गोफ जन्मांतरीचे – मानवी उत्क्रांतीचा वेगळा वेध

_Goaf_Janmantariche_1.jpg

माणसाचे आजचे स्वरूप हा उत्क्रांतीचा परिणाम आहे. उत्क्रांती या विषयावर मराठीत थोडी पुस्तके असली तरीही तो विषय कुतूहलाचा म्हणून नवीन राहिलेला नाही; रोजच्या संशोधनातून काही दुवे सापडत असतात. त्यामुळे उत्क्रांतीवर जेवढी चर्चा करावी तेवढी अपुरीच!

डॉ.सुलभा ब्रह्मनाळकर यांचे ‘गोफ जन्मांतरीचे’ हे पुस्तक मानवी उत्क्रांतीचा वेध वेगळ्या दृष्टिकोनातून घेते. त्यात उत्क्रांती व जनुकशास्त्र यांच्यातील अन्योन्य संबंध उलगडून दाखवला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक चित्र आहे. त्यात काही जाळी एकमेकांत गुंफलेली आहेत व त्यातून मोठ्या जाळ्याचा गोफ विणला गेलेला आहे. साध्या साध्या रचनांतून बनत गेलेले ते जाळे शेवटी गुंतागुंतीचे होत गेले आहे. लेखिकेने उत्क्रांतीच्या मार्गावरील प्रत्येक थांब्यावर सुबोध विवेचन करत सुरुवातीला अवघडातील सोपेपणा दाखवला आहे. त्यांनी त्यांचे हे पुस्तक विज्ञानविषयक असले तरी प्रत्येक ठिकाणी उपमांचा छान वापर केला आहे. त्यामुळे विषयाची दुर्बोधता कमी होते.

उत्क्रांती व जनुकशास्त्र हे दोन्ही विषय सहज पचनी पडणारे नाहीत. पण म्हणून त्यापासून फार काळ फटकूनही राहता येणार नाही, कारण केव्हा ना केव्हा जनुकसंस्कारित मोहरी, वांगे ही पिके मराठी स्वयंपाकघरात आल्याशिवाय राहणार नाहीत. तेव्हा त्यात विज्ञान नेमके काय आहे ते जाणून घेण्याशिवाय गत्यंतर नाही.

मी कोण आहे? कोठून आलो? या प्रश्नाचे उत्तर विज्ञानाच्या अनेक शाखांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात रसायनशास्त्रात जॉन मिलर या वैज्ञानिकाने ‘परिमॉर्डियल सूप’ची कल्पना मांडली व जीवसृष्टीच्या निर्मितीच्या वेळी नेमकी काय रासायनिक क्रिया झाली, ते प्रयोगातून साधण्याचा प्रयत्न केला. चार्ल्स डार्विनने ते कोडे उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडून जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून सोडवण्याचा प्रयत्न केला. खगोलविज्ञानाने त्याकडे विश्वाची प्रयोगशाळेत निर्मिती करून वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले. डॉ. ब्रह्मनाळकर यांनी ‘ल्युका’ नावाचा आदिजीव ते माणूस अशी संपूर्ण उत्क्रांती प्रक्रिया चित्रदर्शी शैलीत उलगडून सादर केली आहे. उत्क्रांती ही केवळ बाह्य अंगांनी झालेली नाही तर त्या प्रक्रियेत जनुकांमध्येही बदल घडत गेले. त्यामुळे त्यांनी जनुक म्हणजे काय, पेशी म्हणजे काय, जिनोमचे पुस्तक या सर्व संकल्पना सोप्या करत उत्क्रांती आणि जनुकशास्त्र यांची सांगड घालून दाखवली आहे. त्या जिराफाची मान उंच का असते, त्याचे उत्तर पाठयपुस्तकात सांगितले जाते ते नाही, तर वेगळे आहे असे म्हणतात. त्यांनी उत्क्रांतीचा आढावा घेताना वेगवेगळ्या जीवशास्त्रीय गटांतील प्राण्यांच्या ज्या खुबी सांगितल्या आहेत व त्याची जी कारणमीमांसा केली आहे. त्यामुळे पुस्तकाची रंजकता वाढते.

त्यांनी पुस्तकाचा विषय जीवसृष्टीचे रहस्य, उत्क्रांती व मानवी जग अशा तीन विभागांत मांडला आहे. त्यांनी उत्क्रांती व जनुकशास्त्र यांचे विवेचन तत्त्वज्ञानाच्या व नैतिकतेच्या अंगाने सर्वात शेवटच्या विभागात केले आहे. सुप्रजनन या संकल्पनेचा गैरअर्थ काढला जाऊन वर्णवाद, वर्चस्ववाद जोपासण्याचे प्रयत्न झाले- तो विज्ञानाचा गैरवापर होता असे विवेचन त्या करतात. त्याच बरोबर त्यांनी तो अतिरेकी विचार बाजूला ठेवून निरोगी संततीसाठी जनुकशास्त्रातील ज्ञानाचा वापर करण्यात गैर काही नाही ही दुसरी बाजूही मांडली आहे. एखादी व्यक्ती जनुकीय दोषांमुळे असाध्य रोग घेऊन जन्माला येणार असेल तर माहीत असूनही माणसाने त्याला जन्म देणे हे अयोग्य आहे. इंग्लडमध्ये मनोवांच्छित संतती तंत्रास मान्यता देणारा कायदा होणार आहे. प्रत्येक गोष्टीत जनुकांना दोष देऊन भागत नाही हे लेखिकेने मांडलेले मत शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिद्ध झालेले आहे. जर माणसाने चांगले पोषक अन्न सेवन केले व त्याच्या आजूबाजूची परिस्थितीही आनंददायक असेल तर जनुकांतही अनुकूल बदल होतात असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. एपीजेनेटिक्स ही शाखा दोन जुळ्यांमध्ये असलेल्या फरकाचे जे विश्लेषण करते त्यावर आधारित आहे. आजूबाजूच्या पर्यावरणाचा जनुकांवर बरावाईट परिणाम होत असतो, त्यातून त्या जुळ्यांमध्ये पुढे फरक दिसू लागतो अशी माहिती त्या पुढे देतात.

एकूण, हे पुस्तक वाचकाला सोप्याकडून अवघडाकडे नेते; पण तरीही त्या अवघडातील सौंदर्य त्याला पुरेसे जाणवल्याशिवाय राहत नाही. डॉ. ब्रह्मनाळकर पेशाने बालरोगतज्ज्ञ असल्याने त्यांनी बारीक बारीक तपशील समजावून घेऊन मांडला आहे. त्यामुळे वाचकाला एक अगम्य ते अविश्वसनीय वाटणारे विश्व त्याच्या कवेत आल्याचा अनुभव येतो.

गोफ जन्मांतरीचे

डॉ.सुलभा ब्रह्मनाळकर,

राजहंस प्रकाशन, पृष्ठे-३२२

मूल्य-३०० रुपये.

– राजेंद्र येवलेकर

(लोकसत्ता (लोकरंग पुरवणी), रविवार, ४ नोव्हेंबर २०१२ वरून उद्धृत)

About Post Author