गौतम गवईची कारखानदारी

1
18
_GautamGavaichi_Karkhandari_1.jpg

मी ‘साहित्यकुंज’ संघ स्थापन करून त्याअंतर्गत दर सहा महिन्यांनी नवोदितांसाठी ‘काव्य-लेख-कथा’ स्पर्धा आयोजित करत असे. त्यातील निवडक साहित्य घेऊन ‘साहित्यकुंज’ अनियतकालिकाचे अर्धवार्षिकांक दर दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रसिद्ध करत असे. माझ्याकडे बरीचशी मुलेमुली त्यांच्या कथा, कविता वा लेख घेऊन येत. मी माझ्याकडे ‘विद्यार्थी साहित्य मेळावा’ दर तीन महिन्यांस आयोजित करत असे. आम्ही मेळाव्यात एकमेकांच्या साहित्यावर चर्चा करायचो.

एकेदिवशी, संध्याकाळी बेल वाजली. मी दरवाजा उघडला. बघतो तर समोर एक ठेंगणाठुसका, काळासावळा मुलगा उभा होता. त्याने मला बघितल्याबरोबर भीतभीतच बोलण्यास सुरुवात केली. ‘सर, मी गौतम गवई. नॅशनल हायस्कूलमध्ये बारावीत (आर्ट्स) शिकतो.’

‘ये.’ मी त्याला आत घेत म्हटले, ‘बस’, कसा काय आलास माझ्याकडे?’

‘सर, मी माझ्या कविता तुम्हाला दाखवण्यास आणल्या आहेत.’ तो म्हणाला.

‘ठीक आहे, दाखव तुझ्या कविता.’ मी खुर्चीवर बसत त्यालाही बाजूच्या खुर्चीवर बसण्यास सांगितले.

त्याने त्याची कवितांची वही आनंदाने उघडून पहिली कविता माझ्यासमोर धरली. माझे लक्ष त्याच्या हातांवर त्यावेळी गेले. तो करत असलेल्या कामाचे घट्टे त्याच्या तळहातांवर पडलेले होते. मी तो काहीतरी जड काम करत असावा असा अंदाज केला. मी त्याला विचारले ‘तू काय करतोस? तुझ्या तळहातांवर हे कशाचे घट्टे पडले आहेत?’

तो थोडासा खजील झाला. त्याने वही माझ्यासमोर ठेवली व त्याचे हात मागे घेतले. मी त्याला तोच प्रश्न पुन्हा केला. तो काही सांगत नव्हता. मी त्याला खोदून खोदून विचारल्यावर ‘सर, मी दररोज सकाळी शाळा भरण्याआधी व शाळा सुटल्यानंतर सायंकाळी गिट्टी खदानवर गिट्टी फोडण्यास जात असतो.’ त्याने चाचरत उत्तर दिले.

माझे मन ते ऐकून सुन्न झाले. मी त्याच्या कविता काहीशा अस्वस्थतेने वाचण्यास सुरुवात केली. कविता बारावीच्या मानाने चांगल्या होत्या. आमची चर्चा त्याच्या कवितांवर झाली. तो त्यानंतर वारंवार सायंकाळी माझ्याकडे येऊ लागला.

एका संध्याकाळी तो म्हणाला, ‘सर, मी तुमच्याकडे दररोज रात्री अभ्यास करण्यास येत जाऊ काय? गिट्टी खदानवर टिनाच्या लहानशा खोलीत झोपण्यास जागाही नसते, रात्री थंडी खूप वाजते व अभ्यास होत नाही.’

‘तू खदानवरच राहतो काय?’ मी त्याला विचारले असता, ‘हो सर, आम्ही सारे तेथेच राहतो.’ असे तो म्हणाला.

मला त्याच्या परिस्थितीची कल्पना आलेली होतीच. मी त्याला ‘हो’ म्हटले. त्याचा चेहरा आनंदला. तो दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता एक फाटकी गोधडी व मळकी चादर घेऊन आला. मी काहीच न बोलता त्याला माझ्या स्कूटरवर बसवले, गावात नेले आणि त्याच्यासाठी एक नवीन ब्लँकेट व चादर विकत घेतली. घरी आल्यावर, मी माझ्याच खोलीत माझ्याकडे शिल्लक असलेली गादी त्याला अंथरण्यास सांगितली व ते ब्लँकेट आणि चादर पांघरण्यास दिली. त्याने आधी ‘नाही, नाही’ म्हटले, पण मी त्याला थंडीने तब्येत कशी बिघडू शकते आणि त्याच्या आरोग्यावरच त्याचे अभ्यासाचे यश कसे अवलंबून आहे हे समजावून सांगितले. त्याने शेवटी ती गादी अंथरली, ब्लँकेट-चादर पांघरली आणि तो त्याच्या अभ्यासास बसला. मी माझी आंघोळ दुसऱ्या दिवशी सकाळी झाल्यावर पूजेला बसलो, तर तो दूर जाऊन बसला. मी त्याला तसे करण्याचे कारण विचारले, त्याने त्याला संकोच वाटला होता असे सांगून, मला त्याच्या जातीची कल्पना दिली. ‘तुझ्या जातीची कल्पना मला तुझ्या आडनावावरून आधीच आलेली आहे. तू काहीच संकोच करू नकोस. येथे मनमोकळेपणाने राहा व तुझा अभ्यासकर. मी जरी पूजा करणारा असलो तरी मी खुळ्या बाबींना मानत नाही. तू माझ्याजवळ येथे येऊन बसू शकतोस.’ असे म्हटल्यानंतर तो मोकळेपणाने वागू लागला. तो त्याचा अभ्यास दररोज माझ्या मार्गदर्शनाखाली मन लावून करू लागला.

मी काही जणांना आसरा अशा प्रकारे पूर्वीही दिला होता. त्यांचे व माझे राहणे व झोपणे एकाच खोलीत असल्याने काहींनी माझ्या खिशाला चाटही मारली होती. परंतु गौतमने कधीच माझ्या खिशाला हातही लावला नाही. मी त्याला त्याने त्याच्या अडीअडचणींत मागितल्याप्रमाणे आर्थिक मदतही करू लागलो. तो अभ्यासासाठी दररोज रात्री येत गेल्याने थोड्याच दिवसांत आमच्यात भावाभावाचे विश्वासाचे नाते निर्माण झाले. मी माझ्या घराची एक चावीच त्याच्याकडे दिली. तो बारावी पास होऊन, तीन वर्षांत पदवीधर झाला आणि नोकरी शोधू लागला. परंतु त्याच्याजवळ एसटीच्या भाड्यासाठीसुद्धा पैसे नसायचे. त्याने त्याचे नोकरी शोधण्याचे मार्गक्रमण माझ्याजवळून वेळोवेळी गरजेनुसार पैसे घेत सुरू ठेवले. त्याला नोकरी पत्रकाराची तात्पुरती अनेक टक्केटोणपे खात माझ्या मार्गदर्शनाने एका वर्तमानपत्रात तुटपुंज्या पगारावर मिळाली. तो रात्रीबेरात्री माझ्याकडे यायचा; माझी झोपमोड होत गेल्याने थोडासा ओशाळायचाही. पण मीच त्याला समजावून सांगायचो व त्याचा ओशाळलेपणा दूर करायचो.

त्याच्याच राखीव जातीची कारकुनाची एक जागा एकदीड वर्षांने खामगावातील एका महाविद्यालयात निघाली. आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्याचे नोकरीचे काही तेथे जमले नाही. तो हताश झाला, खचून गेला. त्याला जीवनात रस नाही असे वाटू लागले.

‘गौतम, असे निराश होऊन कसे चालेल? तू जरी आज लहान आहेस तरी एका दिवशी खूप महान होशील. तसे महान बनण्यासाठी ईश्वराने तुला ही कारकुनाची नोकरी दिली नाही. देव करतो ते भल्यासाठी!’ असे मी त्याला समजावून सांगत त्याच्या मनावरील निराशेचे मळभ दूर केले; त्याच्यात नवीन उत्साह निर्माण केला, त्याला हिंमत दिली आणि तो आवश्यकतेनुसार माझ्याजवळून पैसे घेत, चांगल्या नोकरीच्या शोधात पुन्हा फिरू लागला.

त्याला मुंबईत एका नामांकित वृत्तपत्रात चांगल्या पगारावर पुन्हा पत्रकाराचीच नोकरी खूप महत्प्रयासाने, आधीच्या पत्रकारितेच्या अनुभवामुळे मिळाली. त्याने त्यातून माहिती घेत, शासकीय योजनांतून कर्ज घेत, मेहनत करत खामगावात कारखाना उभारला. गौतम खामगाव येथे एका कारखान्याचा मालक बनला आहे. नोकरीसाठी उपाशीतापाशी वणवण फिरणाऱ्याने अनेक बेरोजगार हातांना त्याच्या कारखान्यात काम दिले आहे. तो गरिबांना मदत करत आहे. माझाही ऊर त्याची प्रगती बघून आनंदाने भरून येतो.

-प्रा. देवबा शिवाजी पाटील

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.