‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना आणि विनायक रानडे

7
94
carasole

नाशिकच्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चे विनायक रानडे. ते प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि वाचनालय समितीचे अध्यक्ष आहेत. रानडे हा माणूसच अवलिया आहे. त्यांच्या कल्पनेतून साकारलेली ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना अटकेपार झेंडे रोवत आहे. त्या योजनेचा गेल्या सहा वर्षांतील प्रवास थक्क करणारा आहे.

आजच्या नेटयुगात संगणकाच्या पडद्यावर क्षणार्धात ग्रंथच्या ग्रंथ, पुस्तकेच्या पुस्तके आणि वैचारिक मंथन उपलब्ध होऊ शकते, या पार्श्वभूमीवर रानडे यांची ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही योजना लक्षणीय ठरते. रानडे यांना ही कल्पना सुचली तरी कशी? ते म्हणतात, ”वाचनालय ही महाराष्ट्राची गेल्या दीडशे वर्षांची परंपरा आहेच; पण ग्रंथालयापर्यंत न जाताही पुस्तक घरी आणून मिळाले, निदान घराच्या अगदी जवळ उपलब्ध झाले तर वाचक ग्रंथ- पुस्तकांकडे अधिक वेगाने आकृष्ट होतील असे वाटले. त्यातून या कल्पनेचा जन्म झाला. प्रतिष्ठानचे वाचनालय तर सुरू होतेच. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ ही कल्पना डोक्यात आल्यावर कामाला लागले.”

विनायक रानडे यांच्या स्वभावाचा मूलभूत भाग म्हणजे मनात एखादी हितकारक गोष्ट आली, की मग ती मार्गी लागेपर्यंत गप्प न बसणे हा होय. हाती पुस्तक घेऊन वाचनसुख अनुभवणाऱ्या वाचकांसाठी मग ही साहित्यपर्वणी सुलभ ठरू लागली.

विनायक रानडे मूळचे नाशिकचे. मध्यमवर्गीय घरात त्यांचा जन्म झाला. त्यांनी प्रांजळपणे त्यांचे एक स्वप्न सांगितले,

“आमच्या घरात मला लहानपणापासून कधी फळे आणली, की ती कापून फोडी करून, सर्वांनी मिळून खायची सवय होती. त्या काळी ‘विको वज्रदंती’च्या जाहिरातीत जसे अख्खे सफरचंद खातात तसे मला ते खायचे होते. मला पहिला पगार मिळाला तेव्हा मी पहिल्यांदा सफरचंदाच्या गाडीशी उभा राहून, एक पूर्ण सफरचंद एकट्याने खाल्ले! मला स्वप्नपूर्तीचा आनंद मिळाला खरा, पण एक सफरचंद दहाजणांत वाटून खाण्याची गंमत हरपल्याचेही ध्यानी आले.’”

रानडे यांनी पुण्याच्या ‘विद्यार्थी गृहा’त तीन वर्षे राहून प्रींटिंगचा डिप्लोमा मिळवला. नंतर ते नाशकात येऊन छपाईची लहानमोठी कामे करू लागले. त्या दरम्यान त्यांचे लग्नही झाले होते. त्याच काळात ते सर्व संवेदनाशील नाशिककरांप्रमाणे कुसुमाग्रजांच्या संपर्कात आले.

रानडे यांचा ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’च्या विश्वस्त मंडळातील ‘अध्यक्ष’ हे पद सांभाळताना खरा कस लागत आहे. त्यातूनच त्यांच्या अनेक कल्पक योजना साकारल्या गेल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे ‘ग्रंथ तुमच्या दारी!’ हा उपक्रम. अचाट जनसंपर्काची अफाट हौस हा रानडे यांचा मोठा आवश्यक विरंगुळा आहे. माणसाच्या मनापर्यंत पोचण्यासाठी त्याच्या ‘जन्मदिनाच्या  शुभेच्छां’चे निमित्त मोठे छान असते. त्यांनी आत्मियता पोचवण्याचा तो एक मार्ग निवडला. संबंधितांपैकी प्रत्येकाला शुभेच्छा देण्याचा चंगच त्यांनी बांधला. जनसंपर्क वाढत गेला, तशा विविध कल्पनाही त्यांना सुचू लागल्या. त्यांनी शुभेच्छा देता देता लोकांना वाढदिवसाच्या दिवशी पुस्तकांचा उपयोग करा अशी कल्पना सुचवली. लोकांना ती आवडत गेली. ‘प्रतिष्ठान’कडे पुस्तकांसाठी निधी जमवण्यासाठी नाशिकमधून सुरुवात केली आणि महत्त्वाचे लोक Tap केले तर? असा विचार मनात आल्यावर रानडे यांनी त्यांचा जनसंपर्काचा डाटा अभ्यासला. त्याचे गटनिहाय वर्गीकरण केले. उदाहरणार्थ पत्रकारांचा गट, मित्रमैत्रिणी यांचा गट, नात्यागोत्यातील मंडळींचा गट अशा सर्वांशी संपर्क साधला.

या सगळ्या धडपडीतून ‘ग्रंथपेटी’ची संकल्पना समोर आली आणि ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेला प्रारंभ झाला.

योजनेची उद्दिष्टे अशी :

वाचन संस्कृतीचे पुनरुज्जीवन, वाचन संस्कृतींचे संवर्धन करणे, लोकांमध्ये संवाद वाढवणे, टीव्ही, मोबाईल, ईमेल यांमध्ये अडकत चाललेल्या नव्या पिढीला वाचनाने दिशा देणे.

योजनेचे थोडक्यात स्वरूप असे:

पस्तीस जणांच्या एका वाचकसमूहाने काम करण्यासाठी त्यांच्यातीलच एक समन्वयक (Coordinator) निवडायचा. समन्वयकाने पुस्तके वाचण्यासाठी ‘प्रतिष्ठान’कडे ग्रंथपेटी मिळवण्यासाठी अर्ज करायचा.

• प्रतिष्ठान आणि समन्वयक यांमधील कराराची कलमे अशी:

करार शंभर रुपयांच्या मुद्रांक कागदावर केला जातो. या करारात वाचकांना ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करणे, त्यांच्याकडून परत घेणे, ग्रंथ गहाळ झाल्यावर अथवा फाटल्यास त्याच्या छापील किंमतीची भरपाई करणे इत्यादी. करारपत्रात समन्वयकावरील जबाबदारीचा उल्लेख आहे. शंभर रुपयांच्या मुद्रांक कागदाचा खर्च ‘प्रतिष्ठान’ करते.

• पेटीतील शंभर पुस्तकांत अनेक साहित्यिकांचे नवे-जुने कथासंग्रह, कादंबऱ्या, नाटके, ललित लेख, अनुवादित कादंबऱ्या, आत्मचरित्रे, लेखसंग्रह असतात. वीस हजार रुपयांपर्यंत किंमतीची ती पुस्तके समन्वयकाच्या स्वाधीन केली जातात.

सहकारी बँका/ पतपेढ्या, ग्रंथ प्रकाशक या ग्रंथपेट्यांचे प्रायोजक असून काही वैयक्तिक वाचकांनी स्वत:चा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, एकसष्टी, सहस्रचंद्रदर्शन अथवा आप्तजनांच्या स्मरणार्थ अशा दिलेल्या देण्ग्यांतून या पेट्या निर्माण झाल्या आहेत.

पाचशे रुपयांपासून कितीही जास्त रकमेची देगणी स्वीकारली जाते.

‘ग्रंथपेटी वाचनालय’ सुरू करावे असे रानडे यांचे आवाहन आम जनतेला आहे. ग्रंथपेटी चार महिने एका वाचक समूहाकडे ठेवता येते. ग्रंथांची देवाण घेवाण करण्याचे ठिकाण समन्वयक आणि वाचकांच्या संमतीने ठरते. सभासदाकडून अनामत रक्कम घेण्याची मुभा आहे.

‘प्रतिष्ठान’कडे एक कोटी सत्तर लाख रुपयांची ग्रंथसंपदा जमा झाली आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, सिल्व्हासा, तामिळनाडू, कर्नाटक तसेच भारताबाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी ‘ग्रंथ तुमच्या दारी’शी संबंधित वाचकवर्ग विखुरलेला आहे.

रानडे यांची संधी न सोडणे ही खासियत आहे. त्यांची साताऱ्यात कोणाची तरी ओळख निघाली. लगेच त्यांनी काढली गाडी अन् गेले साताऱ्याला! त्या एका ओळखीवर, काही जणांना एकत्र बोलावून एक मीटिंग घेतली. योजना समजावली आणि अकरा पेट्यांसाठी देणग्या घेऊनच ते परतले! परवा तर एका गावी गेले असताना, एकाने चेक वटवायला वेळ जायला नको म्हणून अकरा पेट्यांचे रोख पैसे हातात ठेवले. हा विश्वास, हे प्रेम आणि वाचनाची निर्माण होत असणारी आवड ही रानडे यांची श्रीमंती आहे. ‘ग्रंथ तुमच्या दारी!’  या योजनेत ‘प्रतिष्ठान’ व रानडे यांना अनेक स्नेहशील माणसांचा सहवास लाभला आहे. ते ठाण्यामधील भावे दाम्पत्यांचा त्याबाबतचा दाखला देतात. त्यांच्या हाती ग्रंथपेटी सोपवल्यावर त्यांच्या घरी पुस्तक बदलण्यास आलेल्या वाचकांना केवळ पुस्तके नव्हे तर आपुलकी आणि चहा-पोहेही मिळतात. पुस्तक बदलण्याची वेळ सकाळी सहा ते रात्री दहा. या वयोवृद्ध पण तरुण मनाच्या दाम्पत्याचा वेळ आनंदात जात आहे. सोशल नेटवर्किंग इंटरनेटवर कशाला, ते घरात जितेजागते होऊन जाते. अशी अनेक उदाहरणे…

कांदिवलीतील एक गृहिणी, सरला शहा. वय वर्षें अठ्ठ्याऐंशी त्यांच्याशीही अशीच दोस्ती झाली. रानडे दर वाढदिवशी त्यांना शुभेच्छा द्यायचे. एकदा रानडे यांचा त्यांना फोन करण्याचा राहून गेला, म्हणून काही दिवसांनी त्यांनी सरलाबेनला फोन केला. त्या देवाघरी गेल्याचे कळले. घरच्यांनी सांगितले त्या तुमच्या फोनची वाट पाहत होत्या. असे चुटपूट लावणारे प्रसंगही रानडे यांच्या वाटेला आलेले आहेत.

कधी बोलता बोलता रानडे या ‘ग्रंथ चळवळी’च्या यशाचे व्यावहारिक गणित मांडतात. ‘एक वाचनालय, त्यात समजा दीड लाख ग्रंथ. वाचनालयाचे सभासद कागदावर सहा हजार. नियमित वाचक साधारण एक ते दीड हजार म्हणजे वाचली जाणारी पुस्तके एक ते दोन टक्के. म्हणजे सत्त्याण्णव टक्के पुस्तके वाचनालयात कायम विश्रांती घेत असतात. रानडे म्हणतात, ”आपली शंभर पुस्तके एका विभागात चाळीस टक्के वाचक तरी वाचत असतील. म्हणजे समृद्ध वाचनालयात वाचली जाणारी पुस्तके तीन टक्के आणि आपली कमीतकमी पस्तीस टक्के आहेत. शिवाय योजना विनामूल्य आहे.’ रानडे यांनी मांडलेले हे गणित एक गंभीर विचार करायला लावणारे वास्तव आहे.

‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेला आजवर भरघोस प्रतिसाद मिळत आलेला आहे. पेटी वाचनालायची शतकपूर्तीकडे वाटचाल होत आहे. रानडे यांच्या उपक्रमात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन यांनी मांडलेल्या पाच परिमाणांचे पालन होत आहे. ते पाच नियम असे –

१. ग्रंथ उपयोगासाठी आहेत, २. ग्रंथाला वाचक हवा, ३. वाचकाला ग्रंथ उपलब्ध व्हायला हवा, ४. वाचकाचा वेळ वाचायला हवा आणि ५. वाचकांमध्ये वाढ व्हायला हवी.

‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ आणि ‘nab इंडिया मोडक सेंटर, नाशिक’ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील एकवीस अंध शाळांना ‘बोलकी पुस्तके’ या पेट्यांचे वितरण करण्यात आले आहे. मुंबई पश्चिम विभागाच्या सहकार्याने वर्तक कॉलेज, बोरीवली येथे शंभर पुस्तकांच्या पंचवीस ग्रंथपेट्यांचे वितरण करण्यात आले आहे. मुंबई पश्चिम विभागाचे समन्वयक डॉ. महेश अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली आणि सह समन्वयक असलेले अशोक काणे, अरुण शिरस्कर, घनश्याम देटके, भाग्यश्री राव व अनेकांच्या सहकार्याने गौरवास्पद घौडदौड होत आहे. अल्पावधीतच एकशेपंचवीस ग्रंथपेट्यांचा विस्तार हे यश लक्षणीय आहे. राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या आर्थिक सहकार्यामुळे वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी कार्यरत असलेल्या या योजनेला मोलाची साथ मिळाली आहे.

असंख्य वाचक, समन्वयक, देणगीदार, सहभागी संस्था, हितचिंतक यांचा सक्रिय सहभाग योजनेला लाभत आहे. ‘अखिल भारतीय नाट्य परिषदे’तर्फे ५ नोव्हेंबर २०१६ रोजी मराठी रंगभूमी दिनानिमित्त करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात, ‘ग्रंथ तुमच्या दारी’चा ग्रंथसेवेबद्दल विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

त्‍या सगळ्या घौडदौडीमागे विनायक रानडे आणि त्यांच्या चमूचे अथक परिश्रम आहेत. प्रसंगी पदरमोड करत स्वत:चा वेळ, कष्ट कशाचीही तमा न बाळगता गाडीत ग्रंथपेट्या घालून रानडे स्वत: त्या मुक्कामी पोचवत असतात. या योजनेच्या अनुषंगाने ते अनेक छोटे- मोठे उपक्रम हाती घेत असतात. उदाहरणार्थ,  ‘ग्रंथ तुमच्या दारी’ मुंबई विभागाचे समन्वयक आणि देणगीदार यांच्यासाठी ९ मे २०१५ रोजी गोखले सभागृह, ‘महाराष्ट्र सेवा संघ’, मुलुंड येथे गेट टूगेदर आयोजित करण्यात आले होते. अनेक संबंधितांनी आपले अनुभव कथन केले. त्यानंतर उपस्थित देणगीदार आणि समन्वयक यांचा सत्कार करण्यात आला.

एकदा,  ‘ग्रंथपेटीने मला काय दिले ?’ हा विषय देऊन निबंधस्पर्धा आयोजित केली गेली. विकास कॉम्प्लेक्स, ठाणे येथून म. वि. कुंटे यांनी त्यांच्या निबंधात लिहिले आहे –

‘या योजनेत सहभागी झाल्यापासून मला ग्रंथ आणि साहित्याचा मोठा खजिना उपलब्ध झाला. माझ्या वृत्तीत फरक पडू लागला आहे. मी गूढ तत्त्वज्ञानाचे सार समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मुख्य म्हणजे वाचन वाढल्यामुळे मला विचार व्यक्त करायचा आत्मविश्वास मिळाला आहे.’

‘ब्रह्मांड, ठाणे’ येथून उषा भालचंद्र येवले यांनी त्यांच्या निबंधात लिहिले आहे –

‘वाचनाचे महत्त्व आपण सगळेच जाणतो पण प्रत्येक वेळेला पुस्तक खरेदी करणे शक्य नसते. वाचनालयही जवळ नसते तेव्हा या योजनेचे आमच्यासारखे वाचक मनापासून स्वागत करतात. दर तीन महिन्यांनी पेटी बदलली जाते. पेटीत विविध विषयांवरील शंभर पुस्तके असतात. आम्ही आमच्या ‘मायबोली महिला मंडळा’त ‘मी वाचलेले पुस्तक’ या विषयावर दर महिन्याला चर्चा करतो.’

‘मित्तल पार्क, रघुनाथ नगर ,ठाणे येथून उषा गायकवाड यांनी त्यांच्या निबंधात लिहिले आहे –

आजच्या धावपळीच्या जीवनात ग्रंथपेटीमुळे पुस्तके सहज उपलब्ध होत आहेत. ‘हु किल्ड करकरे ?’ या पुस्तकातून अतिरेकी हल्ल्यामागील एक झगझगीत वास्तव समोर आले. ‘सावरकर’ आणि ‘कुसुमाग्रज’ या दोन ‘तात्यां’ची नव्याने ओळख झाली. वीणा गवाणकरांचा ‘कार्व्हर’ मला येथेच भेटला. जीवनाच्या अनेक पैलूंचा उलगडा मला या पुस्तकांमुळे झाला.

याशिवाय अनेक अप्रत्यक्ष फायदे झाले. ‘फ्लॅट’ संस्कृतीमुळे कमी झालेले संपर्क वाढले. शेजारीपाजारी भेटू लागले. सुख-दु:खांची देवाणघेवाण होऊ लागली. तरीही एक खंत जाणवते आहे. आमच्या पिढीप्रमाणेच पुढच्या पिढीपर्यंत ही पुस्तके अजून पोचत नाहीत. साहित्यातून होणारे संस्कार त्यांच्यावरही होतील तेव्हाच ग्रंथपेटीचे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य होईल.

काही जणांनी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या योजनेमुळे उतारवयातील एकटेपणा दूर गेला असे म्हटले आहे. म्हणजे ज्यांच्यासाठी ही योजना राबवली जाते त्या वाचकांना या ग्रंथपेट्या उदंड आनंद देत आहेत.

मुंबईतील आर्थर रोड कारागृहातही ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’च्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेच्या ग्रंथपेट्या पोचल्या आहेत. तेथील कैदीसुद्धा विनासायास त्यांची जिज्ञासा पुरी करू शकतात. नाशिक, येरवडा, नागपूर येथील कारागृहांमध्येही ग्रंथपेट्या पोचल्या आहेत.

‘माझे ग्रंथालय, बालविभाग’ हा योजनेचा एक विशेष भाग आहे. अलीकडे ‘मुले पुस्तके वाचत नाहीत’ म्हणत असतानाही या ‘बालविभागा’ला उदंड प्रतिसाद मिळत आहे. इयत्ता दुसरी ते आठवीच्या मुलांसाठी असलेला हा बालविभाग. ग्रंथपेटीत पंधरा मराठी आणि दहा इंग्रजी अशी एकून पंचवीस पुस्तके असतात. दर दोन महिन्यांनी ती आपापसांत बदलली जातात. साहित्याचा खजिना असलेली फिरती ग्रंथपेटी मुलांना वाढदिवसाला भेट देण्यासाठी उत्तम असते.

योजनेचा विस्तार वाढवत मराठी वाचकांपर्यंत ग्रंथपेट्या पोचवणे ही आता रानडे यांची सवय झाली आहे. ‘ग्रंथ निघाले’ या शीर्षकाखाली ते whtsapp वर पोस्ट टाकतात, ती वाचल्यावर कळते, की हे ग्रंथ भारताबाहेर जायला निघालेले आहेत. ‘प्रतिष्ठान’च्या वाटचालीचे यश अर्थात फक्त ग्रंथपेट्यांवर अवलंबून नाही. ‘नक्की या !’ अशी  रानडे यांची पोस्ट वाचली, की एखाद्या नवीन कार्यक्रमाचे जिव्हाळ्याचे आमंत्रण असणार हे नक्की झाले आहे. एखाद्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने किंवा स्वतंत्रपणे ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठाना’त अनेक कार्यक्रम सादर होत असतात. त्याची एक झलक –

 

‘आज नक्की या
संध्याकाळी सहा वाजता
कुसुमाग्रज स्मारक नाशिक येथे
‘प्रकाशयात्रा आठवणींची’

दीपावली २०१६:- नाशिक शहराचा सांस्कृतिक वारसा तसेच, कला जोपासण्यासाठी कार्यरत असलेल्या आणि मोलाचे योगदान देणाऱ्या अनेक संस्था आहेत. या संस्थांच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या दिवंगत व्यक्तींच्या स्मृतींचा एक आकाशकंदील व एक पणती उजळूया…’

कधी प्रवीण दवणे यांच्याशी दिलखुलास गप्पा, तर कधी ‘वाचण्याची कला’ या विषयावर संजय भास्कर जोशी यांचे प्रात्यक्षिकांसह विशेष सत्र. कधी ‘कोजागिरी’निमित्त विशेष कार्यक्रम तर कधी अच्युत गोडबोल्यांचे व्याख्यान. निमित्तांचा उत्सव नाहीतर सोहळा करणे रानडे यांना चांगले जमते.

विनायक रानडे – 99 22 22 5777 (What’s up – 9423972394)
vinran007@gmail.com
‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’, तरण तलावामागे, टिळकवाडी, नाशिक- ४२२००२, महाराष्ट्र.

– अलका रानडे-आगरकर

Last Updated On – 24th Dec 2016

About Post Author

7 COMMENTS

  1. Aamchya society madhey
    Aamchya society madhey (Vijaynagar society, Andheri) yethe 5 granth petya aahet… Kharach eak khup Chan upkram… Thanks & Regards

  2. लेख वाचून फार बरे वाटले ,
    लेख वाचून फार बरे वाटले ,

  3. Ek sunder upkram.

    Ek sunder upkram.
    Mi dadar la rahate.
    Mumbai group cha sampark no. Milel ka.
    Dadar vibhagat koni ahe ka granth peti cha group.
    Khup aavdel group madhe samil hota yeil

  4. धन्यवाद , मुंबई येथे ग्रंथ
    धन्यवाद , मुंबई येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेत सहभागी होण्यासाठी मुंबई समन्वयक डॉ महेश अभ्यंकर 9820450986 यांच्याशी संपर्क साधावा

  5. अप्रतिम उपक्रम

    अप्रतिम उपक्रम
    आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला माणूस जोडणारा उपक्रम

  6. अलकाताई,खुपचछान.VanRan 007=
    अलकाताई, खुपच छान. विनायक रानडे सर! नाशिक मध्ये माझीमुलगी +”कुसुमाग्रज” माझेplus point! सरांचीही ओळख झालिये.खुप सविस्तरपणे वाचायला मिळाले धन्यवाद! मलाही बालग्रंथपेटीत माझ्या “Vrukshraj aamha सगेसोयरे” ही पुस्तिका, सामील करायची ईच्छा आहे मी प्रतिष्ठानकडे लेखी विनंती केली आहेही बालनाटिका पुणे आकाशवाणी वर सादर झाली आहे.उपक्रमाबद्दल शतशः धन्यवादच! !!!!!!

  7. कृपया मला गोरेगाव मुंबई इथे…
    कृपया मला गोरेगाव मुंबई इथे ग्रंथ मिळतील का, इथे कोणाकडे ग्रंथ पेटी आहे कळावे.. मी अभिनेता आहे अणि मला ही योजना खूप आवडली 9822614465 मला गोरेगाव मधील पेटी संदर्भात माहिती मिळावी

Comments are closed.