उमरा गावच्या उगम संस्थेचे बहुविध कार्य

1
62
-heading

‘उगम’ ग्रामीण विकास संस्था ही उमरा (तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली) येथील आहे. ती संस्था शाश्वत ग्रामीण विकासासाठी कार्यरत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील कुटुंबांना उपजीविका निर्मिती व प्रोत्साहन यांतून त्यांचा शाश्वत विकास करून आर्थिक व सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे हे संस्थेचे मुख्य कार्य आहे. संस्थेची स्थापना 15 जानेवारी 1996 रोजी झाली. संस्था सेंद्रीय शेती, पाणलोट क्षेत्र विकास, महिला सक्षमीकरण, पतपुरवठा, क्षमताबांधणी, कौटुंबिक हिंसाचार, आरोग्य, पर्यावरण शिक्षण, उपजीविका प्रोत्साहन, नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन अशा विविध विषयांमध्ये कार्य करते.

रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या अतिवापरामुळे जमीन नापीक होत आहे. एकेकाळी लाकडी नांगराने नांगरली जाणारी जमीन लोखंडी नांगराने नांगरली जाऊ लागली. परंतु, रासायनिक पद्धतीमध्ये वाढ झाल्याने जमीन कणखर झाली. आता, ती ट्रॅक्टरने नांगरली जाते; मात्र काही ठिकाणी ट्रॅक्टरनेसुद्धा नांगरणी होत नाही, म्हणून ‘उगम’कडून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी तीस गावांतील सातशेपन्नास शेतकऱ्यांना एकत्र आणून, त्यांना सेंद्रीय खते व औषधे तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. शेतकरी स्वतः शेतीसाठी लागणारी सर्व खते व औषधे तयार करतात व शेतीत नियमित वापरतात. सेंद्रीय खते तयार करण्यासाठी मुख्यतः शेतीतील काडीकचपट, शेण, गोमूत्र; तसेच, शेतीतील इतर संसाधने यांचा वापर केला जातो. सेंद्रीय खते, औषधे, रासायनिक खते व औषधे यांच्या तुलनेत दहा टक्के रकमेत तयार होतात. शेतकरी कमी रकमेमध्ये चांगले उत्पन्न घेत आहेत. तसेच, त्यांच्या शेतमालाला भावसुद्धा रासायनिक मालाच्या तुलनेत जास्त मिळत आहे.

सेंद्रीय पद्धतीमुळे धान्य विषमुक्त मिळते. ‘उगम’ संस्थेकडून हिंगोली जिल्हा परिषद परिसरात दर शुक्रवारी सेंद्रीय भाजीपाल्याचा आठवडी बाजार भरवला जातो. ‘उगम’च्या मार्गदर्शनातून निर्माण झालेला विषमुक्त भाजीपाला त्या बाजारामध्ये विक्रीसाठी वीस शेतकरी घेऊन येतात. तो उपक्रम आय.आय.आर.डी. संस्थेच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे. उपक्रमास प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळत आहे.

हे ही लेख वाचा –

कयाधू नदीकाठावर निसर्ग बहरला
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान
शहाजी गडहिरे – सामाजिक न्यायासाठी अस्तित्व

संस्थेच्या वतीने कयाधू नदी व ओढ्याकाठावरील गवताळ पट्ट्याच्या संवर्धनाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. कयाधू नदी काठावर मारवेल, पवना, जोंधळी व कुंदा अशा पोषक गवताच्या काही जाती आहेत. त्या गवतांचे प्रकार पशुधनासाठी पोषक आहेत, पण जमिनीची माती आणि कस टिकून ठेवण्यासाठीही पूरक आहेत. ‘उगम’ त्या प्रकल्पावर पाच वर्षांपासून कार्यरत असून; लोकांचे संगठन, त्यांचे मनपरिवर्तन, जाणीव जागृती या सर्व आघाड्यांवर सध्या काम सुरू आहे. शेतकरी थडीचा (नदीच्या काठावरील कुरण) वापर शेतीसाठी करायचे. त्यासाठी गवत नष्ट केले जायचे. पण हळुहळू मानसिकता बदलत आहे. त्यांना थडीचे महत्त्व पटले आहे. पशुधनासाठी चारा आणि दुग्ध व्यवसायातून उत्पन्न मिळू शकते हे त्यांच्या लक्षात आले आहे. ‘उगम’ त्यासाठी सामगा ते सोडेगाव अशा बारा गावांतून कार्यरत आहे.

-sendriy-bajarशेतकऱ्यांना पाटा वाटप (बावीस प्रकारची मिश्रित बियाणे) दरवर्षी केले जाते. पाट्यामध्ये बावीस प्रकारच्या बियाण्यांचा समावेश असतो. ते सर्व बीज खाद्यपिकांचे असते. शेतकरी मुख्य पिक घेतात त्याच पिकामध्ये एक पाटा टाकला जातो. त्याचा मुख्य उद्देश आहे, की एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रित करणे. जेव्हा मुख्य पिकावर कीड पडते तेव्हा पाट्यावर मोठ्या प्रमाणात फुले असतात. त्यामुळे मुख्य पिकावरील कीड ही पाट्याकडे आकर्षित होते, त्यामुळे मुख्य पिकाचे नुकसान होत नाही. पाट्यामध्ये बावीस प्रकारचे बियाणे असल्याने प्रत्येक दिवशी ताजा व वेगवेगळा आहार मिळतो. त्यामुळे अन्नातील विविधता वाढते. पाट्यातील अन्नाच्या सेवनामुळे महिलांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे. पाट्यामुळे शालेय विद्यार्थी शेतात चवळी, शेळणी, काकडी, मका अशी खाद्य पिके खाण्यासाठी जातात. त्यामुळे त्यांना शेतीची आवड निर्माण होते. तेथे पक्षी, कीड व फुलपाखरेही पाहण्यास मिळतात.

शिक्षण शाळेत किंवा पुस्तकांत मिळते असे नाही, मात्र शिक्षणाचा केंद्रबिंदू शाळा व पुस्तक होय. पुण्याच्या पर्यावरण शिक्षण केंद्राच्या मदतीने पर्यावरण आधारित शिक्षण ‘उगम’ संस्थेकडून वीस शाळांत पाच वर्षांपासून शिकवले जात आहे. ‘उगम’ने वीस शाळांमधून पर्यावरण शिक्षणाच्या तासिका सुरू केल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांना फळझाडे, फुलझाडे, विविध पारंपरिक बियाणे, पशू, पक्षी, प्राणी, परिसर स्वच्छता, आरोग्य यांबाबत खेळ, प्रश्नमंजुषा या माध्यमांतून शिक्षण दिले जात आहे. त्यात वृक्षसंवर्धन, पाण्याचा योग्य वापर याचेही महत्त्व सांगितले जाते.

मुलांना बीज संकलन करणे, आजोबा पंधरा वर्षांचे असताना त्यांचा आहार काय होता, वडील पंधरा वर्षांचे असताना त्यांचा आहार काय होता, मुलाचा पंधरा वर्षांचा आहार काय आहे? त्यातून अन्नातील जैवविविधतेचा अभ्यास होतो, शाळास्तरीय जैवविविधता कोपरा तयार करण्यात आला. त्यामध्ये स्थानिक व दुर्मीळ बियाणे संकलित केली आहेत. तसेच, ‘उगम’स्तरावर पिटारा तयार करण्यात आला आहे. पिटारा म्हणजे मुले शिवारफेरीसाठी आल्यानंतर त्यांच्यासाठी विविध वस्तू त्यात ठेवलेल्या असतात. त्यामध्ये कॅमेरा, दुर्बीण, तापमापी, मापे, पुस्तके, रानभाज्या, पिके, कीटक, दुर्मीळ प्रजातींचे फोटो अशा विविध घडीपत्रिका उपलब्ध आहेत. त्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पाणी तपासणे, रोपे तयार करणे, चौरस पद्धतीने गवत मोजमाप करणे, पक्षी ओळखणे असे विविध उपक्रम, शिवार फेरी, चर्चा व प्रात्यक्षिके यांच्या माध्यमातून शिकवण्यात येत आहेत. शिकवणीसाठी पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

-kukuutpalanबीज संकलन हा शाळेचा उपक्रम आहे. त्यासाठी मुलांच्या स्पर्धा घेण्यात येतात. जो विद्यार्थी सर्वात जास्त बीज संकलन करेल त्याला बक्षीस दिले जाते. बीज संकलनातून विषय अभ्यास कसा केला जातो? तर –
– बीज संकलन करण्यासाठी मुले शेतात फिरतात तेव्हा शारीरिक शिक्षण होते.
– कोणत्या झाडाचे बीज किती आहे हे जेव्हा मोजतात तेव्हा ते गणित शिकतात.
– जेव्हा बियांचा आकार समजतात तेव्हा भूमिती शिकतात.
– ती बीजे कोणत्या भागांतून/ टापूतून आणली आहेत त्यावरून भूगोल शिकतात.
– बीज कोणत्या ऋतूत लागवड करतात तेव्हा ते विज्ञान शिकतात.
– बियांची नावे काय आहेत ते त्यावरून भाषा शिकतात.

महिलांचे सक्षमीकरण होऊन त्यांचा सहभाग ग्रामविकासात वाढवावा या हेतूने ‘सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट’च्या माध्यमातून बचत गटांच्या महिलांना सहज कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तो पूर्णतः महिलांनी चालवलेला मायक्रो फायनान्स आहे. त्यात महिलाच चेअरमन, महिलाच अध्यक्ष आहेत. साडेचार हजार महिलांनी तो आर्थिक डोलारा उभा केला आहे. त्यातून वार्षिक पाच कोटींची उलाढाल होत असते. म्हणजेच व्ही डी सी (Village Development Committee ) असून क्लस्टर असोसिएशनमध्ये पंधरा ते वीस गावांचा समावेश असतो. तो उपक्रम पाच जिल्ह्यांत असून त्या पाच जिल्ह्यांच्या उपक्रमावर ‘अनिक मायक्रो फायनान्स’चे नियंत्रण आहे. त्यात कर्जफेडीचे प्रमाण चांगले आहे. महिलांचे आर्थिक व्यवहार योग्य कारणासाठी आणि काटकसरीचे नियोजनबद्ध असतात हे सिद्ध झाले आहे. काही महिला बचत गटांनी पाच ते सहा वेळा कर्ज घेऊन वेळेपूर्वीच कर्जफेड करून दाखवली आहे.

मुंबईच्या ‘इडलगिव्ह फाउंडेशन’च्या वतीने दुष्काळावर मात करण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवण्यात आला आहे. माथा ते पायथा हीदेखील दुष्काळ निवारण निगडित संकल्पना असून आमदरी आणि तेलंगवाडी या गावांत तो उपक्रम राबवला जात आहे. तो भाग आदिवासी वस्तीचा आहे. दोन वर्षांच्या काळात आमदरी गावात नव्वद टक्के पाणलोट भाग विकासात्मक कामांतून पाण्याखाली आला आहे. आमदरी गावामध्ये एकेकाळी ऐंशी टक्के कुटुंबे स्थलांतरित होत होती, ती संख्या दहा टक्क्यांवर आली आहे. आमदरी गाव करटुले व सीताफळ यांसाठी प्रसिद्ध आहे. पाणीपातळी वाढल्याने स्थानिकांना शाश्वत उपजीविका मिळालेली आहे.

-pataआमदरी गाव हे पाणलोट क्षेत्र विकासाच्या अंगणी आदर्श गाव आहे. हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख नदी कयाधू मृत होत आहे. एकेकाळी बारमहा वाहणारी ती नदी फक्त पावसाळ्यात वाहते. कयाधू नदी पुन्हा वाहती करण्यासाठी प्रयत्न सुरू असून ‘उगम’ने शंभर जणांसमवेत शंभर किलोमीटर अंतराची पायी दिंडी काढली होती. तसेच, एक हजार एकशे पंच्याहत्तर किलोमीटर अंतराच्या लहानमोठ्या ओढ्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये सध्याचा जलसाठा, भविष्यकालीन जलसाठा, पाणलोट क्षेत्र विकासाचे झालेले रचनात्मक कार्य व भविष्यातील रचनात्मक कामे असे एकशेएकतीस गावांचे नकाशे तयार केले आहेत.

‘उगम’ संस्था वाशीम जिल्ह्यातील आठ गावांतही कार्यरत आहे. त्यामध्ये पाणलोट क्षेत्र विकासासाठी सिमेंट नाला बांधणी, शोषखड्डे, सौरदिवे, दशपर्णी अर्क, शिवांश खत, शाळा दुरुस्ती, हँड वॉश स्टेशन, जलशुद्धीकरण यंत्र, महिला बचत गट बांधणी, उपजीविका निर्मिती, आरोग्य शिबीर, पशू आरोग्य शिबिर अशा प्रकारची कामे राबवण्यात येत आहेत. ‘उगम’ संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष जयाजी पाईकराव आहेत. त्यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्था, (मुंबई) येथून एमएसडब्ल्यूचे शिक्षण पूर्ण केले आहे, तर संस्थेचे प्रकल्प संचालक सुशांत पाईकराव आहेत आणि प्रकल्प समन्वयक म्हणून विकास कांबळे कार्यरत आहेत. संस्थेमध्ये एकूण पासष्ट प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

– विकास कांबळे 7722048230
kamble358vikas@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. उगम संस्थेच्या कार्यास…
    उगम संस्थेच्या कार्यास शुभेच्छा.

Comments are closed.