कोरची अपंग संघटनेची गगनभेदी भरारी!

_Korachi_Apang_Sanghatana_1.jpg

‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था फेब्रुवारी १९८४ पासून मागस भागात कार्यरत आहे. संस्थेच्या कामाचे क्षेत्र गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा या तीन जिल्ह्यांत आहे. संस्था पाच विषयांवर प्रामुख्याने काम करते – १. महिला अधिकार, २. शिक्षण अधिकार, ३. उपजीविका अधिकार, ४. आरोग्य अधिकार, ५. विकलांगता अधिकार. माझ्याकडे जबाबदारी अपंगांच्या पुनर्वसनास मदत अशा प्रकारची आहे. त्या कामाची सुरुवात अॅक्शन एड इंडिया (मुंबई) यांच्या आर्थिक सहकार्यातून झाली. अपंग पुनर्वसन कामाची सुरुवात २००३ पासून झाली. मी विकलांग लोकांची स्थिती काय आहे ते पाहण्यासाठी प्रथम कोरची व कुरखेडा या दोन तालुक्यांतील पंचवीस गावांचे प्राथमिक सर्वेक्षण केले. पंचवीस गावांतील सात हजार सहाशे लोकसंख्येपैकी एकशेएकवीस लोक अपंग निघाले. त्यांपैकी फक्त आठ लोकांकडे तसे प्रमाणपत्र आणि दोन लोकांकडे बसपास होता. अपंग व्यक्तींना काय सवलती मिळू शकतात ते त्या लोकांना माहीत नव्हते; अपंगत्व प्रमाणपत्र कोठे काढतात – केव्हा काढतात- त्यासाठी लागणारे कागदपत्र या सगळ्याविषयी अज्ञान होते. ज्यांना ती माहिती होती त्यांच्यापुढे अडचण होती ती आर्थिक. दीडशे किलोमीटर एवढ्या प्रवासासाठी पैसा कोठून आणावा? अपंगांना त्या कामी सहाय्य करावे म्हणून ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेने पुढाकार घेऊन प्रथम कोरची व कुरखेडा तालुक्यांत कामाला सुरुवात केली. अपंग लोकांना एकत्र करणे, त्यांच्या संघटना बांधणे हे आरंभीचे काम. संघटना बांधणीचा एकमेव उद्देश हाच की लोकांची ताकद वाढवणे- अपंगत्वामुळे गहाळ झालेला आत्मविश्वास पूर्ववत आणणे. त्यांच्या एकोप्याची कास धरून दोन तालुक्यांत अपंग लोकांच्या तालुकास्तरीय संघटना बांधण्यात आल्या आणि त्यांच्या पुनर्वसनाचे काम चालू झाले. साईट सेव्हर इंटरनॅशनल (मुंबई) यांच्या वित्तीय सहाय्यातून सर्वसमावेशक नेत्र सेवाव्यवस्था निर्माण प्रकल्प परत तीन वाढवण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व नागभिड या तालुक्यांतही अपंग व्यक्तींच्या संघटना बांधण्यात आल्या.

‘अपंग जन परिसर संघटना’ कोरची येथे एक संघटना, कुरखेडा येथे तीन, आरमोरी येथे तीन, नागभिड येथे एक, ब्रह्मपुरी येथे एक आणि लाखादूर येथे एक अशा या दहा संघटनांत एकूण सहाशेपाच लोक जोडले गेले आहेत. त्यांतील अंध आणि अपंग बत्तीस जण त्यांचा त्यांचा स्वतंत्र व्यवसाय करत आहेत.

अपंग व्यक्तींना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देणे, त्यांचा सहभाग समाजाच्या विकासप्रवाहात वाढवणे, अपंगांना समाजाप्रती जबाबदार बनवणे व समाजाला अपंगांप्रती संवेदनशील घडवणे, समाजात अपंगांप्रती सन्मानाची भावना निर्माण करणे, त्यांना ‘संजय गांधी निराधार योजना’ मिळवून देणे, अपंग कल्याणार्थ ग्रामपंचायतीला तीन टक्के निधी खर्च करण्यास लावणे, अपंगत्व टाळणे आणि शासकीय योजना यांविषयी जाणीव जागृती कार्यक्रम राबवणे, जागतिक अपंग दिन (३ डिसेंबर)- दृष्टिदिन साजरे करणे. विकलांग वधुवर परिचय मेळावे घेणे, अपंग व्यक्तीला व्यवसायाला लावणे, अपंग व्यक्ती ही शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही – अपंग व्यक्तींना त्यांचे प्रणाणपत्र- बसपास-रेल्वेपास मिळवून देणे, शासनासोबत धोरणवकिली करणे, अंध-अपंग व्यक्तींना व्यवसायाला लावणे, अपंग आणि अंध व्यक्तींना त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार ‘महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने’च्या कामात काम मिळवून देणे, परिसर संघातून जिल्हा संघटना बनवणे, अपंग व्यक्तींसाठीच्या कामाचा प्रचार-प्रसार होण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी अपंग व्यक्ती मार्गदर्शन केंद्रे उघडणे – वाचनालये चालवणे, अपंग आणि अंध व्यक्तीला स्वावलंबन व परिचलन यांचे प्रशिक्षण देणे इत्यादी कामे संघटनेमार्फत चालू असतात.

मी यांपैकी काय कामे करू शकले? तर मी २०१३ साली ऑनलाईन अपंगत्व प्रमाणपत्र नियमांनुसार तीनशेएकसष्ट लोकांची प्रमाणपत्रे आणि बसपास मिळवून दिले; तसेच, वीस लोकांचे रेल्वेपास काढून दिले. ‘अपंग व्यक्तींच्या संकल्पनेतून लोकांसाठी वाचनालय’ आणि ‘अपंग व्यक्ती मार्गदर्शन’ अशा तीन केंद्रांची स्थापना केली. बत्तीस लोक व्यवसाय करू लागले. प्रत्येक अपंग व्यक्तीला तिच्या तिच्या क्षमतेनुसार काम मिळू लागले. अंध व्यक्ती प्रशिक्षणामुळे अडथळाविरहित परिचलन करू लागल्या. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा हे तीन जिल्हे मिळून ‘जनकल्याण अपंग जन संघटना’ स्थापन करण्यात आली.

लोक एकत्र येण्यास सुरुवातीला टाळाटाळ करतात: काही तरी मिळण्याच्या अपेक्षेने येतात आणि निघून जातात. लोक टिकवून ठेवण्यात अडचण येते. लोकांचे तुसडे बोल नेहमी ऐकावे लागतात. प्रवासातील अडथळे निवारण्यासाठी परिचलनास उपयुक्त साहित्याची उपलब्धता नसते. लोकांचे सहकार्य मिळवण्यास वेळ लागतो. शासकीय यंत्रणेचे अपंगांच्या कामाकडे पाहण्याबाबत दुर्लक्ष असते. काम करताना असा व्यत्यय वारंवार येतो, म्हणून कधी खूप निराशा वाटायची. पण नियोजनाने कामात नियमितता आणली. एकेक कामे होऊ लागली. तेव्हा झालेल्या कामाचा बोलबाला होऊन लोक विश्वासाने संघटनेत सामील होऊ लागले.

प्रत्येक व्यक्तीला संघटना सदस्य बनण्यासाठी एकावन्न रुपये भरावे लागतात. दहा संघटनांच्या सदस्यांनी सदस्य फी भरल्यामुळे संघटनेच्या खात्यात पाच हजारांच्यावर पैसा जमा आहे. अशा प्रत्येक परिसरात संघटनेचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. अपंग व्यक्तींचे पस्तीस बचतगट बनवण्यात आले आहेत. प्रत्येक बचतगटात पाच ते दहा सदस्य आहेत आणि ते त्यांच्या त्यांच्या परीने व्यवसाय करू लागले आहेत. मी त्या सगळ्या प्रक्रियेची माहिती ग्रामपंचायत ते जिल्हास्तरापर्यंत पोचवली आणि त्या कार्यालयांना वारंवार भेटी दिल्या, पत्रव्यवहार केला, त्यामुळे सगळ्यांचा विश्वास कामावर बसला. गावातील लोक सहजपणे कामाला मदत करतात, उशिरा का होईना पण चांगले परिणाम येऊ लागले.

मला मी ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेत रूजू होण्याअगोदर स्वयंसेवी संस्था काय असते, तिचे काम कसे चालते ते काहीच माहीत नव्हते. मी एम.ए. शिकले होते, पण अतिशय लाजाळू, घाबरट होते; कधी कोणासमोर उभी राहून डोळ्यांत डोळे घालून बोलण्याचे साहस केले नाही. पण मी संस्थेत रूजू झाल्यापासून बचतगटाचे काम, गाव सूक्ष्म नियोजन आराखडा, मागसक्षेत्र अनुदान निधी (बी.आर.जी. एफ.), विकलांगता अधिकार (समाज आधारित विकलांगता पुनर्वसन) या सगळ्यात कार्यकर्ता प्रशिक्षक म्हणून काम करत गेले. त्यामुळे मी माझ्यातील घबराट कमी होऊन बोलू लागले; स्वत:चे काम स्वत: करू लागले. म्हणतात ना की रूक्ष असलेल्या झाडाला खतपाणी घालावे आणि तो वृक्ष फळाफुलांनी बहरून यावा! तसाच परिणाम माझ्या संस्थेने माझ्यावर केला असे म्हणण्यास हरकत नाही. माझे बालपण चौदा लोकसंख्येच्या कुटुंबात आणि उनाडखोर वृत्तीत गेले. झाडावर चढणे-आंब्याच्या कैर्‍या तोडणे- गिल्ली दंडा खेळणे- गोवर्‍या जमा करणे-मधाची पोळी शोधणे, झाडावर झुपाझपी खेळणे हे माझे उद्योग. माझे सातवीपर्यंतचे शिक्षण तसेच झाले, नंतर माध्यमिक आणि एम.ए.पर्यंत शिक्षण तालुक्याला वसतिगृहात राहून पूर्ण केले.

संस्थेतील कामाच्या अनुषंगाने सांगताना मला आनंद होतो, की माझ्या आवडीचा विषय मला मिळाला – अपंग लोकांची सेवा करणे! जे लोक त्यांचे कोणी नाही या विचाराने जगून अर्धमेले असतात त्यांना दिलासा देणे! ज्यांचा आत्मविश्वास संपलेला आहे अशांना समुपदेशनाच्या माध्यमातून आशेचा किरण दाखवणे! या कामात मला फार आनंद वाटतो.

ज्या कुटुंबात अपंग मुलगा जन्मलेला असेल त्या घरच्या लोकांना भेटून त्यांची अपंग व्यक्ती म्हणजे पूर्वजन्मीचे पाप अशी जी मानसिकता झालेली असते आणि त्यामुळे ते त्याकडे दुर्लक्ष करत असतात, त्यांना समजावून सांगणे, की देवाने तुमच्यातील सहनशीलता ओळखून तुमच्यावर अपंग व्यक्ती सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. तुमची खरी वेगळी ओळख स्वभावातील सामंजस्य, समजुतदारपणा हीच आहे. मला त्यांना तसे समजावून देताना अतिशय आनंद होतो. माझा प्रयत्न अपंग व्यक्ती दुसर्‍याच्या घरी जन्माला आलेली बरी असे म्हणण्यापेक्षा कुटुंबाने आणि समाजाने स्वत: अपंग व्यक्ती स्वीकारली पाहिजे यासाठी आहे आणि मला लोकांसोबत तसा संवाद साधण्यास आवडते. मला सांगताना आनंद होतो, की मला शिक्षक बनायचे होते, पण जे नाही त्यासाठी दु:ख करत बसण्यात काही तथ्य नाही. जे आहे त्यात आनंद मानण्यात मोठे सार्थक आहे. माझा अनुभव शिक्षकी पेशापेक्षा लोकांना समुपदेशन करणे आणि त्यांना त्यांच्या कामातील ओळख पटणे हे बहुमोल आनंद मिळवून देते असा आहे. संस्थेने परिपक्व हाडामांसाच्या गोळ्याला हातपाय चालवण्यास, वाचण्यास, लिहिण्यास, हसण्यास, खेळण्यास शिकवले. मी माझ्या कामात इतकी रूळले आहे, की काम आणि काम व त्यातील मग्नता हेच माझ्या आवडीचे बनले आहे. त्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत करणारे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख हे माझे या कामातील प्रेरणास्थान!

माझ्या मदतीच्या वाटेत धावून येणारे – मार्गदर्शक संस्था ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’, ‘पत्रकार संघटना’, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालये, गावातील लोक.

– संगीता गोविंद तुमडे

मुक्काम राखी, पोस्ट गुरवळा, तालुका व जिल्हा गडचिरोली.

फोन – ०७१२ – २७८०५८६,  ०९४०४२२७७१४

डॉ. सतीश गोगुलवार ०९४२२१२३०१६

About Post Author

1 COMMENT

  1. Hello mam, ha lekh wachun…
    Hello mam, ha lekh wachun khrch khup chhan watl, majh sikshn 12th jhal ahe. Me tumchya sanshthesobt kam kru sktoka? Mobadlya mdhe mala kahihi nahi pahije. Mo.no. 8551969229 (Dighori,lakhandur,bhandara-441805)

Comments are closed.