चित्रकलेचे बाजारीकरण

0
50
डावीकडून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे संपादक दिनकर गांगल, 'साने केअर ट्रस्ट'चे यश वेलणकर, 'चिन्ह'चे संपादक सतीश नाईक, डॉ. माधवी मेहेंदळे, सुहास बहुळकर, ज्योत्‍स्‍ना कदम आणि प्रभाकर कोलते.
डावीकडून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे संपादक दिनकर गांगल, 'साने केअर ट्रस्ट'चे यश वेलणकर, 'चिन्ह'चे संपादक सतीश नाईक, डॉ. माधवी मेहेंदळे, सुहास बहुळकर, ज्योत्‍स्‍ना कदम आणि प्रभाकर कोलते.

चित्रकलेबद्दलची रसिकता संग्राहक ते खरेदीदार ते गुंतवणूकदार अशी बदलत गेली आहे. चित्रकलेचे त्यामधून घडून आलेले बाजारीकरण कोणी रोखू शकणार नाही. खरे तर, ते नैतिकतेचे बाजारीकरण आहे, अशा आशयाचे उद्गार प्रसिध्द चित्रकार प्रभाकर कोलते यांनी रविवारी झालेल्या दिवसभराच्या ‘विचारमंथना’त काढले. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल आणि ‘साने केअर ट्रस्ट’ या संस्थांच्या वतीने खोपोलीजवळच्या ‘माधवबागे’त दर महिन्याच्या चौथ्या रविवारी एकेका क्षेत्रातील मान्यवर जमतात आणि त्या त्या विषयातील विविध मुद्यांची सखोल चर्चा करतात.
डावीकडून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे संपादक दिनकर गांगल, 'साने केअर ट्रस्ट'चे यश वेलणकर, 'चिन्ह'चे संपादक सतीश नाईक, डॉ. माधवी मेहेंदळे, सुहास बहुळकर, ज्योत्‍स्‍ना कदम आणि प्रभाकर कोलते.कोलते यांच्या समवेत सुहास बहुळकर , ज्योत्स्ना कदम, डॉ. माधवी मेहेंदळे , वसंत सरवटे , रंजन जोशी, नीलिमा कढे, जयंत जोशी, मुकुंद कुळे, उमा कुलकर्णी असे मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झाले. ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी चर्चासंचालन केले. सकाळीच, वास्तुशिल्पी फिरोझ रानडे यांच्या मृत्यूची बातमी आल्याने हे दिवसभराचे विचारमंथन रानडे यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले. तशी घोषणा दिनकर गांगल यांनी आरंभी केली. बहुळकर म्हणाले, की जीवनामध्ये आर्थिक गोष्टींपलीकडे काही बाबी असतात ही जाणीव शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे शेअर बाजाराप्रमाणे चित्रकृतींची खरेदी-विक्री होते. बहुळकर यांनी कलावंतांची भ्रष्टता हा मुद्दाही ठासून मांडला.
नीलिमा कढे म्हणाल्या, की एजंट हा वेगळाच घटक चित्रव्यवहारात अवतरला आणि तो चित्रकृतीची भ्रामक प्रतिमा निर्माण करू लागला. त्यांनी चित्रकृतीचे कलामूल्य व बाजारमूल्य यांमधील विसंगती श्रोत्यांच्या लक्षात आणून दिली.
डॉ. माधवी मेहेंदळेपुण्याच्या डॉ. माधवी मेहेंदळे यांनी चित्रकला सर्वसामान्यांपासून दूर कशी जात आहे याची उदाहरणे सांगितली आणि त्या म्हणाल्या, की बाजारीकरणाचा म्हणण्यापेक्षा कलेतील अर्थकारणाचा आरंभ इटालीच्या फ्लॉरेन्स शहरात सतराव्या शतकात पापकल्पनेमधून झाला. त्यावेळी कर्जाऊ दिलेल्या पैशांवर व्याज घेणे हेदेखील पाप मानले जाई. मेहेंदळे यांनी चर्चेसाठी बरीच तयारी केली होती आणि त्यामुळे त्यांच्या भाषणामधून नवनवीन माहिती व मुद्दे मिळत गेले. त्यांनी पुण्याचे चित्रकार मिलिंद मुळीक यांची काही मते श्रोत्यांसमोर चर्चेकरता मांडली. मुळीक यांच्या मते, बाजारीकरण सोशॅलिस्टिक अंगाने आले तर ते समाजाच्या फायद्याचेच ठरेल. त्यांनी ‘मोनालिसा’ सारख्या गाजलेल्या ऐतिहासिक महत्त्वाच्या चित्रकृतींच्या किंमती शून्य कराव्यात अशी अभिनव कल्पना सुचवली. त्यावर अर्थातच लगेच छोटा वादही घडून आला.
बहुलकर यांनी गुजरातमध्ये चित्रकारांना किती सवलती आहेत याची यादीच सादर केली, तेव्हा त्यास पुष्टी जोडताना कोलते म्हणाले, की त्यामुळेच महाराष्ट्रातील चित्रकार गुजरातेत प्रदर्शने भरवणे पसंत करतात.
खरे बाजारीकरण नैतिकतेचे! - प्रभाकर कोलतेराजेंद्र मंत्री यांनी कलावंताच्या सत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, की कलावंत विक्री व्यवहाराला शरण जातो तेव्हा तो स्वत:चे सत्त्वच गमावत असतो.
रंजन जोशी यांनी फाइन आर्ट ही ब्रॅण्ड इक्विटी होत आहे हे निदर्शनास आणले. ते म्हणाले, की मागणी व पुरवठा यामध्ये अडकायचे की नाही हे कलावंतानेच ठरवायचे असते. त्यांनी उपयोजित चित्रकाराने प्रथम विशुध्द चित्रकलेची कास धरणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. असे ‘ब्लेंडिंग’ हे बाजारीकरणाला उत्तर ठरू शकेल. ते म्हणाले, की कोलते, बहुळकर यांनी स्वत:ची नावे सिध्द केली आहेत. ही गोष्ट कलावंत म्हणून त्यांच्या मान्यतेसाठी महत्त्वाची ठरली.
चित्रकलेच्या आस्वादावर व त्या संबंधातील मराठी माणसांच्या दुर्लक्षाबद्दल बरीच चर्चा घडून आली. त्यामध्ये शालेय शिक्षणातील चित्रकलेचे स्थान हा साधना बहुळकर यांचा मुद्दा सर्वांनीच अधोरेखित केला.
वसंत सरवटे यांनी चित्रकला वा कोणतीही कला समजावून सांगणे या विधानाला आक्षेप घेतला. ते म्हणाले, की कलेचा आस्वाद शब्दांमध्ये मांडताच येणार नाही. कलेचा गाभा सूचकता हा असतो. सूचकता पकडण्यासाठी शब्द अपुरेच ठरतील असे त्यांचे म्हणणे. त्या ओघात पत्रकार मुकुंद कुळे यांनी भाषेमध्ये जसे शब्दाचे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व लक्षणार्थ असतात तसे चित्रभाषेत असते का असा प्रश्न उपस्थित केला. तो मात्र शेवटपर्यंत अनुत्तरित राहिला. त्या संबंधात गांगल यांनी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर अनंत कुलकर्णी हे कलाशिक्षक ‘व्हिज्युअल लॅंग्वेजच्या शोधात’ हे नवे सदर सुरू करत आहेत अशी माहिती दिली.
मंत्री यांनी ‘विकी पेंटिंग्ज’ नावाच्या वेबपोर्टलवर हजारो चित्रे पाहाण्यास उपलब्ध आहेत ही महत्त्वाची माहिती सांगितली. त्यामुळे चित्रकला रसिकता प्राप्त होण्यासाठी अनेकानेक व वारंवार चित्रकृती पाहायला हव्यात ह्या सर्वांनी सतत सांगितलेल्या मुद्याला उत्तर अशी नवी जागा उपलब्ध झाली.
कार्यक्रमाचा समारोप करताना दिनकर गांगल यांनी ‘झिंग’ सायबर क्लब ही नवी नेटवर्कींगची योजना मांडली.चर्चेचे प्रास्ताविक डॉ. यश वेलणकर यांनी केले आणि समारोप दिनकर गांगल यांनी केला. त्यांनी ‘झिंग’ सायबर क्लब ही नवी नेटवर्किंगची योजना मांडली. तिला सातजणांनी सभासद होऊन प्रतिसाद दिला. डिसेंबरमधील विचारमंथन रविवारी २३ तारखेला ‘मिडिया मेसेज: वर्तमान व भविष्य’या विषयावर असून त्यामध्ये जयराज साळगावकर, अतुल फडणीस, अमला नेवाळकर, भारतकुमार राऊत, नितिन वैद्य, उदय निरगुडकर वगैरे मंडळी सहभागी होणार आहेत. ज्यांची त्यावेळी येण्याची इच्छा असेल त्यांनी महेश खरे यांच्याशी ९३२०३०४०५९ या मोबाइल नंबरवर संपर्क साधावा.

– प्रतिनिधी,
संपर्क – ९०२९५५७७६७/ ०२२-२४१८३७१०
इमेल – thinkm2010@gmail.com

About Post Author