काका हरदास – वर्तुळ पूर्ण झाले!

1
46
carasole

काका हरदासकाका व कल्याण शहर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काका हरदास यांच्या समाजजीवनाचा प्रारंभ अर्धशतकापूर्वी झाला. पंचविशीत असलेले काका म्हणजे ऊर्जेचा प्रचंड स्रोत होता. त्‍यांनी वयाचा अमृतमहोत्सव ओलांडला, तरी त्यांची ऊर्जा तशीच ‘तरुण’ आहे.

काका हरदास यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये दोन आहेत. एक तर ते संवेदनशील आहेत व दुसरे म्हणजे ते खंबीर आहेत. मात्र त्यांच्या संवेदनशीलतेला भाबडेपणाचा स्पर्श नाही आणि त्यांच्या खंबीरपणाला ‘सुजाण’पणा लाभला आहे. त्यामुळे ते सामाजिक काम करत असताना कार्यनाश होणार नाही याची दक्षता प्रथम घेतात. काका ज्या परिसरात राहात होते तेथून त्यांच्या कार्यास प्रारंभ झाला. कोणाचीही कोणतीही अडचण दिसली की प्रथम त्याच्या मदतीस धावून जाणे हा त्यांचा मनोधर्म आहे. त्यामुळे अडचणीत, संकटात असलेल्या व्यक्तींना प्रथम ‘काका’ आठवतात! त्यांचे वर्तन मदत करताना अंगात काही संचार झाल्याप्रमाणे असते. त्यांचे लक्ष्य त्या व्यक्तीस तिच्या ‘संकटा’तून सोडवणे एवढेच असते. ते गाठल्यावरच ते थांबतात.

अर्धशतकापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाचा आरंभकाळ होता. तेव्हा ते फक्त ‘बाळ ठाकरे’ होते. ‘मार्मिक’ हे त्यांच्या हाती अमोघ अस्त्र होते. त्यांच्या संघर्षाचा केंद्रबिंदू अमराठी लोकांचे मुंबईवरील आक्रमण हा होता. बाळासाहेबांचे आवाहन युवकांना भावले व शिवसेनेचा जन्म झाला.

कवी ग्रेस यांसोबत काका हरदास आणि अविनाश बर्वेशिवसेनेची लाट ठाणे व कल्याण येथे पोचली, ती ठाण्यात कै. आनंद दिघे व कल्याणात काका हरदास यांच्या प्रयत्नांतून. दोघांच्या कार्यपद्धतीची झपाटून काम करणे, नि:स्वार्थीपणे काम करणे ही वैशिष्ट्ये होती. काकांनी शिवसेना कल्याणात रुजवली. काका कल्याण नगरपालिका ते महानगरपालिका या प्रवासात एक प्रमुख नागरी शक्तिकेंद्र होते. समाजकारण पक्षीय सीमांच्या बाहेर असते, हे मनोगत जाणल्याने ते पुढे सक्रिय राजकारणातून दूर झाले. काकांची खरी ओळख ‘चांगले काम करणारा माणूस’ हीच ठरली.

माझा काकांशी असाच संबंध आला. मतिमंदांना आजीवन सांभाळण्यासाठी डोंबिवली-कल्याणजवळ खोणी गावात आमच्या संस्थेने वसतिगृह उभे केले आहे, ‘घरकुल’. काका हरदास खोणीच्या ‘घरकुला’त नेमके कोणत्या दिवशी आले ते नीटसे आठवत नाही. पण ते ज्या दिवशी आले त्या दिवशी ‘घरकुला’चे झाले.‘घरकुला’त राहणा-या मुलांविषयी काकांना वाटणारा कळवळा हा आमच्यातील संबंधाचा गाभा आहे. काका स्वत: आपल्या परीने ‘घरकुला’त मदत तर करतच असतात, त्याचबरोबर ते कल्याणमधील विविध क्षेत्रांतील लोक ‘घरकुला’त यावेत यासाठी प्रयत्नशील असतात. मामा ओक, भाऊ साठे, वि.आ.बुवा यांसारखी मोठी मंडळी केवळ काकामुळे ‘घरकुला’शी जोडली गेली. काकांचा व्यापारी समाजाशी मोठा संपर्क आहे. ती मंडळीही ‘घरकुला’त आली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पाय आमच्या ‘घरकुला’स लागले ते केवळ काकांमुळे! बाबासाहेब कल्याणला येणार होते. काकांनी बाबासाहेबांना ‘वाटेत दहा मिनिटे एका संस्थेस भेट देऊयात’ अशी विनंती केली. त्यांनी ती मान्य केली. बाबासाहेबांची ‘घरकुल’ भेट ही संस्थेच्या वाटचालीत ऐतिहासिक महत्त्वाची घटना झाली. बाबासाहेब सुमारे दीड-दोन तास ‘घरकुला’त थांबले. मुलांमध्ये बसले. त्यांच्या डोक्यावरुन मायेचा हात फिरवला. त्यानंतर त्यांनी ‘घरकुला’तील सेवकांची विचारपूस केली. त्यांनी ‘तुमची सेवा अनमोल आहे, तुम्ही देवाचे काम करत आहात’ अशा शब्दांत सेवकांचा सन्मान केला. नायगार्‍याच्या धबधब्यासारखे ज्यांचे वक्तृत्व आहे, ते बाबासाहेब त्या दिवशी मूक होते. ते काहीही बोलले नाहीत. खरे तर, त्यांचे ते ‘मौन’ हे सर्वात प्रभावी भाषण होते. त्यांच्या भोवती असलेले आम्ही पन्नास-पाऊणशे लोक भारावून गेलो होतो.

सामाजिक कार्यासोबत काकांनी आपले छंदही जपले आहेतआमच्या एका मुलाकडून ‘घरकुला’शेजारी जे गणपती मंदिर आहे त्यातील मूर्तीचा हात दुखावला गेला होता. काका नेमक्या त्याच दिवशी तिथे आले होते. काकांनी जयपूरहून देखणी गणेशमूर्ती मागवली व चतुर्थीचा मुहूर्त पाहून विधिवत मूर्तीची मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली.

घरातून समाजकार्याचा वारसा लाभलेले काका 1963 पासून सामाजिक कार्यात आहेत. पण समाजकार्य करताना त्‍यांनी आपले छंद ही जपले. पक्षीनिरीक्षण, सागर सफरी, फोटोग्राफीसोबत ते जुन्‍या गाण्‍याचेही शौकिन आहेत. भाऊ साठे यांच्‍या शिल्‍पांची त्‍यांना आवड आहे. ते विशेष करून फोटोग्राफी करण्‍यात रमतात. वयाच्‍या बाराव्‍या वर्षापासून त्‍यांना फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. त्‍या वेळी कोडॅकचा बॉक्‍स कॅमेरा वीस रूपयांना येत असे. तो घेऊन काका फोटो काढीत. कल्‍याण, पुणे येथे त्‍यांच्‍या छायाचित्रांची प्रदर्शनेही भरवण्‍यात आली होती. महाराष्‍ट्र राज्‍य कला संघ, पुणे यांकडून काकांना फोटोग्राफीबद्दल जीवनगौरव पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे.

महाराष्‍ट्रातील किल्‍ल्‍यांची दुरवस्‍था काकांना सलत असे. ते म्‍हणत, की जर किल्‍ल्‍यांची अवस्‍था अशीच राहिली तर भविष्‍यातील पिढीला किल्‍ले केवळ फोटोंमध्‍ये पहावे लागतील. पण काका केवळ सांगून गप्‍प बसले नाहीत. पर्यटनाच्‍या दृष्‍टीने जलदुर्गांचे महत्त्व वाढावे यासाठी त्‍यांनी वयाच्‍या बहात्तराव्‍या वर्षी सागरी मार्गे कल्‍याण ते सिंधुदुर्ग अशी पाचशे किमी अंतराची ‘जलदुर्ग परिभ्रमण मोहिम’ हाती घेतली. या सहा दिवसांच्‍या मोहिमेअंतर्गत त्‍यांनी सतरा जलदुर्गांना भेटी दिल्‍या. या प्रवासादरम्‍यान आचरे-सिंधुदुर्ग प्रवासात होडी हेलकावे खात असताना दोन होडींच्‍या मधे काकांचा हात चिरडला गेला होता. टाके घातल्‍यानंतरही रक्‍तस्‍त्राव थांबेना, तेव्‍हा मालवणात काकांच्‍या हातावर एका तासाची शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली होती. या सागरी प्रवासात भेट दिलेल्‍या अनेक किल्‍ल्‍यांची पडझड झालेली पाहून काकांना वाईट वाटले. या किल्‍ल्यांची देखभाल करून सरकारने पर्यटकांना आवश्‍यक त्‍या सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍यास कोकणातील पर्यटन वाढू शकेल, असे मत काकांनी नोंदवले होते. काकांच्‍या या सागर मोहिमेला मुंबई आणि कोकणातील वर्तमानपत्रांतून बरीच प्रसिद्धी मिळाली होती.

काकांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरे काकांचा सत्कार करतानाकाका ‘घरकुला’त होणाऱ्या समारंभ-कार्यक्रमांना आवर्जून येतात, छायाचित्रण करतात, त्याची सीडी पाठवून देतात. काका ‘घरकुला’साठी खूप काही व नेहमीच काहीना काही करत असतात, त्याची यादी देणे अप्रस्तुत होईल. त्यांच्या अमृत महोत्सवी गौरवाचा एक समारंभ ‘घरकुलात’ही झाला.

कल्याणमधील सर्व क्षेत्रांतील मान्यवर व्यक्ती काकांवरील प्रेमामुळे त्यांच्या या सत्कार समारंभास उपस्थित राहिली. सर्व पक्षातील मान्यवरही उपस्थित राहिले. काकांवर अलोट प्रेम करणारे कल्याणकर तर होतेच त्याचबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत काकांचे जे सुह्रद आहेत तेही उपस्थित होते, पंच्याहत्तरीत अजूनही तरुणास लाजवेल अशी चपळाई असलेले, सदैव प्रसन्नमुद्रा असलेले, दुसर्‍याच्या सहाय्यास धावून जाणारे काका त्यांचा शतकमहोत्सव याच सभागृहात साजरा व्हावा अशी मनोमन इच्छा सर्वांच्याच मनात असेल. सर्वजण तीच प्रार्थना करतील.

समाजकारणातून राजकारण व आता पुन्हा केवळ समाजकारण हेच काकांचे जगणे झालेले आहे. वर्तुळ पूर्ण झाले आहे!

अविनाश बर्वे

Last Updated On – 28th Jan 2017

About Post Author

1 COMMENT

  1. काका लेखातून तंतोतंत
    काका लेखातून तंतोतंत डोळ्यांसमोर उभे राहतात. अशी माणसं हेरून समाजापुढे त्यांच्या निस्पृह कार्याचा आदर्श ठेवणे हे थिंक महाराष्ट्र चे काम वाखाणण्याजोगे आहे.

Comments are closed.