ख-या देवाचा शोध आणि सतत प्रश्न विचारणारा माणूस

सॉक्रेटिस
सॉक्रेटिस

     सुमारे दोन हजार चारशे वर्षांपूर्वी प्राचीन ग्रीस देशातल्या अथेन्स शहरामधे एक कुरूप माणूस होऊन गेला. तो बसक्या नाकाचा व कुरूप तर होताच, पण त्याला शारीरिक स्वच्छतेचाही फारशी पर्वा नसायची. तो इतर लोकांना सतत काही ना काही उलटसुलट प्रश्न विचारून बेजार करायचा. काही लोकांना त्यांचे प्रश्न आवडायचे, पण इतर खूप लोकांना ते त्रासदायक वाटायचे, नकोसे व्हायचे आणि त्यांना त्याचा फार राग यायचा. त्याची बायकोदेखील भांडखोर होती.

     तो तरुणपणी अथेन्सच्या लष्करातला सैनिक होता. त्याने अनेक लढायांमध्ये भाग घेतला. पण तो प्रौढपणी मात्र काहीच कामंधदा न करता लोकांना प्रश्न विचारत हिंडायचा आणि असे करत तो कुठेही फिरायचा. तो रस्त्यावर किंवा भरबाजारात सुद्धा लोकांना थांबवून प्रश्न विचारायचा. त्याने विचारलेल्या प्रश्नांना लोकांनी उत्तरे दिली, की तो ती उत्तरे कशी चुकीची आहेत हे दाखवून द्यायचा आणि स्वत:ला शहाणे समजणार्‍या लोकांना ते प्रत्यक्षात किती अडाणी व गाढव आहेत, हेही दाखवून द्यायचा.

     एकाला त्याने विचारले, ‘चोरी करणे पाप आहे का?’ तो माणूस म्हणाला, ‘हो, अर्थातच!’ मग पुढे त्याने विचारले, ‘पण समजा, तुमचा एक मित्र भयंकर नैराश्याच्या आहारी जाऊन कमरेला लटकावलेल्या सुर्‍याने स्वत:ला भोसकून आत्महत्या करायला निघाला, आणि तुम्ही हळूच, त्याच्या नकळत त्याचा सुरा पळवला, तर ते पाप होईल का?’ उत्तर देणारा अर्थातच निरुत्तर झाला.

     पण त्याच्या प्रश्न विचारण्यामागचा खरा उद्देश इतर लोकांना अडाणी किंवा निर्बुद्ध ठरवणे असा नसायचा. उलट, लोकांना अजून कशातले फारसे काही समजलेले नाही याची जाणीव व्हावी आणि त्यांना विचार करण्याची सवय लागावी, त्यांचा चौकसपणा वाढावा आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी हा चांगला व समाजप्रबोधनाचा उद्देश त्याच्या प्रश्न विचारण्यामागे असायचा.

सॉक्रेटिस     सतत प्रश्न विचारुन सर्व लोकांना हैराण करणार्‍या या माणसाचे नाव होते सॉक्रेटिस. त्याच्या बुद्धिवैभवाची मोहिनी अनेक लोकांच्यावर पडायची.

     त्या काळी ग्रीस देशामधे अनेक वेगवेगळे देव पुजले जायचे. बहुसंख्य लोक धार्मिक होते आणि त्यांची देवावर भरपूर श्रद्धा असायची. पण सॉक्रेटिस श्रद्धेला विरोध करायचा. तो म्हणायचा, लोकांनी नेहमी प्रश्न विचारत राहिले पाहिजे, स्वत:चे डोके चालवून विचार केला पाहिजे आणि त्यायोगे देवाबद्दलचे खरखुरे सत्य शोधून काढले पाहिजे.

     त्या काळी अथेन्स शहरामधे अनेक विद्वान लोक होते. आपल्या महाराष्ट्रात जसे एकेकाळी पुणे शहर म्हणजे विद्वत्तेचे आगर समजले जाई; तसेच, त्या काळच्या ग्रीस देशामधले अथेन्स. तिथल्या विद्वान लोकांना ‘सोफिस्ट’ असे म्हणत. ग्रीक भाषेत सोफिया म्हणजे ज्ञान. त्यावरून सोफिस्ट अनेक श्रीमंत लोक आपल्या मुलांना सोफिस्ट लोकांकडे शिकायला पाठवत. हल्लीचे आईबाप आपापल्या पाल्यांना भरमसाठ डोनेसन देऊन मोठ्या व नावाजलेल्या शिक्षणसंस्थांमधे प्रवेश मिळवून देतात ना? त्यातलाच तो अडीच हजार वर्षांपूर्वीचा प्रकार! पण सॉक्रेटिस मात्र सोफिस्ट लोकांशी वाद घालून त्यांना मुर्खांत काढत असे. त्यामुळे बहुसंख्य सोफिस्ट लोक सॉक्रेटिसवर भयंकर चिडत.

     दुर्दैवाने, त्यातल्याच एका मिलेट्स नावाच्या गृहस्थाने शेवटी वैतागून सॉक्रेटिसला कोर्टात खेचले आणि त्याच्यावर अनेक आरोप लावले. सॉक्रेटिस श्रद्धेला विरोध करतो, आपल्या ग्रीक देवांना मानू नका असे लोकांना शिकवतो, देवाबद्दल भलत्याच कल्पना लोकांना सांगतो. इतकेच नव्हे तर तरुण पिढीला आपल्या पारंपरिक संस्कृतीच्या विरुद्ध वागायला शिकवतो आणि समाजातल्या उच्चपदस्थ व अधिकारी, विशेषत: धर्माधिकारी व्यक्तींच्या विरुद्ध तरुणांना फितवतो असे अनेक आरोप ठेवले.

     त्या काळी ग्रीस देशामधे नागरिकांच्या समुदायापुढे खटले चालवले जात. त्यांना ज्यूरी म्हणत. तशा अनेक नागरिकांच्या ज्यूरींसमोर सॉक्रेटिसचा खटला चालवला गेला. त्यापैकी एकोणपन्नास टक्के ज्यूरींनी त्याला निर्दोष म्हटले, पण एकावन्न टक्के ज्यूरींनी दोषी ठरवले. न्यायाधिशाने त्याला देहान्त प्रायश्चिताची शिक्षा ठोठावली. पर्याय एकच होता, की उर्वरित आयुष्यभर सॉक्रेटिसाने प्रश्न विचारू नयेत, कुणाशीही वाद घालू नये, चूप बसावे आणि कुणालाही काहीही शिकवू नये. सॉक्रेटिसने अर्थातच पर्याय नाकारला आणि म्हटले, “प्रश्न न विचारता आणि आयुष्यातल्या प्रत्येक घटनेचे व समोर असलेल्या परिस्थितीचे वैचारिक परीक्षण न करता जगलेले आयुष्य काय कामाचे? असे आयुष्य जगण्यात तरी काय हशील? आणि त्याने असे म्हणून, देहान्त प्रायश्चित म्हणून त्याला दिलेला विषाचा प्याला आनंदाने पिऊन टाकला!

प्रश्न न विचारता जगण्याऐवजी सॉक्रेटिसने मरण पत्करले.      सॉक्रेटिस जे बोलत होता, करत होता, तेच बरोबर होते. ते व्यवहारात तर खरे आहेच, पण अध्यात्मातले ज्ञान मिळवण्याकरतादेखील प्रश्न विचारावे लागतात. असे प्रश्न इतरांना, म्हणजे गुरुला, इतर सहाध्यायी गुरुबंधूंना किंवा इतर थोरामोठ्यांना तर विचारावे लागतातच, पण कित्येकदा स्वत:च स्वत:ला देखील विचारावे लागतात. आणि नुसते प्रश्न विचारून भागत नाही, त्यांचा शोध घ्यावा लागतो. असे केल्याशिवाय अध्यात्माचे ज्ञान तरी मिळणार कसे?

     यजुर्वेदातला याज्ञवल्क्य आणि त्याच्या गार्गी व मैत्रेयी या दोन बायका, यांच्यामधला प्रश्नसंवाद आठवतो? उपनिषदातला श्वेतकेतू आणि त्याचा बाप उद्दालक यांच्यामधला प्रश्नसंवाद आठवतो? नचिकेत आणि यम यांच्यातला प्रश्नसंवाद आठवतो? आणि वेदवाड्ःमयातला सर्वात मोठा, खरेतर भलामोठा प्रश्न, ‘कस्मै देवाय हविषा विधेम?’ (अर्थ – यज्ञ करताना कुठल्या देवाला यज्ञामधे हवि अर्पण करून उपासना करायची?) इतकेच काय, पण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने भगवान कृष्णाला विचारलेला प्रश्न, ‘स्थितप्रज्ञस्य का भाषा?’ आठवतो?

     प्रश्न, प्रश्न आणि आणखी अनेक प्रश्न. आख्खा हिंदू तत्त्वज्ञानामध्ये प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांच्याशिवाय आहेच काय? आणि त्यात श्रद्धा कुठे आली? ती तर शंभर टक्के वैचारिकता आहे. त्यात पुरेपूर लॉजिक भरलेले आहे.

     म्हणून निव्वळ श्रद्धेच्या पोटी काहीही मान्य करणे हे अध्यात्म नव्हे. मग ती देवाच्या अस्तित्वाबद्दलची श्रद्धा का असेना!  तेव्हा सतत प्रश्न विचारत राहून देवाबद्दलच्या सत्याचा शोध घेत राहणे हेच खरे अध्यात्म.

     तुकाराम महाराजांच्या एका प्रसिद्ध अभंगाची सुरूवात ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी आहे. त्या अभंगाच्या शेवटल्या ओळीमधे तुकोबाराय म्हणतात, ‘तुका म्हणे होतो मनाशी संवाद, आपुलाचि वाद आपणासी’

     खर्‍या अध्यात्मात केवळ श्रद्धा ठेवून स्वस्थ बसायचे नसते. तर प्रश्न विचारायचे असतात, वाद घालायचा असतो, देवाबद्दलच्या सत्याचा शोध घ्यायचा असतो.

     आणि येशू ख्रिस्ताने तरी वेगळे काय सांगितले? ‘शोधा म्हणजे सापडेल. आणि ठोठावा म्हणजे उघडेल’ हे ख्रिस्तवचन जगप्रसिद्ध आहे. एकविसाव्या वर्षी ज्ञानेश्वरानी संजीवन समाधी घेऊन देहत्याग करण्याचा निर्णय का घेतला असेल? त्यापाठीमागचे लॉजिक तुमच्या ध्यानात आले का?

     पण तोदेखील एक प्रश्नच की! यापरते अध्यात्म ते कोणते ?

डॉ. अनिलकुमार भाटे,
निवृत्त प्राध्यापक, विद्युत अभियांत्रिकी,
संगणक विज्ञान, आय-टी आणि मॅनेजमेण्ट
एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका
इमेल-  anilbhate1@hotmail.com

About Post Author

4 COMMENTS

  1. अजून वाचावेसे वाटत रहात
    अजून वाचावेसे वाटत रहात असतांनाच संपलेला एक अभ्यासपूर्ण लेख. गहन विषय पण सरळ सोपी भाषा .आपण केलेले लेखन प्रश्नोपनिषदा सारखे छान झाले आहे. लिहित रहा.श्री शारदा प्रसन्न आहे.
    अण्णा सोनवणे. नाशिक ९४२२७५६३३३

  2. dada prashna mule samadhan
    dada prashna mule samadhan hote khar aahe , nantar punha prashan aahetach ,bhale te yogya asot va yogya , sansarik asot va adyatmik,vait aso va changale ,pan jya manala prashan padatat tyacha vichar na karata anubhav gheun baghave ‘यापरते अध्यात्म’ yethun suru hote(9421423034)

Comments are closed.