चंद्रपूरचा परकोट

0
44
carasole

चंद्र‘पुरात शहरासभोवती परकोट आहे. त्याचा पाया गोंड राजवंशातील दहावा परंतु चंद्रपूर येथे राज्य करणारा पहिला राजा खांडक्या बल्लाळशहा याने 1472 च्या सुमारास घातला व त्याची राजधानी बल्लारपूर येथून चंद्रपूरास हलवली. तेल ठाकूर नावाच्या वास्तुशिल्पकाराने परकोटाचा नकाशा तयार केला व साडेसात मैल परिघाची आखणी करून पायाभरणी केली. परकोटाचा पाया बारा फूट खोल आहे. खांडक्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हीरशहा याने बांधकाम सुरू केले. त्याने प्रथम परकोटाच्या चार वेशी उभारल्या. ‘हत्तीवर आरूढ असलेला सिंह’’ हे शौर्याचे राजचिन्ह ठरवून, प्रत्येक वेशीवर बाजूस खोदवले. त्या शिल्पात सिंहाचे शरीरआकारमान हत्तीच्या दुप्पट दर्शवले गेले आहे! हीरशहाचा नातू कर्णशहा याच्या कारकिर्दीत तटाची उंची केवळ अर्ध्यावर बांधून झाली. कर्णशहाचा नातू धुंड्या रामशहा (1597 – 1622) याच्या कारकिर्दीत परकोटाचे काम पूर्ण झाले. त्यानिमित्त मोठे वास्तुपूजन होऊन दानधर्म झाला. याचा अर्थ खांडक्याच्या सहाव्या पिढीत ते काम पूर्ण झाले. सव्वा कोट रुपये खर्च झाला व कामास सव्वाशे वर्षांचा कालावधी लागला. तटाची उंची वीस फूट (सुमारे) असून परीघ साडेसात मैल आहे. परकोटाचा आकार दीर्घ वर्तुळाकार असून पूर्व-दक्षिण बाजूंना झरपट तर पश्चिमेस इरई नदी वाहते.

परकोटाच्या चार प्रवेशद्वारांची नावे जटपुरा, अचलेश्वार, पठाणपुरा व बिनबा अशी आहेत, तर त्यास बगड, हनुमान, विठोबा, चोर व मसाण अशा पाच खिडक्या आहेत. खिडक्यांचा आकारही प्रचंड असून त्यातून ट्रक-ट्रॅक्टर यांची वाहतूक सहज होत असते. ही सर्व नावे भोसल्यांच्या अमलात पडली आहे. जटपुरा दरवाज्यावर गणेशराव जाट, अचलेश्वार दरवाज्यावर भानबा माळी, पठाणपुरा दरवाज्यावर अलिखान पठाण आणि बिनबा दरवाज्यावर बिनबा माळी असे जमादार होते. ते सगळ्या प‘कारच्या आवक-जावकीची नोंद ठेवत असत. त्यांच्याच नावावरून पुढे या दरवाज्यांना नावे देण्यात आली.

प्र‘त्येक दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना भव्य व प्रशस्त बुरूज आहेत. त्यावर चढण्यासाठी दगडी पाय-या आहेत. सर्व दरवाज्यात सर्वांत उंच व अधिक देखणा आणि सौंदर्याने युक्त असा पठाणपुरा  दरवाजा आहे. इतिहासकाळात चंद्रपूरचा संपर्क मोगलाई व निजामशाहीशी अधिक येत असे. त्यामुळे वाहतुकीची मदार त्याच दरवाज्यावर होती. त्यामुळे चंद्रपूर शहराचे तेच प्र‘मुख द्वार होते. ब्रि‘टिशकाळात रेल्वे आली आणि नागपूरपुणेमुंबई– दि‘ल्ली-चेन्नई असा संपर्क स्थापित झाला. त्यामुळे पठाणपुरा दरवाज्याचे महत्त्व कमी होऊन जटपुरा दरवाज्याचे महत्त्व वाढले. सध्या सर्व वाहतूक जटपुरा दरवाज्यानेच होते. ते शहराचे प्र‘मुख प्रवेशद्वार मानले जाते.

पठाणपुरा दरवाज्याच्या बाहेर इरई व झरपट नदीचा संगम आहे. त्या नद्यांचा व तेथील संगमाचा उल्लेख वाकाटक नृपती द्वितीय प्र‘वरसेन याच्या ताम्र‘पटात आला आहे. संगमाच्या बाजूला माना टेकडी आहे. टेकडीच्या बाजूलाच एका लहान टेकडीत खडकात कोरलेल्या काही गुहा आहेत, मात्र त्यांस ऐतिहासिक महत्त्व नाही.

बल्लारपूर चंद्रपूरपासून तेरा किलोमीटर अंतरावर दक्षिणेस आहे. ते खांडक्या बल्लाळ याचे मूळ राज्य. तो या गोंड वंशाचा. त्याचे सर्वांग खांडकांनी (फोड) व्यापले होते. खांडकांचे रूप काहीसे कुष्ठासारखे होते. खांडक्याची राणी सुंदर, सुलक्षणी व पतिपरायण होती. तिने पतीची काया पूर्ववत व्हावी म्हणून अनेक नवस-सायास केले, व‘तवैकल्ये केली पण गुण येईना. पुढे बल्लारपूर-चंद्रपूर यांच्या मध्यावर असलेल्या व वनश्रीने नटलेल्या जुनोना या गावाची, निवड राजाच्या हवापालट व विश्रांतीसाठी केली गेली. तेथे तलाव आधीचाच होता. राजाने त्याची दुरुस्ती करून जवळच बंगला बांधला. राजाराणी तेथे विश्रांतीसाठी जात.

(सौजन्य अ.ज. राजूरकर. चंद्रपूर , प‘. जोशी, चिमूर)

– डॉ. अ.तु. काटकर (निवृत्त प्राचार्य)

(मूळ लेख ‘शब्द रूची’ मासिकामधून साभार)

About Post Author