चित्रकला आणि माझं जगणं

0
27
_Chitrakala_Aani_MazaJagna_1_0.jpg

मी मुंबईला सत्तरच्या दशकात आलो आणि येथील जीवन अनुभवू लागलो. त्यावेळी शोषित दलित यांच्या अनुभवाला आणि संवेदनांना ज्या कवींनी आणि लेखकांनी आवाज मिळवून दिला होता, त्यामध्ये नारायण सुर्वे व दया पवार हे महत्त्वाचे. येथील जीवन समजून घेण्यासाठी नारायण सुर्वे आणि दया पवार यांच्यासारख्यांचे शब्द, त्यांनी कधी जोशपूर्ण आवेगात म्हटलेल्या तर कधी मधुर लयीत गायलेल्या कविता माझ्यासाठी मोलाच्या होत्या आणि आजही आहेत. दया माझ्या 1979 साली झालेल्या पहिल्या प्रदर्शनाला आले होते. त्यांना चित्रे आवडली की नाही ते मी सांगू शकत नाही, कारण त्याबद्दल ते काही बोलले नव्हते. पण नंतरही ते एका प्रदर्शनाला आले, त्यामुळे मला वाटते, की त्यांना माझ्या चित्रांत काही तरी भावले असावे.

माझ्या चित्रांचे विषय, विशेषतः सत्तर, ऐंशी आणि नव्वद या तीन दशकांत कामगार, रस्त्यावर दिसणारी सर्वसामान्य माणसे, शहरातील गर्दी वगैरे असे असायचे. मी त्या लोकांना पाहण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मी स्वतः कामगारांचे आणि शोषितांचे जीवन जगलो नव्हतो. मी मध्यमवर्गीय. मी मध्यमवर्गाच्या सवलती उपभोगल्या होत्या. शोषितांचे अनुभव आणि माझे अनुभव जरी वेगवेगळे असले तरी त्यांच्याशी मी ह्या शहराचा एक रहिवासी म्हणून जोडला गेलो होतो आणि मी चित्रे त्या वर्गाला, त्या लोकांना चित्रांमध्ये स्थान मिळावे, त्यांचे जगणे कथित करावे ह्या इच्छेने काढत होतो.

चित्रे लोकांबद्दल होती, पण त्या चित्रांमध्ये माझाही आवाज स्पष्ट होता. कारण शेवटी तो माझा, चित्रकार म्हणून घेतलेला अनुभव होता. सुधाकर यादव जसे म्हणतात, की चित्र विषयापासून सुरू होत नाही आणि विषयापाशी थांबतही नाही. चित्र सुरू होते ते एका आंतरिक गरजेतून; कलाकाराच्या आतील संवेदनांच्या पुनर्रचनेच्या गरजेतून व ती आंतरिक गरज जाऊन भिडते बाहेरच्या जगाशी. मग ते जग निव्वळ रंग-रेषांचे असेल, निसर्गाचे असेल, माणसांचे आणि शहरांचे असेल किंवा समग्र समाजाचे आणि इतिहासाचे असेल. ते प्रत्येक चित्रकाराच्या इच्छेवर व जाणिवेवर अवलंबून आहे. चित्राचा परीघ कितीही छोटा किंवा मोठा असला तरी सगळीच चित्रे आतील-बाहेरील त्या संवादातून घडत जातात. प्रेक्षकास कलेचा अनुभव घ्यायचा असेल, चित्रे समजून घ्यायची असतील तर त्याने चित्रभाषेत आणि जगामध्ये घडणारा संवाद ऐकला-पाहिला पाहिजे. तेव्हा त्याला कलेच्या अनुभवाचे वेगळेपण जाणवते.

_Chitrakala_Aani_MazaJagna_2_0.jpgकलाकृतींमध्ये जीवनाचे प्रतिबिंब दिसते. त्यात जीवनावर भाष्य असते, अन्यायाविरुद्ध आवाजही उठतो. पण जीवनावर भाष्य होणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठणे या गोष्टी इतरही ठिकाणी, इतर माध्यमांतूनही होत असतात. नियतकालिकांतून, विविध वर्तमानपत्रांतून, टीव्हीवरील चर्चांतून, डॉक्युमेंटरीजमधून आणि थेट सामाजिक चळवळींतून. काही वेळा सामाजिक कृतीच्या आणि अभिव्यक्तीच्या त्या इतर माध्यमातील आणि कलेतील फरकही अस्पष्ट, पुसट होताना दिसतो. तरी कलेच्या क्षेत्रात आणि त्या इतर क्षेत्रांत जे अंतर आहे ते जपण्याची गरज असते. कारण कलेचा अनुभव रसिकाला काही अशा गोष्टी देऊ शकतो जे दुसरे कोठले माध्यम त्याला देऊ शकत नाही.

कलेतून मिळणारा आनंद, मनोरंजन, आत्मरंजन, सौंदर्याचा अनुभव ह्या गोष्टी तर कलेची वैशिष्ट्ये मानली जातातच, पण मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. मी त्यांना जरा बाजूला ठेवतो आणि कलेच्या वेगळेपणाचे उदाहरण म्हणून सहज लक्षात न येणाऱ्या तिच्या दुसऱ्या एका बाजूकडे वळतो. बऱ्याच वेळा, रसिकाच्या मनात त्याच्या भावनांबद्दल, अनुभवांबद्दल दुविधा असते. त्याचे मन एखाद्या गोष्टीबद्दल ‘मला काय वाटते’ ह्याबद्दल साशंक असते. ही गोष्ट नेहमीच्या जीवनात अडचणीची असते. त्याला काही तरी निर्णय घेऊन कृती करायची असते. ही किंवा ती बाजू घ्यायची असते आणि ते कृतिशील राहण्यासाठी आवश्यक असते.

पण मनाची ती स्थिती – नक्की माहीत नसण्याची स्थिती, रसिक त्याच्या मतांबद्दल जरा साशंक असण्याची स्थिती (मनातील grey areas म्हणू) – त्याच्या खाजगी जीवनात आणि समाजजीवनात फार मोलाची असते. तिला नाकारून त्याचे आणि समाजाचे नुकसानच होते.

ह्या मानसिक स्थितीमधूनच जगाशी असलेले त्याचे नाते बदलते आणि त्याला अस्थिर असण्याची जाणीव होत असते. तो ते नाते त्या जाणिवेतून प्रवाही राहील आणि उत्क्रांत होत जाईल असे ठेवू शकतो. मानवी जीवनाला अर्थ एकच नसून त्याला अर्थ अनेक असू शकतात. सर्व शक्यतांना, त्यांच्या अंतर्गत विसंवादासह, अंतर्विरोधांसह जिवंत ठेवणे हे कलेमध्ये साध्य होऊ शकते. कला अगदी विरोधी भावनांना एका रचनेत क्षणभर स्थिरावण्याचे अवघड काम करते. कला एकाच वेळी उजेडाची आणि अंधाराची आस, निर्मळ-नितळ आणि बकाल-गलिच्छ गोष्टींचे आकर्षण, भीती आणि शौर्य, क्रूरता आणि करुणा अशा टोकाच्या भावनांना एका पाटावर मांडते. कला मनातील ह्या द्वंद्वाला, ह्या संदिग्धतेला मूर्तरूप देते आणि त्या रूपात त्याला व रसिकाला, त्यांच्या कायम अपुऱ्या माणुसपणाची जाणीव होते.
कलेचा तो एक महत्वाचा गुण आहे. तो इतर माध्यमांत क्वचित आढळतो. म्हणून कलेचे वेगळेपण, कलाकारांनी आणि रसिक प्रेक्षक-वाचकांनीदेखील जपण्याची, त्यांनी कलेकडून ह्या वेगळेपणाची अपेक्षा कायम ठेवण्याची गरज आहे.

कलेचे हे वेगळेपण जपणे म्हणजे कलेला जीवनापासून वेगळे ठेवणे किंवा तोडणे नव्हे. उलट, कला तिचा एक वेगळा आणि विशेष मार्ग गुंतागुंतीच्या ह्या जीवनाचे खोल आकलन करण्यासाठी खुला करून देते. इतर मार्गांपेक्षा तो मार्ग काही वेगळे ज्ञान देतो, म्हणून त्याचे महत्त्व.

– सुधीर पटवर्धन

(प्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन यांना 2017  चा दया पवार स्मृती पुरस्कार मिळाला. त्यासाठी योजल्या गेलेल्या समारंभात त्यांनी केलेले भाषण)

About Post Author

Previous articleविश्वनाथ खैरे – संस्कृती संशोधक
Next articleअसाध्य आजारावर जयंत खेर यांनी केली मात
सुधीर पटवर्धन हे प्रख्यात चित्रकार आहेत. त्यांना लोकचित्रकार व मुंबई शहराचे चित्रकार म्हणून ओळखले जाते. त्यांची कलाप्रदर्शने देशीविदेशी मोठमोठ्या गॅलरींमध्ये झाली तशीच ती लहानगावी व दूरदूरच्या जागी झाली. सर्वसामान्य माणसापर्यंत कला पोचावी असा त्यांचा संग्रह असतो. त्यांचा चित्रकलेवर रणजित होस्कोटे यांची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ती अशी 'The Complicit Observer' आणि 'The Crafting of Reality'. पद्माकर कुलकर्णी यांचे 'चित्रकार सुधीर पटवर्धन' नावाचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. सुधीर पटवर्धन यांची चित्रे जगभरच्या नामवंत खाजगी व सार्वजनिक संग्रहालयांमध्ये आहेत. पटवर्धन ठाणे येथे राहतात. लेखकाचा दूरध्वनी 9821826261