गुणेश डोईफोडे यांचा ‘पेरते व्हा!’चा मंत्रजागर!

8
27
_Gunesh_Doifode_1.jpg

शिक्षकी पेशाचा हेतुपुरस्सर आणि विचारपूर्वक अंगीकार हे उदाहरण दुर्मीळच मानावे लागेल. कल्याणस्थित गुणेश डोईफोडे किंवा गुणेश सर हे तसे एक दुर्मीळ उदाहरण आहे.

भाषेवरील प्रभुत्व आणि गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याची आवड हे गुण सरांकडे आहेतच, त्या जोडीला त्यांना वाचनाची आवड. त्यामुळे त्यांची विचारशक्ती प्रगल्भ जाणवते. त्यांनी बारावी झाल्यावर डी.एड. करताना फ्री लान्स पत्रकारितेत यश मिळवले. त्यांचे आईवडील शिक्षक होते. ते स्वत: गणेश विद्या मंदिर (कल्याण पूर्व) ह्या शाळेत शिकवतात. विद्यार्थ्यांचे हित, त्यांचा वैचारिक विकास हा त्यांचा कायमच आग्रह राहिला आहे.

त्यांनी त्याच विचारातून अनेक उपक्रम चालवले. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ ह्या क्षेत्रात घालवला आहे, पण तरी त्यांनी त्यांच्यातील प्रयोगशीलता जपली आहे.

‘क्षितिज’ ही माजी विद्यार्थी संघटना गुणेश सरांच्या मार्गदर्शनाखाली मोठी झाली. संस्था पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काम करते. ‘दुवा फाउंडेशन’ हीदेखील माजी विद्यार्थ्यांचीच अजून एक संघटना. शाळेतील, किंबहुना समाजातील गुणी विद्यार्थ्यांना घरच्या परिस्थितीपोटी शिक्षण अकाली खंडित करून अर्थार्जनाला जुंपून घ्यावे लागते अशा विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देणे आणि शिक्षण सोडण्यापासून परावृत्त करणे हे ‘दुवा फाउंडेशन’चे प्रमुख कार्य आहे. सरांनी त्यांच्या स्वतःच्या पगारातून मुलांना मदत केली आणि त्यामधून कार्याची व्याप्ती वाढत गेली तसे-तसे अनेक माजी विद्यार्थी आणि पुढे पुढे काही लाभार्थीदेखील फाउंडेशनच्या कार्यास हातभार लावण्यास पुढे सरसावले.

सरांनी लेखनाद्वारे मुलांच्या अभिव्यक्ती कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. मग तो इयत्ता दुसरीतील मुलांना त्यांच्या आईवडिलांना पत्रे लिहिण्यास लावण्याचा उपक्रम असो (आणि ह्यातील आई की वडील ह्या मुलांच्या निवडीवरून सर त्याच्या कौटुंबिक स्वास्थ्याचा अंदाज बांधत त्या पालकांशी संवाद साधतात) किंवा इयत्ता सातवीतील मुले आणि देशोदेशींच्या राजदूतांना किंवा भारत-महाराष्ट्रातील आपल्या नेते-मंत्र्यांना पत्र लिहिण्याचा उपक्रम असो, किंवा दहावीतील मुलांना सहलीला नेऊन रोजचा वृत्तांत पालकांना केवळ पत्रांद्वारे कळवण्याची सहेतूक सक्ती असो (त्‍या सहलीत मोबाइलला मज्जाव आहे. सहलीची दुसरी खासीयत म्हणजे त्यात मुलांच्या राहण्याची व जेवणाची सोय बहुधा त्या त्या ठिकाणच्या व्यक्ती करतात. त्यात प्रेमळ धनिक सराफ असतात अथवा छोट्या पाड्यावरचा प्रेमळ अगत्यशील आदिवासीही असतो).

_Gunesh_Doifode_2.jpgत्यांनी रोजच्या व्यवहारात भेटणाऱ्या व्यक्तींशी गप्पा मारण्याची संधी मुलांना ‘गप्पांमधून शिकू काही’ ह्या कार्यक्रमातून उपलब्ध करून दिली आहे. त्या उपक्रमात पॅथॉलॉजिस्टशी मारलेल्या गप्पांचा परिणाम चक्क मुलांच्या आहाराच्या सवयी बदलण्यावर झाला! सरांनी सीमेवर तैनात फौजेमधील एक पालक सुट्टीवर घरी आल्याची संधी साधून सीमेवरील जवानांच्या खडतर आयुष्याची ओळख मुलांना करून दिली.

गुणेशसर त्यांच्या विद्यार्थ्यांचे यश त्यांच्या पदवीच्या सामाजिक प्रतिष्ठेवर न मापता त्यांच्या माणूस म्हणून घडण्यावर मोजतात. एका विद्यार्थिनीने विद्यार्थिदशेत लिहिलेल्या पत्रांचा तिच्यावर खोल परिणाम होऊन तिने स्वतः शिक्षिका होण्याचा निर्णय घेतला, ही बाब त्यांना महत्त्वाची वाटते.

त्यांनी स्वतः शिक्षणाची कास इतक्या साऱ्या उपक्रमांतूनही घट्ट धरून ठेवली आहे. म्हणूनच त्यांनी शिक्षकी पेशा चालू असतानाच बी.एड. व एम.एड. केले. त्यांच्या आवडत्या इतिहास ह्या विषयात बी .ए. व एम. ए. ही केले. त्यांनी Cyber law चा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. त्यांचा विचार त्या ज्ञानाचा वापर समाजोपयोगी कामासाठी कसा करता येईल ह्यावर चालू आहे.

मी पेरत जाणार. उगवेल की नाही ह्याची चिंता करणे हे माझे काम नाही. थेट गीतेत घेऊन जाणारे हे साधे तत्त्वज्ञान घेऊन हा माणूस जगत आला आहे.

– सचिन भुसारी, 9890623142

About Post Author

8 COMMENTS

 1. गुणेश सर आपले कार्य खुपच…
  गुणेश सर आपले कार्य खुपच उल्लेखनीय आणि सलाम करावे असे आहे .आपली तळमळ जवळून पाहण्याचा योग आला हे माझे भाग्य आहे .

 2. प्रयोगशील, उत्साही अणि आदर्श…
  प्रयोगशील, उत्साही अणि आदर्श अशा व्यक्तिमत्वास मनापासुन सलाम.

 3. गुणेश सर खरोखर एक गुणी…
  गुणेश सर खरोखर एक गुणी व्यक्तिमत्व आहे यात तिळमात्र शंका नाही.

 4. आम्हाला अभिमानच नाही तर आमचे…
  आम्हाला अभिमानच नाही तर आमचे भाग्य आहे कि आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली वाढलो .
  Thank you Sachin for your article.

 5. गणेशला मस्तच. प्रेरणादायी. …
  गणेशला मस्तच. प्रेरणादायी. ..दुर्वा आणि क्षितीज …initial step by you…many teachers will definitely follow you…an off course me too…?

 6. असा गुरु
  मिळणं
  भाग्य…..

  असा गुरु
  मिळणं
  भाग्य…..
  सरनां आदर्श शिक्षक पुरस्कार
  राष्ट्रपतीच्या हस्ते
  मिळणारं..

Comments are closed.