एक आयुष्य, चळवळीतील -नरेंद्र दाभोळकर

11
41

एखाद्या व्यक्तीचं आयुष्य हाच एखाद्या चळवळीचा, संस्थेचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही.
डॉ. नरेंद्र दाभोळकर हे असेच एक नाव. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोळकर हे एकमेकांचे समानर्थी शब्द बनून गेलेले आहेत, म्हणूनच अंधश्रध्देबाबत कोणतीही घटना महाराष्ट्रात घडली, की 'आता कुठे आहेत तुमचे दाभोळकर?' अशी विचारणा होते. खरे तर, 'अंधश्रध्दा निर्मूलन समिती याबाबत काय करतं आहे?' असा प्रश्न लोकांना विचारायचा असतो. लोकांनी अशा प्रकारे दाभोळकरांचे नाव अंधश्रध्दा निर्मूलनाशी जोडणे, ही त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळ केलेल्या कार्याची पावती नव्हे का?

दाभोळकरांचा मूळ पिंड हा अस्सल कार्यकर्त्यांचा. ते तरूण वयापासून सामाजिक कार्याकडे ओढले गेले आहेत. राष्ट्र सेवा दलात काम करत असताना त्यांच्या सत्यशोधक आणि चिंतनशील प्रवृत्तीला चालना मिळत गेली.  समाजातील विवेकाचा वाढता -हास आणि कालबाह्य रुढी-परंपरा व अंधश्रध्दा यांचा वाढता घोर यांनी त्यांना त्याच काळात अस्वस्थ केले. म्हणूनच त्यांना एम.बी.बी.एस. झाल्यावर सुस्थापित, चांगले आयुष्य जगण्याची संधी त्यांना नाकारावीशी वाटली. 1977 साली सरकारी नोकरांचा संप घडला. राजपत्रित अधिकारी असूनही दणाणून भाषण केल्याने दाभोळकरांची नोकरी गेली. त्यांनी वैद्यकीय सेवेच्या पहिल्या चार महिन्यांतच सातारा नगरपालिकेत भ्रष्टाचाराविरुध्द आंदोलन करून चौकाचौकात सभा घेतल्या. जयप्रकाश नारायण यांच्या 'कुछ बनो' या शब्दांनी जागा झालेला हा तरुण अंधश्रध्दा निर्मूलनाच्या व्यापक आणि आव्हानात्मक कार्यात गुंतत गेला.

दाभोळकर यांचा जन्म साता-यातील. केरळचे रॅशनॅलिस्ट बी प्रेमानंद, युक्रांदचे नेते डॉ.कुमार सप्तर्षी; तसेच 1969 मध्ये भारतीय सर्वोदय संघाचे कार्याध्यक्ष असलेले बंधू देवदत्त दाभोळकर यांच्या प्रेरणेने दाभोळकरांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरूवात केली.

सुरुवातीला, नागपुरात समविचारी तरुणांनी एकत्र येऊन 'मानवीय नास्तिक मंच' उभारून 'अधश्रध्दा निर्मूलन' या विषयावर काम सुरू केले. पण थोड्याच काळात 'नास्तिक' या शब्दावर खल होऊन या मंचाने 'अधश्रध्दा निर्मूलन समिती' हे नाव धारण केले. (1989) पुढे, समितीतलेच कार्यकर्ते शाम मानव यांच्याशी समितीच्या कार्यात्मक स्वरूपाविषयी झालेल्या मतभेदांझाल्या नंतर 'अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती' व 'महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती' असे समितीचे दोन भाग झाले. पैकी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीची धुरा दाभोळकरांनी समर्थपणे जवळ जवळ बारा-पंधरा वर्षे सांभाळली आहे.

समितीची मध्यवर्ती शाखा सातारा येथे आहे. दाभोळकर समितीत 'कार्यवाह' या पदावर आहेत. समितीच्या महाराष्ट्र, बेळगाव, कर्नाटक, गोवा या राज्यांत मिळून दोनशेच्या आसपास शाखा आहेत. मध्यवर्ती शाखेची मुख्य कार्यकारिणी आहे व प्रत्येक शाखेत त्याच धर्तीवर कार्यकारी मंडळ आहे. समितीचे कार्य लोकशाही पध्दतीने चालते. समितीतर्फे एक वार्तापत्र मासिक प्रकाशित केल जाते. त्याशिवाय समिती अंधश्रध्दांशी संबंधित विषयांवर छोट्या- छोट्यापुस्तिकाही प्रकाशित करते. समितीने चळवळीशी संबंधित गीतांची ध्वनिफीतही काढलेली आहे.

समितीच्या माध्यमातून दाभोळकर अंधश्रध्दा निर्मूलनाचे कार्य करत असले तरी, समाजपरिवर्तनाच्या व्यापक 'चळवळीतला हा एक टप्पा आहे, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच, त्यांचा प्रयत्न या कार्याकडे एकूण मानवतावादी चळवळीच्या संदर्भात पाहण्याचा असतो. ही गोष्ट त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतूनही स्पष्ट होते.त्यांनी या विषयावर 'भ्रम आणि निरास', 'अंधश्रध्दा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम', 'अंधश्रध्दा विनाशा'य', 'विचार तर कराल', 'श्रध्दा-अंधश्रध्दा' आणि 'लढे अंधश्रध्देचे' अशी सहा पुस्तके त्यांनी या विषयावर लिहिलेली आहेत. त्यामधून अंधश्रध्दांचे विविध प्रकार, त्यामागची चिकित्सा करण्याची पध्दत, समितीने त्याविरूध्द वेळोवेळी उभारलेले लढे आणि या सा-यामागची वैचारिक बैठक पुरेशी स्पष्ट होते. या पुस्तकांतून दाभोळकरांचे अंधश्रध्दा, विवेकवाद व तत्सबंधित विषयांवरचे प्रभुत्व, त्यांचा सूक्ष्म अभ्यास प्रत्ययास येतो. त्यांनी चळवळींचे काम करत असताना आपल्या हातून झालेल्या चुका, आपल्यापुढे उभे ठाकलेले प्रश्न प्रांजळपणे मांडलेले आहेत. सोपी मांडणी, अनेक उदाहरणे देत विषय समजावण्याची हातोटी, विचारांची ठाम व आग्रहपूर्वक मांडणी, मुद्देसूद विवेचन ही त्यांच्या लेखनशैलीची काही वैशिष्ट म्हणता येतील. या पुस्तकांतून जाणवणारी आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, त्यांपैकी एकाही पुस्तकातून दाभोळकरांनी स्वत:चे व्यक्तिगत आयुष्य चित्रित केलेले नाही वा त्याचे गौरवीकरण-उदात्तीकरण केलेले नाही. सगळी मांडणी चळवळीच्या रोखाने केलेली आहे. तरीही या सर्वच पुस्तकांतून, विशेषत: 'लढे अंधश्रध्देचे' या पुस्तकातून दाभोळकरांनी अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्यात स्वत:ला किती झोकून दिले आहे, किती लढ्यांमध्ये त्यांना जीवघेण्या, निर्णायक क्षणांना प्रसंगांना तोंड द्यावे लागलेले आहे याची जाणीव वाचकाला होत राहते; दाभोळकरांची कार्यावरील निष्ठा आणि विधायक, सनदशील मार्गावरून अंधश्रध्दा निर्मूलनाची लढाई करण्याची त्यांची विचारधारा यांचाही परिचय होतो.

पुस्तकांखेरीज वृत्तपत्रे व इतर नियतकालिके ह्यांतूनही अंधश्रध्दांशी संबंधित तात्कालिक विषयांवर दाभोळकरांचे लेखन चालू असते. सध्या, ते 'साधना' साप्ताहिकाचे संपादक म्हणून कार्यरत आहेत.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अनेक उपक्रमांतून ते स्वत: सतत सहभागी होतात. विनय, नम्रता आणि साधेपणा हे गुण गांधीजी, साने गुरुजी यांच्यासारख्या त्यांच्या आदर्शांकडूनच त्यांच्यात रुजले असावेत. म्हणूनच 'भानामती निर्मूलन', 'शोध भुताचा', 'बोध मनाचा' अशा मोहिमा; 'दैववादाची होळी', 'अंधरूढींच्या बेड्या तोडा', 'विवेक जागराचा: वादसंवाद', यांसारखे उपक्रम, 'सत्यशोध', 'प्रज्ञा परीक्षा' यांसारखे प्रकल्प आणि शेकडो बुवा-बाबांची भांडाफोड, त्यांनी केलेल्या 'चमत्कारां'ची चिकित्सा अशा प्रत्येक गोष्टीत ते आपल्या कामांतून अग्रभागी राहिलेले आहेत.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीव्यतिरिक्त; दाभोळकर अनेक चळवळींत सक्रिय आहेत.समाजात विज्ञाननिष्ठा वाढीला लागेल म्हणून दाभोळकरांनी 'सत्यशोधक प्रज्ञा प्रकल्प' सुरू केला. महाराष्ट्रात सुमारे एक लाख विद्यार्थी त्या परीक्षेला बसतात दाभोळकर सायण्टिफिक अँण्ड टेक्नाअलॉजी लिटरसीबाबतही अनौपचारिक पातळीवर प्रशिक्षण देतात. वैज्ञानिक दृष्टीचा चळवळीद्वारे महाराष्ट्रात प्रसार व प्रचार होण्यासाठी दाभोळकर स्वत: शिबिरे घेतात. दाभोळकरांनी त्याद्वारे महाराष्ट्रात सुमारे सोळा हजारांहून अधिक शिक्षक तसेच सुमारे चार लाख विद्यार्थी तयार केले आहेत. भविष्यात भारतभर नेटवर्किंगचा त्यांचा विचार आहे. ते व्यसनमुक्ती केंद्रही चालवतात. दलित चळवळ , एक गाव एक पाणवठा, सामाजिक कृतज्ञता निधीचे काम, तेलाच्या भाववाढीविरुध्द आंदोलन, यात्रांमध्ये साज-या होणा-या ऊरुसांत बोकडांचा बळी देण्याची प्रथा काही प्रमाणात थांबवणे इत्यादी उपक्रमांत दाभोळकरांचा सक्रिय सहभाग होता.

हात फिरवून व सोनसाखळ्या आणि भस्म देणारे सत्यसाईबाबा, नरेंद्र महाराजांसोबतचा जाहीर वाद, सिंधुदुर्गातील डुंगेश्वर देवालयातल्या चमत्काराविरुध्द लढ्यात तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे, चाकूरच्या अतिप्रचंड साईबाबा मंदिर बांधकाम प्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्याविरूध्द आंदोलन छेडणे, अस्लम ब्रेडवाला भोंदुबाबाविरुध्द गृहमंत्र्यांना पत्र लिहिणे, निर्मलादेवी इत्यादी…; दाभोलकरांच्या अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या यशाचे महत्त्वाचे टप्पे होते.

त्याचसोबत अंधश्रध्दा निर्मूलनाचा प्रयत्न केवळ 'चमत्कारांचा पर्दाफाश' या स्वरुपाचा राहू नये, तर त्याला जी वैचारिक बैठक आहे, त्यामागे जो सकारात्मक व निकोप समाजनिर्मितीचा आग्रह आहे, तो लोकांनी समजावून घेतला पाहिजे असे दाभोळकरांना वाटते. म्हणूनच विवेकाची ही 'चळवळ'  तळागाळापासून ते समाजाच्या वरच्या थरांतल्या लोकांपर्यंत पोचावी, यासाठी दाभोळकर वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत असतात. त्यांच्यातली धडपडी वृत्ती, त्यांचा उत्साह त्यांच्यासोबत काम करणा-या सहका-यांना, कार्यकर्त्याना स्तिमित करत राहतो. अखेरपर्यंत झुंजत राहणे, झुंजताना संयम राखणे हे 'कबड्डी' या खेळाने त्यांना पूर्वीच शिकवलेले असावे. दाभोळकर हे विद्यार्थिदशेत एक उत्कृष्ट कबड्डीपटू होते. त्यांनी महाराष्ट्र व भारताचे कप्तानपद आठ वर्षे भूषवले होते. आठ सुवर्णपदकेही पटकावली होती. पण जिंकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी काहीही करण्याची तयारी हवी, हे मात्र खेळ त्यांना शिकवू शकला नाही. म्हणूनच त्यांचा कटाक्ष स्वत:चे वर्तन नैतिकदृष्टया स्वच्छ व नितळ ठेवण्याकडे असतो. कार्यकर्ता हा चोख, कणखर, अभ्यासू पण सह्रदय व साध्य – साधन विवेक मानणारा असला पाहिजे, असे ते मानतात आणि याची सुरुवात स्वत:पासून करतात.म्हणूनच अनेकदा त्यांच्यावर हल्ल्याचे प्रसंग येऊन ते डगमगलेले नाहीत, अंधश्रध्दा निर्मूलनाबाबतचा कायदा होण्यासाठी प्रयत्नशील राहताना ते थकले नाहीत. चळवळीतली आव्हाने स्वीकारताना ते कचरत नाहीत. त्यांच्या स्वभावातील ॠजुता, कोणालाही चटकन आपलेसे करण्याची वृत्ती त्यांच्याविषयी सर्वांना आदर बाळगायला लावते. कुठे एखादे शिबीर असेल तर ते स्वत: जातीने सर्व व्यवस्था बघतात. कार्यकर्त्यांबद्दलची काळजी वाहता वाहता, अगदी कार्यकर्त्यांच्या झोपायच्या व्यवस्थेपासून ते त्यांना नीट बस मिळाली आहे की नाही इथपर्यंतच्या गोष्टी ते स्वत: पाहतात. त्यांची स्कूटर ही त्यांच्या अथक धावपळीची साक्षीदार आहे . कार्यकर्त्यांच्या मनात आलेला चळवळीविषयीचा विश्र्वास हा त्यांनी आपल्या स्वत:च्या वागणुकीतून निर्माण केलेला आहे, याची कार्यकर्त्यांना जाणीवही होऊ नये, इतके दाभोळकर त्या माणसांत बुडून गेलेले असतात. म्हणूनच त्यांच्या सहवासात राहिलेला माणूस हा त्यांचा बनतो. त्याच बळावर तर ते पिशवी काखोटीला मारून किंवा एखादी बॅग घेऊन महाराष्ट्रभर फिरू शकतात. कारण त्यांनी अनेक माणसे नकळत जोडलेली असतात. त्यांचे कार्य समिती आणि घर असा फरक करत नाही. म्हणूनच त्यांची पत्नी हौसा त्यांच्या कार्यात सारखा वाटा उचलते. त्यांच्या मुलांची, मुक्ता व हमीद ही नावे त्यांनी काही मुद्दाम क्रांती करण्यासाठी वगैरे रचलेली नसून ती त्यांच्यात मुरलेल्या चळवळीतून सहजतेने आलेली आहेत. दाभोळकर यांना माधवराव बागल विद्यापीठाचा भाई माधवराव बागल पुरस्कार, तसेच महाराष्ट्र फाउण्डेशनचा समाजकार्य पुरस्कार लाभला आहे.

एकूणच, दाभोळकरांचे आयुष्य ही अंधश्रध्दा निर्मूलनाची चळवळ बनलेले आहे. आणि प्रशंसनीय गोष्ट ही, की त्यांनी स्वत:चे भक्त किंवा अंधानुयायी निर्माण केलेले नाहीत. जे कार्यकर्ते या चळवळीत सहभागी होतात ते स्वत:ला पटणा-या विचारांसाठी, ध्येयाच्या दिशेने पुढे वाटचाल करतात. म्हणूनच ही चळवळ एकट्याची तंबू बनलेली नाही.

वेगवेगळया समस्यांवरच्या चळवळींना लोकपाठिंबा मिळू शकतो. पण अंधश्रध्दा निर्मूलनाकडे अजूनही देव-धर्मविरोधी चळवळ म्हणून काहीसे संशय व संभ्रमाने पाहिले जाते. त्यात स्वत:ला बापू, महाराज म्हणवणारे अंधश्रध्दा निर्मूलनाच्या नावाखाली भोंदुपणा जोपासत त्या गोंधळात भर घालतात. अशा वेळी विवेकनिष्ठ दृष्टिकोनाचा झेंडा बळकटपणे वाहून नेण्याचे कार्य, ही चळवळ लोकमानसात रुजवण्याचे काम दाभोळकरांनी केलेले आहे.

About Post Author

11 COMMENTS

 1. This article is insightful
  This article is insightful and inspiring. He very aptly defined the dividing line between Shradha and Andha Shradha. Rationalism must have human-touch.
  Thanks for thinkable material.
  The site is now more interesting than before and not just entertaing.

 2. dr dabholkaransarkhi
  dr dabholkaransarkhi vaicharik manse chalvlitun vichar deun jatat te atmsat karun tyancha vichar jivant thevla pahije

 3. ya maharashtratach dobhilakar
  ya maharashtratach dobhilakar panasare yana golhya maranyat yetaat. ganghinahi maranara godase maharashtriy hota. sharamaechi baba aahe. biharala nave thevanyapeksha marathi manasane baghave savatakadae.

 4. Such an inspiring and
  Such an inspiring and dedicated personality. I would like to do something to help this movement grow. Who can I contact? I will appreciate any help.

 5. I would like to become a
  I would like to become a member and I tried to give my name and password but it was not accepted. What can I do to register?

 6. जय चंद्रा,

  जय चंद्रा,
  तुम्‍ही आम्‍हाला 9029557767 किंवा 022 24183710 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 7. डॉ नरेंद्र दभोलकरांचे विचार व
  डॉ नरेंद्र दभोलकरांचे विचार व कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या विवेकनिष्ठ विचारसरणीने मी अतिशय प्रभावित झालो आहे. नव्या पिढीने त्यांच्या विचारांचा अभ्यास करावा.

 8. Fight against superstition
  Fight against superstition has been admirable. It is great work in aspect of human life and scientific approaches.we always miss to Dr. Narendra dabholkar sir

Comments are closed.