गांगलांची ‘अण्णा हजारेगिरी’

0
29

    दिनकर गांगल यांच्या ‘पर्याय काय?’ या टिपणाबद्दल माझा तीव्र आक्षेप आहे. "परंतु प्रश्न याहून गंभीर आहे. जगात मंदीचे वारे वाहत आहेत आणि येणार्‍या काळात संधींची शक्यता कमी असणार आहे. अशा वेळी देशस्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. ती योजना सरकारकडे नाही, ना विरोधकांकडे. मनमोहन सिंग आर्थिक सुधारणांचा मंत्र जपतात, पण त्या सुधारणा राबवण्यासाठी सक्षम यंत्रणा त्यांच्याकडे नाही. राजकारण्यांच्या भ्रष्टाचारापेक्षा सरकारी प्रशासन अधिक चिंताजनक अवस्थेत आहे. कारभारयंत्रणेतील भ्रष्टाचाराने जनता नाडली गेली आहे. सरकारी अधिकारी पैसे खातातच, पण कामेदेखील करत नाहीत. पोलिस यंत्रणा तर त्यांच्या युनिफॉर्मपुरती उरली आहे. देशात जवळजवळ अराजक आहे, फक्त ते कोणत्यातरी मोठ्या घटनेमुळे आमलोकांना जाणवणार आहे."

     मोठी घटना कोणती?  bloody revolution?  हे गांगल यांचे ‘विशफुल थिंकिंग’ आहे.

     "ती योजना सरकारकडे नाही, ना विरोधकांकडे" हे म्हणणे चुकीचे आहे.  गांगल यांच्या डोक्यात ती नाही, म्हणून ती इतरांच्या डोक्यातही नाही असे नाही. मनमोहन सिंग आर्थिक सुधारणांचा मंत्र जपणारे नसून त्यांनी भारताला क्रांतिकारक आर्थिक धोरणाने पुढे आणलेच आहे. भ्रष्टाचार, काळे धन हा तुमचा-आमचा सर्वांचाच प्रश्न  आहे. महागाई आणि आर्थिक वाढ एकमेकांशी रिलेटेड आहेत. महागाई जबरदस्तीने नष्ट केली तर ते देशाला हितकारक नाही. गरिबांना महागाईची झळ लागू नये याचे केंद्र शासनाने केलेले उपाय राज्य शासनांना कार्यान्वित करावे लागतात.

     सगळेच योजना बनवणारे लुच्चे असून मूर्खही आहेत (लुच्चे खरे म्हणजे मूर्ख नसतात, नेमके काय ते तुम्हाला मनाशी ठरवायला पाहिजे.), योजना कार्यान्वित करणारे देखील लुच्चे किंवा मूर्ख असून भारत देश रसातळाला चालला आहे, सारे जग रसातळाला चालले आहे, ‘थिंक महाराष्ट्र’ दाखवून देत असलेले कुठे कुठे तुरळक होणारे व्यक्तिगत विधायक कार्य सोडल्यास सर्वत्र सावळागोंधळ सुरू आहे असे म्हणणे केवळ नकारात्मक नाही पण चुकीचेही आहे. हे म्हणजे ‘अण्णा हजारेपणा’ झाला. हिमालयात तप करत असलेले काही आध्यात्मिक दृष्ट्या बलशाली योगी कसेबसे विश्वाला सावरून धरत आहेत का?

     गांगल यांचे सवयीने असलेले महाराष्ट्र शासनावरचे लक्ष त्यांनी जरा बाजूला करावे आणि हिंद देशाच्या केंद्र शासनावर आणि हिंद देशावर जास्त लक्ष द्यावे. काही गोष्टी कायदा करून सिद्ध होतात. उदाहरणार्थ, कस्टम दर कमी करणे, परकीय गुंतवणूक खुली करणे, टेलेकॉम, इन्शुरन्स, बॅंका यांचे व्यवहार वाढवणे, शिक्षण आणि आरोग्य यासाठी जास्त पैसा उपलब्ध करून देणे, रेशन गोंधळ थांबवण्यासाठी संगणकाचा वापर करणे, सरकारी नियम शिथिल करणे (पैसे खाण्याच्या शक्यता कमी करणे), इत्यादी. ही आर्थिक क्रांती भारतात झालेलीच आहे. तिचे सूत्रधार सिंग हेच होते आणि अजूनही आहेत. त्यामुळेच गरिबी नष्ट व्हायला मदत होणार आहे.

  मी पाकिस्तानातल्या  आर्थिक  तज्ज्ञाचे आणि जनतेतल्या प्रतिनिधीचे बोल कालच ‘व्हाईस  ऑफ अमेरिका’ रेडिओवर ऐकले. “भारतात जम्बुरीयत (लोकशाही) रुजलेली आहे.

     स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा लागतो हे भारतातील लोकांना माहीत आहे. उलटपक्षी आम्हाला हा काहीच अनुभव नाही. त्यामुळे हजारे यांच्यासारखा माणूस तेथे आंदोलन करू शकतो. केवढे तेथील लोक जागृत आहेत बघा! भारताची अर्थव्यवस्था चीनच्या बरोबरीने झाली आहे. नऊ टक्के आर्थिक प्रगती करत असलेला हा देश श्रीमंत देशांच्या बरोबर उठबस करतो, कारण त्या देशांना या देशाची गरज असते (चाळीस टक्के भुकेकंगाल असलेला देश पण त्याच वेळी श्रीमंतदेखील असू शकतो – macroeconomics – आणि चाळीस टक्के भुकेकंगाल आणि निरक्षर लोकांना त्या खाईतून वर काढण्यासाठी वेगवान आर्थिक प्रगती हेच औषध आहे हे कृपा करून लक्षात घ्या —- मी.) त्या देशाने आय एम एफ चे कर्ज केव्हाच फेडले आहे. नाहीतर आम्ही?” असे ते तज्ज्ञ म्हणाले. पाकिस्तानी आम आदमी ने भारताची प्रशंसा करण्यासाठी चक्क ‘आओ बच्चो तुम्हे दिखाये झांकी हिंदुस्तानकी’ हे गाणे रेडिओवर म्हणून दाखवले. आता बोला!

     गांगल महाराष्ट्रात फिरतात आणि त्यामुळे काही विधायक कार्य त्यांच्या दृष्टोत्पत्तीस येते. त्याची माहिती ते ‘थिंक महाराष्ट्र’मध्ये देतात. ही चांगली गोष्ट आहे. पण “त्याहून चिंता वाटावी अशी गोष्ट म्हणजे देशातील विचारी व संवेदनाशील समाज आत्ममग्न होऊन बसला आहे. सध्याच्या देशस्थितीमध्ये प्रशासनावर वचक व पर्यायी विचार होताना दिसत नाही. त्यामुळे मनमोहन सिंग गेले तरी त्यांच्या जागी येणारा पंतप्रधान त्यांच्याहून मवाळ व क्रियाशून्य निघण्याची शक्यता आहे व कदाचित तो भ्रष्ट, गैरव्यवहारी आणि उद्दामदेखील असेल!" हे म्हणणे बरोबर दिसत नाही. देशातील विचारी व संवेदनाशील समाज आत्ममग्न झालेला असता तर त्याने अण्णा हजारे यांना उत्स्फूर्त पाठिंबा दिला नसता. देशातील गरिबी दूर करण्यासाठी आर्थिक वाढीचा दर वेगवान करण्याची गरज आहे हे जाणून ज्या माणसाने देशाच्या आर्थिक व्यवस्थेला क्रांतिकारक वळण दिले त्या माणसाला मवाळ व क्रियाशून्य म्हणणे बरोबर नाही. त्या गृहस्थाला स्वत:चे असे मत आहे.  ते नेत्यांसारखे गर्जना करून बोलत नाहीत. (आम्हाला तसे न बोलणारा माणूस मवाळ वाटतो.) ते लोकसभेत निवडून आलेले नाहीत, तसे त्यांना निवडून यायचेपण नाही. ते राजकीय नेतृत्व सोनिया गांधी यांनाच देतात.   

     पण देशाचे धोरण केवळ सोनिया गांधी ठरवतात आणि ते कळसूत्री बाहुलीप्रमाणे  केवळ पंतप्रधानपद भूषवतात असे म्हणणे चुकीचे आहे. त्यांच्याशी संबंध आलेले सर्व राजकीय नेते हे समजतात आणि मानतात. ‘थिंक महाराष्ट्र’ला आपला सिनिसिझम कमी करण्याची आवश्यकता आहे.

– वसंत केळकर,
मोबाइल – ९९६९५३३१४६,
इमेल:  vasantkelkar@hotmail.com

दिनकर गांगल यांच्‍या ‘पर्याय काय?’ या लेखावर वरील वादचर्चा आधारित आहे. हा लेख वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा.

{jcomments on}

About Post Author

Previous articleसुधीर नांदगावकर
Next article‘स्लट वॉक’चा धुरळा
Member for 11 years 11 months वसंत केळकर नागपूरचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण पटवर्धन हायस्कूल मध्ये झाले. विज्ञान महाविद्यालय नागपूर येथून ते फिजिक्स या विषयात एम एससी झाले. भारतीय डाक सेवा या शासकीय सेवेत ते १९६६ ते २००१ पर्यंत होते. बंगलोर येथून मुख्य पोस्टमास्तर जनरल या पदावरून २००१ साली ते सेवानिवृत्त झाले. आवड म्हणून जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय दिल्ली येथे फ्रेंच आणि इतिहास या विषयांचा अभ्यास करीत आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9969533146