गर्दीची अक्क्ल

स्टिफन कोल्बर्ट
स्टिफन कोल्बर्ट

स्टिफन कोल्बर्ट      दोन माणसांच्या तीव्र हुशारीनं मला कॉम्प्लेक्स येतो. इतके कसे हे दोघे हुशार, विटी, विनोदी, हाड-हुड स्पेशालिस्ट? कसे बुवा हे असे चार्मिंग आणि तरीही यांची हृदयं जागच्या जागी? कोल्बर्ट रिपोर्टवाला स्टिफन कोल्बर्ट आणि जॉन स्ट्युअर्ड या दोघांमुळे टीव्ही नावाची गोष्ट मला आवडू लागली. हे दोन्ही चार्मर्स तुम्हाला माहीत नसतील तर आग्रहानं माहीत करून घ्यायला हवेत इतके इंटरेस्टिंग. कोल्बर्ट आणि स्ट्युअर्ड जे काही अमेरिकन राजकारणाबद्दल बोलू शकतात, ते बघता लोकशाहीत विनोदाचं स्थान आणि सामर्थ्य किती महत्त्वाचं आहे ते ध्यानात येतं. या कोल्बर्टनं अनेक संकल्पनांसोबत एक नवीन शब्द जन्माला घातलाय, तो शब्द म्हणजे ‘ट्रुथीनेस’. ‘ट्रुथीनेस’ म्हणजे सत्याचा आभास निर्माण करु शकण्याची शक्ती. ब-याच मतप्रदर्शनांमध्ये सत्याचा अंश सत्यासाठी आवश्यक पुरावा नसतो, परंतु त्यात सत्याभासाची शक्यता भरपूर असते. अशा वाक्यांना, दृष्टीकोन बनवणा-या मतांना कोल्बर्टनं नाव ठेवलं ‘ट्रुथीनेस’. ‘ट्रुथीनेस’ नावाचं हे वास्तव  जन्माला आलं, त्याबरोबर त्या आभासाचा उपयोगही लक्षात आला, कारण जमाना आलाय क्राऊड सोर्सिंगचा.

     ‘क्राऊड सोर्सिंग’ हा सध्याचा बझवर्ड आहे. चिन्हवास्तवाच्या जगात लक्षावधी व्यक्ती ट्विटर, फेसबुक, सोशल नेटवर्किंग साईट्स इथं मतप्रदर्शन करत फिरतायत. त्यांच्या या मत-मतांच्या गलबल्यांचा उपयोग अनेक कॉर्पोरेट व्यावसायिकांना होत आहे. या सा-या नव्या गर्दी-अकलेचं नाव आहे ‘क्राऊड सोर्सिंग’.व्यापारी वर्गाला हे क्राऊडसोर्सिंगचं महत्त्व फार पूर्वीपासून माहिती आहे. माझा एक अत्यंत हुशार व्यावसायिक बॉस होता. फाळणीच्या वेळी तो सहा वर्षांचा होता. अक्षरशः नेसत्या कपड्यानिशी घरदार सोडून तो मुंबईत आला आणि नंतर झोपडपट्टीत वाढला. मात्र नंतर कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीतल्या व्यवसायात यशस्वी झाला. तो मला हसून म्हणायचा, ’ज्ञानदा, बिझनेसमधल्या यशाचं गमक एकच, एकट्याची अक्कल चालवू नका. दहा लोकांना विचारा. कुठल्याही एका बुध्दीमान उत्तरापेक्षा जास्त माहीती, तुम्हाला तोच प्रश्न दहा लोकांना विचारून मिळेल’. मला त्याच्या बोलण्याचा वैताग यायचा कारण रियाझानं, अभ्यासानं तयार केलेल्या अकलेला नाकारून तो सामान्य दहा जणांची मतं का विचारात घेतोय ? असं वाटून चिडचिड व्हायची. मग एके दिवशी बॉसच्या ‘क्राऊड-सोर्सिंग’चं गमक मला उलगडलं.

     व्यापारात-बिझनेसमध्ये ज्यांना यशस्वी म्हणून आपण ओळखतो ते पण निर्णयनाच्या प्रक्रियेच्या अलिकडे आश्वासक उत्तरं (इन्डॉर्समेंट्स) शोधत असतात. एखादी नवीन कल्पना मांडायची आणि ‘तुम क्या सोचते हो?’ असा प्रश्न फ्लोट करायचा. आयआयटी, आयआयएम मंडळी असा प्रश्न आला की तल्लख, चतुर उत्तरांचा मारा करतात आणि बघता बघता लीडरकडं पंधरावीस कुरकुरीत विचारांची यादी तयार होते. त्यातुन विविध नफा-नुकसानीचा हिशोब करत बॉस निर्णय घेतो. वैश्य बॉसच्या यशाचं गमक, त्याची बुध्दीमान निर्णय सुचण्याची क्षमता हे नव्हतंच कधी, तर कोणती माहिती व्यवस्थित रिस्क घेऊन, कशी वापरायची यातंच तर होती वैश्य किमया! या किमयेचा आता नवा अदभुत अवतार म्हणजे ‘क्राऊडसोर्सिंग’. एखादा नवा ब्रँड लाँच करायचा आहे तर टाका तो फेसबुकात, बघा लोकं काय उत्तरं देतायत ते.  इंटुकड्यांना विचारा दर बुधवारी ’तहेलका’ वाचनाच्या सवयींबद्दल, वेगवेगळे प्रश्न कसे टाकत राहतं फेसबुकात? या हजारो वाचणा-या, व्यक्त होणा-या माणसांच्या लसावि उत्तरात सापडून जातं यशाचं गमक.

     हे यशाचं गमक जस व्यापा-यांच्या उपयोगाचं तसंच ते राजकारण्यांच्याही. म्हणून तर कोल्बर्टनं वर्णलेला ‘ट्रुथीनेस’ तपासण्याची नवी मॉडेल्स तयार होत आहेत. इंडियाना विद्यापीठानं तर www.truthy.indiana.edu ही वेबसाईटच लाँच केली आहे. एखाद्या राजकीय/ सामाजिक मतप्रदर्शनानंतर लोकं ट्विटर/ फेसबुकवर कशी प्रतिक्रिया देतात आणि त्या प्रतिक्रियांना मोजून त्यातल्या ‘सत्त्याभासा’ची शक्यताही मोजतात इंडियानातली गणितमानी मंडळी.

     कलेचं एक जग आहे. ज्याला मी सिग्नेचरचं जग म्हणते. तिथे तुम्ही जे काही करता ते तुमच्या शिक्क्यानं जन्माला येतं आणि दुसरं एक परात्म करणारं औद्योगिक जग आहे. या भुसार जगात कोणाच्याही सहीचं काहीच नसतं. गर्दीच्या गरजा भागवायला गर्दीचीच अक्कल वापरायची असा असतो इथला व्यवहार, बिनसहीचा- क्राऊडसोर्सिंगमधून जन्माला येणारा. मोठ्या मोठ्या ब्युरोक्रॅटिक रचनांमध्येदेखील मतांचा कॉपीराईट कोणाच्या हातात उरत नाही. एखादं ट्विटरवरचं मत कसं पटापटा रिट्विट होतं – मूळ ट्विट-निर्मात्याला त्याचं काही श्रेय मिळतच नाही. पोस्ट मॉडर्न जगात हे असं व्हर्जनिंग आणि कॉप्यांचं प्रसृतीकरण सतत चालू असतं.

     परवाच माझी एक मैत्रिण तणतणत म्हणाली, ’अगं, माझं विश्लेषण या माझ्या बॉससोबत शेअर केलं आणि दुस-या दिवशी ‘मिंट’ मध्ये याच्या नावावर लेख, त्यात माझा साधा उल्लेखही नाही.’

     तेव्हा तिला मी हसून हे माझं ‘क्राऊड सोर्सिंग’चं तत्त्वज्ञान ऐकवलं. ‘बॉस’ नावाच्या प्राण्याला शेवटी इजिप्तच्या फारोहा सारखं पिरॅमिड बांधायचं श्रेय मिळतं. त्या पिरॅमिडचा दगड कोणी कुठून वाहत आणला याचा काही मतलब उरत नाही. शेवटी कल्पनांचे दगड कुठून आले त्याला महत्त्वच नाही. मी तिला मग चिडवायच्या स्वरात म्हटलं, ’अगं, तुझ्या विश्लेषणावर तुझी सही लागून त्याचं फारफार तर काय झालं असतं? एखादं आर्टिकल, पण या पॉवर-स्प्रिंगबोर्डवरच्या बॉसच्या मुखातून तेच ज्ञान टपटपल्यानं त्याची किंमत वाढली आणि तुझ्या अनामिक भागीदारीचं श्रेय तुझ्या गुटगुटीत पगारात परावर्तित झालंच की.’

निळू दामले लिखित ‘लवासा’!निळू दामले     सबब हे श्रेयाचं आणि क्राऊड सोर्सिंगचं नातं हे असं व्यस्त आहे, पण परत एकदा मूळ मुद्दा ‘सत्याचा आभास’ तयार करण्याचा. हा 

     ‘ट्रुथीनेस’ दिवसेंदिवस महत्त्वाचा ठरत जाणार आहे. सध्या बघा निळू दामल्यांनी लवासाच्या अर्धमाहितीला त्यांच्या तथाकथित ’तटस्थ ’ ट्रुथीनेसचा टेकू दिलाय, तो ‘मौजे’नं प्रसिध्दही केलाय… मी अभ्यास करतीए तो हा ‘ट्रुथीनेस’ जिंकतोय की सुनीतीचं खरंखुरं राजकारण – त्याचा!

ज्ञानदा देशपांडे

भ्रमणध्वनी : ९३२०२३३४६७

इमेल – dnyanada_d@yahoo.com

About Post Author