गोहराबाई कर्नाटकी –शताब्दी आली तरी उपेक्षाच!

बालगंधर्व हे महाराष्ट्राचे दैवत त्यांची प्रेयसी आणि नंतरची बायको गोहराबाई कर्नाटकी हिला कर्नाटकात प्रतिगंधर्व म्हणत. परंतु महाराष्ट्रात मात्र तिचा द्वेष करत. गोहराबांईची शताब्दी चालू आहे. या निमित्ताने कन्नडमध्ये रहमत तरीकेरी या संगीत अभ्यासकाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. प्रशांत कुलकर्णी यांनी सादर केलेला त्याचा अनुवाद

सोबत, मराठी गोहराबाई यांच्याबद्दलचा द्वेष काय प्रकारचा होता हे दर्शवणारी बाळ सामंत-शंकर पापळकर संवादाची झलक (पुनर्मद्रित)…

गोहरा-बालगंधर्व यांच्या संबंधांचे स्वरूप कसे असेल हे सांगणे कठीण आहे. त्यांच्या दोघांच्या फोटोमध्ये कोट घातलेल्या आणि डोक्याला फेटा गुंडाळलेल्या पुरुषी वेशामध्ये गोहराबाई आहेत आणि बाजूला बालगंधर्व स्त्रीवेशामध्ये आहेत. गोहरा-बालगंधर्व संबंध दैहिक, प्रेमिक की कलात्मक होते हे सांगणे कठीण आहे. ते आपल्या समाजामध्ये प्रचलित असलेले आध्यात्मिक असावेत.

अपूर्व नाट्य अभिनेत्री, गायिका गोहराबाई कर्नाटकी यांच्या निधनानंतरसुद्धा, त्यांना त्यांच्या प्रतिभेनुसार गौरव प्राप्त झाला नाही. गोहराबाई (१९१०-१९६७) ह्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे; तर कोणास त्यांची आठवणही राहिलेली दिसत नाही.

बेळगीच्या भगिनी

अमीरबाई कर्नाटकी आणि गोहराबाई कर्नाटकी या दोघी बहिणी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला नावाजलेल्या गायक-नट्या होत्या. मी अमीरबाई ह्यांचे जीवनचरित्र लिहिले होते. त्यासाठी मी त्यांचा परिचय असलेल्या व्यक्तींकडे, शोध घेत बेळगी, धारवाड, हुबळी, विजापूर, पुणे आणि मुंबईपर्यंत गेलो होतो. मुंबईमध्ये अमीरबाईंच्या गायकीचे अभ्यासक आणि हिंदुस्तानी संगीताचे जाणकार प्रकाश सी. बुरडे ह्यांच्याबरोबर चर्चा करायची होती. ते अमीरबाईंबद्दल आत्मीयतेने बोलले. गोहराबाईंबद्दल बोलताना मात्र त्यांची जीभ कडवट झाली. गोहराबाईंबद्दल काही मराठी लोकांत अनादर दिसून आला होता. मी प्रकाश यांना परत परत विचारले असता त्यांनी लिहिलेला लेख मला वाचायला दिला. त्याचा शेवटचा भाग असा होता:

'प्रतिगंधर्व अशी प्रसिद्धी मिळालेल्या गोहराबाईंना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या बालगंधर्वांच्या प्रेक्षकांनी आणि हितचिंतकांनी, गोहराबाईंकडे पूर्ण दुर्लक्ष का केले असावे? गोहराबाई कर्नाटकच्या होत्या म्हणून की मुस्लिम होत्या म्हणून? की त्यांनी अमाप कीर्ती मिळवून, चित्रपटांत भूमिका करून, दिवसरात्र बालगंधर्वांच्या बरोबर तीस वर्षे सावलीसारखी सोबत केली म्हणून?'

बुरडे स्वत: कन्नड भाषिक आहेत. त्यांनी प्रगट केलेली व्यथा मला बोचून गेली. कन्नड रंगभूमीवरून आलेल्या कलाकारांनी मराठी रंगभूमीवर आपले जीवन अर्पण करूनसुद्धा त्यांना मराठी लोकांनी आपलेसे का केले नाही, याचे मला कुतूहल वाटू लागले. गतकाळाचा शोध घेता घेता, तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि रंगभूमी यांचे अवलोकन केले असता, किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये, गोहराबाई यांची प्रतिभा, त्यांची महत्त्वाकांक्षा, हट्ट समजून घेतले गेले?  कन्नड संत महादेवीअक्का यांना, स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी परिस्थितीचा मोठा सामना करावा लागला. मला वाटते, की गोहराबाईंचे आयुष्य तसेच खर्ची पडले. त्यांच्या ह्या स्वभावामुळे गोहराबाईंनी एकेवेळी कीर्ती भोगली पण नंतर, त्यांना वाईट दिवस पाहवे लागले!

अनेक गोहर

गोहर नावाच्या अनेकजणी कलाक्षेत्रात होऊन गेल्या आहेत. उदाहरणार्थ, म्हैसूर दरबारात हिंदुस्तानी संगीत गाणारी कोलकात्याची गोहरजान(१८७३-१९३०); पारशी रंगभूमीवरील कलाकार गोहरजान; मुंबईच्या रणजित फिल्म्स स्टुडिओच्या गायक-नटी गोहरा ह्या पहिल्या आणि गोहराबाई कर्नाटकी हे नाव सांगणा-या कर्नाटकाची कन्या त्याच. गोहराबाई हिंदुस्तानी पद्धतीच्या संगीत-गायक कलाकारही होत्या. त्या अमीरबाई ह्यांच्यासारख्या सुंदर नव्हत्या, पण तीक्ष्ण कटाक्ष असलेले डोळे हे त्यांचे आकर्षण होते. ह्या दोन बेळगी भगिनींपैकी अमीरबाई अधिक प्रसिद्धी पावल्या, कारण त्या चित्रपटासारख्या प्रभावी आणि प्रसिद्ध माध्यमात काम करत होत्या. उलट, गोहराबाई चित्रपटांइतके प्रभावी माध्यम नसलेल्या प्रादेशिक रंगभूमीमध्ये गुरफटून गेल्या आणि त्यांचे मराठी रंगभूमीवर दंतकथा बनलेल्या नारायण राजहंस ऊर्फ बालगंधर्व ह्यांच्यावर प्रेम बसले! त्यांचे. बालगंधर्वांचे अनुकरण करून, गंधर्व कंपनीमध्ये शिरून, शेवटी, त्या बालगंधर्वांच्या जीवनसाथी बनल्या. त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक रोमांचकारी घटना घडल्या; तसेच, अनेक अपमानित करणारे, दुःखी करणारे प्रसंग येऊन गेले. ती आणखी दुसरीच शोककथा आहे!

कलेसाठी पोषक परिसर

त्या काळच्या मुंबई प्रांताचा भाग असलेल्या विजापूर जिल्ह्यातील बेळगीमध्ये गोहराबाई जन्मल्या. त्यांचे वडील हुसैनसाहेब बेळगी स्वतः रंगभूमी कलाकार होते. त्यांची स्वतःची नाटक कंपनी होती. ती फार काळ चालली नाही. नाट्यसंगीतात चांगले नाव कमावलेले बेऊरचे बादशाह मास्तर हे गोहराबाईंचे सख्खे मामा होते.  ते ज्येष्ठ रंगभूमी कलाकार येलागी बाळप्पा बादशाह मास्तरांचे शिष्य.  बुवा बादशाह मास्तर यांनी गोहराबाईला शिक्षण दिले असण्याची शक्यता आहे. गोहराबाई बेळगीच्या कलाक्षेत्रात प्रसिद्धी पावण्यासाठी अजून एक कारण असे, की त्यावेळी विजापूरच्या आसपास रंगभूमी बहराला आलेली होती. शिवमुर्थी कणबुर्गी मठ, गरुड सदाशिवराव, शीरहट्टी व्यंकोबाराय, वामनराव ह्यांच्यासारखे लोक त्यांच्या त्यांच्या नाटक कंपन्यांमधून सर्वत्र पसरले होते. त्या बरोबर विजापूरच्या लोकरंगभूमीवर जन्म पावलेल्या 'कृष्ण-पारिजात' मध्ये बहुतांशी मुस्लिम कलाकार काम करत होते. लोककवी आणि गायक तळेवाडचे नबी त्यांच्या राधेच्या नाटकामुळे ख्यातनाम झाले होते. पुढे, 'कृष्ण-पारिजात' नावाचा दशावतारासारखा लोकप्रिय प्रकार कन्नडमध्ये आहे. त्यामधील कलाकार अप्पालाल नंदाघर व इतर बेळगी भगिनींच्या गाण्याच्या प्रभावाखाली गात.

अशा परिसरामध्ये गोहराबाईंचा ठसा उमटत गेला. गोहराबाईंचे कलाजीवनसुद्धा त्यांच्या भगिनी अमीरबाई ह्यांच्याप्रमाणे, कन्नड रंगभूमीपासून सुरू झाले. गोहराबाईंनी गदगच्या यरासी भाराम्प्पा ह्यांच्या वाणिविलास संगीत नाटक मंडळीमध्ये गायक-नटी म्हणून आपले जीवन सुरू केले. वाणिविलास कंपनीच्या 'कित्तूर रुद्रम्मा' नाटकात त्या रुद्रम्माची भूमिका करत. त्या नंतर त्यांनी कुंदगोळ हणमंतराय यांच्या कंपनीमध्ये सुद्धा काम केले असावे. गोहर यांचा अभिनय पाहिलेले हुबळीचे ज्येष्ठ अभिनेते वसंत कुलकर्णी यांच्या म्हणण्याप्रमाणे, कुंदगोळ केव्हाही गोहर यांनाच नाटकात घ्यायचे. त्यांच्या 'वरप्रदान' नाटकातील ललिता या पात्रामुळे त्यांची ओळख झाली. विजयनगर राज्याची कथावस्तू असलेल्या 'वरप्रदान' नाटकात ललिताचे पात्र गोधचारिणीचे होते. गोहर ह्यांचा त्या वेळेस रंगभूमीवर काम करणा-या मल्लिकार्जुन मन्सूर आणि बसवराज मन्सूर ह्यांच्याबरोबर परिचय होता. त्यांनी बसवराज मन्सूर यांच्या 'कलाप्रकाश नाट्यसंघ कंपनी' मध्येसुद्धा काम केल्याचे दिसून येते.  म्हैसूरच्या पद्मा श्रीराम ह्यांच्या आठवणीप्रमाणे, गोकाकच्या एका कंपनीच्या 'मानवती' नाटकात गोहरने मानमतीचे काम केले होते. त्या मोठ्या आवाजात संवाद म्हणायच्या.

कन्नड नाट्यगीते

त्यांचे रंगभूमीवरील काम पाहिलेले कोणी राहिलेले नाही. आढळतात ती फक्त त्यांनी गायलेली रंगभूमीवरील गाणी. गोहर कन्नड नाट्यगीते अदभुत रीतीने गायच्या.  'कित्तूर रुद्रम्मा' नाटकातल्या 'ना पेलुवे निनोगोडूपाया तारावाल्ली नेनागे अपमान मारुली आत्महत्यीडू महापापवे' ह्यासारखे गीत हे त्यांतलेच. एचएमव्ही कंपनीने काढलेले, ७८ आरपीएम मुद्रिकेमध्ये असलेले त्यांचे गीत लोकप्रिय झाले होते. हे गीत त्यांच्या गायकीची साक्ष आहे. गोहर यांनी कन्नडमध्ये अजून कितीतरी गीते गायली असण्याची शक्यता आहे. त्या बालगंधर्वांच्या शैलीमध्ये गायच्या.

मराठी रंगभूमीशी संपर्क

उत्तर कर्नाटकात त्या वेळेला मराठी रंगभूमीचे आकर्षण होते. ह्यास अनेक कारणे होती:

१. विजापूर जिल्ह्यापर्यंतचा भाग त्या वेळी मुंबई प्रांतात सामील होता. त्यास मुंबई-कर्नाटक असे म्हटले जायचे. (काही जण त्यास दक्षिण महाराष्ट्र असे म्हणतात). ह्यामुळे उत्तर कर्नाटकातील नाट्यकलाकार, चित्रपटकलाकार, संगीतकार, अभ्यासक यांचा जास्त संपर्क पूर्वीच्या म्हैसूर राज्याच्या ऐवजी पुणे, नाशिक, कोल्हापूर यांसारख्या गावांबरोबर सहज येई. गंगुबाई हंगल, भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मन्सूर, बसवराज राजगुरू, कुमार गंधर्व ह्यांच्यासारखे हिंदुस्तानी शास्त्रीय गायकही विजापूर परिसरात उत्कर्ष पावले आणि ते जास्तीत जास्त कार्यक्रम त्याच भागात करत होते. कन्नड भाषेतील चित्रपट म्हैसूर-कर्नाटकात तयार होत, परंतु त्यांचे केंद्र मात्र मद्रास आणि कोईमतूर या ठिकाणी होते. म्हैसूरच्या चित्रपट आणि नाटक या क्षेत्रांमध्ये कर्नाटक शास्त्रीय संगीत प्रभावी होते, तिथे हिंदुस्तानी शास्त्रीय गायकांना जास्त संधी नव्हत्या. उत्तर कर्नाटकातील हिंदू-मुस्लिम संस्कृतीमधून आणि संगीत व लोकसंगीतातून तयार झालेल्या तेथील कलाकारांचे दक्षिण कर्नाटकातील रंगभूमी आणि चित्रपटांबरोबर एवढे जमले नाही, त्यामुळे ते कलाकार त्यांची सांस्कृतिक आणि भाषिक जवळीक असलेल्या हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांकडे आकर्षले गेले. त्यामुळेच ह्या भागातल्या व्ही. शांताराम, शांता हुबळीकर, लीला चिटणीस, सुमन कल्याणपूर, लीना चंदावरकर यांसारख्या प्रतिभावान कलाकारांनी मुंबईकडे धाव घेतली. तीच वाट बेळगीच्या भगिनींनी चोखाळली.

२. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उत्तर कर्नाटकातील नाटक कंपन्या मराठी नाटक कंपन्यांकडे पाहून उत्कर्ष पावल्या. स्वतः गोहरबाई काम करत असलेली यरासी भाराम्प्पा यांची कंपनी मराठी नाटके कन्नडमध्ये अनुवाद करून बसवत असे. त्याच काळात वामनरावांची विश्वगुणदर्श कंपनीसुद्धा मराठी नाटकांचे अनुवाद करून प्रयोग बसवत होती. त्यामुळे मराठी रंगभूमीच्या गाण्यांच्या धाटणीवर कन्नड नाट्यगीते गाणे ही बाब सर्वसामान्य समजली जाई. त्याचबरोबर, मराठी नाटक कंपन्या विजापूर, बेळगाव, हुबळी-धारवाड या भागात दौरे करायच्या. त्यांचासुद्धा दीर्घ इतिहास आहे. तो एकोणिसाव्या शतकात किर्लोस्कर कंपनीपासून आरंभ झाला. अण्णासाहेब किर्लोस्कर मूळचे कर्नाटकाचे. त्यांनी मराठी रंगभूमी निर्माण केली कर्नाटकात, तीच मुळी कन्नड रंगभूमीच्या प्रभावामुळे. त्यांची कंपनी उत्तर कर्नाटकात मुक्काम ठोकून असे. इतर मराठी नाटक कंपन्यासुद्धा तिथे मुक्काम करायच्या. पुढे, बालगंधर्वांची नाटक कंपनीही त्या भागात दौ-यावर येत असे. ह्या नाटक कंपन्या मराठी तसेच कन्नड भाषिकांमध्ये सुद्धा लोकप्रिय होत्या. गंधर्व कंपनीचे हुबळीच्या सिद्धारूढ मठाबरोबर जवळचे संबंध होते. सुरुवातीच्या कन्नड नाटककारांपैकी रामचंद्र यांचे ‘जेथे पाहवे तेथे मराठी कलाकारांचे अस्तित्त्व होते’ हे, मराठी रंगभूमीच्या सांस्कृतिक प्रभावाबद्दलचे वाक्य या गोष्टीचे प्रमाण आहे. गोहर ह्यांच्यासारख्या स्थानिक प्रतिभावंत कलाकाराचा मराठी रंगभूमीवरील प्रवेश या परिस्थितीमध्ये झाला.

चित्रपट कलाकार गोहरा

गोहरा यांनी मराठी नाटक कंपनीमध्ये जाण्यापूर्वी हिंदी चित्रपटांमधून काम केले.

त्या १९३२च्या सुमारास मुंबईला गेल्या. गोहरायांना चित्रपटांमधून काम करायला सांगणारे होते कृष्णराव चोणकर. ते गंधर्व नाटक कंपनीमध्ये नट होते. कृष्णराव चोणकर यांनी गोहरा यांना चित्रपटविश्वाची नुसती ओळख करून दिली नाही तर त्यांनी स्वतः त्यांच्याबरोबर काम केले. शारदा फिल्म्स कंपनीचा 'रासविलास' हा गोहरा यांचा पहिला चित्रपट. गोहरा यांनी नानुभाई वकील यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांमधून अधिक काम केले. त्यांचा उल्लेख त्या वेळेला महिन्याला तीनशे रुपये मिळवणारी गाणारी नटी असा आढळतो. त्यांनी सुमारे पंधरा चित्रपटांमधून काम केले; उदाहरणार्थ, रासविलास(१९३३), रंभाराणी(१९३३), गरीब का प्यार(१९३५), बुर्खावली(१९३६), गीला निशान(१९३७), सिंहलद्वीप की सुंदरी(१९३७), गुरुघांटाल, काला भूत, कुलदीपक, तारणहार. हे चित्रपट फार महत्त्वाचे नाहीत. त्यानंतर बालगंधर्व यांच्याकडे आकृष्ट झाल्यामुळे गोहरe यांनी चित्रपटसृष्टीला राम-राम केला आणि त्या मराठी रंगभूमीवर प्रवेश करत्या झाल्या.

गोहरा गायिका झाल्या

गोहर लहानपणापासून बालगंधर्वांच्या गायनाकडे आकर्षल्या गेल्या होत्या. विजापूरमध्ये जेव्हा गंधर्व कंपनी मुक्काम करत असे, तेव्हा गंधर्वांची गाणी ऐकून त्यांच्या मनात बालगंधंर्वांबद्दल सुप्त आकर्षण होऊ लागले. त्यावेळेला बालगंधर्वांच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका कोलंबिया कंपनीने काढल्या. गोहरा त्या ऐकून त्यांच्या शैलीत गाण्याचे शिकल्या. अनागी बालप्पासुद्धा म्हणतात, की गोहरा बालगंधर्वांचे अनुकरण करून गायच्या. त्यामुळे मराठी लोकांनी त्यांना प्रतिगंधर्व असे नामाभिधान देऊन टाकले होते. पुढे, त्यांच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका एचएमव्ही कंपनीने काढल्या. त्यांचे 'वैकुंठाचार्य' नावाचे सुरुवातीचे नाट्यगीत प्रसिद्ध झाले होते. गोहरा यांनी मराठी-बंगालीमध्ये गायलेली पट्टी खूप जास्त असे.

पुढे, गोहर यांच्या जीवनातील मुख्य ध्येय गंधर्व कंपनीमध्ये जाणे हेच झाले. त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कुतूहल जागवणारे आहेत. त्या १९३२-३४च्या अवधीत दररोज रात्री गंधर्व कंपनीच्या नाटकांना जाऊन पहिल्या रांगेत बसायच्या.  नाटकांच्या मध्यंतरात गंधर्वांची भेट घेण्याचा प्रयत्न करायच्या. शेवटी, त्या गंधर्व कंपनीत शिरल्या. त्या गंधर्व कंपनीत कशा शिरल्या याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत:

१. विजापूरमधील त्यांचा मुक्काम सोडण्याआधी बालगंधर्वांनी गोहरा यांची प्रतिभा ओळखून, त्यांना कंपनीमध्ये बोलावून घेतले.

२. विजापूरच्या प्रसिद्ध सर्कस आणि नाटक कंपनीचे मालक, त्रिपुरसुंदरी टॉकिजचे छत्रे यांनी स्वतःच्या गावातील मुलीला मुंबईच्या चित्रपटसृष्टीमध्ये जाण्यासाठी ओळख करून दिली.

३. स्वतः कलाकार असलेल्या आणि नाटक कंपन्यांमध्ये मध्यस्थी करणा-या चाफेकर नावाच्या गृहस्थांनी, १९२८ मध्ये किर्लोस्कर कंपनी विजापूरमध्ये असताना पेटी वाजवणा-या गोहरा यांना पाहिले व त्यांनी गोहरा यांची गंधर्व कंपनीमध्ये ओळख करून दिली. चाफेकर गोहरा यांच्या घरी गेल्यावर, गोहरा यांनी बालगंधर्वांची गाणी हुबेहूब आवाजात म्हटलेली ऐकून चकित झाल्याचे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे. त्यांनी गोहरा यांना गंधर्वांची भेट घालून देण्याचा शब्द दिला.

४. बालगंधर्वांच्या आईने स्वतः गोहरा यांचे अभंग त्यांच्या मुलाच्या कानावरून जातील अशी व्यवस्था केली.

गंधर्वगोहरा जोडी

बालगंधर्वांना आपले जीवनसाथी बनवावे अशी सुप्त इच्छा गोहरा यांच्या मनात ब-याच काळापासून असावी असे दिसते. ते गोहरा यांच्यापेक्षा तेवीस वर्षांनी मोठे होते, मधुमेहाने त्रस्त होते. तरीपण गोहरा आणि बालगंधर्व यांच्यामध्ये प्रेम अंकुरले. गंधर्व कंपनीच्या बिकट परिस्थितीने त्यांना आणखी जवळ आणले. त्या वेळेला बालगंधर्वांनी 'संत एकनाथ' हा चित्रपट काढून हात पोळून घेतले होते. मुंबईनंतर बालगंधर्वांची कंपनी पुणे, मिरज, कोल्हापूर येथे गेली. कंपनी कर्जाखाली दबून गेली होती. कलाकार कंपनी सोडून जात होते. अशा कष्टमय परिस्थितीत(१९३७) बालगंधर्व, त्यांची चाहती असलेल्या गोहरा ह्यांच्या घरी गेले. ह्या भेटीला बालगंधर्वांचे चरित्रकार वेगळा रंग देतात. पण गोहरा यांच्या जीवनातील ही अपूर्व घटना होती. त्यांनी बालगंधर्वांना हात देऊन कंपनीची दिवाळखोरी कमी करायला मदत केली. ती दोघे १९३८ मध्ये एकत्र राहू लागली होती. कलाकार कंपनी सोडून जात असताना ती वाचवण्यासाठी किंवा त्यांना पैसे देणे आहेत म्हणून, कंपनीच्या मालकांनी त्यांच्याबरोबर विवाह करावा. ही त्या काळी प्रचलीत गोष्ट मानली जाई. पण बालगंधर्व-गोहरा प्रेमसंबंध हे विशिष्ट प्रकरण होते. त्या दोघांमध्ये अतुट असा प्रेमबंध निर्माण झाला होता. बालगंधर्व यांच्या पत्नी निधन पावल्यानंतर(१९५१), त्यांनी गोहरा यांच्याबरोबर कायदेशीर रीतीने विवाह केला. त्या वेळेला गोहरा यांचे वय चाळीस होते आणि बालगंधर्वांचे वय त्रेसष्ट.  पुढे गोहरा यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य गंधर्वांच्या प्रती वेचले. रंगभूमीवर त्यांची जोडी नापसंत ठरली. बालगंधर्वांबरोबर विवाह झाल्यानंतर, गोहरा यांनी इतर नायकांबरोबर काम केले नाही.

त्यानंतर, काही दिवसांतच गोहरा आणि गंधर्व यांचे कष्टाचे दिवस सुरू झाले. गंधर्वांचे वजन वाढून, ते स्त्रीपात्र रंगवण्यात असमर्थ ठरू लागले. त्यामुळे गोहरा त्यांच्या भूमिका साकारू लागल्या.  तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात गंधर्वांसारखे गाणार्‍या गोहरा या एकट्याच होत्या. तरीपण कंपनीचे दिवाळे निघाले.

कंपनीचे १९५३ हे शेवटचे वर्ष ठरले. कंपनी पूर्णपणे बंद पडली. त्यानंतर गोहरा आणि बालगंधर्व वेगवेगळ्या ठिकाणी नाट्यगीते गाऊ लागले. गंधर्व कालांतराने आजारी पडले आणि अंथरुणाला खिळून गेले. ते मधुमेही होतेच, त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका येऊन गेला. तेव्हा गोहरा गंधर्वांची काळजी घेऊ लागल्या. हुबळीचे बिलंकर त्यांच्या आठवणी सांगत: 'मी गोहरांना १९४८ मध्ये पाहिले. मुंबईमध्ये असताना मी त्यांच्याकडे जात असे. तेव्हा त्यांना बरे नसे. त्यांना अस्थम्याचा त्रास होता. त्या वेळेला आम्ही बालगंधर्वांचा कार्यक्रम कोयनानगरमध्ये करून त्यांना पाचशे रुपये जमा करून दिले. तेवढ्यात चिपळूणमधील परशुराम मंदिराचे पुजारी आले. ते म्हणाले, की त्यांच्या मुलाचे लग्न आहे, त्यासाठी काही मदत करावी. तेव्हा गोहरा यांनी ते पैसे त्यांना देऊन टाकले! आणि त्या मुंबईला रिकाम्या हातांनी परत गेल्या. हे आम्हाला नंतर कळले. त्यानंतर आम्ही कोयनानगर-चिपळूणमध्ये बालगंधर्वांचे चार-पाच कार्यक्रम करून, गोहरा-गंधर्वांना बोलावून त्यांना दोन हजार रुपये रोख दिले. तेव्हा गोहरा म्हणाल्या: 'बिलंकर, ह्या वेळेला रक्कम आमच्या हातात देऊ नका. किराणा दुकानदाराला शंभर रुपये, औषध दुकानदाराला पाचशे रुपये देऊन टाका. ‘आम्ही गंधर्वांना त्यांच्या मुंबईमधील घरी पोचवून, खाली असलेल्या दुकानदाराला पैसे दिले. बालगंधर्व आणि गोहर खूप उदार होते. कसेही पैसे खर्च करायचे.’

शेवटचे दिवस

बालगंधर्व त्यांच्या शेवटच्या दिवसांत, शारीरिक व मानसिक रीत्या गोहरा यांच्यावर पूर्णपणे अवलंबून होते. ते गोहरांना प्रेमाने 'बाबा' अशी हाक मारत. कोणी आले की म्हणत, 'बाबा, आले बरं का'. गोहरांना अस्थम्याचा त्रास होता. तरी त्या बालगंधर्वांची अपार सेवा करत. त्यातच त्या दमून गेल्या. त्या १९६४ मध्ये निधन पावल्या. त्या वेळेस त्यांचे वय ५३-५४ होते. त्यांना माहीम येथील कब्रस्तानात दफन केले गेले. त्या वेळी गंधर्वांनी खूप आक्रोश केला. त्यांना गोहरा यांच्या निधनाचा मोठा धक्का बसला. पुढे गोहरा यांची मानलेली मुलगी अशाम्माने गंधर्वांचा सांभाळ केला. बालगंधर्वांचे निधन गोहरा गेल्यानंतर तीन वर्षांतच झाले.

मराठी लोकांचा कठोरपणा

बालगंधर्व ह्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता अशी अफवा उठून ते मरण पावल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी गोंधळ निर्माण करण्याचे कारस्थान काही जणांनी रचले होते. बालगंधर्व गोहरा यांच्याबरोबर राहिल्याचे त्या काळच्या कर्मठ लोकांना सहन झाले नाही. गंधर्वांच्या पत्नीचे आकस्मिक निधन होण्यास गोहरा-गंधर्व यांचे प्रेमप्रकरण कारणीभूत झाले असे ते लोक मानत. बालगंधर्व ह्यांना अपंगत्व आले त्या काळात गोहरा यांनी गावोगावी फिरून, त्यांच्यासारखे गाऊन पैसे कमावल्याचा आरोप काही लोक त्यांच्यावर ठेवतात. मराठी रंगभूमीच्या चरित्रकारांपैकी काही जणांनी 'गंधर्वांच्या पत्नीचे हृदय पुरुषाचे आणि गोहराच्या पतीचे हृदय स्त्रीचे' होते असे नमूद करून ठेवले आहे. बालगंधर्व ही मराठी लोकांची अस्मिता बनली. गोहरानी गंधर्वांना त्यांच्यापासून हिरावून घेतले अशी त्यांची भावना झाली होती. लोक गोहरा-गंधर्वांची प्रीती समजून घेऊ शकले नाहीत की ‘स्वतःच्या प्रिय व्यक्ती’वर लोकांनी दाखवलेला अधिकार गोहराला सहन झाला नाही! गंधर्वांना १९६४ मध्ये पद्मभूषण जाहीर करण्यात आले, त्या वेळेला गोहरा समारंभास उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात आली होती. गंधर्वांच्या जन्मशताब्दी उत्सवाच्या वेळेला(१९८८) प्रकाशित झालेले लेखन आणि इतर साहित्य यांमध्येसुद्धा गोहराबद्दल गरळ ओकले गेले आहे. 'गोहराचे मायाजाल' अशा एका लेखात गोहरा यांना खलनायिका ठरवण्यात आले आहे.

कलावंतांचे जीवन

गोहरा-बालगंधर्व यांच्या संबंधांचे स्वरूप कसे असेल हे सांगणे कठीण आहे. त्यांच्या दोघांच्या फोटोमध्ये कोट घातलेल्या आणि डोक्याला फेटा गुंडाळलेल्या पुरुषी वेशामध्ये गोहराबाई आहेत आणि बाजूला बालगंधर्व स्त्रीवेशामध्ये आहेत. गोहरा-बालगंधर्व संबंध दैहिक, प्रेमिक की कलात्मक होते हे सांगणे कठीण आहे.  ते आपल्या समाजामध्ये प्रचलित असलेले आध्यात्मिक असावेत. कोलकात्याची गोहरजान, बेंगलुरूची नागरत्नाम्मा, बेळगीच्या अमीरबाई आणि गोहराबाई, शांता हुबळीकर ह्या कलाकारांचे जीवन पाहिले तर असे दिसेल, की त्यांचे जीवन अतिशय कष्टदायी होते. ते कलाकार आपापले जीवन धर्मातीत रीतीने जगत असतात, त्यांची कला भाषातीत माध्यमामधून व्यक्त होत असते. ती प्रांत, देश यांच्या सीमा ओलांडून सर्वदूर रसिकांपर्यंत पोचलेली असते. तरीपण त्यांना पाहणा-या समाजाचा दृष्टिकोन संकुचित असतो. ते जिवंत असताना त्यांना प्रेम देण्यासाठी काहीही करतील, त्यांच्या मृत्युप्रश्चात त्यांना महात्मापद देण्यास तयार असतील, पण गोहराबाईंच्या वाट्याला हे सुख आले नाही. त्यांच्या मृत्यूची वार्तासुद्धा कळली नाही. त्या कर्नाटकच्या असून, मराठी रंगभूमीवर काम केले हे कर्नाटकाचे लोक विसरले आहेत. गोहरा यांनी कलेसाठी किंवा प्रेमासाठी दिलेली ही आहुती आहे असेचं म्हणावे लागेल.

मूळ कन्नड लेखक-रहमत तरीकेरीमराठी अनुवाद – प्रशांत कुलकर्णी, पुणे , ९८५०८८४८७८

 

या लेखाच्या औचित्यासंबंधी थोडेसे:

डॉ. तरीकेरी हे धारवाड विद्यापीठात कन्नडचे प्राध्यापक आहेत. त्यांनी अमीरबाईंवर कन्नड मध्ये एक चरित्र लिहिलेले आहे. गोहरबाई यांची २०१० हे जन्म शताब्दी वर्ष. त्या निमित्ताने हा लेखप्रपंच. हा लेख कन्नड मासिक 'मयूर' मध्ये ऑगस्ट च्या अंकात आला आहे. डॉ. तरीकेरी गोहराबाई यांचे चरित्र लिहीत आहेत. अनुवादक प्रशांत कुलकर्णी हे कन्नड आणि मराठी जाणणारे, संगीत विषयक अभ्यास करणारे एक संगणकतज्ञ आहेत.

गोहरा यांचा महाराष्ट्रात द्वेष!

बाळा सामंत – पापळकर संवाद

‘देवकीनंदन गोपाला’ जून १९८८ बालगंधर्व विशेषांक संपादक शंकर पापळकर यांनी २९ मे १९८८ रोजी बालगंधर्वाच्या जीवनावरील ‘ तो राजहंस एक’ या पुस्तकाचे लेखक बाळ सामंत यांची भेट घेतली. भेट त्यांच्या मुलाखतीसाठी होती.

शंकरराव पापळकरांनी बाळ सांमत यांना मुलाखतीत विचारले, की “तुम्ही या पुस्तकात गोहराबाईंवर फार वाईट लिहिले आहे, ते का?” त्यावर बाळ सामंत म्हणाले, “त्याबाईंनी बालगंधर्वासोबत केलेच तसे. त्या बाईं बालगंधर्वांना माझ्यासमोर शिव्यासुद्धा देत होत्या!”

“प्रत्येक घरामध्ये एकमेकांशी भांडतील तेवढेच त्यांचे एकमेकांवर प्रेम असते! त्याच गोहरबाईने गंधर्वांच्या चड्ड्यासुद्धा धुतल्या आहेत. ना? तसेच त्यांना जेवू खावू घालीत!” असे पापळकर त्यावर उत्तरले.

बाळा सामंतांनी यावर ‘हे जेवढं खरं असलं तेवढंच या बाईंनं गंधर्वांना जीवनातून उठवले आहे हे ही खरे ना’ असे विचारले.

पापळकरांनी सामंतांना यावर विचारले, की ‘त्यावेळेला ( त्या काळात) तुम्ही बांलगंधर्वांना कोणत्या तर्‍हेचे सहकार्य केले?

‘त्यावेळी मी कोणत्याही तर्‍हेचे सहकार्य केलं नाही’ असे सामंतांनी मान्य केले.

गोहरबाईंवर तुम्ही पुस्तकात एवढा अन्याय का केला? असे सामंताना विचारल्यावर सामंत पापळकरांना म्हणाले, “तुम्हांला ही बाब समजून येणार नाही, ती बाई आमच्या सारख्या लोकांना गंधर्वांना भेटूसुद्धा देत नव्हती”

आपण जी माहिती लिहिली ती आपण पाहिली आहे का? की ऐकलेली आहे? इति पापळकर “मी स्वत: पाहिलेली आहे. त्या बाईबद्दल मी या पुस्तकात संपूर्ण पुराव्यानिशी छापले आहे” असे सामंतांनी सांगितले.

पापळकरांनी पुढे विचारले, “सामंत साहेब. बालगंधर्व या बाईंच्या एवढे आहारी का गेले?” त्यावर सामंत उत्तरले की “गोहरनी त्यांना शारीरिक सुखाचे सर्वोच्च असे सहकार्य दिले. तसेच त्यांच्यावर संपूर्णतया निगराणी सुद्धा ठेवली”

सांमत साहेब हा मुद्दा वादातील आहे. त्या काळात बालगंधर्वांवर मोहीत होणार्‍या आणि त्यांना सर्वस्वी अर्पण करणार्‍या हजारो अशा स्त्रिया होत्या. परंतु गंधर्व आपल्या पायरीपासून ढळले नाहीत. मग त्यात गोहरची काय बिशाद? असे पापळकरांनी सुनावल्यावर सामंतांनी उलट प्रश्न केला, की “ मग आपले म्हणणे काय आहे?” त्यावर पापळकरांनी सांगितले की “गंधर्व हे गोहरच्या कलागुणावर मोहित झाले होते. गोहरही त्यांच्यावर अंत:करणापासून प्रेम करते ह्याची बालगधर्वांना खात्री होती. त्यांच्या पडत्या काळामध्ये भीक मागून त्यांनी बालगंधर्वांना पोसले तसेच दुसरे उदाहरण म्हणजे विकलांग अवस्थेमध्ये गोहरने दागदागिने विकले परंतु गंधर्वांना जे पद्मभूषण पदक मिळाले होते ते पदक नाही विकले. आणि याच तिच्या कर्तव्यपरायणबद्दल बालगंधर्व तिला शरण गेले. परंतु महाराष्ट्रातील एकही साहित्यिकाणि गोहरबद्ल प्रशंसनीय उद्‍गार का नाही? याचेच मला (आश्चर्य) नवल वाटते.

(वरील मुलाखत बाळ सामंत यांच्या नरिमन पाईंट येथील (रिलायन्स उद्योग) ऑफिसमध्ये झाली. पापळकर यांनी तेथील सामतांचे ‘तो एक राजहंस’ हे पुस्तक तेथेच अर्धा तास वाचले होते मुलाखत अजून लांबली असती परंतु सामंताना जरुरीचे काम असल्यामुळे जावे लागले त्यामुळे मुलाखत अर्धवट राहिली. )

(देवकीनंदन गोपालाजून १९८८ बालगंधर्व विशेषांकच्या आधारे)

थोरल्या बाजीरावांची रक्षा मस्तानी, हिला जशी समाजाकडून सहानुभूती लाभली नाही तशीच गोहरचीही उपेक्षा झाली.

दादूमिर्यां ऊर्फ डॉ. नेने यांनी (माणूस दिवाळी अंक १९७८) गोहरची मुलाखत घेतलेली आहे. त्या मुलाखतीवरून एक गोष्ट दिसते की बौद्धिकदृष्टया गोहर बालगंधर्वांपेक्षा बुद्धिमान व व्यवहारी असावी. मुसलमान म्हणून तिचा अधिक्षेप फार केला गेला व तिची बाजू कुणी ऐकून घेतली नाही. ते काम दादूमियांनी बिनतोडपणे केलेलं आहे.

बालगंधर्व-लेखक : अरविंद ताटकेया पुस्तकाद्वारे

About Post Author

Previous articleवीरमाता
Next articleमाहिती अधिकाराचे ग्रंथालय!
प्रशांत कुलकर्णी हे गेल्या २० वर्षाहून अधिक काळ संगणक क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या cloud computing या विषयामध्ये ते एका आंतरराष्ट्रीय संस्थेत मध्ये काम करत आहेत. त्यांनी पुण्यातल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून भरतविद्येचा (Indology) अभ्यास केला आहे. भाषा, इतिहास, साहित्य आणि संगीत यासारख्या विविध क्षेत्रात त्यांना विशेष रुची आहे. त्यांनी काही काळ उर्दू भाषेचा देखील अभ्यास केला आहे. त्यांनी अमेरिका, युरोप, भारतात भटकंती केली आहे. सह्याद्रीत्तील १५० हून अधिक किल्ल्यावर जाऊन आले आहते. ते पुण्यातल्या डॉ जगन्नाथ वाणी संस्थापित 'स्किझोफ्रेनिया अवरेनेस असोशिएशन'(SAA), ह्या मानसिक आजाराच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेत देखील जबाबदारी पार पाडत आहेत. या पूर्वी त्यांनी भाषांतरित केलेले अमीरबाई आणि गोहरबाई यांच्यावरील लेख महाराष्ट्र टाईम्स, गावकरी या वर्तमानपत्रातून तसेच 'थिंक महाराष्ट्र' या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9850884878