हिमाचल प्रदेशच्या कुलू जिल्ह्यातील मलाना हे गाव त्याच्या वैशिष्ट्यांमुळे जगप्रसिद्ध आहे. ते स्वतःला भारतापासून स्वतंत्र असं सार्वभौम राष्ट्र मानतं. पूर्वापार काळापासून या गावाचा कारभार प्रजासत्ताक पद्धतीने चालतो. म्हणूनच हे गाव ‘व्हिलेज रिपब्लिक’ म्हणून ओळखलं जातं. गावकरी भारतीय कायद्याचं पालन करत नाहीत. गावाची स्वतःची कायदेप्रणाली आहे. प्रशासकीय व्यवस्था आहे. भारतीय पोलिस त्या गावात जाऊन कारवाई करू शकत नाहीत.
पार्वती पर्वताच्या खोर्यात वसलेलं मलाना गाव समुद्रसपाटीपासून तीन हजार सातशे मीटर उंचीवर आहे. गावाशेजारून मलाना नदी वाहते. बाहेरच्या जगाशी संबंध नसल्यानं गावाचा फारसा विकास झालेला नाही. मलानातील निवासी रंगानं उजळ पण उंचीनं बुटके असतात. गावाची स्वतःची जीवनशैली आणि व्यवस्था आहे. गावातील घरं, मंदिरं किंवा इतर वास्तूरचना हिमाचल प्रदेशापेक्षा वेगळ्या असल्याचं जाणवतं. गावकर्यांच्या जीवनात निसर्गास महत्त्वाचं स्थान आहे. वंशपरंपरागत अनुभवानं गावानं निसर्गाशी ताळमेळ राखून त्याचं जीवन समृद्ध केलं आहे. मलानाच्या रहिवाशांचा आपली संस्कृती, परंपरा आणि धार्मिक श्रद्धांवर गाढ विश्वास आहे. गावात ‘कनाशी’ ही भाषा बोलली जाते. 1961 साली करण्यात आलेल्या जनगणनेनुसार गावात ‘कनाशी’ भाषा बोलणार्या व्यक्तींची संख्या पाचशेत्रेसष्ट एवढी होती. ‘कनाशी’ भाषा गावाबाहेरील कोणाही व्यक्तीस ठाऊक नाही. ही भाषा परिसरातील इतर कोणत्याही भाषेशी मेळ साधत नाही. तथापी तीमध्ये संस्कृत आणि तिबेटमधील भाषांचे मिश्रण जाणवतं.
जमलु नामक ऋषीकडून मलाना गाव वसवण्यात आल्याची आख्यायिका आहे. जमलु म्हणजे ‘जमदग्नी’. जमलु ऋषी आणि रेणुका माता यांच्याकडून गावाचं संरक्षण करण्यात येतं असं मानलं जातं. त्यामुळे मलानाच्या रहिवाशांची त्या देवतांवर श्रद्धा आहे. मलानाचे गावकरी स्वतःला आर्यांचे वंशज मानतात. गावातील देवीचं मंदिर वर्षातून एकदा ठरावीक दिवशी उघडलं जातं. त्याच वेळी मंदिरात वर्षातील एकमेव पूजा केली जाते. मंदिराची बांधणी लाकडाच्या साह्यानं करण्यात आली आहे. त्याच्या बाहेरील भिंतींवर कोणत्याही प्रकारची चित्रकला अथवा कोरीव काम आढळत नाही. मात्र तिथं डझनावरी हरीण आणि इतर प्राणी यांची मुंडकी लटकावलेली आढळतात. ती केवळ शिराची कातडी असते. ते देवीला दिलेले बळी होत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर शेळी आणि म्हैस यांची मुंडकी लटकावलेली आढळतात.
मलाना गावाची स्थापना ग्रीक राजा अलेक्झांडरच्या सैनिकांकडून करण्यात आली असल्याची कहाणीदेखील सांगितली जाते. अलेक्झांडरचा भारतात पराभव झाला. तो माघारी फिरला. त्यावेळी त्याचे सैनिक थकले होते. त्यांना हिमाचल प्रदेश थंड आणि शांत वाटला. त्यांनी तिथंच राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मलाना हे गाव वसलं गेलं. त्यामुळे गावकरी स्वतःला अलेक्झांडर राजाचेही वंशज समजतात.
मोगल साम्राज्याच्या काळात एका रोगावर उपचार करण्यासाठी सम्राट अकबर मलाना गावी आला असल्याची आख्यायिका आहे. गावकर्यांकडून अकबराचा रोग बरा करण्यात आल्यानंतर त्याने या गावाला कर भरण्यापासून मोकळीक दिली होती.
गावाची लोकवस्ती दीड हजाराच्या आसपास आहे. तेथील माणसं पुस्तकी शिक्षण घेत नाहीत. तेथील भाषा, वेशभूषा, कायदे, व्यवस्था, प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. कुणा बाहेरच्या व्यक्तीशी व्यवहार करायचा झाला तर त्याच्यापासून दूर उभे राहून त्याला द्यायची वस्तू त्याच्या अंगावर फेकली जाते. गावकर्यांनी गावात सिमेंटच्या वाटा तयार केल्या आहेत. त्या वाटा केवळ गावाबाहेरच्या (अस्पृश्य) व्यक्तींच्या वापरासाठी असतात. जर कुणी त्या वाटांपासून वेगळे चालत गावकर्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलाच, तर गावकरी सरळ चिखलात उडी मारून स्पर्श करण्याचे टाळतात.
लोकशाही व्यवस्थेचा अवलंब करणा-या जगातील सर्वात पहिल्या ठिकाणांपैकी मलाना गाव आहे, असे म्हटले जाते. त्यांनी स्वतःची न्यायव्यवस्था पंचायतीच्या रूपाने तयार केली आहे. पंचायत रोज भरवली जाते. लोकसभा आणि राज्यसभा यांच्याप्रमाणे पंचायतीचे दोन भाग पाडलेले आढळतात. एक उच्चसभा आणि दुसरी कनिष्ठ सभा. त्या व्यवस्थेत पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यासारखी पदे असतात. पंचायतीच्या सदस्यांची निवड गावाच्या निर्णयावरून केली जाते. उच्च सभेत अकरा सदस्य असतात. कोणत्याही प्रकरणाची सुनावणी सर्वप्रथम कनिष्ठ सभेत किंवा न्यायालयात केली जाते. त्यानंतर त्यावर उच्च न्यायालयात निर्णय सुनावला जातो. या निवाड्यास आव्हान देणार्या व्यक्तीला गावाकडून वाळीत टाकले जाते, या अनोख्या ग्रामव्यवस्थेमध्ये गावाचे स्वातंत्र्य हे एकट्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यापेक्षा महत्त्वाचे समजले जाते. मलानामध्ये पोलिस स्टेशन नाही, गावाची घटना नाही, कायदोपत्री लिहीलेले कायदे नाहीत. गावाने अनेक शतकांपासून स्वतःची व्यवस्था चालवली असून परस्परांवरील, परंपरेवरील विश्वासाच्या आधारे गावकरी शांततेने नांदतात. परस्परांच्या जबाबदा-या वाटून घेउन काम करणे ही गावाची रीत आहे.
मलाना गावात मोठ्या प्रमाणात भांग पिकवली जाते आणि तेच गावच्या उत्पन्नाचं मोठं साधन आहे. सत्तरच्या दशकात काही युरोपीय माणसं गावात आली आणि त्यांनी गावकर्यांना भांगेचा ‘खरा वापर’ समजावला. जवळच्या कसोल या निसर्गरम्य गावी भांगेच्या कारणास्तव अनेक परदेशी पर्यटकांचं वास्तव्य असतं. बदलत्या काळानुसार मलानी लोक कामासाठी गाव सोडून बाहेरही जाऊ लागले आहेत.
मलानापर्यंत पोचण्यासाठी कुलू जिल्ह्यापासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या जरी नामक शहरास जावं लागतं. जरी शहरापासून तेवीस किलोमीटर अंतर गिर्यारोहण केल्यानंतर मलाना गाव लागतं. मलाना गावावर ‘Malana: Globalization of a Himalayan Village’ आणि ‘Malana, A Lost Identity’ यांसारखे काही माहितीपट तयार करण्यात आले आहेत. मलानाप्रमाणेच अमेरिकेच्या पेनसिल्वेनिया भागात ‘अमिष’ नावाची एक जमात वास्तव करून आहे. या जमातीकडून पाळल्या जाणा-या परंपरा मलानाशी थोड्याफार प्रमाणात जुळतात.
गावापर्यंत भारताची निवडणूक प्रक्रिया पोचली आहे. गावात राजकारणाचा शिरकाव झाला. परिणामी, त्यांच्या त्यांच्यामध्ये दुही निर्माण होऊ लागली. या भागाचा विकास करण्यासाठी परिसरातील नद्यांवर धरणं बांधण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. पर्वतांमध्ये बोगदे खोदून रस्ते तयार करण्यात आले आणि आजपर्यंत इतरांपासून फारकत घेऊन राहणार्या मलाना गावाकडे आधुनिकीकरणाचा ओघ वाहू लागला. मलानामध्ये टी.व्ही., मोबाइल, वीज, सॅटेलाइट डिश, चांगले रस्ते अशा सुविधा उपलब्ध झाल्या.
मलानात 2008 सालच्या जानेवारी महिन्यात शॉर्टसर्किटमुळे मोठी आग लागली. त्यामध्ये अर्ध्या गावासह चार पुरातन मंदिरं नष्ट झाली. त्यामध्ये ग्रामदैवत जमलु ऋषीच्या प्रसिद्ध मंदिराचाही समावेश होता. बाहेरच्या जगाच्या स्पर्शानं अनेक सुविधा गावात आणल्या, मात्र त्याचबरोबर त्या जगानं मलानाच्या परंपरागत संचितावर हल्ला चढवला आणि तो म्हणजे त्यांचा परस्परांवरील विश्वास! आगीच्या दुर्घटनेनंतर मलानाच्या पुर्नवसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कॉंक्रिटची घरं बांधण्यासाठी आणि विकासकामांसाठी बाहेरची माणसं लागणार, पैसा लागणार. बाहेरच्या माणसांचे स्वार्थ व त्यांची संस्कृती गावात येणार. या प्रकारात कित्येक शतकांपासून चालत आलेल्या एका समाजजीवनाचा डोलारा कोसळू लागला आहे!
किरण क्षीरसागर, इमेल – thinkm2010@gmail.com
मलानावर तयार करण्यात आलेले माहितीपट
‘Malana: Globalization of a Himalayan Village’
‘Malana, A Lost Identity’
{jcomments on}