गरिबांचा जीवनदाता : देवेंद्र गणवीर

_Devendra_Ganveer_1.jpg

देवेंद्र गणवीर विदर्भात आरोग्यसेवेचे काम करतात. त्यांनी आरोग्यदूत बनून, ज्या गरिबांजवळ असाध्य रोगांवर उपचार करवून घेण्यासाठी पैसा नाही, ज्यांना मरणाशिवाय पर्याय नाही अशा रुग्णांना मदत केली आहे. त्यांनी विदर्भातील नक्षलग्रस्त, अतिदुर्गम आदिवासी व ग्रामीण भागांत राहणार्‍या गरीब व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा पुरवल्या. त्यांनी ‘सत्य सामाजिक संस्थे’च्या माध्यमातून आरोग्य शिबिरे भरवली; रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून दिले; लोकांजवळील अतिरिक्त औषधे गोळा केली व ती गरजूंपर्यंत पोचवली. देवेंद्र यांनी ज्या शस्त्रक्रिया गरिबांपर्यंत मोफत पोचवल्या त्यांची किंमत पाच कोटी रुपयांपर्यंत निश्चितच जाईल! देवेंद्र यांनी त्यांचा स्वत:चा वैद्यकीय सेवेशी कोणताही संबंध नसताना ते कार्य केले! देवेंद्र यांनी एकोणचाळीस आरोग्य शिबिरे आयोजित केली. त्यामध्ये बारा हजार रुग्णांची तपासणी व उपचार केले. त्यांतील शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या बाराशे एकोणचाळीस रुग्णांवर नागपूर येथील रुग्णालयांमध्ये सरकारी योजनांचा वापर करून मोफत शस्त्रक्रिया करवून घेतल्या. एका अर्थी, देवेंद्र यांना गरिबांचा धन्वंतरी म्हटले तर ते वावगे ठरू नये.

हे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्याचे रहिवासी. त्यांना वेगवेगळ्या संस्थांच्या द्वारा समाजातील विविध समस्यांवर काम करत असताना लोकांच्या स्वास्थ्याचा प्रश्न प्रकर्षाने जाणवला. गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा यांसारख्या जिल्ह्यांमध्ये दुर्गम भागामुळे डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे असाध्य रोगांवर तपासण्या होत नव्हत्या. ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज होती, त्यांच्याजवळ शहरात जाऊन इलाज करण्यास पैसे नव्हते. यांनी त्या रुग्णांना उपचार मोफत करणारी हॉस्पिटल्स यांची माहिती देणे, योग्य उपचारांच्या दिशेने सल्ला व मार्गदर्शन देणे सुरू केले. त्यांना त्या कामात डॉ. अविनाश सावजी यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे देवेंद्र आवर्जून सांगतात. देवेंद्र यांनी जेथे डॉक्टर उपलब्ध नाहीत, तेथे डॉक्टरांची टीम नेऊन आरोग्य शिबिरे घेण्यास सुरुवात केली. त्या शिबिरांतून मूत्रपिंड व मूत्रमार्ग आजार, कॅन्सर, फ्रॅक्चर, स्त्रीरोग, हृदयरोग, स्तन व गर्भाशय यांचे आजार, लकवा, लहान मुलांचे आजार, जठर व आतड्याची शस्त्रक्रिया यांसारख्या वेगवेगळ्या आजारांच्या तपासण्या व आवश्यक शस्त्रक्रिया केल्या जातात. ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’तून विविध आजारांतील नऊशे एकाहत्तर शस्त्रक्रिया मोफत होतात, पण त्यासाठीच्या आवश्यक तपासण्या त्यातून होत नाहीत. यांनी शस्त्रक्रियेबरोबर त्या रोगांच्या तपासण्यादेखील मोफत व्हाव्या यासाठी विविध हॉस्पिटल्स व डॉक्टर यांच्याकरवी प्रयत्न चालवले. त्यामध्ये नागपूरचे डॉ. सौरभ अग्रवाल, केअर हॉस्पिटल, श्रीकृष्ण हृदयालय, अमरावतीचे संत अच्युतबाबा हॉस्पिटल आदींनी सहकार्य केले. तसेच डॉ. अविनाश सावजी यांची चाळीस-पन्नास डॉक्टरांची टीम ‘सेवांकुर संस्थे’च्या माध्यमातून त्यात सहभागी आहे. डॉ. सावजी यांनी यांना वर्षाला दहा ते बारा शस्त्रक्रिया त्यांच्याकडून येणार्‍या रुग्णांसाठी मोफत करवून देण्याची व्यवस्था केली आहे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी २००२ साली देवरीहून नागपूरला आले. तेव्हा त्यांना ग्रामीण राहणीमान, गावरान बोलीभाषा यामुळे नागपुरात अडचणी येत. ते बोलू लागले, की मुले त्यांना हसत. त्यांची भाषा महाविद्यालयातील मित्रमैत्रिणींमुळे सुधारत केली, राहणीमानातही फरक पडला. देवेंद्र यांना कॉलेज कॅम्पेनिंगच्या काळात नागपूरमधील ‘युवा संस्थे’त काम करण्याची संधी मिळाली. ती संस्था तरुणांमध्ये नेतृत्वगुण जोपासला जावा, आत्मविश्वास वाढावा, वादविवाद-चर्चासत्रांमध्ये तरुणांचा सहभाग वाढावा, त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण व्हावी यासाठी मूल्याधारित जीवन जगण्याचे शिक्षण देण्यासाठी कार्यशाळा भरवते. यांनी त्या संस्थेत स्वयंसेवक म्हणून तीन-चार वर्षें काम केले. तेथेच, त्यांच्यात समाजसेवेची बीजे रोवली केली. देवेंद्र ‘धनवटे नॅशनल कॉलेज’मधून बी.ए. २००६ साली झाले. त्यांनी पदवीनंतर नोकरीचा विचार न करता सामाजिक कामात झोकून देण्याचे ठरवले.

देवेंद्र सामाजिक कामानिमित्त वेगवेगळ्या संस्थांशी जोडले गेले. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती केली. त्यांचे काही मित्र नाशिकमधील ‘लोकविकास सामाजिक संस्था’ व ‘दिशा फाउंडेशन’ यांच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करत होते. देवेंद्रही त्यांच्या सोबत नाशिकमध्ये त्या कामात २००६ पासून सहभागी झाले. त्या दोन्ही मित्रसंस्था आहेत. त्या संस्था असंघटित मजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करतात. तसेच, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व महिलांवर होणार्‍या अत्याचारांविरूद्ध जनजागृती करतात. महिलांवर स्त्री-भ्रूणहत्या, हुंडाबळी, लिंगभेद अशा विविध मार्गांनी अत्याचार होतो. त्या संस्थेने महिलांवरील हिंसाविरोधी अभियानांतर्गत त्याविरूद्ध आवाज उठवला. देवेंद्र त्या संस्थेच्या कामात प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून सहभागी होते. ‘लोकविकास सामाजिक संस्थे’चे अध्यक्ष मिलिंद बाबर व ‘दिशा फाउंडेशन’च्या अंजली बोराडे यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले असे देवेंद्र सांगतात.

_Devendra_Ganveer_2.jpgदेवेंद्र स्वत:च्या संस्थात्मक अनुभवाबद्दल म्हणतात, “मी यवतमाळमध्ये ‘रसिकाश्रय संस्थे’च्या माध्यमातून शेतकरी व महिला यांच्या समस्यांवर काम केले. मी त्या कामातून सामाजिक दृष्ट्या घडत गेलो. दरम्यान, मला सुप्रिया सुळे यांच्या सोबत ‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. मी तेथे ‘यशस्विनी सामाजिक अभियानां’तर्गत तरुणांच्या प्रश्नांवर काम केले. मी प्रतिष्ठानच्या कामात २००९ ते २०१२ पर्यंत कार्यरत होतो. मी ‘फ्युचर ग्रूप’च्या माध्यमातून दीड वर्षें ‘स्कील डेव्हलपमेंट’चे वर्ग घेतले. मला वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना विदर्भामध्ये अशा पद्धतीचे काम करणार्‍या संस्थेची गरज जाणवली. तो आदिवासी भाग असल्यामुळे व नक्षलग्रस्त, युद्धजन्य परिस्थितीमुळे विकासाच्या पायाभूत सुविधा तेथे उपलब्ध नाहीत. मी त्या अनुषंगाने स्वतंत्रपणे काम करण्यासाठी ‘सत्य सामाजिक संस्थे’ची गोंदियामध्ये २००९ साली स्थापना केली. संस्थेचे कार्यक्षेत्र गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा असे वाढत गेले. मी विद्यार्थ्यांसाठी ‘स्कील डेव्हलपमेंट’चे प्रशिक्षणवर्ग सुरू केले, त्यांना तीस-तीस मुलांचे ग्रूप करून व्यावसायिक प्रशिक्षण दिले. मी पंचवीस बॅचेस प्रशिक्षित केल्या आहेत. मी प्रयत्न करून त्यांतील चारशे मुलांना वेगवेगळ्या शहरांत ‘बिग बझार’, ‘कॅफे कॉफी डे’, ‘मॅकडोनाल्ड’, ‘पिझ्झा हट’ अशा कंपन्यांमध्ये नोकर्‍यांना लावले आहे. ती मुले प्रत्येकी महिना पंधरा ते वीस हजार रुपये कमावतात.”

सावजी देवेंद्रबद्दल सांगतात, “मी देवेंद्रला दहा वर्षांपासून ओळखतो. त्याचे कौशल्य लोकांना मदत मिळवून देण्यात आहे. देवेंद्र एकेकाळी काळी-पिवळी गाड्यांवर सीटा भरण्याचे काम करायचा. तो फक्त बी.ए.पर्यंत शिकला. तो तेहतीस वर्षांचा आहे. तो गरीब व कोणीही वाली नसणाऱ्या रुग्णांसाठी जीवनदाता बनला आहे.”

देवेंद्र चिमूरचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांना त्यांच्या कामात मदत करतात. ते त्यांच्या मतदारसंघातील राजकीय कामे, शिक्षण, बेरोजगारी, आरोग्यविषयक प्रश्न हाताळतात. त्यासाठी त्यांना आमदारांकडून मानधन मिळते. देवेंद्र स्वत:ची संस्था त्या मानधनातून चालवतात. देवेंद्र यांचे मित्र राहुल राऊत त्यांना संस्थेच्या कामात मदत करतात. देवेंद्र सांगतात, “रुग्णांची नोंदणी सध्या फोनवरून होते. आम्ही नोंदणी केलेल्या रुग्णाच्या कागदपत्रांची शहानिशा करून व त्याची गरज ओळखून त्याला मोफत उपचारासाठी मदत करतो. संस्थेच्या कामाचा पसारा वाढत आहे. ते रुग्णसेवेचे न संपणारे काम आहे.”

देवेंद्र यांना त्यांच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांचा भाऊ गोंदियामध्ये ‘सत्य सामाजिक संस्थे’चे काम सांभाळतो. देवेंद्र यांची पत्नी (पत्नीचे नाव) नागपूरला पोलिस कॉन्स्टेबल असून तिने घरची जबाबदारी पेलली आहे. “मला पत्नीने दिलेल्या मोकळिकीमुळे मी माझ्या कामाला न्याय देऊ शकतो,” असे देवेंद्र सांगतात.

देवेंद्र गणवीर, ९४२०३६२६४३, devendra.ganvir09@gmail.com

– वृंदा राकेश परब

About Post Author

4 COMMENTS

  1. धन्यवाद्, आपण मला संधी दिली.
    धन्यवाद्, आपण मला संधी दिली.

Comments are closed.