खरेदी करत असतात. तेथील प्रत्येक वस्तूच्यामागे इतिहास दडलेला असतो. अँटिक अथवा जुन्या वस्तूची किंमत तिच्या दुर्मीळपणावर ठरते. विक्रेत्याची पैशांची गरज आणि ग्राहकाला वस्तूची गरज यावर सौदा ठरवला जातो. त्या दुर्मीळ वस्तूची किंमत काहीही असू शकते. त्यावेळी ग्राहकाचे ‘लक’ महत्त्वाचे असते.

मुंबईत दोन-तीन शतकांपूर्वी पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच, यहुदी यांसारखे अनेक पाश्चात्य लोक राहत होते. भारताचे अनेक देशांबरोबर व्यापारी संबंध होते. ती विदेशी मंडळी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांच्या चीजवस्तू भारतात सोडून मायदेशी परत गेली. त्यांनी वापरलेल्या त्या चीजवस्तू या ना त्या मार्गाने चोर बाजारात आल्या. त्याशिवाय अनेक इतिहासप्रसिद्ध शहरांतील संस्थानांचे जुने राजवाडे, जमीनदारांचे बंगले, नबाबांच्या हवेल्या लिलावात निघतात. कधी जीर्ण होऊन जमीनदोस्त होतात. पुन्हा नव्याने बांधल्या जातात. बाजारातील व्यापारी तेथील कलाकुसरीचा सर्व माल खरेदी करतात. कित्येक जण वडिलोपार्जित जुन्या वस्तू जागेच्या अडचणीमुळे, नादुरूस्त झाल्यामुळे नाममात्र किंमतीत फेरीवाल्यांना विकतात. फॅशन बदलते तशा जुन्या वस्तू ‘आऊटडेटेड’ होतात. काही वेळा हलाखीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे घरचे सामान विकण्याची परिस्थिती येते. फेरीवाले विक्रीस निघालेले असे सामान, अगदी पीनपासून मोठमोठी झुंबरे, हवेल्यांच्या खिडक्या दारांपर्यंतच्या वस्तू चोरबाजारात विकायला आणतात. त्यामुळे तेथे रेडिओग्राम, चेंजर, साखळी लावलेली शोभिवंत घड्याळे, जातिवंत लाकडाचे कोरीव नक्षीकाम केलेले फर्निचर, तांबा, पितळ, ब्राँझ, जस्त आदी धातूंपासून बनवलेल्या सुबक वस्तू, पेंटिंग्ज, चित्रे, राजेरजवाड्यात दिसणारे नक्षीकाम केलेले पेटारे, रांजण, गुडगुड्या, पक्ष्यांचे मोठाले पितळी पिंजरे, कलात्मक पुतळे, मूर्ती, चहाचे पेटारे, चौकोनी बरण्या, पोर्सिलीनच्या प्लेट्स, कपबश्या, कटग्लासेस, लायटर्स, अॅश ट्रेज, दारूचे मग्ज, चलनी नाणी यांसारख्या असंख्य वस्तू पाहायला मिळतात.

चोर बाजारात भारतीय पुरातत्त्व खात्याने निर्बंध घातलेल्या हस्तिदंती, प्राण्यांची हाडे, कातडी, केस व शिंगांपासून बनवलेल्या वस्तू, देवादिकांच्या पंचधातूंच्या मूर्ती, शिल्पे अशा काही संरक्षक वस्तू सोडून बाकी सर्व सामान तेथे मिळते. पुरातत्त्व विभागाची माणसे अधुनमधून बाजाराची पाहणी करण्यास येतात. तेथे बाजारात आलेली कोणतीही जुनी दुर्मीळ वस्तू दुरुस्त करणारे, जुनी वस्तू नवीन करण्यात वाकबगार असणारे कसबी कारागीर आहेत. बाजारात एकदा विकलेली वस्तू कोणी परत घेत नाहीत. खरेदी-विक्रीची पावतीही दिली जात नाही. परदेशी लोकांना विमानतळावर दाखवायला कच्ची पावती देतात. परंतु त्यावर खरी किंमत लिहिलेली नसते.

पाच वर्षांपेक्षा जुन्या वस्तूंना सेल्सटॅक्स लागत नाही. काही व्यापारी विकलेली वस्तू अस्सल असल्याचे सर्टिफेकेट देतात.

भारतात शंभर वर्षांपेक्षा जुन्या वस्तू परदेशी पाठवण्यावर बंदी आहे. लोकांना त्यांच्या संग्रही अशा वस्तू असल्यास त्या सरकारकडे रजिस्टर कराव्या लागतात. तसे कायदे अनेक आहेत. पंरतु ते राबवण्यासाठी यंत्रणा अपुरी आहे. त्यामुळे चोरबाजारात माल कोठून येतो व तो नंतर कोठे जातो यावर काहीच नियंत्रण नाही. अनेक जण ‘असली माला’च्या नावाखाली म्हणून नकली माल विकतात. शेलका, किंमती माल त्यांच्या गोदामात असतो. विश्वास पटल्यावर तो आणून दाखवला जातो. बाजारात परदेशी गिऱ्हाइके मोठ्या प्रमाणावर येत असल्याने बाजारातील व्यापारी त्यांच्याशी मोडक्यातोडक्या इंग्रजीत बोलतात. त्यांपैकी काहींच्या वेबसाइटही आहेत. त्यांचा व्यवसाय इंटरनेटमुळे ग्लोबल झाला आहे. बाजारात दर शुक्रवारी कनिष्ठ, मध्यमवर्गीय, विविध वस्तूंचे छांदिष्ट, हौशी, संग्राहक, इतिहास समाजशास्त्राचे अभ्यासक, हिंदुस्थानी कारागिरी-कलाकुसर यांविषयी कुतूहल असणारे विदेशी नागरिक, बंगले, फ्लॅट, हॉटेल्स, रेस्टॉरंट यांच्या सजावटीसाठी विविध वस्तू घेणारी उच्चवर्गीय व्यापारी मंडळी, स्टुडिओत सेट लावणारे तंत्रज्ञ, कारागीर इत्यादी मंडळी पंढरीच्या यात्रेकरूंसारखे नित्यनेमाने, भक्तिभावाने तेथे येतात. बाजारातून, जुन्या काळाची वातावरण निर्मिती करण्यासाठी हंड्या, झुंबरे, दिवे, गालिचे, मोठी पेंटिंग्ज, पोर्ट्रेट, टेलिफोन, ग्रामोफोन, भिंतीवरील घड्याळे, सिनेमाची पोस्टर्स, जुन्या गाड्या आदी वस्तू सर्रास खरेदी केल्या जातात.

चोर बाजारातील व्यापाऱ्यांची दुसरी-तिसरी पिढी चालू आहे. गिऱ्हाईकांशी पहिल्यासारखा आपलेपणा दाखवला जात नाही. तेथील बुजूर्ग दुपारच्या नमाजाला गेल्यावर, तेथे बसणारी तरुण मुले मिळेल त्या किंमतीत माल विकून टाकतात. आजकाल पाश्चिमात्य गोरे लोक तेथे मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसतात. कॉलेजच्या पोरीही हौसेने जुन्या दुर्मीळ वस्तूंच्या शोधात तेथे येतात.

चोरबाजाराचाही पुनर्विकास होणार आहे. काही श्रीमंत बोहरी लोक त्यासाठी प्रयत्नशील आहेत. रस्त्यांवर, उघड्यावर बसणारे व्यापारी कदाचित टॉवरमध्ये जातील! पण तेथे गिऱ्हाईके जातील का? याची त्यांना शंका आहे.

– अरुण पुराणिक

Last Updated On – 19th May 2016

About Post Author

Previous articleदेवपूरचा राणेखान वाडा : अभिजात वास्तुकला!
Next articleपक्षीमित्र दत्ता उगावकर
अरुण पुराणिक हे 'रिलायन्‍स' कंपनीतून उपाध्‍यक्ष पदावरून निवृत्‍त झाले. ते सध्‍या 'टाटा पॉवर'मध्‍ये सल्‍लागार म्‍हणून कार्यरत आहेत. पुराणिक 1986 सालापासून वर्तमानपत्रे-साप्‍ताहिके यांमधून सातत्‍याने लेखन करतात. ते चित्रपट, संगीत, मुंबईतील जुनी स्‍थळे अशा विविध विषयांचा शोध घेऊन लेखन करतात. त्‍यांचे दीड हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध झाले असून 'सरगम', 'अनसंग हिरोज', 'हमारी याद आयेगी', 'मुंबई टॉकिज' अशी पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. त्‍यांनी 'सिनेमाची शंभर वर्षे', 'सिनेमा आणि मुंबई शहर' अशा विषयांवरील फोटो, पोस्‍टर्स, लॉबी कार्ड, पुस्‍तीका यांची प्रदर्शने भरवली आहेत. अरुण पुराणिक यांच्‍या कुटुंबाला संगीताची पार्श्‍वभूमी आहे. त्‍यांचे आजोबा पंढरपूरकर बुवा हे 'गंधर्व नाटक कंपनी'त मुख्‍य गायक म्‍हणून कामास होते. त्‍यांनी अभिनेत्री शांता आपटे यांना शास्‍त्रीय संगीताचे धडे दिले होते. लेखकाचा दूरध्वनी 9322218653

3 COMMENTS

  1. अत्यंत माहितीपूर्ण व वाचनीय
    अत्यंत माहितीपूर्ण व वाचनीय लेख. गिरगावात बालपण गेल्यामुळे १९५० ते १९७० च्या सुमारास या चोर बाजारात आम्ही अनेकवेळा जात असू. त्यामुळे लेख उत्सुकतेने वाचला. जुन्या आठवणी जाग्रुत झाल्या. इतक्या वर्षात या बाजाराबद्दल अशी सविस्तर माहिती वाचनात आली नव्हती. जुन्या मुंबईचा हा इतिहास जतन करून ठेवला पाहिजे. कालौघात तो नष्ट होऊ शकतो. या उपक्रमाबद्दल थिंक महाराष्ट्रला धन्यवाद!

  2. Chor bazara vishyai khup Chan
    Chor bazara vishyai khup Chan Mahiti milali. Wa khup mast Me kadhi tethe gelo nahi. Pan aata nakkich jaun yein. Thanks mahiti post kelyabaddal.

  3. ……..अप्रतिम सूंदर अभ्यासू
    ……..अप्रतिम सूंदर अभ्यासू माहितीपूर्ण लेख

Comments are closed.