क्षण कृतज्ञतेचा, अविनाश बर्वे सरांच्या पंच्याहत्तरीचा…!

0
49
-barve-sir

अविनाश दामोदर बर्वे हे ठाण्याच्या मो ह विद्यालयातील उपक्रमशील, कनवाळू, संयमी, सतत हसतमुख असणारे निवृत्त शिक्षक. बर्वेसर छत्तीस वर्षें मो ह विद्यालयात सेवारत होते. ते सगळ्यांना आपलेसे करणे या त्यांच्या गुणवैशिष्ट्यामुळे सगळ्यांचे लाडके शिक्षक/सहकारी बनले. त्यांना निवृत्त होऊन जवळपास एकोणीस वर्षें उलटली, तरीही त्यांचा शाळेशी व नव्या शिक्षकवर्गाशी बंध सैलावला नाही. ते उत्साहाने शाळेच्या विविध उपक्रमांत नित्य सहभागी होतात. त्यांनी ‘अविनाश’ या एका शब्दाने ‘मो ह’ परिवारातील अनेकांना मोहून टाकले आहे! त्यांनी ऐंशी ते नव्वद वर्षें वयोगटातील जुन्या शिक्षक-पालकांपासून ते विशी-पंचविशीतील माजी विद्यार्थ्यांना एका माळेत प्रेमाने ओवले आहे. सरांविषयीच्या त्या प्रेमापोटी माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन शाळेच्या सहकार्याने त्यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन केले. त्या योजनेला शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र राजपूत यांनीही क्षणात संमती दर्शवली! अविनाशसरही असे, की त्या सोहळ्याच्या निमित्ताने आजी-माजी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, मित्र परिवार एकत्र येतील म्हणून त्यांनी त्या समारंभास संमती दिली!

तो कार्यक्रम म्हणजे कौटुंबिक सोहळाच घडून आला. विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ‘अविनाश बर्वे अमृतमहोत्सवी वर्ष’ अशी सुबक रांगोळी काढण्यात आली होती. शाळेच्या व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बर्वे पती-पत्नींचे स्वागत केले. त्यांचा कर्तबगार मुलगा – मिलिंद मुद्दाम पुण्याहून आला होता. सरांच्या जीवनातील आनंदाचे अनेक क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त होते. बर्वेसरांची फोटोग्राफी ही एक हौस. विविध क्षणींचे फोटो काढायचे. त्या प्रसंगांस अनुरूप पद्यपंक्ती त्यासोबत लिहायच्या आणि लॅमिनेट करून संबंधितांना पाठवून द्यायचे. त्या छायाचित्रांचे कोलाज शिक्षक-सहकाऱ्यांनी केले होते. ती छायाचित्रे पाहताना सर्वांसहित अनेक शिक्षक, माजी विद्यार्थी गतकाळाच्या स्मृतीत रममाण झाले. तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सरही शाळेच्या शतकमहोत्सवी समारंभातील छायाचित्रे पाहताना हळवे झाले होते. तो त्यांच्या सेवेतील सुवर्णकाळ होता असे सर म्हणाले.

 

हे ही वाचा-

अविनाश बर्वे – उत्स्फूर्त उपक्रमशीलता

मतिमंदांचे घरकूल

अवनी: मतिमंद मुलांना मायेचे छत्र!

 

सोहळ्याप्रसंगी अनेक वकील, डॉक्टर्स, इंजिनीयर्स, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक यांनी सरांच्या प्रेमापोटी सक्रिय उपस्थिती दर्शवली होती. प्रत्येकजण बर्वेसरांचा चाहता याच भावनेने आला होता. व्यासपीठावर बाळासाहेब चितळे (माजी शिक्षक, वय नव्वद वर्षें), शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र राजपूत आणि बर्वे पती-पत्नी होते. सरांचा सत्कार सोहळा शैलेंद्र साळवी यांच्या हस्ते शाल-श्रीफळ आणि पुस्तक देऊन साजरा झाला. तोही अत्यंत साधेपणाने, फुलांचा गुच्छ नाही की पैशाची थैली नाही. उलट, सरांनीच शाळेच्या ‘अभिरुची मंडळा’ला पाऊण लाख रुपयांचा धनादेश दिला. धन्य तो दाता! बर्वेबार्इंचाही सहचारिणी म्हणून आदरसत्कार केला गेला.

कायम, दुसऱ्याच्या सुखात स्वत:चा आनंद मानणारे, कोणाच्याही संकटाच्या वेळी तत्परतेने धावून जाणारे, शीघ्र कवी मनाचे… त्यांनी त्यांचे ते सारे गुण उपयोगात आणून दिव्यांग मुलांचा सांभाळ करणाऱ्या ‘अमेय पालक संघटने’चा ‘घरकुल’ नावाचा आधुनिक आश्रम डोंबिवलीजवळ खोणी येथे उभा केला आहे! पण ते स्वतःला त्या संस्थेचा केवळ एक ‘स्वयंसेवक’ मानतात. त्यांनी जोपासलेली-वाढवलेली ती संस्था पुढील पिढीच्या हाती देण्याचा चंगच बांधला आहे. ते आमचे सर! थोरामोठ्यांना वाचनाची आवड लागावी यासाठी सतत आग्रही असणारे. त्यांच्या विविध आवडी, त्यातून जाणवणारे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व यांबद्दल सोहळ्यात प्रत्येकाला काही ना काही बोलायचे होते. पण ते शक्य होणार नव्हते, म्हणून शिक्षक-सहकाऱ्यांनी सरांना पत्रे लिहून देण्याची भन्नाट कल्पना काढली. सरांना स्वतःला पत्रलेखनाची प्रचंड आवड आहे. ते स्वतः खूप पत्रे लिहित असतात – हल्ली व्हॉट्स अॅप मसेजेस. त्याखेरीज दरवर्षी दिवाळीत ‘घरकुल आश्रमाच्या हिंतचिंतक’ जवळपास अडीच हजार लोकांना शुभेच्छापत्रे लिहून पाठवतात. शिक्षक-सहकाऱ्यांनी त्यांची ती आवड लक्षात घेऊन त्यांना चक्क एक पत्रपेटीच (पोस्टाचा लाल डब्बा असतो, तसा ) भेट दिली! शैलेश साळवी या माजी विद्यार्थ्याने सुबक आकर्षक पत्रपेटी तयार केली होती. कार्यक्रमाआधी सर्वांनी त्यांची त्यांची पत्रे लिहून पेटीत जमा केली होती. त्या भेटीने सरांना विशेष आनंद झाला आणि प्रत्येकाला त्याच्या सरांविषयीच्या आदर, कृतज्ञता भावना व्यक्त करण्याची छान संधी मिळाली. समारंभातून घरी गेल्यावर सर ती पत्रे वाचत बसतील ही कल्पना. त्याप्रसंगी मान्यवरांनी, मित्रमंडळींनी, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी 

-barve-postbox-giftअभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी या शाळेच्या माजी विद्यार्थिनी- त्यांनी बर्वे उभयतांची खुसखुशीत मुलाखत घेतली. सरांनी त्यांच्या कामाविषयी, शाळेतील – खासगी आयुष्यातील अनेक गंमतीजमती सांगितल्या. सरांच्या आणि बार्इंच्या स्वभावगुणांचे पैलू त्यातून उलगडत गेले. त्या दोघांची कै. कौस्तुभचा (सरांचा मतिमंद मुलगा) सांभाळ करताना झालेली धावपळ, घालमेल उपस्थित सर्वांना ठाऊक होती, तरी ती पुन्हा ऐकून सर्वांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. बर्वे दोघे देवाने त्यांच्यावर सोपवलेली ती एक जबाबदारी होती याच भावनेने वावरले. सरांच्या आयुष्याला एवढया मोठ्या दुःखाची कडा असूनही ती दोघे इतके छान, सुसंस्कृत आयुष्य जगत आहेत! ती दोघे नेहमी दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी बनली आहेत. शिरीष अत्रे मॅडम म्हणतात,

कणखर तरी खळखळणारे निर्झरासारखे, आनंददायी आणि निर्मळ,
स्वतः मूल्यांविषयी आग्रही पण तितकेच प्रेमळ.    
कसे ओ घडलात असे?
आयुष्याच्या शाळेतील प्रश्न सोडवता सोडवता झालात सह्याद्रीच जसे!

सरांनी कार्यक्रमाच्या शेवटी मनोगत मांडताना शाळेविषयी, तेथील सहकाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

– स्नेहा शेडगे 9920811755

snehashedge86@gmail.com 

About Post Author