भंडारा जिल्ह्यात एक छोटे गाव आहे. खराशी. लोकसंख्या एक हजार. गाव दुर्लक्षितच. त्या गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रथम सकाळी प्रार्थना आणि परिपाठ. त्यानंतरच्या तासात शिक्षकाकडून अचानक कोठलाही प्रश्न विचारला जातो. उदाहरणार्थ, जगातील शांतताप्रिय लोकांना तो देश उठसूठ अणुबॉम्बची धमकी देतो. मुळात, तो देशच तसा आहे. मुलांनो.. सांगा बघू त्या देशाचे नाव?’
‘खराशी पॅटर्न’ची कीर्ती ऐकून आजूबाजूचे लोक शाळेच्या प्रांगणात जमलेले असतात. मुलांच्या मनात प्रश्नाचे उत्तर एका क्षणात तयार असते. चिमुकल्यांकडून सामूहिक उच्चार येतो… उत्तर कोरिया!
सर्वांना वेठीस धरणारा तेथील सम्राट कोण? मुख्याध्यापकांच्या उपप्रश्नाने मुलांचा गोंधळ उडत नाही. मुलांचे हात वर. उत्तर तय्यार… किम जोंग!
जगाला आण्विक युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या उत्तर कोरियाचा इतिहास आणि इतर प्रश्नांची हवीतशी सरबत्ती सुरू होते. मुले धडाधड उत्तरे देत असतात. त्यांना बघण्यास आलेल्या ‘प्रेक्षकां’ना सुखद धक्का बसलेला असतो. तो उपक्रम ऊन अंगावर घेत सकाळी तासभर चालतो. भेट देणारे बदलतात. त्यांच्या चेहऱ्यांवरील विस्मय विद्यार्थ्यांनाही नित्याचा झाला आहे.
राज्यभरात जिल्हा परिषदेच्या एकोणसत्तर हजार शाळा आहेत. अभावांचा रतीब आणि बेशिस्तीचा कहर सगळीकडेच दाटलेला आहे. प्रशासनाचे लक्ष नाही, गुरुजींना वेळ नाही असे सार्वत्रिक चित्र आहे. खराशीची शाळा त्या नियमाला अपवाद ठरेल. शाळेची पटसंख्या आहे फक्त एकशेचाळीस. मुबारक सय्यद हे तेथील धडपडे मुख्याध्यापक. ते खराशीत आठ वर्षांपूर्वी आले तेव्हा त्यांची लोकप्रियता झाडीपट्टीतील कसलेला कलावंत अशी होती. त्यांनी त्यांच्या नाट्यवेडात बाराशेहून अधिक नाटकांमध्ये कामे केली आहेत. त्यांचा खलनायक पूर्व विदर्भात लोकप्रिय होता. त्यांची भूमिका मुरमाडी शाळेतून खराशीला झालेल्या बदलीबरोबर बदलली. त्या बदलीने त्यांना नायकही बनवले. ‘खराशी पॅटर्न’ तेथून उदयास आला.
त्यांची शाळा ही नो-बेल स्कूल आहे. तासिका संपल्याचा गजर तेथे नाही. अंगणवाडीपासून चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आवाक्याबाहेरच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची सवय लागली आहे. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचे नाव सर्वसामान्य माणसांच्या लक्षात कोठे असते? खराशीच्या शाळेतील विद्यार्थ्यांची तुम्ही ‘टेस्ट’ घ्या. केरळ, हिमाचल या राज्यांच्या आधीच्या तीन मुख्यमंत्र्यांचीही नावे ते एका क्षणात सांगतील.
मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांनी मुलांना बचतीची सवय लावली आहे. मुलांची खाऊचे पैसे बचत खात्यात जमा करण्यासाठी गर्दी असते. सारा हिशेब मुले ठेवतात. रक्कम जमा करणे, पासबुक नोंदी आणि त्यावरील शिक्का-सहीसुद्धा. शाळेपुढे खाद्यविक्रीची दुकाने नाहीत. मुले खाणारच नाहीत तर दुकान चालणार कसे? शालेय वस्तू भंडार आहे. नोटबुक संपले तर ते लगेच मिळते. खात्यातून पैसे वळते होतात. त्यांवर वीस टक्के सवलत असते. खिचडी बनवण्याची जागा अगदी स्वच्छ. सर्व वर्गांना सुटी एकाच वेळी नसल्याने गोंधळ नाही. शिस्त कमालीची. शाळा सकाळी सात ते बारापर्यंत असते. सगळे विद्यार्थी संध्याकाळी पाच ते सहा खेळण्यासाठी शाळेत जमतात. गुरुजीही त्यांच्यासोबत खेळतात. प्रोजेक्टरवर ‘मोटिव्हेशनल’ व्हिडिओ दाखवले जातात, आकर्षक माहिती शेअर केली जाते. हे सर्व होते शिक्षकाविना. सर्व धुरा वर्गाच्या कॅप्टनकडे.
शाळेतील नव्वद टक्के मुलांचे पालक मजूर किंवा शेतकरी आहेत. भवताल खेड्यापाड्यांचा असल्याने भाषा ग्राम्य जाणवते. आत्मविश्वासाला मात्र तोड नाही. मुलांचे इंग्रजीही पक्के.
मागील सात वर्षांत तीस हजारांहून अधिक लोकांनी या शाळेला मुद्दाम भेट दिली आहे. दर बुधवारी आणि शुक्रवारी पाच-पन्नास लोक जिल्हा परिषदेचा शाळा पॅटर्न समजून घेण्यासाठी गाड्या करून खराशीला येतात. मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांच्यासह सतीश चिंधालोरे, राम चाचेरे, जयंत खंडाईत, दुर्गा टेकाम या शिक्षकांचीही त्या प्रयोगातील कामगिरी महत्त्वाची आहे. अभ्यासक्रमात नसतानाही ऑलिम्पिक स्पर्धांमधील विक्रम, विदेशी क्रिकेटपटूंची नावे, नोबेलच्या सनावळी अशा विषयांवर मुले चर्चा करतात. सीबीएसई शाळांची मुले जिल्हा परिषद शाळांकडे वळवण्याचा चमत्कार खराशीने घडवला आहे. विद्यार्थ्यांचा ‘एक हात वर’ ठेवण्याची किमया साधणाऱ्या खराशी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला हवी.
– श्रीपाद अपराजित
shripad.aparajit@timesgroup.com
वाचणी य आणि शिक्षकांनी बोध…
वाचणी य आणि शिक्षकांनी बोध घ्यावा असा अप्रतिम लेख
आपन केलेला उपक्रम फारच छा आहे
आपन केलेला उपक्रम फारच छा आहे
KHUP CHHAN PATTERN AAHE
KHUP CHHAN PATTERN AAHE
भारीच उपक्रम आहे सरांची…
भारीच उपक्रम आहे सरांची मेहनत व कषट याला तोड नाही
Comments are closed.