कोपरगावातील खाद्याची मेजवानी

0
29
carasole

कोपरगाव शहरात प्रामुख्याने कानकुब्जी कुटुंबीयांचे मिठाईचे दुकान व त्या दुकानातील बिट्टाबाईची जिलेबी प्रसिद्ध होती. ते मूळचे उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सिक्टीयापूर्वा गावचे होते. त्यांची पत्नी बिट्टाबाई या कोपरगावच्या रामलाल हलवाई व पत्नी गोदावरी यांची कन्या होय. ते स्थलांतर करून कोपरगावी दत्ताच्या पारावर राहू लागले. तेथेच त्यांनी जिलेबीचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या जिलेबीला कोपरगावकरांनी दिलेल्या पसंतीने ते कोपरगावच्या आश्रयास कायमचे राहिले. शुद्ध तूप, रंगाचा वापर न करता तयार होणारी कुरकुरीत व दर्जेदार जिलेबी कोपरगाव, नगर जिल्ह्यातच नव्हे तर परदेशी गेलेल्यांसमवेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका व सौदी अरेबियातही पोचली आहे. कानकुब्जींचे दुकान त्यांच्या पाचही मुलांनी सांभाळले आहे. कानकुब्जी यांची तिसरी पिढी जिलेबीचा व्यवसाय सांभाळत आहे.

कोपरगावच्या पांडे यांचे पेढेही, कोपरगावकरांचे प्रेम मिळवून आहेत.

कानकुब्जी व पांडे या दोन्ही कुटुंबीयांच्या माल तयार करायच्या भट्ट्या महादेवाचे मंदिराजवळ होत्या.

कानकुब्जी व पांडे कुटुंबीय सावळाविहिर, शिर्डी येथील बाजारहाट देखील करायचे. साईबाबा शिर्डीच्या बाजारात त्या दोन्ही कुटुंबीयांच्या दुकानात भिक्षुकीसाठी कटोरा घेऊन जायचे आणि भिक्षा वाढल्यानंतर डोक्यावर काठी ठेवून आशिर्वाद द्यायचे, अशा आठवणी दोन्ही कुटुंबीय सांगतात.

मारवाडी ब्राह्मण समाजाचे दगडू महाराज वयाच्या आठव्या वर्षी कोपरगावला आले. त्यांनी लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम अशा वेळी स्वयंपाक करण्यास प्रारंभ केला व पुढे कॅटरिंग व्यवसायात मोठी प्रगती केली. अतिउत्तम, रूचकर जेवण बनवण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हते. त्यांना नाशिक, नगर, पुणे तसेच इतर ठिकाणांहूनही मोठमोठ्या समारंभात जेवण बनवण्यासाठी बोलावले जाई. केशरी जिलेबी हा त्यांचा विशेष पदार्थ. दगडू महाराज उपाध्ये तीन वर्ष ‘पीपल्स बँके’चे संचालक तसेच व्हाईस चेअरमनपदीही होते.

कोपरगावच्या गांधी चौकातील विजय शंकर थिएटर (सुदेश) जवळ असलेली दौलतची भेळ, भाऊराव कहार यांची लस्सी, सदूची भजी, लालाची पाणीपुरी, सुंदरची भजी यांची आठवण कोपरगावचे वयस्कर नागरिक काढतात. तसेच गांधे चौकातील तपसीप्रसाद व स्पिलोसीय यांचे कलाकंद, फाफडा हे देखील कोपरगावच्या खाद्य संस्कृतीचे वैशिष्ट्य होय. त्यांची मुले महेश व अजय यांनी ते टिकवून ठेवले आहे.

ठाकूर यांची रमेश भेळही नावाजलेली होती. भेळ या शब्दाला भत्ता हा शब्द परिसरात ऐकण्यास मिळतो. दौलत नावाची व्यक्ती भत्त्याच्या पुड्यांवर स्वत:चा फोटो व नाव असलेली हँन्डबिले लावून विकायची. सदू आदमाने यांचे भजी आणि सदाशिव खोसे, जयसिंग पाटील यांचा भत्ता हादेखील तत्कालीन कोपरगावचे वैशिष्ट्य होते.

कोल्ड्रिंक्सची दुकाने अस्तित्वात नव्हती. आईस्क्रिम पार्लरचे नावसुद्धा माहीत नव्हते. फक्त कुल्फी हे उन्हाळ्यात खाद्य असे. हातगाडीवर अजमेर कुल्फी विकली जायची. झब्बुलाल जैन राजस्थान प्रांतातील अजमेर येथून चार महिन्यांच्या कालावधीत कोपरगावी येत असत व उन्हाळ्याचा हंगाम संपल्यानंतर परत अजमेरला जात असत. झब्बुलाल हे धोतर, नेहरू शर्ट व काळी टोपी घालत असत. काळी टोपी ही त्यांची कुल्फीची गाडी ओळखण्याची खुण होती. कुल्फीची गाडी प्रत्येक गल्लीत आल्यानंतर झब्बुलाल हे ‘बालं बालीया पिस्ते वालीया इलायची वालीया मलई ऽऽऽ’ अशी आरोळी देऊन मुलांना आकर्षित करायचे. त्यांची ही परंपरा पुढे त्यांचे नातू अनिल जैन यांनी कायम ठेवली आहे. एक आण्याला विकली जाणारी कुल्फी आता पाच रूपयांस विकली जाते, दोन आण्यांची कुल्फी दहा रूपयांस विकली जात आहे. आईस्क्रिम व कोल्ड्रिंक्स यांसाठी ‘अनिल कोल्ड्रिंक्स’ने कित्येक वर्षांपासून वैशिष्ट्य टिकवून ठेवले आहे.

हिरालालजी लाडे यांनीही ‘गणेश भेळ’च्या रूपाने तो मान पुन्हा मिळवला. कोपरगावातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेलेली मुले, सासरी गेलेल्या मुली, कोपरगावी येणारे पाहुणे कोपरगावात आल्यानंतर ‘गणेश’ची भेळ बांधून नेतात. ‘रसराज’चे केशवराव साबळे यांनीही हॉटेल व्यवसायात नाव कमावले आहे. गवळींची आणि सावजींची मिसळ, राधाकिसन हलवाईचे मुगवडे ही कोपरगावची वैशिष्ट्ये बनून गेली आहेत.

– सुधीर कोयटे koyate17@gmail.com

(‘असे होते कोपरगांव’ या पुस्तकातून पुनरद्धृत)

About Post Author