चुकीच्या, खोट्या देवाला नमस्कार करू नका!

अनिलकुमार भाटे
अनिलकुमार भाटे

अनिलकुमार भाटे     चुकीच्या, खोट्या देवाला नमस्कार करू नका.

     असे केल्याने तुमचे भले होण्याऐवजी उलट वाईट होऊ शकते!

     ‘माघी गणेशाच्या नावाने …’ हा दिनकर गांगल यांनी लिहिलेला लेख वाचला आणि पटला, पण पूर्णपणे पटला नाही, म्हणून त्यावर हे टिपण. गांगल यांच्या लेखातील सर्व मुद्दे मला मान्य आहेत, त्यांनी केलेली सर्व टिकादेखील मला मान्य आहे, आणि त्यांनी काढलेले निष्कर्ष देखील मला मान्य आहेत.  मग पटले काय नाही? तर गांगल यांचा ‘अप्रोच’.

     गांगल सेक्युलर भूमिकेतून टीका करतात, पण मी सेक्युलर नाही. मी शंभर टक्के आणि प्रखर अध्यात्मवादी आहे. आणि गांगल जी टीका करतात, ती टीका मी माझ्या अध्यात्मवादी भूमिकेतून करतो.

     मी गेली तीन दशके अमेरिकेत राहत आहे व अमेरिकन नागरिक आहे, पण गेली चार दशके कसोशीने कडक अध्यात्मसाधना करत आलो आहे.

     आमचे भाटे कुटुंब माझ्या जन्माअगोदरपासून अव्वल सुधारकांचे होते. तरुणपणी, मी मार्क्सवादी विचारांचा कॉलेजविद्यार्थी होतो. पण अध्यात्म या विषयाबद्दल मला कुतूहल असायचे. ते गौडबंगाल काय आहे ते एकदा शोधून काढून त्याचा छडा लावला पाहिजे असे वाटायचे. पण पारंपरिक धार्मिकतेचा तिटकारा वाटायचा आणि देवपूजा वगैरे सर्व थोतांड वाटायचे. इंजिनीयर झालो आणि विज्ञान-तंत्रज्ञान हेच खरे, धार्मिक श्रध्दा खोटी आहे असे मनापासून पटायचे. पुढे, मी विद्युत अभियांत्रिकी व संगणक विज्ञान यांचा प्राध्यापक झालो तेव्हादेखील वृत्ती तीच राहिली.  ‘लॉजिकल थिंकिंग’ हे महत्त्वाचे, श्रद्धा खोटी ही भूमिका कायम राहिली.

     मी अध्यात्मात ‘रिसर्च’ करत होतो. पण रिसर्च करताना अध्यात्माला पूर्ण (शंभर टक्के) न्याय देऊन ते करायला हवे, ही माझी भूमिका होती. मी मुंबईतल्या पवई आयआयटीमध्ये १९७२ ते ८१ अशी नऊ वर्षे लेक्चरर होतो. मी त्या कालावधीत ती भूमिका कसोशीने पाळली. त्यानंतर आजपावेतो अमेरिकेतदेखील पाळत आलो.

     अध्यात्म या विषयात ‘रिसर्च’ करायचे तर अध्यात्म हा ‘रिसर्च प्रॉब्लेम’ मानायला हवा. त्यातील सर्व काही स्वतःहून प्रत्यक्ष करून बघायला हवे. त्यात सांगितल्या गेलेल्या उपासना, साधना वगैरे सर्व स्वतः व्यवस्थितपणे करून बघायला हव्या. तिथे हलगर्जीपणा नको, प्रामाणिकपणा हवा. अध्यात्मातील उपासना व साधना ‘ओपन माइंड’ ठेवून केलेली असावी, कसोशीने केलेली असावी आणि तिच्या ‘आहारी न जाता’ करावी.

     आम्ही आयआयटीच्या फॅकल्टी वर शिकवत असलेल्या अध्यापक, प्राध्यापकांनी सन १९७३ च्या जून महिन्यात उन्हाळी सुटीत विद्यार्थी घरी गेले असताना एक होस्टेल रिकामे करून तेथे दहा दिवसांचे विपश्यना शिबिर भरवले. त्यात मी विपश्यना शिकलो आणि तेव्हापासून गेली एकोणचाळीस वर्षे सातत्याने करत आलो. कदाचित विपश्यनेच्या बाबतीत गोएंका गुरुजींचा मी सर्वात सीनियर साधक-विद्यार्थी असेन!  त्यानंतर, १९७७ साली काशीचे तंत्रविद्येचे ‘ग्रँडमास्टर’ कै. पंडित गोपीनाथ कविराज यांच्या परंपरेतील (काश्मीर शैविझम) कुंडलिनी जागृतीची दीक्षा घेतली. मी ती ध्यानसाधनादेखील गेली पस्तीस वर्षे विपश्यनेबरोबर, समांतरपणे करत आलो.

     मी शास्त्रशुध्द साधना केली आणि ती करताना जे आध्यात्मिक अनुभव आले, त्यांचे शुद्ध लॉजिकल आणि कठोर वैचारिक परीक्षण करत गेलो. खरे अध्यात्म श्रद्धेवर आधारलेले नाही, तर साधना करताना आलेल्या प्रत्यक्ष अनुभवांवर, म्हणजे ‘प्रत्यक्षानुभूती’वर आधारलेले आहे. एकीकडे व्यावसायिक जीवनात इंजिनीयरिंग शिकवायचे, ‘मायक्रो-इलेक्ट्रॉनिक्स’ विषयात ‘रिसर्च’ करायचे, आणि त्याबरोबर खाजगी जीवनात अध्यात्मातले ‘रिसर्च’ करायचे. दोन्हीमधील ‘रिसर्च’ची मूलभूत भूमिका एकच. तो प्रकार अमेरिकेत आल्यावरही चालू राहिला. अमेरिकेतील विद्यापीठांमधे शिकवले आणि रोबॉटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए-आय), न्यूरल नेटवर्क आणि ह्युमन कॉन्शसनेस या विषयांकरता कॉग्निटिव्ह सायन्स या विषयांत ‘रिसर्च’ केले.

     लेखकाने स्वतःबद्दल फारसे लिहू नये असा सर्वमान्य संकेत आहे. मलाही तो मान्य आहे.  तरी वरील वैयक्तिक पार्श्वभूमीचा ‘रेफरन्स’ दिला, कारण अध्यात्म ‘सबजेक्टिव्ह’ असते. अध्यात्माचे ‘ऑबजेक्टिफिकेशन’ करणे कठीण असते.

     गांगल चेंबूरमधील त्यांच्या घरानजीकच्या अग्निशामक दल केंद्रातील आणि तेथून जवळपासच्या देवळांबद्दल लिहितात आणि ते देशाच्या सेक्युलर घटनेविरुद्ध व म्हणून गैर आहे असे म्हणतात. तसेच, तहसीलदार कचेरीतील देवाबद्दलही तेच म्हणतात. या गोष्टी गैर आहेत, हे माझ्या मतेदेखील अगदी बरोबर आहे. माझे प्रश्न असे –

     १. प्राचीन काळी जिथे देवळे बांधली गेली त्या सर्व ठिकाणांना स्थानमाहात्म्य होते. ती त्या जागी काही विशिष्ट घटना घडल्याने आली होती. तिथे देवळे बांधली गेल्यावर त्या स्थानमाहात्म्याचे रूपांतर स्थलमाहात्म्य या स्वरूपात झाले. प्रत्येक मोठ्या प्राचीन देवळाला ‘स्थलपुराण’ असते. त्या त्या देवळाच्या स्थलपुराणात त्या त्या ठिकाणचे स्थानमाहात्म्य सापडते. ते देऊळ तेथे का बांधले गेले याचे ‘जस्टिफिकेशन’देखील स्थलपुराणात सापडते. ती परंपरा महत्त्वाची मानली जाते.

     पण अग्निशामक दल ही सरकारी सार्वजनिक सेवा आहे व तहसीलदार कचेरी ही सरकारी व्यवस्थापन सेवा आहे. तिथे स्थानमाहात्म्य कोणते? अशा ठिकाणी देवळे उभारणे हे अध्यात्म दृष्टया चुकीचे तर आहेच, पण ते ‘पापकर्म’ आहे.

     2. त्या ठिकाणी गणपतीच्या मूर्तीची ‘प्राणप्रतिष्ठापना’ कुठल्या भटजीबुवाने केली? ती योग्य प्रकारे झाली का? ती करणारा भटजी योगी होता का? त्याचा मंत्रविद्येचा अभ्यास होता का? की तो फक्त तोंडाने (आणि तेही अशुद्ध उच्चार करून) मंत्रपठणाच्या नावाने निव्वळ पोपटपंची करून काहीतरी अगडम-बगडम असे मंत्रपठण करणारा होता?

     ३. त्या गणपतीच्या मूर्तींच्या मधे गणपतीचे ‘स्पिरिट’ खरोखरच अवतरले याची गॅरण्टी काय? एखाद्या मेलेल्या व्यक्तीचा मृतात्मा त्या मूर्तीमधे कशावरून आला नसेल? आपल्या सभोवताली अनेक मृतात्मे हिंडत-फिरत असतात. आपण त्यांना पाहू शकत नसलो, तरी ते आपल्याला बघू शकतात. हे वाक्य मी केवळ श्रद्धेच्या पोटी करत नसून प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारावर करत आहे.

     इतके अनेक लोक तिथल्या मूर्तीला नमस्कार करत आहेत हे पाहून असाच एखादा मृतात्मा त्या योग्य प्रकारे प्राणप्रतिष्ठापना न झालेल्या मूर्तीमधे प्रवेश करून ती मूर्ती ‘ऑक्युपाय’ करू शकतो.

     ४. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा मूर्तीला देव मानून, तिला नमस्कार करून, तिची उपासना करून आपले भले होईल याची तरी गॅरण्टी काय?

     या मुद्यावर असे म्हटले जाईल, की अशी गॅरण्टी कुणीच कुणाला देऊ शकत नाही. पण ते खरे नव्हे. गॅरण्टी देऊ शकणारी माणसे खरोखरच असतात. त्यातली काही माझ्या प्रत्यक्ष परिचयात देखील आहेत.

     मला आजमितीला या प्रश्नांचा विचार कुणीही करताना दिसत नाही. कारण बहुसंख्य लोकांना देवावर फक्त श्रध्दा ठेवून बसायचे असते; विचार करायचा नसतो, अभ्यास करायचा नसतो.

     अशा अनेक प्रश्नांची उत्तरे धर्मशास्त्रामधे दिलेली असतात. पण धर्मशास्त्र जाणून घ्यावे – त्यात अमुक असे जे म्हटले गेले, ते का म्ह्टले?  त्याचा अभ्यास करावा असे कुणाला वाटत नसते. हीच खरी हिंदू धर्माची शोकांतिका आहे!

     पण याचा अर्थ मी हिंदुत्ववादी आहे असा नव्हे. मला भारतातील हिंदुत्व नको. मला ‘वैदिकत्व’ हवे आहे. पण भारताची प्रचलित भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान यांचा वेदांमधील संस्कृती व तत्त्वज्ञान यांच्याशी काहीही संबंध राहिलेला नाही. एकूणच, भारतीय समाज वेदांपासून शेकडो मैल दूर गेला आहे. पण विश्व हिंदू परिषदवाल्यांनी वैश्विकतेचा कितीही घोष केला तरी भारतीय हिंदुत्व भारताच्या सीमारेषा ओलांडून पलीकडे गेलेले नाही. वैश्विकतेचा घोष करायचा आणि अमेरिकन संस्कृतीला शिव्या द्यायच्या, ही खरी वैश्विकता नव्हे.

     उदाहरण म्हणून सांगतो, की अलिकडेच दिल्लीमधे घडलेल्या पाशवी बलात्काराच्या संदर्भात झालेले सरसंघचालक भागवत यांचे वक्तव्य मी अमेरिकेत यू-ट्यूबवर पाहिले व ऐकले. त्यात त्यांनी इण्डिया विरुध्द भारत असा भेद केला. त्या भाषणातला एक शब्दही मला पटला नाही. एकीकडे वैश्विकतेच्या तत्त्वज्ञानाच्या गप्पा करायच्या आणि दुसरीकडे भारतातल्या भारतातच इण्डिया विरुध्द भारत असा भेदभाव दाखवायचा हा, माझ्या मते, चक्क दुटप्पीपणा आहे. वेदांमधील तत्त्वज्ञान आणि संस्कृती वैश्विक स्वरूपाची आहे आणि एक अमेरिकन नागरिक या नात्याने सुध्दा मी वैदिक संस्कृती व तत्त्वज्ञान यांचा पुरेपूर अंगिकार करू शकतो आणि केला आहे.

     ५. वेदांमधे मूर्तिपूजा अजिबात नाही. मूर्तिपूजेचा साधा उल्लेखसुद्धा वेदांत कुठेही नाही. वैदिक उपासना फक्त यज्ञ व त्याकरता केलेले होमहवन यावर आधारलेली आहे.

     ६. मूर्तिपूजा आगमशास्त्रामधे सांगितलेली आहे. प्राचीन काळी शेकडो आगमे होती. ती काळाच्या ओघात नष्ट झाली. आता फक्त पांचरात्र आगम, वैखानस आगम, शैवागम ही पुरुष देवतांच्या उपासनेची आगमे आणि काही देवी (स्त्री देवता) उपासनेची आगमे एवढी अक्षरशः मुठभर आगमे उपलब्ध आहेत. मृतात्मा मूर्ती ‘ऑक्युपाय’ करू शकतो वगैरे सर्व गोष्टी आगमशास्त्रामधील आहेत. त्यांचा वेदांशीही संबंध नाही.

     ७. आर्य लोक भारताबाहेरून भारतात प्राचीन काळी आले व त्यांनी भारतात येताना आपल्याबरोबर वेद भारतात आणले. वेद मूळचे भारतातील नाहीत. त्याप्रमाणेच मूर्तिपूजादेखील मूळची भारतातील नाही. ती प्राचीन काळी मेसोपोटेमियामधून भारतात आली असे मजपेक्षा दोन पिढ्यांपूर्वीचे विद्वान अहिताग्नी राजवाडे यांचे मत होते व ते बरोबर आहे.

     १ ते ४ असे चार प्रश्न समोर उभे केले. त्यात भर म्हणून आणखी तीन प्रश्न लिहितो.

     ८. देवपूजा सोवळ्यात करायची असते. पण सोवळ्याओवळ्याचा नेमका अर्थ काय? त्यातील ‘जस्टिफिकेशन’ कोणते?

     ९. देवपूजा करण्यापूर्वी दिशा बांधून घ्यायच्या असतात. त्या कशासाठी?

     १०.  देवाला नैवेद्य दाखवताना जमिनीवर पाणी शिंपडून त्यावर नैवेद्याचे तबक ठेवायचे असते व ते तसे ठेवल्यावर हातात पाणी घेऊन नैवेद्याच्या तबकाभोवती फिरवायचे असते. ते का? त्या पाठीमागची कारणमीमांसा कोणती?

     गांगल जी टीका करत आहेत ती योग्य व शंभर नव्हे एकशे एक टक्के बरोबर आहे. फक्त त्यांनी दाखवलेली कारणमीमांसा वेगळी आहे. ती देखील मला पटत आहेच, पण तिच्या जोडीला मी माझी स्वतःची वेगळी कारणमीमांसा मांडत आहे.

     माझा विरोध देऊळ उभारणे या कार्याला नाही. पण ‘नको त्या जागी’ आणि जिथे काहीही ‘पावित्र्य’ किंवा स्थानमाहात्म्य नाही अशा ‘भलत्यासलत्या’ ठिकाणी देऊळ उभारणे याला माझा विरोध आहे. जर देऊळ आश्रमाच्या आवारात उभारले जात असेल, तर मी त्याचे स्वागत करीन. कारण देऊळ आश्रमाच्या आवारात आहे हेच त्या जागेचे स्थानमाहात्म्य.

     पुन्हा एकदा वैयक्‍त‍िक पार्श्वभूमी म्हणून एक अनुभव सांगतो –

     मी अमेरिकेत न्यू जर्सी राज्यात राहतो. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी न्यू जर्सीमधील मजसारख्या अनेक भारतीय-अमेरिकन लोकांनी पैसे जमवून ब्रिजवॉटर नावाच्या गावातल्या एका जुन्या चर्चची इमारत व आजुबाजूची पस्तीस एकर जमीन विकत घेतली. चर्चमधील ‘कॉंग्रिगेशन’मधील सभासदांची संख्या इतकी रोडावली होती, की तेथील ख्रिस्ती धर्मोपदेशक मंडळी चर्च विकायला निघाली होती. सुरुवातीला, चर्चच्या इमारतीचे रूपांतर देवळामधे केले गेले. नंतर आठ-दहा वर्षांनी आणखी पैसे जमवून बाजूच्या जमिनीवर भारतीय पद्धतीचे सुरेख व प्रशस्त देऊळ बांधले गेले. त्यापूर्वी चर्चच्या इमारतीमध्ये देऊळ असतानाच मी तेथे काही वर्षे ‘हिंदुइझम स्टडी ग्रूप’ चालवला. त्यात वैदिक तत्त्वज्ञान आणि वैदिक संस्कृती यांवर अनेक चर्चासत्रे भरवली.

     नवे ‘रेग्युलर’ देऊळ निर्माण केले जात असताना, त्यात भलामोठा ‘हॉल’, त्यात मध्यभागी प्रमुख गाभारा व त्यात मोठी प्रमुख देवाची व्यंकटेश मूर्ती व ‘हॉल’मध्ये सर्व बाजूंना इतर देवदेवतांची चिमुकली देवळे असे प्रारूप बांधले गेले. त्यातील गणपतीच्या चौथ-याखालची पायाभरणी करायचा मान मला दिला गेला. पण मी म्हटले, ‘मी केले ते ईश्वरसेवा म्हणून केले. त्याकरता मान मला नको.’ तेव्हा देऊळ कमिटीच्या प्रमुखाने बजावले, की तुम्ही केलेल्या सेवेबद्दल देवातर्फे मान दिला जात आहे. तो नाकारून देवाचा अपमान करू नका. शेवटी तडजोड म्हणून माझ्या मुलाच्या हस्ते पायाभरणी झाली. नंतर अनेकदा, मी व माझ्या बरोबरचे इतर डॉ. प्रसाद, डॉ. सुब्रह्मण्यम, डॉ. अय्यर अशा अनेकजणांनी आपापल्या पीएच.डी.च्या पदव्या अक्षरशः खुंटीला टांगून ठेवून आमच्या देवळामधे स्वयंसेवक म्हणून काम केले. आम्ही देवळामधे स्वच्छता राखण्याकरता वेळप्रसंगी झाडू मारायची लाजदेखील कधी बाळगली नाही.

     पण जिथे आमचे देऊळ उभारले गेले, तिथे स्थानमाहात्म्य कुठले होते? ते असे, की त्या अगोदर तिथे चर्च होते. ख्रिस्ती असेना का, तरीदेखील काहीतरी पावित्र्य त्या जागेला नक्की होते.

     विशेष म्हणजे आम्ही एका चर्चचे रूपांतर हिंदू देवळामधे केले याबद्दल स्थानिक त्या धर्मातील कुणीही, कधीही, काहीही आक्षेप घेतलेला नाही.

     प्रिय वाचक हो, तुम्ही मला सांगा, की अमेरिकेत आम्ही जे घडवले, ते तसे भारतात कधी घडू शकेल का?

     तेव्हा सरतेशेवटी माझा आग्रह असा, की गांगल यांनी केलेली टीका योग्य व बरोबर मानून त्यांनी त्यांच्या लेखात म्हटलेली सर्व ‘उपटसुंभ’ देवळे आणि त्या प्रकारे बांधली गेलेली इतरही सर्व देवळे काढून टाकली जावीत.  नको त्या भलभलत्या ठिकाणी देवळे उभारून त्यांचा उदोउदो करून स्वतःच्या श्रद्धेचा ‘शो’ करणे हा निव्वळ आचरटपणा आहे. ते अध्यात्म नव्हे.

     अशी देवळे काढून टाकायला ज्यांचा विरोध असेल त्या सर्व लोकांना मी माझ्याशी प्रत्यक्ष “वादविवाद व शास्त्रार्थ” करण्याचे जाहीर आव्हान देतो. जर कुणी माझे हे जाहीर आव्हान स्वीकारायला तयार असतील, तर  त्यांच्याशी शास्त्रार्थ करायला मी अमेरिकेतून भारतात येईन. पण त्याच बरोबर असे देखील बजावून सांगतो, की जे माझे वादविवादाचे आव्हान स्वीकारू इच्छितात, त्यांनी प्रथम वरच्या १ ते ४ व ८ ते १० या सात प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकतो का? याची खात्री निदान स्वतःपुरती करून घ्यावी.

     जे लोक वरील सात प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देऊ शकत असतील, त्यांनीच माझे वादविवादाचे आव्हान स्वीकारावे, अन्यथा चूप बसावे, हे बजावून सांगतो.

     आजमितीला भारतात अध्यात्माच्या नावाखाली चाललेल्या अनेक गोष्टी चुकीच्या आहेत, वाईट आहेत, घातक आहेत. म्हणून खरे अध्यात्म काय आहे ते सर्वांना नीट शिकवायला हवे आणि त्या करता ही वेबसाईट वापरली जावी असे मला फार वाटते.

     वाचकांना जर खरोखरच मनापासून गणपतीची उपासना करायची असेल, तर ती शास्त्रशुध्द पद्धतीने कशी करावी हे मी सांगू शकतो, शिकवू शकतो.

     गांगल यांचा ‘सेक्युलर अप्रोच’ आणि माझा अध्यात्मवादी ‘अप्रोच’ या दोहोंमधला हा मूलभूत फरक.

डॉ. अनिलकुमार भाटे
निवृत्त प्राध्यापक
द्युत अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, माहिती तंत्रविज्ञान आणि मॅनेजमेन्ट
एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका
इमेल anilbhate1@hotmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. FALTU LEKH. DEO DETATA SARE
    FALTU LEKH. DEO DETATA SARE KHOTE ASTE. SHIKALELYA LOKANITARI ASALE DHANDE VADHAVU NAYE

Comments are closed.