गणितप्रेमींचे नेटवर्क

लोक दिवसरात्र गणित करत असतात, परंतु त्यांना गणित नको असते. ते गणिताला घाबरतात. सत्तर टक्के तरी लोकांबाबत ते खरे आहे. मी एका शाळेत गणिताची आवड निर्माण व्हावी म्हणून चौथी ते दहावी या इयत्तांतील मुलांना रोज एकूण चार तास शिकवतो. मी गणित शिकवताना गणिताच्या विविध अंगांचा मूलभूत पाया समजावून सांगण्याचे काम करतो. त्यामुळे मी रिकाम्या तासांतसुद्धा आल्याचा आनंद मुलांना होतो. मी वयाच्या बहात्तराव्या वर्षी, निवृत्तीनंतर, हा खटाटोप करतो हे ऐकल्यावर सर्वांना कौतुक वाटते. पण शाळेत गणित सोडून इतर विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनासुद्धा गणिताची भीती वाटत राहतेच! ते ऐकल्यावर वाईट वाटते.

माझी अशी खात्री आहे, की गणित शिकवणारे शिक्षक मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी म्हणून महाराष्ट्रातील अनेक शाळांमधून निरनिराळे प्रयोग आणि युक्त्या योजत असतील. मंगला नारळीकर यांची व अन्य गणित शिक्षकांची तशा स्वरूपाची पुस्तकेदेखील प्रसिद्ध आहेत. गणितप्रेमींच्या अशा सर्व कल्पनांचे संकलन करावे आणि त्यावर साधकबाधक चर्चा व देवाणघेवाण व्हावी या हेतूने एक व्यासपीठ निर्माण करण्याचा विचार आहे. त्यात ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे सहकार्य आहे. त्यामुळे गणिताबद्दल जी अनास्था आहे ती दूर होण्यास मदत होईल.

शिक्षकांनी आणि इतर गणितज्ञांनी त्यांच्या कल्पना व प्रयोग ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या इमेलवर पाठवाव्यात.

मी या प्रयत्नास आरंभ करून देत आहे. मी गणिताच्या शिक्षकांना व गणितप्रेमींना आवाहन करतो, की त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे अशी इच्छा आहे.

– श्रीनिवास दर्प  shri2409@gmail.com, 9819300186

 

About Post Author

1 COMMENT

  1. हा एक खूपच स्तुत्य उपक्रम…
    हा एक खूपच स्तुत्य उपक्रम आहे.गणित प्रेमिंचा हा कट्टा देवाण घेवाण करून नक्कीच पुढच्या पिढीत गणिताची आवड निर्माण करेल. ह्या उपक्रमासाठी अनेक शुभेच्छा!!!

Comments are closed.