भारतीय संस्कृतीमधील ‘देव’ संकल्पना आणि ‘गॉड’ हा इंग्रजी शब्द यांमध्ये फरक आहे. ‘गॉ़ड’ या शब्दाला ख्रिस्ती धर्माचा संदर्भ आहे. ‘गॉड’ची व्युत्पत्ती (ऊर्फ ‘एटिमॉलजी’) सांगावी असे वाटते.
‘गॉ़ड’ या शब्दाची व्युत्पत्ती मी अमेरिकेतल्या ग्रंथभाण्डारामधून घेतलेली आहे. ती अनेक ठिकाणी सापडू शकते. ती बहुतेक सर्व ठिकाणी एकसारखी आहे. कुठे कुठे, मामुली फरक आहेत. त्यांपैकी दोन महत्त्वाचे मूलस्त्रोत असे : १. अमेरिकन हेरिटेज डिक्शनरी, आणि २. मिर्का एलियादे यांनी घडवलेला अनेक खंडांचा ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन्स’. मिर्का एलियादे हे जगप्रसिद्ध विद्वान न्यू यॉर्क शहर विद्यापीठामधे आणि न्यू यॉर्कमधल्या ब्रुकलिन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांनी जगातल्या सर्व धर्मांची माहिती देणारा प्रचंड मोठा आणि अनेक खंडांचा धर्मकोश बनवला.
प्राचीन काळी वैदिक यज्ञामधे पशू (बकरा, घोडा वगैरे प्राणी) बळी देण्याची प्रथा होती. यज्ञामध्ये मारलेल्या पशूचे रक्त, चरबी व मांस यज्ञामधल्या अग्नीमधे टाकले जात असे. म्हणजे प्रत्येक यज्ञीय देवतेच्या नावाचा मंत्र म्हणून, ‘इन्द्राय स्वाहा, वरुणाय स्वाहा, अग्नये स्वाहा’ असे म्हणून. म्हणजे असा स्वाहाकार करून, थोडे थोडे मांस व चरबी अग्नीमधे अर्पण केली जात असे. यज्ञ करून संपल्यावर उरलेले मांस यज्ञ करणा-या ब्राह्मणांनी व इतरांनी यज्ञाचा प्रसाद म्हणून खायचे अशी पद्धत होती. हा प्रसाद खाल्ल्याखेरीज यज्ञविधीची पूर्तता होत नसे.
वैदिक ब्राह्मण शाकाहारी नव्हते, मांसाहारी होते. आजमितीला होमहवन करताना मांसाऐवजी तूप वापरले जाते. पण हा कालौघात झालेला बदल आहे.
यज्ञामधे प्राणी बळी देताना तो मारायचा कसा, त्याचे मांस कापायचे कसे याचेदेखील शास्त्र होते. त्याबद्दलचे नियम वेदांमधे जागोजागी दिलेले आहेत. उदाहरणार्थ, अश्वमेध यज्ञामधे बळी दिलेला घोडा मारल्यावर त्याचा प्रत्येक अवयव सुटा सुटा होईल अशा प्रकारे, त्या प्रत्येक अवयवास जराही धक्का लागू न देता पूर्णपणे अविच्छिन्न अशा स्वरूपामधे कापून काढावा लागत असे. वाटेल तशी वेडीवाकडी कापाकापी करून चालत नसे. (रेफरन्स.. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलामधली १६२ आणि १६३ क्रमांकांची सुक्ते)
जो कुठला प्राणी बळी दिला असेल, त्या बळी दिलेल्या प्राण्याच्या मांसाला ‘हवी’ किंवा ‘हव्य’ असे म्हटले जात असे. त्यातले जे मांस प्रत्यक्ष अग्नीमधे टाकले जाते त्याला ‘आहुती’ असे म्हणतात. ते मांस अग्नीमधे अर्पण करण्याला ‘हवन’ आणि जो पशू मारला गेला त्याला ‘हुत’ असा शब्द आहे ( हे “हु” या धातूचे भूतकाळाचे रूप आहे). हा हुत झालेला, म्हणजे बळी दिला गेलेला यज्ञीय पशू देवाकडे जातो व देवाशी एकरूप होतो म्हणजे पर्यायाने देव बनतो अशी वैदिक आर्यांची श्रद्धा होती. (वर म्हटलेल्या ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातल्या १६२ व्या सुक्तामधे असे स्पष्ट म्हटले आहे, की ‘अश्वमेध यज्ञामधे बळी दिला गेलेला घोडा देवांच्या पंक्तीला जाऊन बसला आहे, म्हणजे देवच झाला आहे!’
‘हुत’ शब्दावरून हिट्टाइट भाषेमधे ‘घुट्ट’ आणि ‘घीट्ट’ असे शब्द आले. हिट्टाइट भाषा अतिप्राचीन काळी तुर्कस्तानच्या पश्चिमेकडल्या प्रदेशामधे बोलली जात असे. ‘इण्डो-युरोपीयन लिंग्विस्टिक्स’चे शास्त्र असे सांगते, की हिट्टाइट भाषा म्हणजे वैदिक संस्कृत आणि युरोपातल्या प्राचीन भाषा (म्हणजे ग्रीक व लॅटिन) यांच्यामधला ‘इण्टरफेस’ होती. या हिट्टाइट भाषेतल्या घोट्टपासून पुढे ‘ओल्ड जर्मन’ भाषेमधे ‘गॉट्ट’ असा शब्द आला. आणि मग त्यातून पुढे इंग्रजी भाषेमधे गॉ़ड असे त्याचे रूप तयार झाले. तेव्हा गॉ़ड या शब्दाच्या एटिमॉलॉनीचा फॉर्म्युला…‘हुत – घुट्ट – घोट्ट – गॉट्ट – गॉड’ असा आहे.
थोडक्यात, गॉड या शब्दाचा प्राचीन असा मूळ अर्थ – वैदिक यज्ञामधे बळी दिलेला आणि म्हणून देवत्त्वाला पोचलेला यज्ञीय पशू – असा आहे.
पर्शियन भाषेमधे देव या अर्थाने खुदा असा शब्द आहे. हा शब्द पुढे पर्शियन भाषेमधून उर्दू भाषेत आला आणि तिथून पुढे हिंदी भाषेत आला. तो देखील वैदिक संस्कृत भाषेमधल्या हुत या शब्दावरून आलेला आहे. त्यात गंमत अशी की पर्शियन भाषेवर मुसलमानी संस्कार तीव्र असल्याने ईश्वराला फक्त पुल्लिंगी मानले गेले. (हिंदू धर्मात देव आणि देवी असे दोन्ही असतात. इस्लाममधे तसे नाही.) म्हणून ‘हुत’मधल्या त च्या पुढे विसर्ग आला. हुत: त्या विसर्गाचा पुढे अपभ्रंशाने ‘ आ’ झाला. हुता.
संस्कृत भाषेमधे आ-कारान्त असलेले बहुतेक शब्द स्त्रीलिंगी असतात. पण पर्शियन भाषेतला खुदा हा शब्द आ-कारान्त असूनही पुल्लिंगी आहे. त्याचे कारण अपभ्रंश होय. तेव्हा खुदा या पर्शियन शब्दाची उपपत्ती अशी: ‘हुत – हुत: – खुद: – खुदा’
संस्कृत काय, पर्शियन काय, अशा अनेक भाषा एकाच भाषा-कुटुंबामधे मोडतात. या भाषा-कुटुंबांमधे चार भाग आहेत. ते असे – इण्डोयुरोपीयन, इण्डोइराणीयन, इण्डोआर्यन आणि सध्याची ( आता मृतप्राय झालेली, पण अलिकडची) संस्कृत भाषा. पर्शियन भाषा ही त्यातल्या इण्डोइराणीयन या भागातली भाषा-भगिनी आहे.
वैदिक संस्कृत भाषा अतिप्राचीन आहे ( नेमकी किती प्राचीन: त्याबाबतीत मतभेद आहेत.) पण सुमारे शंभर वर्षांपूर्वी अनेक पाश्चात्य विद्वानांनी तिच्याही अगोदर कुठली भाषा होती? असा प्रश्न स्वत:च स्वत:ला विचारला आणि अशी भाषा कशी असू शकेल, यावर विचार केला.
वैदिक संस्कृतातली अनेक शब्दांची रूपे सध्याच्या संस्कृत व्याकरणात बसत नाहीत. म्हणून त्यांना ‘आर्ष’
(म्हणजे अतिप्राचीन ऋषींनी वापरलेली) रूपे म्हणतात. पण पाश्चात्य विद्वानांनी वैदिक संस्कृतातले शब्द घेऊन, त्यांच्यावरून मागे जाऊन, म्हणजे त्यांचे ‘लिंग्विस्टिक रिग्रेशन’ करून, त्यापेक्षाही पूर्वीचे शब्द काय होते किंवा असू शकतात, ते बनवायचा म्हणजे ‘सिन्थेसाइझ’ करण्याचा प्रयत्न केला. त्यातून बनलेल्या भाषेला प्रोटो-इण्डोयुरोपीयन असे म्हणतात. ही खरी बोलीभाषा नाही, तर कृत्रिम ऊर्फ ‘सिन्थेटिक’ भाषा आहे. म्हणजे तर-तुमच्या भाषेत बोलायचे, तर अतिप्राचीनतम काय असू शकेल? याची ती फक्त कल्पना आहे.
भाषा-कुटुंबांतले वरील चारही भाग मिळून त्या कुटुंबांमधे एकूण शंभर ते दीडशे भाषा येतात. त्यामधे उत्तर व मध्य भारतातल्या अनेक भारतीय भाषा, बहुसंख्य युरोपीयन भाषा आणि मध्यपूर्वेतल्या काही भाषा येतात. त्यांचा नक्की आकडा सांगता येत नाही, कारण त्यांमधल्या अनेक भाषांना जुळ्या बहिणी ( ऊर्फ ‘डायलेक्टस्’) आहेत. त्यांची स्वतंत्र भाषा म्हणून मोजदाद करायची की नाही हा प्रश्न येतो. आपली मराठी भाषा या भाषा-कुटुंबांतलीच एक भाषा-भगिनी आहे, पण कोकणी भाषा ही तिची जुळी बहीण आहे. तिला स्वतंत्र भाषा म्हणायचे का? हा प्रश्न आहेच. पण संपूर्ण भाषा-कुटुंबांतल्या एकूण भाषांची संख्या शंभर ते दीडशे आहे एवढे नक्की. या संपूर्ण भाषा-कुटुंबांचे मूळ वैदिक संस्कृत भाषेमधे आहे. म्हणून या सर्व भाषा आणि त्यांच्यामधले सर्व ज्ञान यांची जननी वैदिक संस्कृत भाषा हीच आहे.
डॉ.अनिलकुमार भाटे
निवृत्त प्राध्यापक,
विद्युत अभियांत्रिकी, संगणक विज्ञान,
माहिती तंत्रविज्ञान आणि मॅनेजमेन्टएडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका
ईमेल- anilbhate1@hotmail.com
{jcomments on}