घायाळ – य.दि. पेंढरकर (कवी यशवंत)

1
62
carasole

कवी यशवंत ‘आई म्‍हणोनी कोणी’ ही कविता लिहिणारे आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक म्हणून जनसामान्यांना परिचित आहेत. ते बडोदे संस्थानचे राजकवी होते. यशवंतांनी गद्यलेखनही बरेच केले आहे. त्यांच्या गद्यलेखनापैकी फारसे ज्ञात नसलेले पुस्तक म्हणजे ‘घायाळ’.

स्टीफन झ्वार्इंग यांच्या The Failing Heart या कथेचे (दीर्घकथेचे) ते रुपांतर आहे.

यशवंतांनी पुस्तकाला मोठी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी स्टीफन झ्वार्इंग यांची प्राथमिक माहिती, मराठीत झालेले त्यांचे अनुवाद, मराठी साहित्यिकांना वाटत असलेले झ्वार्इंग यांचे महत्त्व इत्यादी विस्तृत टिप्पणी केली आहे. झ्वार्इंग यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य सांगताना यशवंत लिहितात – ‘झ्वार्इंगच्या लेखणीचा भर त्याला ज्या विशेष व्यक्ती आढळल्या त्यांचे मनोव्यापार विशद करण्यावर आहे. घडामोडींची रहस्यमय ओढ त्याच्या लेखनात फारशी नाही. पण त्यांचे लेखनचातुर्य घडामोडींतील व्यवहारामागे काय मनोरचना असते आणि तिच्या व त्यांच्या योगाने व्यक्तिमात्राच्या जीवनप्रवाहाला कशी गती येते किंवा कलाटणी मिळते हे सूक्ष्मपणे दाखवण्यात सामावले आहे – त्यांचे सारे चित्रणकौशल्य बहरले आहे.’

प्रस्तावनेत पुढे मराठीत त्यावेळी बहरत असलेल्या मनोविश्लेषणात्मक लेखनाच्या कवी यशवंतांना जाणवलेल्या मर्यादा त्यांनी कथांची वा कथाकारांची नावे न घेता सांगितल्या आहेत.

आता, ही घायाळ कथा नेमकी काय व कशी आहे?

The Failing Heart ला रुढार्थाने कादंबरी/लघुकादंबरी म्हणणे अवघड वाटते. कथेचा नायक पासष्ट वर्षांचा व्यापारी – तो व्यावहारिक दृष्ट्या यशस्वी आहे, परंतु इंग्रजी न येणारा, चलाख नसलेला; किंबहुना गबाळाच असा तो आहे. तो त्याची पत्नी व एकोणीस वर्षांची मुलगी यांना घेऊन विश्रांतीसाठी माथेरानला आला आहे. त्याने त्यांची सांपत्तिक स्थिती आयुष्यात अपार कष्ट करून सुधारली आहे. पण त्यासाठी तो स्वत:ला विसरला आहे. त्याच्या आयुष्यभराचे ध्येय फक्त एक होते – पत्नी व मुलगी यांच्या साऱ्या ऐहिक गरजा, हौशी-मौजी, ऐष-आराम पुरवणे.

माथेरानला आलेले असताना त्याची मुलगी तेथीलच सहप्रवाशाच्या खोलीत रात्रभर राहते आणि पहाटे तिच्या स्वत:च्या खोलीत परतते. मुलगी नुकती वयात आली आहे, दिसायला सुरेख आहे आणि तारुण्याच्या भरात येऊ लागली आहे. हे बापाला समजते तेव्हा तो प्रचंड हादरतो, लज्जित होतो, संतापतो. त्याला मुलीबद्दल व पत्नीबद्दल घृणा वाटू लागते. पत्नीवरही – कारण ती त्याला राबणारे यंत्र म्हणूनच पाहत असते! त्या त्याला त्याने अफाट परिश्रमाने मिळवलेल्या संपत्तीचा उपभोग घेत असताना कवडीइतकीही किंमत देत नाहीत.

त्याने मुलीला व पत्नीला जाब विचारायला हवा असे वाटते, पण त्याला ते धैर्य होत नाही. ‘कुलटा आहे. ही माझी कार्टी कुलटा आहे आणि हे मला कळले असून, तिला सांगून टाकण्याचे धारिष्ट्य मात्र मला नाही’ हे त्याला स्पष्ट जाणवत आहे. त्याला केवळ धक्का बसला आहे असे नाही, तर तेथून पुढे तेच चालू राहणार – त्याची मुलगी शरीरसुखासाठी अनेकांच्या मागे धावणार अशी भयस्थिती त्याला जाणवत राहते. तो मुलगी आणि पत्नी यांना धक्का, दु:ख, संताप आणि अगतिकता यांच्या दुर्दैवी आघाताने काहीच बोलत नाही. त्या दोघींच्या नैसर्गिक हालचाली चालू राहतात. तो झाला प्रकार पत्नीला सांगत नाही. तो ‘आपण येथून ताबडतोब जाऊ’ असे म्हणतो. कारण काय विचारते, तर तो म्हणतो ‘‘मला जे माहीत आहे ते तुला कोठे सांगत बसू? सांगण्यासारखे नाही ते. आरुणीलादेखील तू ह्या लोकांत मिसळू देता कामा नयेस.’’

पत्नी ते मान्य करत नाही. तिच्या मते, सारे सहप्रवासी ‘सद्गृहस्थ’ आहेत. तिच्या (म्हणजे त्यांच्या) घरी येणाऱ्या अनेक माणसांपेक्षा ते नक्कीच अधिक ‘सद्गृहस्थ’ आहेत. तिला तिच्या मुलीच्या ‘सुखाच्या आड’ का यावे ते कळत नसते.

येथे तिला मुलीच्या आनंदाच्या आड म्हणणे अभिप्रेत असेल पण ती ‘सुखाच्या’ असा शब्द वापरते. त्यामुळे झाला प्रकार तिला ठाऊक आहे आणि तिला ते गैर वाटत नाही हे स्पष्ट होते.

अखेर, व्यापारी एकटा परततो. तो त्यांच्या घाबरून लिहिलेल्या पत्रांना-तारांना उत्तर देत नाही. तो त्या परततात तेव्हा त्यांना स्टेशनवरही घ्यायला जात नाही. त्याचे संसारातील आणि धंद्यावरील सारे लक्ष उडते.

‘स्वत:चा पित्तशूळ आणि दुखरा भाग या व्यतिरिक्त माझे म्हणण्याजोगे माझ्याशी काय राहिले आहे? या जगात फक्त हा आजार आणि मृत्यू एवढी काय ती माझी मिरास. घरदार, बायको, पोरगी, धंदा ही सारी असून नसल्यासारखीच’ अशी त्याची भावना. त्याने वर्तमानपत्र वाचण्याचेही सोडून दिले. कोणतीही बाह्योपाधी किंवा विचार त्याच्या भीषण विमनस्कतेचा कोट फाडून आत तात्पुरताही शिरकाव करून घेण्यास समर्थ होईना.

अखेर, त्याची पत्नीही गबाळा नवरा का खचला याची चिकित्सा न करता तिच्या सामाजिक वर्तुळात रममाण होते, त्याच्या प्रकृतीच्या खालावण्याची प्रक्रिया कळसाला पोचते. त्याच्या पित्तशुळाची शस्त्रक्रिया होते. तशा, दुर्बल अवस्थेत मुलीच्या दर्शनाने, त्याच्या तिरस्काराचा उत्कर्षबिंदू गाठला जातो. तो मुलगी, बायको यांना दूर लोटतो आणि त्याचे हृदय कायमचे थांबते !

कथानकात नायकाबद्दल वाचकाला सहानुभूती निर्माण होते. मात्र त्याची पत्नी व मुलगी यांची मनोभूमिका तशी का झाली असेल याचे कारण परिणामकारकरीत्या पुढे येत नाही. नायकाची घालमेल वाचताना पु.भा. भावे यांच्या लेखनशैलीची जरूर आठवण होते.

रूपांतर करताना पेंढारकरांची भूमिका अशी आहे, की ‘हा घायाळ गृहस्थ एतद्देशीय नाही एवढे लक्षात घेतल्यावर त्याचे नाव, गृह्यसंस्कार, भाषा, रीतिरिवाज, स्थलविशेष वगैरे बाबतींत आढळून येणाऱ्या किरकोळ विसंगतीकडे वाचक काणाडोळा करू शकतील.’ (कथानायक ‘सोमनाथ’ आणि त्याची मुलगी ‘आरुणी’ पण तो ख्रिस्ती आहे. तो अंत्यसंस्कार व तद्पश्चात गरिबांना दान यासाठी भली थोरली रक्कम चर्चला देतो. कथेत अनेक वेळा चर्चच्या घंटा आणि त्यांचा नायकावरचा परिणाम येतो). कवी यशवंतांनी म्हटल्याप्रमाणे या विसंगतीकडे दुर्लक्ष केले तर उत्तम दीर्घकथा वाचल्याचे समाधान हे पुस्तक वाचल्यावर मिळू शकते. झ्वार्इंग यांच्या मनोविश्लेषण कौशल्याची प्रचीती नायकाच्या घायाळ होण्याच्या परिणामातून येत असली तरी त्याची पत्नी आणि मुलगी – जी त्याच्या घायाळ होण्याचे मुख्य कारण आहे, त्यांची मानसिकता तशी का बनली ते झ्वार्इंग सुचकतेने मांडतात. तेही अधिक सविस्तर आले असते तर दीर्घकथेचे रुपांतर कादंबरीत झाले असते आणि शोकांतिका उत्कट व गडद झाली असती असे मात्र वाटते.

जाता जाता :  यशवंतांनी झ्वार्इंग यांच्या सपत्नीक आत्महत्येचा तपशील/ कारणमीमांसा सांगितली आहे. त्यांनी महायुद्धाने जगावर ओढवलेले संकट, राष्ट्रवादाने जगाला दिलेले भूकंपसदृश धक्के आणि जिवितमूल्यांची झालेली भयंकर उलथापालथ जाणतेपणी पाहिली व अनुभवली असल्याने – त्या प्रलयजलात हा होरपळून निघाला असल्यामुळे आणि सांप्रतचे जगड्व्याळ युद्ध जेव्हा भडकले तेव्हा समग्र भूगोलाची आणि मानवी संस्कृतिविजयाची त्यात राखरांगोळी होणार हे पाहून, कल्पनाचक्षूंना दिसणारे जगाचे भेसूर भवितव्य न साहून या साहित्यद्रष्ट्याने २३ फेब्रुवारी १९४२ रोजी पत्नीसह आत्महत्या केली.

येथे वाचकाला ‘घायाळ’चा नायक व झ्वार्इंग यांच्यातील साम्य सहज जाणवू शकेल. ‘घायाळ’चा नायकही मुलीने त्याच्या मूल्यांचा केलेला विध्वंस पाहतो, कोलमडतो, तो पुन्हा उभे न राहण्यासाठी. पुढे काय होईल ते भयावह असेल या धारणेने त्याची जीवनेच्छा सरते आणि त्याचे पित्तशुळाचे दुखणे उचल खाऊन त्याला मृत्यू येतो. पत्नीने त्याला जिवाचा संताप करून घ्यायचा नाही हे पथ्य बजावून सांगितले असूनही त्याला त्याच्या दुबळेपणामुळे आणि जीवनेच्छा सरल्यामुळे ते पाळता येत नाही. अप्रत्यक्ष रीत्या ती आत्महत्याच होय.

ह्या साम्यामुळे ती दीर्घकथा झ्वार्इंग यांच्या बाबतीत भविष्यवादी आहे असे म्हणता येईल का?

घायाळ – य.दि. पेंढरकर (कवी यशवंत)
प्रकाशक व व्यवस्थापक :  रा.ज. देशमुख,
प्रकाशन ८ जून १९४४,
मूल्य दोन रुपये

– मुकुंद वझे

About Post Author

1 COMMENT

  1. मुकुंद वझे ह्यांनी…
    मुकुंद वझे ह्यांनी यशवंतांच्या घायाळ कादंबरीचा परामर्श वाचला.तो वाचताना त्यांच्या ‘हपिसर’ या फार पूर्वी वाचलेल्या छोटेखानी पुस्तकाची तीव्रतेने आठवण झाली.हे पुस्तक म्हणजे यशवंतांच्या वडिलांचे चरित्र होय.ते तुरुंगातले अधिकारी असावेत असं आता पुसटसे आठवते.आपल्या संग्रहांत सदर पुस्तक असल्यास त्याचा परामर्श घ्यावा,ही विनंती.

Comments are closed.