चिंचवडचा श्री मोरया गोसावी

carasole

मोरया गोसावी हे सतराव्या शतकातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. मोरया गोसावी हे शाहू महाराज व पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समकालीन.

कर्नाटक राज्याच्या बिदर जिल्ह्यातील बसव तालुक्यातले शाली हे मोरसा गोसावी यांच्‍या आईवडीलांचे मूळ गाव. मोरया यांचे आईवडिल, वामनभट शाळिग्राम आणि त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांचे वैदिक कुटुंब होते. वामनभट त्यांना मूलबाळ न झाल्याने गाव सोडून निघाले. सोबत पार्वतीबाई होत्या. ते दोघे पुण्यातील मोरगावला येऊन स्थिरावले. त्यांना कऱ्हा नदीचे खळाळणारे पाणी, मोरयाची भव्य मूर्ती यांनी भुरळ घातली. त्या परिसराबद्दल काही अद्भुत दंतकथा वामनभटांच्या कानी आल्या. ब्रम्हदेवाने तेथे तपश्चर्या केली! त्याच्या कललेल्या कमंडलूतून कऱ्हा नदी उगम पावली! जगताच्या उत्पत्तीचा ब्रम्हदेवाचा मनोरथ तेथे पुरा झाला! मोरयाच्या कृपेने ब्रम्हदेवाला जगताची सृष्टी करता आली! वगैरे वगैरे. त्या कहाण्या ऐकून वामनभटांना वाटले, की मोरया त्यांचेही मनोरथ पूर्ण करेल! त्यांनी अनुष्ठान मांडले. मोरयाने स्वप्नात येऊन सांगितले, की ‘तुझ्या नशिबात पुत्र नाही.’ त्यामुळे वामनभट खट्टू झाले. पण त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली. शेवटी, पार्वतीबाईंचा पाळणा हलला. त्यांनी बाळाचे नाव मोरया हेच ठेवले.

मोरया वाढू लागला. त्याची मुंज झाली. त्याचे वेदाध्ययन झाले. त्याच्यात तपश्चर्येची ऊर्मी जागी झाली. त्याला नयन भारती गोसावी गुरू भेटले. मोरया त्यांच्या प्रेरणेने थेऊरला आला. त्याची तपश्चर्या मुळा-मुठेच्या काठी चिंतामणीजवळ सुरू झाली. मोरयाच्या बेचाळीस दिवसांच्या तपश्चर्येनंतर चिंतामणीने मोरयाला दर्शन दिले.

मोरया गोसावी महाराज सिद्धी प्राप्त झाल्यावर मोरगावला परतले. आईवडिलांचा आनंद गगनात मावेना. गावकऱ्यांना मोरया गोसावींचा आधार वाटू लागला. मोरया गोसावी सगळ्यांच्या अडचणी दूर करत. रंजले-गांजले अष्टौप्रहर त्यांच्याकडे येऊ लागले. त्यामुळे मोरया गोसावींना पूजेअर्चेला वेळ मिळेना. शेवटी, ते कंटाळून गेले. त्यातच त्यांच्या आईवडिलांचाही अंत झाला. मोरया गोसावींनी मोरगावचा निरोप कोणालाही न कळवता घेतला.

मोरया गोसावींनी पवनेच्या काठी किवजाईच्या देवळात मुक्काम केला. त्यांची साधना थेरगावच्या घनदाट जंगलात सुरू झाली. परंतु तेथेही मोरया गोसावींच्या एकांतात व्यत्यय येत असे. चिंचवडच्या गावकऱ्यांना मोरया गोसावींनी त्यांच्या गावी यावे असे वाटत होते. त्यामुळे गावडे-चिंचवडे, भोईर, वाल्हेकर, रबडे, गपचूप असे सगळेजण मोरया गोसावींकडे गेले आणि त्यांनी मोरया गोसावींना चिंचवडला आणले. मोरया गोसावी रबड्यांनी बांधलेल्या झोपडीत राहू लागले.

मोरया गोसावींचा प्रघात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी चिंचवड सोडावे, चतुर्थीपर्यंत मोरगावला जावे, मोरयाची पूजाअर्चा करावी, पंचमीचे पारणे करून परतावे असा होता. मोरया गोसावींच्या मोरगाव वारीत कधी खंड पडला नाही. त्‍यासंदर्भातील एक दंतकथा सांगितली जाते. एकदा कऱ्हेला पूर आला, नदी ओलांडणे मुष्किल झाले, तर मोरया कोळ्याचे रूप घेऊन आला. त्याने मोरया गोसावींना नदीपार नेले. दुसरी दंतकथा अशी – एकदा, मोरया गोसावींना पोचायला उशीर झाला. गुरवांनी देऊळ बंद केले. मोरया गोसावी बाहेर तरटीच्या झाडापाशी बसले, तर मोरया स्वत: बाहेर आला आणि महाराजांना चिंतामणीचे दर्शन झाले! कऱ्हा नदीत स्नानाच्या वेळी भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या मंगलमूर्तीची स्वयंभू मूर्ती आली. मग मासिक वारीऐवजी भाद्रपद, माघ, ज्येष्ठ अशा वाऱ्या चालू झाल्या.

पुढे, चिंचवडजवळच्या ताथवडे गावच्या गोविंदराव कुलकर्ण्यांना दृष्टांत झाला. त्यानुसार त्यांची मुलगी उमा हिच्याबरोबर मोरया गोसावींचे लग्न झाले. थेऊरचा चिंतामणी त्या उभयतांच्या पोटी जन्माला आला. जन्मल्यावर तो रडला नाही. त्याच्या छातीवर शेंदराचा पंजा होता आणि त्याने खेचरी मुद्रा (अष्टांगयोगातील एक मुद्रा) केली होती. मोरया गोसावींना त्या सगळ्या गोष्टींचा अचंबा वाटला नाही. कारण त्या खुणा चिंतामणीने अगोदरच मोरया गोसावींना सांगून ठेवल्या होत्या!

‘न मागे तयाची रमा होय दासी’ असे म्हणतात. मोरया गोसावींना 1616 पासूनच जमिनी इनाम म्हणून मिळू लागल्या होत्या. त्यांना आदिलशहा, निजामशहा, शहाजीराजे, शिवाजीराजे यांच्याकडून मोरगाव, कुंभार वळण, चिंचवड, चिंचोली या आणि इतर अनेक ठिकाणच्या जमिनी मिळाल्या. संप्रदाय वाढला, अन्नछत्र-सदावर्त, उत्सव-यात्रा, पूजाअर्चा यांचा पसारा वाढला. मोरया गोसावी वयोमानाप्रमाणे थकले. ते मार्गशीर्ष वद्य षष्ठी(25-01-1657) या दिवशी सकाळीच घाटावरील तयार केलेल्या गुंफेत जाऊन बसले. मोरया गोसावींनी संजीवन समाधी घेतली. त्यावर त्यांचे पुत्र थोरल्या चिंतामणी महाराजांनी मोठी शिळा ठेवली आणि त्यावर सिद्धी-ऋद्धीसहित मोरयाची मूर्ती बसवली. चिंतामणी महाराजांनी 1658-59 मध्ये त्यावर देऊळ बांधले. समाधीच्या प्रवेशद्वारावर कोथळ्याहून (जेजूरीच्या खंडोबाची मूर्ती सोमवती अमावस्येला स्नानासाठी कोथळे गावी नेली जाते.) आणलेली अर्जुनेश्वर शंकराची मोठी पिंड बसवली.

चिंतामणी महाराज संस्थानचा कारभार पाहू लागले. तेही वडिलांइतकेच साक्षात्कारी संत होते. त्यांच्या कारकिर्दीत समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरू तुकाराम महाराज चिंचवडला आले. चिंतामणी महाराजांनी त्या प्रसंगी मोरयाला बोलावले तर ते स्वत:च मोरया झाले असे म्हणतात. खुंडादंडविराजित, चतुर्भुजमंडित असे त्यांचे गणेशरूप पाहून तुकाराम महाराजांनी त्यांना ‘देव’ म्हणण्यास सुरुवात केली. पुढे, तेच त्यांचे आडनाव झाले. शाळिग्राम-गोसावी-देव असा हा आडनावांचा प्रवास पूर्ण झाला.

चिंतामणी महाराजांच्या कृपेने पुण्याची देशमुखी कृष्णाजी काळभोर यांना 1664 मध्ये मिळाली, म्हणून कृष्णाजींनी चिंचवड-रावेतची देशमुखी चिंतामणी महाराजांना दिली. चिंतामणी महाराजांनी कारभाराला शिस्त लावली, यात्रा-उत्सव आखीवरेखीव केले. त्यांनी पौष वद्य चतुर्थीच्या रात्री देह ठेवला. ते वर्ष बहुधा इसवी सन 1694 असावे.

चिंतामणी महाराजांना चार मुले होती. पैकी नारायण महाराज गादीवर आले. नारायण रावांचे भाऊ काका महाराजांनी थेऊरला तपश्चर्या करून स्वतंत्र चिंतामणीची प्राप्ती करून घेतली; थेऊरची यात्रा सुरू केली. नारायण महाराज एका भाद्रपदी यात्रेत जेजुरीजवळच्या घोडेउड्डाण समोर कोथळ्याच्या देसाई पाटलांकडे उतरले होते. महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांची कोथळ्याला समाधी आहे.

नारायण महाराज राजगुरू होते. त्यांच्या काळात चिंचवड संस्थान श्रीमंत झाले. चिंचवड, वाकड, औंध, माण, चिखली, चऱ्होली, पिरंगुट इत्यादी गावे, कित्येक गावांच्या जमिनी, अनेक ठिकाणची देशमुखी, जकाती यांसारखी उत्पन्नाची साधने संस्थानास मिळाली. चिंचवडला येणाऱ्या मालाला जकात माफ असे. नारायण महाराजांनी 1719 च्या भाद्रपद शुद्ध सप्तमीला देह ठेवला.

नारायण महाराजांचा थोरला मुलगा चिंतामणी याने 1741 पर्यंत संस्थानचा कारभार पाहिला. त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे चिमाजी अप्पांचा वसईचा वेढा. हिंदू बांधवांची फिरंग्यांच्या छळातून सुटका करण्यासाठी चिंतामणी महाराजांनी पेशव्यांकडे आग्रह धरला, त्या मोहिमेला लागणाऱ्या खर्चासाठी दहा हजार रुपये कर्जही दिले. महाराजांचा भक्त गंगोजी नाईक अणजूरकर पठारे प्रभू त्या मोहिमेत होता. महाराजांनी दिलेली गणपतीची मूर्ती अणजूरला नाईकांच्या माडीत आहे. चिमाजी अप्पा 1739 च्या मोहिमेचा विजय साजरा करण्यासाठी पुण्याला जाण्याआधी चिंचवडला थांबले. त्यांनी वसईतून आणलेल्या मोठ्या घंटा चिंचवड, मोरगाव, सिद्धटेक आणि थेऊर या ठिकाणी आहेत.

चिंतामणी महाराजांचा थोरला मुलगा धरणीधर महाराज. त्यांची मोरयाचे वरदायक, साक्षात्कारी संत म्हणून ख्याती होती. धरणीधर महाराजांची गणेशभक्तीची अनेक पदे प्रसिद्ध आहेत.

पेशव्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटत असे. यात्रेच्या वेळी पेशवे स्वत: गणेशखिंडीत पालखीला सामोरे जात, त्यांचे स्वागत करत असत. यात्रेला शिधाशिबंदी देऊन, महाराजांचा आशीर्वाद घेऊन, पालखीबरोबर चार पावले चालून मंगलमूर्तीला निरोप देत असत. त्यांच्या काळात चिंचवडला टांकसाळ आली. टांकसाळीचा फायदा अन्नछत्रात वापरला जाऊ लागला. टांकसाळ इंग्रजी राज्य येईपर्यंत चालू होती.

चिंचवड, मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक या देवस्थानांची व्यवस्था चिंचवड देवस्थानामधून होते. सर्वत्र त्रिकाळ पूजा, नैवेद्य, नंदादीप यांची व्यवस्था असते. चिंचवडला अन्नछत्र व वेदपाठशाळा चालू आहे. तसेच, एक ग्रंथालय व देवस्थानच्या पुढाकाराने चालू झालेले मोरया हॉस्पिटल आहे. माघ व भाद्रपद महिन्यांत दोन मोठ्या यात्रा असतात. श्री मोरया गोसावी त्यांना प्राप्त झालेल्या मंगलमूर्तीसहित वाजत-गाजत मोरगावला जातात. माघात थेऊर, सिद्धटेकलाही जातात. येताना जेजुरीला खंडोबा, शिवरीला यमाई, पुण्याला कसबा गणपती आणि जोगेश्वरी यांचे दर्शन घेतात. देवांची भेट होते, पालखीचे ठिकठिकाणी स्वागत होते. मिरवणूक निघते. श्री मोरया गोसावी यांच्या पुण्यतिथीचा चार दिवसांचा भव्य सोहळा मार्गशीर्ष वद्य षष्ठीला होतो. नामवंत कलाकारांची कीर्तने, प्रवचने, गायन-वादन, सत्कार समारंभ होत असतात. मोठ्या प्रमाणावर अन्नदान होते. इतर सत्पुरुषांच्याही पुण्यतिथी साजऱ्या होतात. देवापुढे गायनाचे कार्यक्रम रोज सकाळी व संध्याकाळी होतात. इतर अनेक कार्यक्रम वर्षभर चालू असतात.

चिंचवडला मिळालेल्या पहिल्या देणग्या सगळ्या निजामशाही-आदिलशाहींच्या आहेत. तुकाराम महाराजांनी चिंचवडला अनेक कीर्तने केली आहेत. मंगलमूर्ती हे त्यांचे स्फूर्तिस्थान होते. समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या पंचायतनातील सगळ्यांना आवर्जून चिंचवडला जाण्यास सांगितले होते. रँडला गोळी घालणारे चापेकर चिंचवडचे. चापेकर बंधूंनी रँडच्या वधाच्या योजना मंगलमूर्ती वाड्याच्या दक्षिण दरवाज्यात आणि धनेश्वरच्या पायऱ्यांवर बसूनच आखल्या. चिंचवड आणि मोरया यांच्याशी महाराष्ट्राचा भावबंध दृढ आहे.

श्री मोरया गोसावी, चिंतामणी महाराज, नारायण महाराज विरक्त होते. त्यांच्या काळात मिळकती आल्या पण त्यासाठी कलह झाले नाहीत. चिंतामणी महाराजांना चार मुले होती. त्यापैकी नारायण महाराज थोरले. ते गादीवर बसले. नारायण महाराजांनी त्यांचे धाकटे बंधू, विनायक ऊर्फ काका महाराज, दिगंबर महाराज आणि मोरोबा महाराज यांचे पुत्रवत पालन केले, त्यांच्या वंशजांना काही जमिनी आणि एक हजार रुपये रोख नेमून दिले, म्हणून त्यांना चिंचवडकर हजारे आणि चिखलीकर हजारे अशी नावे पडली.

विनायक किंवा काका महाराज यांच्या कलहाची हकिकत गंमतीदार आहे. ते स्वत: गणेशभक्त होते, त्यांचे भांडणही त्या कारणावरूनच झाले. मंगलमूर्तीची पूजा फक्त महाराजांनी करायची असा पहिल्यापासून प्रघात. विनायकला नारायण महाराज पूजा करतात, मंगलमूर्तीचे सगळे उपचार करतात आणि आपल्याला काहीच करता येत नाही याचे वैषम्य वाटे. तो एक दिवस नारायण महाराजांची पूजा झाल्यावर जबरदस्तीने दूर्वा वाहण्यास गेला. नारायण महाराजांनी त्याला नको म्हटले, याचा त्याला राग आला. तो ‘दुसरा मंगलमूर्ती मिळवीन तेव्हाच चिंचवडात पाऊल टाकीन’ अशी प्रतिज्ञा करून निघाला आणि थेट थेऊरला गेला. त्याने तेथे नदीत उभे राहून तपश्चर्या केली. त्याला चिंतामणी प्रसन्न झाला. विनायकाच्या हातात मंगलमूर्ती होऊन आले. त्याच वेळी जिंजीला राजाराम महाराजांना दृष्टांत झाला, की मी अवतरलो आहे, माझी व्यवस्था कर. तेव्हा त्यांनी विनायक ऊर्फ काका महाराज यांना थेऊर, जांब, उरळी, हिंजवडी ही गावे इनाम करून दिली.

काका महाराज मोठ्या इतमामाने चिंचवडात आले. महाराजांनी त्यांना प्रथम वाड्यात आणि नंतर पवनेजवळ स्वतंत्र वाडा बांधून दिला.

नारायण महाराजांचा मुलगा चिंतामणी आणि चिंतामणीचा मुलगा धरणीधर हे महाराज असताना देवांचा इतर वंशही पुष्कळ वाढला. ते भाऊबंध पितृधनासाठी कलह करू लागले. रोजच्या कटकटी होऊ लागल्या. कोणी कोणाचे ऐकेना, म्हणून धरणीधर महाराज छत्रपतींच्याकडे साताऱ्याला गेले. त्यांनी तेथून वाटण्या करून आणल्या. पण त्या भाऊबंदांना मान्य झाल्या नाहीत, म्हणून पेशव्यांचा मुक्काम कडध्याला होता, तेव्हा 1744 साली सगळे भाऊबंद तेथे गेले. पेशव्यांनी सगळ्या मिळकतीची मोजदाद केली आणि पुन्हा वाटण्या केल्या. त्या वाटणीपत्राला ‘तहनामा’ म्हणतात. त्यात मिळकतीचा निम्मा हिस्सा देवाची पूजाअर्चा, यात्रा, उत्सव, अन्नछत्र, सदावर्त यांसाठी राखून ठेवला आणि उरलेल्या अर्ध्या भागाची भाऊबंदांत योगक्षेमासाठी वाटणी केली. त्यात अकरा गावे संस्थानची राहिली, अकरा गावे भाऊबंदांकडे उपजीविकेसाठी गेली. नंतर मिळालेल्या उत्पन्नाचीही साधारण त्या तत्त्वावर विभागणी होत गेली.

धरणीधर ऊर्फ तात्यामहाराज देव (रावतेकर) 1923 ते 1936

चिंतामणी ऊर्फ बाबामहाराज (सिद्धटेककर) 1936 ते 1955

वक्रतुंड महाराज देव (औंधकर) 1955 ते 1957

गजानन महाराज देव (वाकडकर) 1957 ते 1964

धरणीधर महाराज देव (सिद्धटेककर) 1964 ते 1981

विघ्नहरिमहाराज देव (वाकडकर) 1981 ते 2001

सुरेंद्रमहाराज देव (सिद्धटेककर) 2001 पासून विद्यमान

घटनेत वेळोवेळी गरजेप्रमाणे दुरुस्ती झाल्या. सध्या पाच विश्वस्त असतात. एक नारायण महाराजांच्या घरातील, एक इतर देव कुटुंबापैकी, एक मोरगाव, सिद्धटेक, थेऊर यांपैकी आणि दोन इतर कोणतेही प्रतिष्ठित. जिल्हा न्यायाधीश-पुणे- यांच्या देखरेखीखाली चिंचवड देवस्थानची व्यवस्था असे. ती सह धर्मादाय आयुक्त (पुणे) यांच्याकडे गेली आहे.

श्री मोरया गोसावी यांचा वंशवेल

1.श्री मोरया गोसावी × उमाबाई  (श्री गोविंदराव कुलकर्णी ताथवडे यांची कन्या) (संजीवन समाधी 25 जानेवारी 1657)

2. चिंतामणी महाराज (थोरले) × पत्नी दोन – नावे अज्ञात (समाधी इसवी सन 1694)

3. नारायण महाराज (थोरले) × आनंदी, रखमा, यमुना, गोमती (नारायण महाराज समाधी इसवी सन 1719)

(आनंदी तथा अनुबाई यांची समाधी कोथळे, घोडे उड्डाण, जेजुरी) हे देऊळ नाझऱ्याच्या मल्हार सागर धरणात गेल्यामुळे दुसरीकडे बांधले आहे.

इतर भाऊ

दिगंबर (चिंचवडकर)

मोरोबा (चिखलीकर)

विनायक तथा काकामहाराज (हिंजवडीकर) समाधी 1731

4. चिंतामणी महाराज (मधले) × नीरूबाई, सगुणाबाई (समाधी 24 डिसेंबर 1741)

इतर भाऊ

विघ्नेश्वर (औंधकर)

गजानन तथा बाबाजी (वाकडकर)

विश्वनाथ (पिरंगूटकर)

लंबोदर तथा विरुपाक्ष तात्या (नक्कल)

5. धरणीधर महाराज × देवकी तथा अक्का, जयंती (समाधी इसवी सन 1772)

इतर भाऊ

उमापती (रावेतकर)

बुन्याबा (रांजणगावकर)

6. नारायण महाराज तथा गबाजी × अबई (समाधी इसवी सन 1802)

इतर भाऊ

गणोबा (सिद्धटेककर)

गजानन तथा बाबाजी (ओझरकर)

मोरोबा (बुन्याबा देव रांजणगावकर यांना दत्तक)

7. चिंतामणी महाराज (धाकटे) × नीरूबाई, सगुणाबाई (समाधी इसवी सन 1805)

8. धरणीधर वडिलांच्या अगोदर वारला.
सिद्धटेक घराण्यातून सखाराम दत्तक घेतला. नाव धरणीधर × जेतीबाई तथा बयाबाई
(मृत्यू 02 सप्‍टेंबर 1852)                                         ×  लक्ष्मीबाई
×  बहिणाबाई

9. चिंतामणी × वेणुबाई (लवकर वारला.)

10. गणपत (लक्ष्मीबाईचा दत्तक, रावेतकर) 1852 ते 1871

भालचंद्र चिंतामणी (सिद्धटेकपैकी चिंतो बजाजीचा मुलगा वेणुबाईचा दत्तक. नाव धरणीधर महाराज (1871-1874)

11. चिंतो बजाजी – न्यायालयात दावा करून लक्ष्मीबाईकडून संस्थानचा ताबा मिळवला. (1874 ते 1886)

12. धुंडीराज गणेश देव (ओझरकर) 1890 ते 1923

13. धरणीधर तथा तात्यामहाराज (रावतेकर) 1923 ते 1936

14. चिंतामणी तथा बाबा महाराज (सिद्धटेककर) 1936 ते 1955

15. वक्रतुंड महाराज देव (औंधकर) 1955 ते 1957

16. गजानन महाराज देव (वाकडकर) 1957 ते 1964

17. धरणीधर महाराज देव (सिद्धटेककर) 1964 ते 1981

18. विघ्नहरिमहाराज देव (वाकडकर) 1981 ते 2001

19. सुरेंद्रमहाराज देव (सिद्धटेककर) 2001 पासून विद्यमान

धुंडीराज गणेश देव यांच्यापासून सर्व विश्वस्तांची नेमणूक सरकारने केली.

– विघ्नहरी भालचंद्र देव

काकडे अंगण, ए 11, तानाजी नगर, तालेरा हॉस्पिटलसमोर, चिंचवडगाव, पुणे.

(020) 27610198

Last Updated On – 13th September 2016

About Post Author