किरण कापसे – समाजसेवेसाठी स्थानिक राजकारणात!

8
30
carasole

किरण कापसे मूळचे नाशिकचे – निफाडच्या ‘वैनतेय विद्यालया’चे विद्यार्थी. ते आता ‘वैनतेय विद्यालया’चे विश्वस्त आहेत. त्‍यांची सामाजिक कार्यकर्ता, नगरसेवक अशीही त्यांची ओळख आहे.

किरण यांचे आजोबा ‘वैनतेय विद्यालया’चे सुरुवातीपासून विश्वस्त होते. किरण म्हणाले, की “मी तसा जरा गुंड प्रवृत्तीचा आहे. म्हणजे मी चुकीचा मार्ग अवलंबतच नाही. त्यामुळे तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही. माझा स्वभाव थोडा अॅग्रेसिव्ह आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळावर माझी नियुक्ती करण्याला काहीजणांचा विरोध होता. परंतु ते लोक माझे काम पाहून खूष आहेत. शाळेचा विश्वस्त असल्यामुळे शाळेत सतत येणे होते.”

किरण यांच्या लहानपणी आई-वडील, एक मोठा भाऊ व दोन बहिणी असा परिवार होता. दीड एकरांवर जिराईत शेती होती. एका युनिफॉर्मवर वर्ष काढावे लागत असे. दहावीपर्यंत तर पायात चप्पलही नसायची. त्यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले; त्याच वर्षी वडील वारले. त्यामुळे त्यांनी शिक्षण बंद करून रोजंदारीवर कामे चालू केली. ‘आयटीआय’मध्ये प्रवेश घेऊन इंग्रजी शॉर्ट हँड शिकले. भाडेतत्त्वावर रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, की परिस्थिती २००१ साली इतकी कठीण होती, की ते रोज फक्त एक वेळा जेवत असत. त्यांनी नंतर जमिनीचे व्यवहार करण्यासही सुरुवात केली. हे सर्व करत असताना, जेव्हा जितके जमेल तितके शिकावे असे चालू होते. त्यांनी बी.ए.पर्यंत शिक्षण तशा पद्धतीने पुरे केले, नाशिकच्या KTHM (कर्मवीर थोरात हिरे मुर्कुटे कॉलेज) येथून. त्यानंतर त्यांनी कॉलेजसमोरच रिक्षाही चालवली, ते सावकारीही करत. त्यासाठी लागणारे लिगल लायसन्स त्यांच्याकडे होते. ज्यावेळी ते ‘वैनतेय विद्यालया’मध्ये विश्वस्त म्हणून काम पाहू लागले, त्यावेळी त्यांनी सावकारीचा धंदा बंद केला.

विश्वस्त म्हणून शाळेत आल्यावर, किरण स्वतः शाळेतील वॉशरूम पाहून येतात. जर त्या खराब असतील तर त्या लगेच स्वच्छ करून घेतात. शिस्तीच्या बाबतीत, किरण काटेकोर आहेत. ते मुलांना शिस्त कशी लागेल याविषयी जागरूक असतात. त्या दृष्टीने योग्य ती पावले उचलतात. अर्थात, शाळेच्या संदर्भातील सर्व कामे विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने होतात असे किरण ठासून सांगतात. त्यांनी त्यांचा सख्खा भाऊ, ज्याचे वर्तन तितकेसे चांगले नाही, त्यालाही ‘वैनतेय विद्यालया’त येण्यास बंदी केली आहे. शाळेतील शिक्षकांसाठी स्टाफरूम खूप चांगली बांधली आहे. ती अद्ययावत कॉन्फरन्स रुमप्रमाणे आहे. प्रत्येक शिक्षकाला लॉकर आहे.

किरण यांचा प्रयत्न गरीब विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा असतो. त्र्यंबकेश्वरच्याजवळ आत्महत्या करणाऱ्या शेतक-यांच्या मुलांसाठी एक आश्रम आहे. त्याचे नाव ‘आधार तीर्थाश्रम’ असे आहे. त्याला अनुदान मिळत नाही. किरण त्या आश्रमातील विद्यार्थ्यांना दरवर्षी युनिफॉर्म देतात. त्या मुलांच्या जेवणासाठी आजूबाजूचे शेतकरी शिधा, भाजी देतात. पण जेव्हा असे धान्य, भाजी मिळत नाही त्या दिवशीचे जेवण किरण देत असतात. मग ते वर्षांत कितीही दिवस द्यावे लागले तरी त्यांना चालते. आश्रमातील जी मुले सायकल वापरतात त्यांना हवा भरण्यासाठी एक रुपया द्यावा लागतो. किरण यांच्या ते लक्षात आले तेव्हा त्यांनी हवा भरण्यासाठी कॉम्प्रेसर मशीन विकत घेऊन ते शाळेत ठेवले. मुलांना पाणी पिण्यासाठी पाण्याची टाकी आहे. तेथे किरण यांनी कुलर बसवून दिला. किरण जेथे राहतात त्या भागात साई मंदिर आहे. साई मंदिरात भंडारा केला जातो. त्यावेळी किरण यांनी चाळीस-पंचेचाळीस गरीब मुलांची पंगत सर्वात प्रथम बसवण्याचा पायंडा सुरू केला.

आश्रमातील गरीब मुलांना दिवाळीत फराळाचे पदार्थ मिळाले पाहिजेत या भावनेने किरण शंभर किलो चिवडा, शंभर किलो शेव व शंभर किलो लाडू बनवून घेतात. त्याची प्रत्येकी एक किलोची शंभर पाकिटे बनवतात. प्रत्येक मुलाला लाडू, शेव, चिवडा याचे एकेक पॅक असे तीन पॅक्स देतात. किरण यांचे ते काम पाहून, त्यांचे मित्रही तसे काम करण्यास पुढे येत आहेत.

नगरसेवक म्हणून किरण यांची कामे –

किरण कापसे अपक्ष उमेदवार म्हणून विक्रमी मतदानाने नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आले. ते २ नोव्हेंबर २०१५ पासून नगरसेवक आहेत. निवडणुकीचा प्रचार करताना, त्यांच्या मतदार संघातील मतदारांच्या घरी – ते सर्व गरीब होते – टेलर पाठवत. त्यांनी टेलरला त्यांची मापे घेऊन कपडे शिवून द्यायला सांगितले. कुटुंबप्रमुखाला काही मदत केली तर तो रास पिऊन पैसे उडवून टाकतो. घरच्यांना काहीच मिळत नाही. तयामुळे त्‍यांनी ही त-हा अवलंबली. त्यामध्ये किरण यांचा स्वार्थ होता. पण त्याचबरोबर परमार्थही घडला असे त्‍यांना वाटते. किरण यांनी अजून एक गोष्ट निवडणुकीपूर्वीच्या वचननाम्यात मतदारांना सांगितली की त्यांच्या भागातील केमिकल फॅक्टरी सहा महिन्यांत बंद करीन, नाहीतर ते नगरसेवकपदाचा राजिनामा देतील.

‘मर्क्‍युरी पूकर’ ही केमिकल फॅक्टरी गावाच्या मध्यभागी गेल्या पंधरा वर्षांपासून होती. तो परिसर नगरसेवक म्‍हणून कापसे यांच्‍या वॉर्डमध्‍ये येई. फॅक्टरीच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे. फॅक्टरीच्या प्रदूषणाचा लोकांना त्रास होई. ती फॅक्टरी राजकारणी लोकांची असल्यामुळे, लोकांच्या तक्रारींचे काही होत नाही. ‘राजकारणी लोकांविषयी काही न बोलणेच बरे’ असे किरण म्हणाले.

किरण ज्या दिवशी निवडून आले, त्याच दिवशी त्यांनी फॅक्टरीच्या मालकाशी बोलणे केले आणि त्यांना फॅक्टरी बंद करण्यात तीन महिन्यांत यश आले. हनुमान नगर भागात ड्रेनेज नव्हते, रस्तेही धड नव्हते. तेही काम किरण यांनी पहिल्या तीन महिन्यांत पूर्ण करून घेतले.

तारीख ३ फेब्रुवारी २०१६. किरण त्यांची दिवसभराची कामे संपवून घरी निघाले होते. त्यांनी वाटेत कादवा नदीवर ‘निफाड नगर पंचायती’मार्फत अवैध मुरुम उपसा होत असलेला पाहिले. त्याची विक्री खाजगी स्वरूपात केली जात होती. किरण यांनी ती गोष्ट फोनाफोनी करून मंडल अधिका-यांच्या लक्षात आणून दिली. अधिकारी घटनास्थळी आले. उत्खननाचे साहित्य, JCB व डंपर यांचा पंचनामा व योग्य कायदेशीर कारवाई करून निफाड तहसील येथे जमा केले गेले. ‘निफाड नगरपंचायती’ला त्रेचाळीस लाख रुपये दंडाची नोटिस देण्यात आली. मात्र ती रक्‍कम नगरपंचालयतीच्‍या खजिन्‍यातून भरली गेली तर सर्वसामान्‍य करदात्‍यांचा पैसा वाया जाणार, म्‍हणून ती रक्‍कम दोषी व्‍यक्‍तींकडून वैयक्तिक पातळीवर वसूल केली जावी असा रिट कापसे यांनी उच्‍च न्‍यायालयात दाखल केला आहे.

एक सजग नागरिक, एक सजग नगरसेवक याला शोभेसे हे कार्य आहे!

कापसे यांच्‍या कुटुंबात त्‍यांची आई, पत्‍नी आणि दोन मुले आहे. मुलगी पाचव्‍या इयत्‍तेत तर मुलगा तिस-या इयत्‍तेत शिकत आहे. ते रोज दोन-अडीच तास व्यायाम करतात. शरीर बलवान असणे फार गरजेचे आहे. त्याचे महत्त्व ते विद्यार्थ्यांनाही सांगतात. किरण यांच्या स्वतःच्या गरजा मर्यादित आहेत. ते नियम पाळण्याच्या बाबतीत जितके कठोर आहेत, तितकेच हळवेही आहेत. किरण म्हणतात, मी काहीही बघू शकतो पण गरिबी नाही पाहू शकत.

– पद्मा क-हाडे

About Post Author

8 COMMENTS

 1. एकखांद्या वक्ति ची जे कार्य
  एकखांद्या वक्ति ची जे कार्य आहे ते लोकां पर्यन्त पोचवने चांगले कम आहे

 2. शुन्यातुन विष्व तयार केले आणि
  शुन्यातुन विष्व तयार केले आणि समाजापुढे एक आदर्श ठेवला. भाऊ आपणाकङुन आशिच सेवा घङत राहो !

 3. सत्याचा मार्ग कठीण आहे पण
  सत्याचा मार्ग कठीण आहे पण विजय हा शेवटी सत्याचाच भाऊ आपली तिळ तिळ प्रगती होओ आपले नाव लवकीक होओ जय जिजाऊ जय शिवराय जय बजरंग हर हर महादेव .

 4. सत्याच्या मार्गानी जात असताना
  सत्याच्या मार्गानी जात असताना तुम्हाला रस्त्यात खूप अडचणी व अडथळा निर्माण करणारे खूप माणसे मिळाली पण तो विचार न करता तुमी तुमचे काम करत राहिले. आणि या पुढे तुमच्या हातून आशिच समाजसेवा होते यावे अशी मी .बुद्ध चरणी प्राथना करतो

 5. भाऊ तुमच्या कार्याला
  भाऊ तुमच्या कार्याला कर्तुत्वाला आई भवानी यश देवो तुमच्या कडून असेच कार्य घडत राहों तुमच्या कार्याला माझा सलाम

Comments are closed.