ऋतुरंगकार अरुण शेवते

2
46
_Arun_Shevate_1.jpg

अरुण शेवते यांचा पिंड कवीचा. मात्र ते लेखक व संपादक म्हणून अधिक परिचित आहेत. त्यांना त्यांच्या कविमनाचा उपयोग विविध कल्पना सुचण्यात होत असावा! त्यांनी संपादनाचे प्रत्यक्ष काम करताना मात्र कल्पनारम्यतेच्या पलीकडे वास्तवाशी, जगण्याशी भिडणारे विषय घेतले आणि ते विविध अंगांनी विकसित करत नेले. त्यामुळे त्यांच्या कल्पना लेखकांनी शब्दबद्ध केल्या तेव्हा त्या लोकांना प्रिय वाटल्या आणि शेवते रसिकजनांचे लाडके होऊन गेले. त्यांच्या ‘ऋतुरंग’ दिवाळी वार्षिक अंकाच्या प्रकाशनाला १९९३ साली आरंभ झाला. तेव्हापासून हा सिलसिला जारी आहे. त्यांनी त्या अंकापासून ते या वर्षीच्या रौप्यमहोत्सवी अंकापर्यंत पंचवीस वेगवेगळे विषय हौशी व मान्यवर लेखकांच्या लेखनाच्या माध्यमातून सादर केले ते त्यांचे संपादनकौशल्य लोकांच्या लक्षात राहवे असेच आहे.

‘ऋतुरंग’च्या रौप्यमहोत्सवी अंकाचे प्रकाशन मुंबईत समारंभपूर्वक व आस्थेवाईकपणे झाले. रवींद्रचे मिनी सभागृह गर्दीने ओसंडून वाहिले. त्याच वेळी शेवते संपादित ‘आठवणींचे असेच असते’ या पन्नासाव्या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. कवी-लेखक-दिग्दर्शक गुलजार, राजकारणी नेते सुशीलकुमार शिंदे व यशवंतराव गडाख आणि वृत्तपत्र व वृत्तवाहिन्या यांचे संपादक गिरीश कुबेर, राजीव खांडेकर व उदय निरगुडकर हे मातब्बर त्या वेळी मंचावर उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमास वेगळी झळाळी प्राप्त झाली होती; त्याचबरोबर काही महत्त्वाची आणि आशयपूर्ण निवेदने ऐकायला मिळणार अशी अपेक्षाही तयार झाली. शेवते यांचे पन्नासावे पुस्तक ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केले आहे. तेव्हा मंचावर ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकरही उपस्थित होते. सुदेश यांनी त्यांचा व अरुण शेवते यांचा स्नेहबंध उलगडून सांगितला. त्यामधून शेवते यांच्या रसिक मनाचा व स्नेहशील वृत्तीचा प्रत्यय आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुण्याचे कवी उद्धव कानडे यांनी केले. उद्धव कानडे मुंबईकरांना फारसे परिचित नव्हते, पण त्यांनी योग्य व समर्पक टिकाटिप्पणी करत आणि व्यासपीठावरील मान्यवरांविषयीचा आदर योग्य दर्शवत सभासंचालन केले. 

अरुण शेवते यांची खासीयत अनवट विषय आणि अनवट लेखक शोधणे ही! त्यांना विषयाची निवड कशी करावी आणि तो कोणी व कसा मांडावा याची जाणीव बहुधा उपजत आहे. त्यांच्यात ते साध्य करण्यासाठी लागणारी चिकाटी, स्पष्टता आणि ठामपणा यांचा मिलापही आहे. त्याला जोड आहे ती त्यांच्या स्वभावलाघवाची. त्यात जणू चुंबकत्व आहे. त्यातूनच शेवते यांनी विविध क्षेत्रांतील नामवंतांचे मैत्र मिळवले. त्याचा उल्लेख मंचावरील प्रत्येकाने केला. ते मैत्र निखळ आहे हे आवर्जून नमूद केले. शेवते ‘ऋतुरंग’ वार्षिकाचा व प्रकाशनाचा व्यवहार एकहाती करतात. त्या कौशल्याचे कौतुक करणारे जसे आहेत, तसेच त्यांना ‘हे जमते कसे?’ असा विषाद करणारेही आहेत; मात्र शेवते ही एक संस्था बनून गेली आहे व तिला लोकाश्रय मिळत आहे याचा प्रत्यय समारंभात वारंवार येत होता. ‘राजाश्रय-लोकाश्रय’ हा इतिहासकाळापासून आजच्या ‘इव्हेंट’च्या जमान्यापर्यंत सा-यांनाच मिळत आलाय; त्यातून सकस काय, हे जाणता येते व तेच टिकते. तरी त्याबाबत विचार करणारी मराठी वृत्ती मात्र गरीबच राहिली आहे!

_Arun_Shevate_2.jpgअरुण शेवते यांनी ‘नापास मुलांची गोष्ट’ हे पुस्तक प्रकाशित केले आणि तेव्हापासून ते संपादक-प्रकाशक म्हणून एका उच्च पातळीवर पोचले. त्या पुस्तकाच्या चाळीस आवृत्ती प्रसिद्ध झाल्या आहेत. ती संकल्पनाच अपूर्व आहे. त्यात नापास होऊन नैराश्य येणा-यांना उत्थानाची ताकद मिळावी हा हेतू आहे. त्या पुस्तकाचा गौरवाने व गमतीने उल्लेख करताना गुलजार म्हणाले, “बरं झालं, मी एकदा नापास झालोय. त्यामुळे मला आइनस्टाइन, महात्मा गांधी, सुशीलकुमार शिंदे आदींच्या पंक्तीत बसण्याचं भाग्य लाभलं.” त्यानंतर शेवते यांनी अनेक कल्पना पुस्तका-मासिका-समारंभांतून फुलवल्या. त्यामुळेच तर त्या समारंभास सौंदर्याचे व रसिकतेचे वलय लाभले होते. पण ते अधिकतर श्रोते-प्रेक्षकांच्या मनातच राहिले. वक्त्यांनी त्यांच्या भाषणांमधून ती उंची गाठली नाही. उलट, गुलजार व शिंदे यांच्या उपस्थितीने समारंभाचे शेवते हे आकर्षण चोरले गेले व ते गुलजार-शिंदे यांच्यावर जाऊन पडले.

गुलजार यांनी ‘ऋतुरंग’मध्ये वेळोवेळी लेख लिहिले. त्याबद्दल बोलताना त्यांनी शेवते यांच्याशी झालेली पहिली भेट सांगितली. त्या भेटीसाठी त्यांनी त्यांच्या घरी शेवते यांना सकाळी आठ वाजता बोलावले होते. गुलजार वेळेबाबत आग्रही आहेत. शेवते यांनी बरोबर आठच्या ठोक्याला त्यांच्याकडे हजेरी लावली. त्यांनी अंक व विषय याबद्दल गुलजार यांना माहिती दिली. त्या कवी-दिग्दर्शकाने शेवते यांच्यातील बुद्धिमत्तेची व स्वभावलाघवाची चुणूक अचूक टिपली आणि त्या दिवसापासून शेवते यांच्यासाठी गुलजार यांच्या घरात सकाळी आठची वेळ ही कायमची राखून ठेवली गेली! त्या दोघांमध्ये जे नाते निर्माण झाले त्याचे वर्णन कसे करणार? मराठी जगापुरते शेवते हे गुलजार यांच्यापर्यंत पोचण्याचा पूल बनून गेले आहेत.

शेवते यांनी बरीच पुस्तके लिहिली/संपादित केली आहेत. त्यांचे ‘साहेब संध्याकाळी भेटले’ हे यशवंतराव चव्हाण यांच्या उत्तरायुष्यात एका संध्याकाळी त्यांच्याशी दिल्लीत झालेल्या निवांत भेटीवर आधारित पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांची ‘पंतप्रधानांना पत्र’ ही दुष्काळपीडित शेतक-याची अवस्था मांडणारी व अस्वस्थ करणारी दीर्घ कविता पुस्तकरूपात वाचकांपर्यंत पोचली व वाचक हेलावून गेले. त्यांनी त्याचबरोबर ‘कालिंदी’ ही हृदयस्पर्शी कवितामालिकादेखील लिहिली आहे. अशी त्यांची पुस्तके काही तरी वेगळे सांगत राहिली आहेत. त्यांचे पन्नासावे (संपादित) पुस्तक समारंभात प्रकाशित झाले; मात्र अरुण शेवते यांची अशी विविध ग्रंथसंपदा असूनही समारंभात वक्त्यांकडून ‘नापास मुलांची गोष्ट’ या पुस्तकाव्यतिरिक्त कोणत्याही पुस्तकाचा उल्लेख झाला नाही!

समारंभात वक्त्यांमध्ये तीन संपादक होते. एरवी त्यांच्या माध्यमातून ठासून बोलणा-या त्या तिघांनी मितभाष्य केले. गुलजार व शिंदे यांच्या उपस्थितीत अधिक न बोलण्याचे औचित्य त्यामागे असेल- त्यांनी तसा उल्लेख केलादेखील, तरी अरुण शेवते यांची चिकाटी, त्यांचे विषय, अंकाचा साहित्यिक दर्जा, त्याचे संग्रहमूल्य यांचा उल्लेख करताना ते लोक तपशिलात थोडे बोलते तर रंगत वाढली असती आणि तो समारंभ शेवते व ‘ऋतुरंग’ यांच्यासाठी आहे याची जाणीव श्रोत्यांच्या मनी जपली गेली असती. खरे तर, गुलजार यांनी ते जाणले होते व त्यांच्या भाषणात ते म्हणालेदेखील, की ‘आज की शाम अरुण शेवते के नाम!’ राजीव खांडेकर यांनी आपण समारंभाला श्रोता म्हणून येऊ, पण वक्ता म्हणून मंचावर नको असे सांगितले होते, त्याचा उल्लेख अरुण शेवते यांनी त्यांच्या प्रास्ताविकात केला होता. तो धागा पकडून खांडेकर यांनी पुलंचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, “पु.लं. देशपांडे यांनी लिहिलंय, की दिल्लीला जायचं ते चांदणी चौकात करीमभार्इंकडे मटण-बिर्याणी खाण्यासाठी. म्हणजे मुंबईतून गाडीत बसायचं, नवी दिल्ली स्टेशनात उतरायचं ते थेट चांदणी चौकात जायचं, तिथलं मटण चापूनचोपून खायचं आणि त्याच क्रमानं परत मुंबईला यायचं, बाकी दिल्लीत काही नाही! माझा येथे येण्याचा बेत तसाच होता – मलाही इथं येऊन गुलजारसाहेबांचे हात हातात घ्यायचे होते. ते मी घेतले. त्यामुळे, खरे तर, मी जाण्यास मोकळा आहे. परंतु अरुण शेवते यांचा हृद्य सहवास मला गेल्या कित्येक वर्षांपासून लाभला आहे. तो कृतज्ञताभावही व्यक्त करायचा आहे असे म्हणून खांडेकर यांनी भावपूर्ण शब्दांत शेवते यांच्या रसिकतेचे व सर्जनशीलतेचे वर्णन केले. ‘झी २४ तास’चे उदय निरगुडकर यांनीही अरुण शेवते यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष सेलिब्रिटी वर्णनाच्या पसा-यात, तसेच पुसट स्वरूपात उल्लेखले. ते म्हणाले, की ‘ऋतुरंग’ची लोकप्रियता, वाचकप्रियता आणि दर्जा शेवते यांनी कायम राखला आहे. त्यांची कल्पकता लोकविलक्षण आहे. यावेळी बोलताना गिरीश कुबेर म्हणाले, अरुण शेवते यांची माणसे बांधण्याची शैली अनोखी आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात त्यांचा दूरध्वनी आला, की आता कोणत्या विषयावर लिहायचे या विचारातून मनात धडधड सुरू होते. ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकाचा सुवर्णमहोत्सवही असाच साजरा होईल. त्या कार्यक्रमास हिंदीतील बड्या वृत्तवाहिन्यांचे संपादक आणि स्वत: गुलजारही हजर असतील असा माझा विश्वास आहे. कुबेर यांनी ‘माझे मद्य जीवन’ या त्यांच्या ‘ऋतुरंग’मधील गाजलेल्या लेखाचा किस्सा सांगितला. तो लेख काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला. परंतु ते म्हणाले, त्यांना अजूनही त्या लेखाबद्दल पत्रे येतात. काल-परवा पुण्याहून चक्क एका ब्राह्मण माणसाचे पत्र आले आहे. त्यांनी म्हटले आहे, “मी स्वत: दारू पित नाही. तथापी, तुम्ही तत्संबंधी केलेले मार्गदर्शन फार महत्त्वाचे वाटत आहे.” असा ‘ऋतुरंग’चा महिमा!

‘ऋतुरंग’च्या पहिल्या दिवाळी अंकापासून मराठी दिवाळी अंकातील माझ्या सहभागाला सुरुवात झाली व तो प्रवास अव्याहतपणे सुरू असल्याचे सांगून गुलजार म्हणाले, “अरुण शेवते हे गेली पंचवीस वर्षें दरवर्षी नवीन विषय व संकल्पना घेऊन ‘ऋतुरंग’ प्रकाशित करत आहेत ही बाब कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे. मी रवींद्रनाथ टागोर यांचे एक पुस्तक वाचले आणि माझ्या आयुष्याला पहिली कलाटणी मिळाली. मला चित्रपट क्षेत्रात यायचे नव्हते, पण बिमलदा रॉय यांच्यामुळे चित्रपटासाठी पहिल्यांदा गीतलेखन केले, ती मिळालेली दुसरी कलाटणी. पुढे, मला पु.ल. देशपांडे, वि.वा. शिरवाडकर यांचा सहवास मिळाला. त्यांचे बोलणे, भाषणे ऐकली. शिरवाडकर यांच्या मराठी कवितांचा मी हिंदीतही अनुवाद केला. तो अनुवाद करणे म्हणजे स्वत:ला समृद्ध करणे होते. दिलीप चित्रे, अरुण कोलटकर आणि अन्यही मराठी कवींच्या कवितांचे वाचन झाले. त्यामुळे मराठी भाषा, मराठी भाषेचे सौंदर्य कळण्यास मदत झाली.” ‘म्हणून मी स्वत:ला मराठी समजतो’ असेही गुलजार म्हणाले. मी मराठीसह अन्य भारतीय प्रादेशिक व अन्य जागतिक स्तरावरील निवडक कवितांच्या हिंदी अनुवादाचे काम हाती घेतले आहे. तो प्रकल्प अंतिम टप्प्यात असून ते अनुवादित पुस्तक पुढील वर्षीं प्रकाशित होईल. त्या पुस्तकात तीनशेपासष्ट कविता असतील अशी माहिती गुलजार यांनी दिली. त्यांनी त्यांच्या भाषणाचा समारोप ‘आई’विषयी असलेल्या – ‘तुजको पेहेचानू कैसे, तुझको देखाही नही, धुंडा करता हू तुझे, अपने चेहरेमेही कही’ या कवितेने केले.

अरुण शेवते यांनी त्यांच्या प्रास्ताविकात समाजभान आणि आत्मभान यांना मोकळी वाट करून देण्यासाठी ‘ऋतुरंग’ हा दिवाळी अंक सुरू केला अशी माहिती दिली. गुलजारसाहेब यांनी त्यांच्या मराठी ओढीबद्दल सांगितले. माझी अरुण शेवते यांच्याशी ओळख झाल्यापासून मला मराठी साहित्याविषयी जाणून घ्यावेसे वाटू लागले आणि मी अरुण शेवते यांच्याकडून मराठी कविता समजून घेऊ लागलो. त्यात मी अमोल पालेकरपासून अमृता सुभाषपर्यंत अनेकांना पकडून मराठी साहित्य जाणून घ्यायचो (हे सांगताना त्यांनी मराठी कलाकार मला टाळू लागल्याचा उल्लेखही गमतीने केला. कारण मी त्यांना नवीन कविता ऐकवून काही शंका विचारीन!) मी इतकी वर्षे मराठी समजून घेण्याचा, आत रुजवण्याचा व त्यातील सौंदर्य अनुवादित करण्याचा प्रयत्न कसा करतोय हे सांगताना त्यांनी पु.ल. व सुनीताबाई करत असलेल्या काव्यवाचनांना हजेरी आवर्जून लावल्याची आठवण वर्णन केली. तरी ते प्रांजळपणे म्हणाले, की “मला मराठी बोलताना अजून संकोच वाटतो. मी शेवते यांच्याशी फोनवर थो़डे मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो.” त्यांनी समारंभात एखादे वाक्य मराठीत उच्चारले असते तर मजा आली असती!
– अरुण जोशी

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.