रस्त्यावर पंच्याऐंशी लिंबे रांगेत लावून ठेवलेली होती. उपस्थित प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. उत्सुकता होती. तेवढ्यात सूरजचे तेथे आगमन झाले. त्याने हातात दांडपट्टा घेऊन शरीराची लयबद्ध हालचाल करत एका मिनिटांत चौर्याऐंशी लिंबांचे प्रत्येकी दोन असे तुकडे केले. त्यांचा खच रस्त्यावर पडला. डोळ्यांचे पारणे फेडणारे ते दृश्य पाहून टाळ्या, शिट्या आणि ‘जयभवानी! जय शिवाजी!!’चे नारे सुरू झाले. सगळे थक्क करणारे होते! सूरजच्या त्या अनोख्या पराक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली! त्याचबरोबर त्याला ‘प्राइड ऑफ नेशन’ हा किताबही देण्यात आला.
सूरजने डोळ्यांवर पट्टी बांधून दांडपट्ट्याने लिंबू कापणे; मानेवर, तोंडावर, पोटावर ठेवलेल्या केळ्याचे तुकडे करणे; डोक्यावर ठेवलेला नारळ दांडपट्ट्याने अचूकपणे फोडणे अशा टीव्हीवरील लाजवाब सादरीकरणाने टीव्ही प्रेक्षकांना (आणि परीक्षकांना) आधीच जिंकले आहे. सूरज टीव्हीवरील शोजमध्ये भाग घेऊन लाखो प्रेक्षकांचे मनोरंजन करतो हे खरेच, परंतु त्याचे ध्येय मोठे आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोल्हापुरात तलवारींचा खणखणाट होतो, पण कोणाचे जीवन संपवण्यासाठी नाही; तर लुप्त होत चाललेल्या मराठ्यांच्या युद्धकलेला जीवदान देण्यासाठी! ते काम सूरज गेली वीस-बावीस वर्षें सातत्याने आणि निष्ठेने करत आहे.
सूरज हा कोल्हापुराच्या सर्वसामान्य कुटुंबातील तरुण. त्याच्या घरात परंपरागत पूजा सांगण्याचा व्यवसाय. सूरजचे वडील गावातील मंदिराप्रमाणे गावात आणि बाहेरून बोलावणे आल्यास बाहेरही पूजा सांगण्यासाठी जात. त्यांच्या घराचा आर्थिक भार वडिलांवर होता. त्यात पाच जणांचा उदरनिर्वाह कसाबसा होत असे. त्याच्या घराण्यातील कोणाचाही युद्धकलेशी दूर दूरपर्यंत संबंध नाही. सूरजला मात्र लहानपणापासून इतिहासाची आवड आहे. सूरजची ऐतिहासिक चित्रपट पाहणे, पुस्तके वाचणे ही ओढ. सूरजने तो आठ-नऊ वर्षांचा असताना भालजी पेंढारकरांचा ‘राजा शिवछत्रपती’ हा चित्रपट पाहिला. त्याच्या मनावर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंड लढवत असलेल्या पराक्रमाच्या प्रसंगाने कायमचे गारुड केले. त्याने वयाच्या बारा-तेराव्या वर्षी त्या खेळाचे शिक्षण घेण्यास नंगीवली तालमीतून सुरुवात केली. तालमीचे वस्ताद निवृत्ती पोवार यांच्याकडून तो मर्दानी खेळांचे शिक्षण घेऊ लागला. तो काठी, पट्टा, बाणा, भाला, बरची, विटा, जांबिया, रिगदगा अशी शस्त्रे शिताफीने चालवू लागला. तो त्याच्या पारंपरिक व्यवसायातही चरितार्थ चालवण्यासाठी वडिलांसोबत लक्ष घालत असे. वडिलांचा सूरजच्या छंदाला विरोध नव्हता, पण ते प्रोत्साहनही देत नव्हते. वडिलांना वयोमानानुसार वाटत होते, की सूरजने त्यांच्यासोबत घराला हातभार लावावा. सूरज दिवसाचे दहा-दहा तास तहानभूक विसरून युद्धकलेचा सराव करत असे. त्याचे करियर त्या कष्टांतूनच घडले.
सूरजने त्याच्या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके कोल्हापुरातील सांस्कृतिक कार्यक्रमांत; तसेच, अहमदनगर-राहुरी-चिपळूण-सातारा-रत्नागिरी-रायगड-पुणे- नाशिक अशा महाराष्ट्रांतील ठिकाणांबरोबरच हैदराबाद, तामिळनाडू येथेदेखील दाखवली आहेत. सूरजने त्या खेळांचे संवर्धन व्हावे या हेतूने डिसेंबर 2000 मध्ये ’शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच’ ही संस्था स्थापन केली. त्याने संस्थेच्या माध्यमातून ‘न्यू इंग्लिश मिडियम स्कूल’, ‘प्ले बर्डस प्रायमरी इंग्लिश स्कूल’, ‘श्रीसंत जगद्गुरू शंकराचार्य विद्यालय’ (मढगाव), ‘छत्रपती शाहू विद्यालय’, ‘न्यू ज्योतिर्लिंग हायस्कूल’, ‘ज्योतिबा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ’, ‘सांगली-वारणा मिलिटरी स्कूल’ (पाचगणी), ‘जीवन विद्यामंदिर’, ‘जोतिबा व ‘पांजरपोळ संस्था’ (कोल्हापूर) इत्यादी अनेक ठिकाणी जाऊन हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक-युवतींना मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे.
सूरजने त्यांचा पारंपरिक व्यवसाय वडिलांच्या पश्चातही सुरू ठेवला आहे. तो दिवसभर पूजा सांगून, दररोज संध्याकाळी सहानंतर गावातील शाळेत प्रशिक्षण वर्ग भरवतो. सूरज स्वत:चा सराव व इतरांना प्रशिक्षण देण्याचे काम करत असतो. सूरज हे खेळ शिकवण्यासाठी फी घेत नाही. सूरजच्या संस्थेत अनेक मुली-महिलांनी स्वसंरक्षणार्थ कलेचे प्रशिक्षण घेतलेले आहे. त्याच्याच संस्थेत शिकलेल्या स्वाती इंगळे या मुलीने सलग पंधरा तास पंधरा मिनिटे हातात काठ्या फिरवण्याचा विक्रम केला आहे. त्याची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. त्याचप्रमाणे त्याच संस्थेतील दोन मुलांच्या नावावर एका तासात तीन हजार आठशेचाळीस लिंबू दांडपट्ट्याने कापण्याचा विक्रमही नोंदवला गेला आहे. सूरज म्हणतो “कला शिकताना निडर वृत्ती, आत्मविश्वास, एकाग्रता, मनावर संयम; तसेच, स्वत: केलेला वार किती वेगात केला जातो याचे भान असणे गरजेचे असते. खेळ शिकण्यासाठी वयाची अट नाही. आठ वर्षांच्या लहान मुला-मुलींपासून ते साठ वर्षांपर्यंतच्या वृद्धांपर्यंत कोणीही खेळाचे शिक्षण घेऊ शकते.”
सूरज वर्षातून पाच-सहा वेळा शिबिरे भरवून मुलांना मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देतो. तसेच, सूरज त्याची प्रात्यक्षिके शिवजयंती-शाहूजयंती, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव अशा अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांतून सादर करत असतो. तो कार्यक्रमांतून मिळणार्या मानधनाचा विनियोग शस्त्रास्त्रे खरेदीसाठी करतो. त्याने सुमारे दीड लाख रुपयांचे शस्त्रास्त्रादी साहित्य खरेदी केलेले आहे. त्याने मर्दानी खेळांबरोबरच ट्रेकिंग, रायफल शूटिंग, धनुर्विद्या, कराटे, फुटबॉल, माऊंटनेअरिंग, रॉक क्लायबिंग अशा खेळांची आवडही जोपासली आहे. त्याने नाशिक येथील राज्य स्तरीय तलवारबाजी स्पर्धेत तिसरा, तर आंतरराष्ट्रीय स्टीक फायटिंगमध्ये सिंगापूरविरुद्ध दुसरा क्रमांक मिळवला आहे. सूरजचे स्वप्न त्या खेळाचे इन्स्टिट्यूट सुरू करण्याचे आहे.
सूरज ढोली – 9421111185
– मंगला घरडे
आपल्या कर्याला सलाम आपले…
आपल्या कर्याला सलाम आपले कार्य असेच चालू ठेवावे
Comments are closed.