चाकोरीबाहेरचा पैदासशास्त्रातील मार्ग – चंदा निंबकर

0
278

माझा विज्ञानातील प्रवेश हा तथाकथित मागच्या दाराने झाला असताना मी ‘लीलावतीची मुलगी’ कशी काय झाले? ती मीच नव्हते का जिने मळलेल्या वाटेवरून जाण्यास नकार दिला होता आणि 1976 मध्ये दहावीच्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाच्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर, विज्ञान नव्हे तर वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता? हो, पण आता मात्र; मी ‘शेतीतील पशूंच्या अनुवंश वा पैदास शास्त्राची तत्त्वे/सिद्धांत व त्यांचा पशू-उत्पादकता सुधारण्यासाठी वापर’ (Animal Breeding) ह्या विज्ञानक्षेत्रात आकंठ बुडाले आहे ! त्या शास्त्राचा वापर करून तळागाळातील शेळ्या-मेंढ्या पाळणाऱ्यांचे उत्पन्न व जीवनमान सुधारणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे ! मी ह्या आव्हानात्मक आणि समाधान मिळवून देणाऱ्या क्षेत्रात गेली तीस वर्षे काम केले आहे. मला कॅशबुके आणि खतावण्या रोज तपासण्याचे काम गुदमरवून टाकणारे वाटू लागले, तेव्हा ते सोडून देऊन ‘चार्टर्ड अकाऊंटंट’ होण्याच्या ध्येयाला तिलांजली देण्याचा माझा निर्णय योग्य होता. अर्थात त्यावेळी मला माहीत नव्हते, की माझे आयुष्य कोठल्या मार्गाने जाणार आहे !

मी सोळाव्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कला, विज्ञान की वाणिज्य शाखा निवडावी हे ठरवण्यास असमर्थ होते. पण त्यामुळे माझ्या पुढील अभ्यासाच्या निवडींवर बंधने फार आली नाहीत. मला कधी कधी पश्चात्ताप होतो, की मला बी एससीसारखे विज्ञानाचे मूलभूत शिक्षण मिळाले नाही. मला जर भूतकाळात जाता आले तर मी बी एससी ला प्रवेश घेईन. पण आता उशीर झाला आहे. तरी मी ‘प्रगत अकाउंटन्सी’ ऐवजी ‘प्रगत संख्याशास्त्र’ (Advanced Statistics) हा विशेष विषय बी कॉम च्या तिसऱ्या वर्षाला घेतला याचा मला आनंद वाटतो. माझे ‘पशू-अनुवंशशास्त्र’ विषयाचे कार्यक्षेत्र हे संख्याशास्त्रावर आधारित आहे. अर्थात, मला माझ्या या सुरुवातीच्या पार्श्वभूमीचा पुढे फायदाच झाला आहे. मला माझ्या संस्थेतील विभाग प्रमुखाची कामे करताना प्रशासकीय कामात अकाउंट्सच्या ज्ञानाचासुद्धा खूप उपयोग होतो. मी माझ्या बी कॉम पदवीनंतर सहा वर्षांनी स्कॉटलंडमधील एडिंबरा विद्यापीठातून एक वर्षाचा एम एससी ‘पशू-अनुवंशशास्त्रा’चा अभ्यासक्रम पूर्ण केला. तो खूपच अवघड होता. पण मला सांख्यिकी किंवा परिमाणात्मक अनुवंशशास्त्र (Quantitative Genetics and Breeding) ह्यातील शिस्त व काटेकोरपणा भावला.

मला एडिंबरा विद्यापीठातील एम एससी नंतर तेथेच पीएच डी करण्याची संधी होती. ते आकर्षण भुरळ पडावी असेच होते. पण मी मात्र ते नाकारले. कारण भारतात पशुपालन व पशुपैदास क्षेत्रात काय चालले आहे हे मला जाणून घ्यायचे होते, त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करायचे होते आणि त्यानंतर प्रत्यक्ष व्यवहारात उपयुक्त होईल असा विषय पीएच डी साठी निवडायचा होता !

मी माझ्या मूळ गावी, सातारा जिल्ह्यातील फलटणला 1990 मध्ये परत आले आणि आमच्या वडिलांनी त्या वर्षी स्थापन केलेल्या निंबकर कृषी संशोधन संस्थेमधील (NARI) पशुसंवर्धन विभागात (Animal Husbandry Division) कामाला सुरुवात केली. मी ते काम करत असताना फलटण तालुक्यातील राजाळे गावाजवळच्या माझ्या शेतावर राहू शकले. तेथे प्रदूषण जवळजवळ नाही आणि आयुष्य बहुतांशी शांततापूर्ण आहे. माझ्या वडिलांनी ‘नारी’(NARI) ही संस्था कापूस, सूर्यफूल, करडई आणि जोंधळा या, सिंचनाखालील पिकांची उत्पादकता वाढवण्यावर संशोधन करण्यासाठी 1968 मध्ये स्थापन केली होती. मात्र पुढे, त्यांना कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या व दुष्काळी भागात जास्त पाळल्या जाणाऱ्या परंतु शासन व भारतातील संशोधक यांच्याकडून दुर्लक्षित शेळ्या-मेंढ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी काम करायचे होते. ते नाविन्यपूर्ण काम होते. आम्ही काही निधी मिळवू शकलो आणि उत्साहाने कामाला लागलो.

मला पीएच डी साठी शिष्यवृत्ती 2002 पर्यंत मिळाली नाही. पण तशी संधी मला जशी पाहिजे होती, तशीच चालून त्यावेळी आली. ती होती ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर इंटरनॅशनल अॅग्रिकल्चरल रीसर्च कडून (Australian Center for International Agricultural Research) दिली जाणारी ‘जॉन ऑलराईट’ शिष्यवृत्ती. त्या संस्थेने आमच्या महाराष्ट्रासाठी बहुप्रसवा व जंतप्रतिकारक अशा मटणाच्या मेंढ्या (Prolific Worm-Resistant Meat Sheep for Maharashtra)  विकसित करण्याच्या प्रकल्पाला निधी दिला होता. मी ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स प्रांतातील आर्मिडेल येथील न्यू इंग्लंड विद्यापीठातून पशुअनुवंश/पशुपैदास शास्त्रामध्ये (Animal Breeding) पीएच डी केली. माझा संशोधन प्रबंध हा ‘महाराष्ट्रातील दक्खनी मेंढ्यांमध्ये जुळी कोकरे होण्याच्या एका जनुकाचा वापर करून मटणाचे उत्पादन आणि मेंढीपालनातील नफा वाढवणे’ या विषयावर होता.

बहुप्रसवतेसाठी प्रसिद्ध असे ‘बरूला’ (Booroola) नावाचे जनुक हे मूळ भारताच्या गरोळ मेंढीमध्ये होते. ती मेंढी पश्चिम बंगाल राज्याच्या सुंदरबन ह्या दलदलीच्या प्रदेशातील होय. ते जनुक अजाणतेपणाने अठराव्या शतकाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाला निर्यात केले गेले. ते तेथे एका विशिष्ट प्रकारच्या मरिनो जातीच्या मेंढ्यांमध्ये प्रथम 1980 मध्ये सापडले. त्याचा गवगवा कोकरांचे उत्पादन वाढवण्यास कारणीभूत ठरणारे पहिले ‘एकमेव’ (Single) जनुक म्हणून पुढे जगभर झाला. त्या जनुकामागील उत्परिवर्तन (Mutation) व ते शोधण्याची डी एन ए (DNA) चाचणी ह्यांवरील संशोधन प्रथम न्यूझीलंडमध्ये 2001 मध्ये फलद्रूप झाले. तेच उत्परिवर्तन भारतीय गरोळ मेंढ्यांमध्ये आहे हे प्रथम आमच्या नारी (NARI) संस्थेने सिद्ध केले. त्याचप्रमाणे त्याचा वापर ‘लोणंद’ दक्खनी मेंढ्यांमध्ये संकरीकरणाद्वारे करून मेंढीमागे मिळणारे कोकरांचे वजन कमीत कमी चाळीस टक्के दर वर्षाला वाढवणे शक्य आहे हेही आम्हीच प्रथम सिद्ध केले. त्या मेंढीची क्षमता जुळी कोकरे देण्याची आहे. आम्ही तिला ‘NARI सुवर्णा’ हे नाव दिले. ती जात कर्नाटक राज्यात खूप लोकप्रिय झाली आहे. आम्ही त्या जातीच्या दोन हजारांपेक्षा जास्त मेंढ्या मेंढपाळांना गेल्या सात वर्षांत पुरवल्या आहेत. पैकी पाचशे महाराष्ट्रात व त्याच्या तिपटीने कर्नाटकात गेल्या आहेत. FecB हे ते जनुक पुढील पिढीत संक्रमित होणारे असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे व त्याचा फायदा शेकडो मेंढीपालकांना मिळत आहे. मला मेंढयांचे काम करण्यास आणि मेंढ्यांची सखोल जाण असणाऱ्या मेंढपाळांबरोबर काम करण्यास खूप आवडते. संशोधनातील निष्कर्ष हे अंतिम लाभधारकापर्यंत घेऊन जाणे हे अतिशय समाधानकारक आहे. आम्ही या मेंढपाळांमध्ये प्रशिक्षण आणि विस्तार यांचे कामही केले आहे.

आम्ही भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या ‘अखिल भारतीय शेळी सुधार परियोजने’त सहभागी होण्यासाठी अर्ज केला. तो 2009 मध्ये स्वीकारला गेला. आम्ही महाराष्ट्रातील उस्मानाबादी शेळीचे संशोधन व विस्तार केंद्र सुरू केले आहे. आम्ही त्या केंद्राच्या माध्यमातून गावागावांतील उत्कृष्ट बोकड निवडून, त्यांचे वीर्य गोठवून त्या वीर्यकांड्यांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर करण्याचे काम भारतात पहिल्यांदाच चालू केले आहे. आम्ही त्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळेच्या साधनसामुग्रीसाठी केंद्र सरकारचे अनुदानही मिळवले.

          मी  माझ्या जिव्हाळ्याचे आणखी एक काम 2018 पासून सुरू करू शकले आहे. ते म्हणजे शेळ्यांमधील अनुवंशिक सुधारणे’चा उपक्रम. तो ब्लॅक बेंगाल शेळ्यांमध्ये आगाखान प्रतिष्ठानच्या भारतातील शाखेतर्फे बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात शेळीपालकांच्या सहकार्याने राबवला जात आहे. त्यासाठी तो माझ्या व न्यूझीलंडमधील अबॅकसबायो कंपनीच्या सल्ल्याने चालू असलेल्या ‘मेषा’ ह्या शेळी सुधारणेच्या मोठ्या प्रकल्पाचा एक भाग आहे. तो उपक्रम पद्धतशीरपणे चालू असलेला व शेळ्यांच्या उत्पादकता वाढीसाठी शेळीपालकांचा सक्रिय सहभाग असलेला भारतातील पहिलाच असावा ! त्यातून शेळीपालकांच्या उत्पन्नात घसघशीत भर पडेल अशी अपेक्षा आहे. आम्ही शेळीपालक, प्रकल्पातील पशुसखी व कर्मचारी ह्यांचे प्रशिक्षण मोठ्या प्रमाणावर केले आहे. त्यासाठी खूपच कष्ट घेतले आहेत. त्याचे चांगले परिणाम आता दृगोचरही होऊ लागले आहेत. स्वत:ची जनावरे स्वत: सुधारावीत, त्यासाठी राज्याच्या किंवा देशाच्या बाहेरून आयात केलेल्या जनावरांवर अवलंबून राहू नये हा विचार पशुपालकांमध्ये रुजावा हे उद्दिष्ट तेथे हळूहळू साध्य होऊ लागले आहे.

मी माझ्या आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण लोकांशिवाय एवढ्या लांबचा पल्ला गाठू शकले नसते. मी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि माझा मार्ग मला शोधू दिल्याबद्दल माझ्या आई-वडिलांप्रती कृतज्ञ आहे. त्यांनी दिलेल्या आर्थिक आणि भावनिक साहाय्याचे मोल प्रचंड आहे. मी ही संस्था माझ्या वडिलांनी वर्षानुवर्षे काम करून स्थापन केली याबद्दलसुद्धा कृतज्ञ आहे. हे संस्थात्मक व्यासपीठ मला उपलब्ध असल्याचा मोठा लाभ झाला. पण दीर्घ कालावधी लागणाऱ्या ‘शेळ्या-मेंढ्यांची अनुवंशिक सुधारणा’ या विषयासाठी निधी मिळवणे आव्हानात्मक आहे. अर्थात आम्ही आमचा ‘नारी सुवर्णा’ मेंढ्यांचा कळप स्वबळावर (पैदाशीच्या उत्कृष्ट मेंढ्यांच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर) गेली दहा वर्षे सांभाळला आहे. माझे ऑस्ट्रेलियन पती गॅव्हन हे माझ्यासाठी एक खंबीर शक्तिस्रोत व पाठिराखे आहेत. त्यांचे प्रेम आणि निष्ठा हा माझ्यासाठी व संस्थेसाठी नवीन विज्ञान वर्षानुवर्षे शिकत असताना उपयुक्त मार्ग शोधत असताना अर्थपूर्ण आणि मजबूत आधार राहिला आहे. मला खूप मोठी मजल मारायची आहे. मी व्यावसायिक रीत्या प्रगती करत आहे आणि उत्कृष्टता, कार्यक्षमता व शक्यता यांत संतुलन साधण्यास शिकत आहे. भविष्य हे आव्हानांनी आणि वेगवेगळ्या शक्यतांनी भरलेले आहे. सीएसआयआरचा (CSIR) ‘ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ हा पुरस्कार, आमच्या संस्थेला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे, माझ्या वडिलांना पद्मश्री पुरस्कार 2006 साली मिळाला. हे पुरस्कार आम्हाला आणखी बळ देत आहेत. माझी जबाबदारी वडिलांचे निधन 2021 साली झाल्यानंतर आणखी वाढली आहे…

चंदा निंबकर 9960940805 chanda.nimbkar@gmail.com

———————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here