एक ‘हिंमत’राव डॉक्टर

2
24
डॉ. बावस्करानी अनेक ठिकाणी विंचुदंश आणि सर्पदंशावर स्वखर्चाने प्रशिक्षणे दिली. चिपळूण तालुक्यात एके ठिकाणी लॅपटॉपच्या साह्याने प्रशिक्षण देताना डॉ. बावस्कर
डॉ. बावस्करानी अनेक ठिकाणी विंचुदंश आणि सर्पदंशावर स्वखर्चाने प्रशिक्षणे दिली. चिपळूण तालुक्यात एके ठिकाणी लॅपटॉपच्या साह्याने प्रशिक्षण देताना डॉ. बावस्कर

डॉ. हिम्मतराव बावस्कर‘रूग्ण हा तीर्थक्षेत्र आहे व डॉक्टराने रुग्णाला दिलेली भेट ही त्या तीर्थाची वारी होय’ असे मानणारा – केवळ मानणारा नव्हे तर त्याप्रमाणे आचरण आयुष्यभर करणारा एम्.डी. फिजीशियन डॉक्टर आहे, रायगड जिल्हयातील महाड या गावी! ते आहेत डॉ. हिंमतराव बावस्कर!

कमालीचे दारिद्र्य व कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबात डॉ. बावस्‍कर यांचा जन्म झाला. खडतर, प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दहा ठिकाणी वणवण करून स्वत:च्या अन्न-वस्त्र-निवार्‍याची व्यवस्था केली. प्रसंगी वेटर आणि मजुरीचे काम करून त्‍यांनी कुटुंबाच्‍या सहकार्याशिवाय त्यांचे शिक्षण सुरू ठेवले. त्याप्रकारे त्‍यांनी त्यांचे शालेय शिक्षण, नंतर नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्‍यांच्‍या घरात शिक्षण घेतलेले ते पहिले व्‍यक्‍ती ठरले. तसेच, त्‍यांच्‍या भोकरदन तालुक्‍यात ग्रॅज्‍युएट झालेले ते पहिलेच व्‍यक्‍ती आहेत.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अकरा वर्षे खेड्यापाड्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा केली. तेथे त्यांना वैद्यकशास्त्राला आव्हान देणारे अनेक अनुभव तर मिळालेच, पण त्यापेक्षाही जास्त मनुष्यस्वभावाचे आणि राजकारणाचेही नमुने पाहण्यास मिळाले. ‘सेवाभावी वृत्तीने निरपेक्ष, निरलस काम करणार्‍या माणसांचे हे जग नाही’ असे वाटायला लावणारे सर्व अनुभव!  तरीही त्यांनी तत्त्वाला मुरड न घालता सरकारी नोकरीत असेपर्यंत खासगी प्रॅक्टिस केली नाही. शहरी भागात बदल्या झाल्या तरी त्या नाकारून बिरवाडी-पोलादपूरसारख्या खेड्यापाड्यातच वैद्यक व्यवसाय केला, कारण ध्यास एकच होता. तो म्हणजे विंचुदंशाने कोकणात होणारे मृत्यू – त्यावर संशोधन व उपाय-उपचार करणे.

काळा विंचु हा कमी विषारी असतो विषारी लाल विंचुमूळचे जालना जिल्ह्याच्या देहेड गावचे डॉ. बावस्कर १९७६ मध्ये कोकणातल्या महाड-बिरवाडी या खेडेगावात वैद्यकीय अधिकारी म्हणून आले. तेव्हा तेथे विंचुदंशामुळे मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक होते. औषधे नव्हती अशातला भाग नाही;  पण त्यांचा उपयोग होत नव्हता. त्यातूनच त्‍यांना संशोधनाची ऊर्मी मिळाली. दवाखान्यात उपलब्ध असलेले स्टेथॅस्कोप आणि ब्लडप्रेशर इंडिकेटर एवढ्या साहित्यावर त्‍यांचे संशोधन सुरू झाले. विंचुदंशानंतर रुग्णाचे हार्ट फेल होते, या निष्कर्षापर्यंत ते येऊन पोचले. ते होऊ नये, विंचवाचे विष शरीरात वेगाने पसरू नये यासाठीचे औषध शोधून काढण्‍यात त्‍यांना १९८३ मध्ये यश मिळाले. त्‍या औषधाचे नाव ‘प्राझोसिन’. डॉक्टरांनी त्या औषधाच्या प्रयोगाने विंचुदंश झालेल्या पहिल्या रुग्णाचा जीव वाचवला.

त्या संशोधनावरील त्‍यांचा शोधनिबंध लॅन्सेट या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रकाशनामध्ये प्रसिद्ध झाला आणि अवघ्या जगाने त्याची दखल घेतली. त्यांना लंडन शहर, आफ्रिका खंड आणि अन्य देश येथेसंशोधन आणि औषध याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी  खास बोलावून घेतले गेले. त्यांचे ‘लॅन्सेट’मध्ये चौसष्ट शोधनिबंधप्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी सर्पदंशावरही भरीव संशोधन केले आहे.बावस्‍कर यांनी त्यांचे सर्व संशोधन कोणत्‍याही फंडिंगच्‍या आधाराशिवाय केले आहे.

बावस्‍कर यांना लोकमत पुरस्‍कार जाहीर झाल्‍यानंतर अभय बंग यांनी त्‍यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार

डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्तेएका माणसाने किती आपत्तींचा सामना करावा? नागपूरला मेडिकल कॉलेजला हिंमतराव बावस्कर जेव्हा प्रथम वर्षाचा विद्यार्थी म्हणून दाखल झाला, तेव्हा अतिशय अभ्यासू मुलगा म्हणून आम्ही सिनीअर्स त्याचे कौतुक करायचो. त्याला शरीरशास्त्रावरील ‘ग्रे’चे पुस्तक तोंडपाठ आहे  असे बोलले जायचे. नंतर त्यामागची व्यथा कळली. गरीब घरातून आलेल्या व प्रसंगी रोजगार हमीवर मजुरी करून शिक्षण घेतलेल्या हिंमतरावने ‘आपण मेडिकलला नापास होऊ’ या भीतीपायी मेडिकलला येण्यापूर्वी सुटीत पुस्तक पाठ करून टाकले होते! मानसिक रोगाच्या दुर्दैवी झटक्यामुळे त्याचे शिक्षण खंडित झाले तेव्हा हा होतकरू मुलगा डॉक्टर म्हणून कायमचा संपला की काय अशी आशंका वाटली. पण तो गरिबी, रोग, सरकारी नोकरीचा खाक्या, पोस्ट ग्रॅज्युएशनमधील वरिष्ठांनी केलेली अडवणूक या सर्वांमधून पार पडून फिनिक्स पक्ष्यासारखा परत उभा राहिला. त्याने महाडसारख्या छोट्या गावात खासगी प्रॅक्टिस करत आपली वैज्ञानिक निरीक्षणे, विचारशक्ती, प्रयत्न आणि प्रेरणा यांच्या भरवशावर कोकणामधील प्राणघातक विंचुदंशावर विकसित केलेली उपचारपद्धत अगदी अफलातून होती. त्याने ती पुराव्यासकट जागतिक वैद्यकीय नियतकालिकांत प्रकाशित केली व दुर्गम भागातील अंधारात एकाकी काम करणारा हिंमतराव प्रकाशात आला.
हिंमतरावमध्ये समाजातील वैद्यकीय प्रश्न बघू शकण्याची व ते सोडवू शकण्याचीप्रतिभा आहे. प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांमध्ये फार क्वचित आढळणारी वैज्ञानिक प्रयोग करण्याची व ते प्रकाशित करण्याची क्षमता व जिद्द आहे. सोबतच याचा फायदा रुग्णांना – विशेषत: गरिबांना मिळावा यासाठी धडपड आहे. आपल्या तत्त्वांसाठी किंमत चुकवण्याची तयारीही आहे. जीवनात उपसावे लागलेले कष्ट व अडवणुकीमुळे त्याच्या स्वभावात व भाषेत तिखट कटुतेची छटा आहे. आपल्याकडे दुर्लक्ष केले जाते  ही त्याच्या मनातली वेदना आहे. ग्रामीण, गरीब महाराष्ट्रातून असा वैज्ञानिक डॉक्टर ‘आयडॉल’ निघावा, ही महाराष्ट्रासाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. डॉ. हिंमतराव बावस्कर व त्यांना कायम साथ देणार्‍या त्यांच्या पत्नीचे मन:पूर्वक अभिनंदन.

– डॉ. अभय बंग, सामाजिक कार्यकर्ते

मण्येर सापाचा दंश कोब्रापेक्षा दहा पटींनी विषारी असतोविंचुदंशाच्या रुग्णांच्या अनेक केसेस बारकाईने तपासून त्यांची लक्षणे, त्यांच्यावर करत असलेले उपचार, औषधांचे डोस, त्यांचे विशिष्ट मिश्रण, पेशंटवर त्यांचे होणारे परिणाम यासंबंधी विविध प्रयोग करून त्या सगळ्यांच्या क्लिष्ट, किचकट वाटणार्‍या नोंदी हिंमतरावांनी त्यांच्या पत्नी डॉ.प्रमोदिनी यांच्या साहाय्याने केल्या. ही निरीक्षणे व अनुभव यांवर आधारित शोधनिबंध लिहून विविध वैद्यकीय जर्नल्समधून प्रकाशित केले.

विंचुदंशासारख्या आपत्तिग्रस्त वा इतरही व्याधिग्रस्त रुग्णांवर कमीत कमी खर्चात उपचार, शक्य असेल तर मोफत उपचार व आर्थिक मदतही दोघे डॉक्टर पतिपत्नी करत असतात; प्रसंगी पेशंटजवळ रात्र रात्र जागून त्यांची सेवा, खाणेपिणे, पथ्य याचीही जबाबदारी स्वीकारतात.

कोब्राने दंश केलेल्यां रूग्णास तपासताना डॉ. बावस्कर विंचुदंशावरील उपाय सिद्ध करणारे त्यांचे संशोधन भारतात प्रथम उपेक्षित ठरले. त्यांची खेडवळपणाकडे झुकणारी साधी राहणी, त्यांचे ग्रामीण बोलीभाषेतील निवेदन आणि पैसे काढण्यापेक्षा सेवाभावी समर्पित वृत्ती हे जणू त्यांच्या विद्वतमान्यतेतील अडथळे ठरले! मात्र जागतिक कीर्तीच्या अनेक जर्नल्संनी त्यांचे प्रयोग व संशोधन यास प्रसिद्धी दिली. त्यांना जगभरातून पत्रे येऊ लागली. त्यांना ब्रिटनमधील ‘ऑक्सफर्ड’मध्ये  भाषणासाठी आमंत्रित करण्‍यात आले.

त्यापूर्वी ते स्वत:चे सर्व साहित्य घेऊन, खेड्यापाड्यात स्वखर्चाने जाऊन डॉक्टरांसाठी ‘स्लाईड शो’सहित प्रबोधन करत, व्याख्याने देत असत.

भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञ पुस्तकवेडे व परदेशावर विश्वास ठेवणारे आहेत. स्वत:च्या विचाराने त्यामध्ये बदल करण्याची त्यांच्यात हिंमत नाही असे डॉ. बावस्‍कर म्हणतात. ती ‘हिंमत’ हिंमतरावांनी दाखवून दिली. इस्त्रायलचे ह्दयरोगतज्ज्ञ डॉ.एम.गुरान, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे सर्पदंशतज्ज्ञ डॉ.वॉरेल यांनी एकमुखाने त्यांची प्रशंसा केली आहे. वॉरेल तर महाडला त्यांच्याकडे येऊन गेले. विंचवाच्या विषातील मूलभूत द्रव्यांचे विश्लेषण करून त्यातील घटक मणेर सर्पदंशाने होणार्‍या पक्षाघातावर उपचारासाठी उपयुक्त ठरतील हे त्यांचे मत लंडन येथील डॉ. पीटर स्ट्रॉंग या शास्त्रज्ञास त्यांनी पटवून दिले व त्या मार्गाने पुढील संशोधन करण्याची डॉ.पीटर यांनी हमी दिली. हिंमतरावांच्‍या कामाने प्रभावित होऊन डॉ. वॉरेल यांनी माजी राष्‍ट्रपती ए.पी.जे. अब्‍दुल कलाम आझाद यांना बावस्‍करांच्‍या कामाचे कौतुक करणारी ईमेल पाठवली होती. डायसेल वैद्यकीय विद्यापिठाचे प्राध्‍यापक डॉ. मेहमेट बोस्‍नाक यांनी बावस्‍करांच्‍या रिसर्चचा उपयोग त्‍यांच्‍या क्लिनिकमध्‍ये केला. त्‍यानंतर त्‍यांनी बावस्‍कर यांना पाठवलेले पत्रच डॉक्‍टरांच्‍या कामाचे महत्‍त्‍व स्‍पष्‍ट करते.

Date : Thu, 29 Jul 2004 20:22:57 IST

Dear Bawaskar

We did read your article concerned with prazosin therapy at scorpion envenomation.

We are understood that you are an author in prazosin and scorpion envenomation.

Our clinic has been using for two month your recommended prazosin therapy in children with scorpion envenomation. Our patients have healing immediately. These results are incredible, thus, we will write our results.

We want learn your experience. Give me please your original article to me for evaluations of reference.

Sincerely yours,

Mehmet Bosnak, M.D.

     Associated Professor in Department of Pediatrics,
Pediatric Emergency and Pediatric Intensive Care Units,
Dicle University Medical School,
Diyarbakir, Turkey

mbosnak@dicle.edu.tr

सर्पदंशतज्ज्ञ डॉ.वारेल यांनी बावस्कर यांना महाडला येऊन भेट दिली. सोबत बावस्कर यांच्या पत्नी प्रमोदिनी बावस्कर

बावस्कर यांच्या हॉस्पिटलला भेट देऊन तेथील कामकाज पाहताना डॉ. वारेल‘ऑक्सफर्ड विद्यापीठातील सुविधा, श्रीमंती व वातावरण पाहता तेथील शास्त्रज्ञांनी रोज नोबेल पुरस्कार मिळवले तरी मला विशेष वाटणार नाही’ असे ते म्हणतात, पण त्‍याचबरोबर विविध प्रकारच्या वैद्यकीय संशोधनासाठी लागणारा ‘कच्चा माल’ आपल्या खेड्यापाड्यांतच आहे हेही ते नमूद करतात.

विंचुदंशावरील यशस्वी उपचारांप्रमाणे सर्पदंशावरही उपचार शोधणे; तसेच, सर्पदंशासाठी टिटॅनस टॉक्साईडसारखी लस तयार करून ती शेतमजूर, ऊसतोड कामगार यांना ट्रिपलप्रमाणे देणे ही वैद्यक संशोधनक्षेत्रापुढील महत्त्वाची उद्दिष्टे असावीत असे त्यांना वाटते.

सर्पदंश व विंचुदंश यांवर सध्या वापरली जाणारी महागडी प्रतिलस योग्य प्रकारे वापरण्याचे प्रशिक्षण वैद्यकीय कॉलेजांमध्ये डॉक्टरांना किंवा नवीन मेडिकल ऑफिसरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देणे महत्त्वाचे आहे असे त्यांचे मत आहे.

डॉ. बावस्कर रस्‍त्‍यावर काम करणा-या मजूरांनाही आरोग्यविषयक माहिती पुरवतात

डॉ. बावस्करानी अनेक ठिकाणी विंचुदंश आणि सर्पदंशावर स्वखर्चाने प्रशिक्षणे दिली. चिपळूण तालुक्यात एके ठिकाणी लॅपटॉपच्या साह्याने प्रशिक्षण देताना डॉ. बावस्करबावस्कर यांच्या संशोधनाने कोकणातील विंचुदंशाने होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण चाळीस टक्क्यांवरून फक्त एक टक्क्यापर्यंत खाली आले आहे. विंचुदंशाच्या रुग्णांना त्यांच्या अंगणातच (म्हणजे जवळपास) इलाज उपलब्ध करून दिला तर ते एक टक्का मृत्यूदेखील होणार नाहीत असे त्यांना वाटते. संशोधनातून सिद्ध झालेल्या त्यांच्या उपचारांचा सर्व डॉक्टरांनी तत्परतेने वापर करावा व एकही रुग्ण विंचुदंशाने मरू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. ‘मी मृत्यूच्या जबडयातून परत आलेला रूग्ण हाच माझ्या संशोधनाचा पुरस्कार मानतो’ असे ते म्हणतात. ते जगातील वैद्यकतज्ञ मंडळींनी त्यांचे ‘क्लिनिकल स्किल’ त्यांच्या जीवनाचा काही काळ खेड्यात राहून परत मिळवावे असा प्रेमाचा सल्लाही देतात.

बावस्कर आपले संशोधन संपूर्ण वैद्यकजगासाठी खुले करून दिल्यानंतर महाड येथे स्थायिक असून रुग्णसेवा करत आहेत. वृत्ती व श्रद्धा तीच–सेवा व समर्पण. त्यांच्या खोलीत एक वाक्‍य लिहिलेले आहे – know that you are only an instrument in the hands of God and that the only physician is God himself.

डॉ. बावस्कर यांना ‘लोकमत मॅन ऑफ इ ईयर 2011’चा पुरस्कार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते दिला गेला.२०११ साली ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’या पुरस्काराने सन्मानित झाल्‍यानंतर हिंमतराव बावस्कर यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या,  त्या अशा… आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या.

मी शोधलेल्या औषधाने विंचुदंश झालेला पहिला माणूस वाचला तो क्षण आणि आज, माझ्या कार्याची परस्पर दखल घेऊन लोकमत परिवाराने केलेल्या सन्मानाचे समाधान मला नोबेल पारितोषिकापेक्षा कमी नाही. ग्रामीण भागातले गरीब शेतकरी, शेतमजूर देशाचाकणा असूनही दुर्लक्षित आहेत अशी खंत गांधीजींनी व्यक्त केली होती. आजचा हा सन्मान त्या शेतकरी-शेतमजुरांचा आहे.

विंचुदंश, सर्पदंश यांबरोबरच निरनिराळ्या व्याधींनी गंभीर झालेले रूग्ण त्यांच्याकडे येतात. दवाखाना-हॉस्पिटल-संशोधनकेंद्र मामुली वाटावे इतके त्याचे रूप प्रथमदर्शनी साधे आहे. तिथे ‘स्वागत कक्ष’ नाही, वॉर्डबॉय नाही, दरवाजाला डोअर क्लोजर नाही. गंभीर अथवा वयस्कर रूग्ण आला तर डॉक्टर स्वत: पटकन बाहेर येऊन त्याला प्रथम पाहतात, स्वत: आवश्यक तपासण्या कमीत कमी वेळात व खर्चात करतात. इमर्जन्सी पेशंटसाठी लागणारी औषधे पत्नी प्रमोदिनी तयार ठेवतात. वेळ न दवडता उपचार सुरू होतात. ह्दयरोग रुग्णाला दवाखान्यात भरती केल्यापासून अत्यावश्यक इंजेक्शन मिळेपर्यंतच्या वेळाला वैद्यक परिभाषेत ‘अॅडमिशन टू नीडल टाईम’ असे म्हणतात. मोठमोठया आंतरराष्ट्रीय हॉस्पिटल्समध्ये तो वेळ तीस ते साठ मिनिटे आहे. बावस्करांच्या साध्यासुध्या दवाखान्यात मात्र तो वेळ पंधरा ते पस्तीस (सरासरी अठरा) मिनिटे इतकाच आहे! ‘विंचुदंश’ हाच दंश जणू हिंमतरावांना झाला होता आणि त्यासाठीच त्यांनी आपल्या वैद्यक व्यवसायातील उमेदीची वर्षे खर्च केली आहेत. ज्ञान आणि पैसाही खर्ची घातला आहे.

बुलढाणा येथे डॉक्टरांना चार वर्षे निवारा देणारे देवकीनंदन महाराज. यांचा उल्लेख डॉक्‍टरांच्‍या ‘बॅरिस्टरचं कार्टं’ या पुस्तकात आढळतोप्रायमरी हेल्थ सेंटर बिरवाडी – विंचूदंशाच्या संशोधनाचे पंढरपूरहिंमतरावांच्या पत्नी प्रमोदिनी बावस्कर यांनी अंबाजोगाई मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. पदवी संपादन केली आहे. त्यांचे हिंमतरावांच्या कार्यातील योगदान ‘गृहिणी सखी सचिव:’ असे आहे. घरातील सर्व कामे करणारी गृहिणी, डॉक्टरांच्या संशोधनकार्यातील मदतनीस, टायपिस्ट, परिचारिका अशा अनेक भूमिका त्या समर्थपणे निभावत आहेत. दोघांच्याही जीवनकार्याचे समान सूत्र ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’ हे आहे.

“मी कधीही ट्रस्ट किंवा एन.जी.ओ. म्हणून संस्था रजिस्टर करणार नाही. कारण माझी बुद्धिमत्ता व वेळ मिळणार्‍या अनुदानाचे हिशेब ठेवण्यात किंवा अन्य ‘खटपटी’ करण्यात खर्च करणे मला परवडणारे नाही. मूलभूत समाजोपयोगी संशोधन करण्यास स्वातंत्र्य हवे आणि आतापर्यंत पैशांवाचून माझे मूलभूत संशोधन कधीही रखडले नाही” हे त्यांचे विचार त्यांनी ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध केले. डॉ बावस्‍करांनी ‘बॅरिस्‍टरचं कार्टं’ हे आत्‍मचरित्र लिहीले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात महाडमध्ये एक ‘ज्ञानसूर्य’ चवदार तळ्याच्या काठी ठाण मांडून बसला होता. दलितांना पाण्यासारखी जीवनावश्यक गोष्ट सहज मिळावी म्हणून. डॉ.बाबासाहेब आंबेडकर! त्याच परिसरात डॉ. हिंमतराव ठाण मांडून राहिलेत, गोरगरिबांचा ‘जगण्या’चा हक्क अबाधित राहावा म्हणून! इतिहासातील आणि वर्तमानातील ही दोन महान आदरणीय स्थाने पाहायला हवीत! पाहायलाच हवीत!!

डॉ. हिंमतराव साळुबा बावस्कर, एम्.डी. फिजीशिअन
बावस्कर हॉस्पिटल, प्रभात कॉलनी,
सावित्री मार्ग, महाड जिल्हा रायगड – ४०२३०१
इमेल – himmatbawaskar@rediffmail.com
दूरध्‍वनी-02145-222398, मोबाईल – 9422595794

सौ. नंदिनी अविनाश बर्वे,
ठाणे
२५३३७२५०

About Post Author

2 COMMENTS

  1. समर्पित व्यक्तीच्या कार्याची
    समर्पित व्यक्तीच्या कार्याची माहिती लिहिणारा समर्पक लेख वाचायला मिळाला. डॉ. बावस्कर साहेबांच्या डोमरूळ गावाचा मी रहिवासी असून डॉ. साहेबांचे मूळ गाव देहेड येथे मला शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली याचा अभिमान आहे.

Comments are closed.